आईपणाची ही दुसरी बाजू माहिती आहे का?

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या नातीने अलीकडेच आत्महत्या केली. पेशाने डॉक्टर असलेल्या सौंदर्या यांच्या आत्महत्येमागचे कारण होते नैराश्य. नैराश्याचे ही अनेक प्रकार आहेत. त्यातीलच एक प्रकार म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन (Postpartum Depression). बहुतांश महिलांना डिलिव्हरी नंतर नैराश्य येते.

खरे तर आई होणं म्हणजे आनंदाची पर्वणी. अशा आनंदाच्या क्षणी कुणी निराश कसे राहू शकेल असा प्रश्न निर्माण होत असला तरी हे अनेक महिलांना अशा प्रकारचे नैराश्य सतावते आणि यातून त्यांच्या हातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले जाऊ शकते.

 

Image source Google

पण, पोस्ट पार्टम डिप्रेशन म्हणजे नेमके काय? ही अवस्था नेमकी कशामुळे निर्माण होते? याची लक्षणे कशी ओळखावीत अशा काही प्राथमिक प्रश्नाबाबत आज या लेखात चर्चा केली जाणार आहे.

 

डिलिव्हरी नंतर महिलांच्या शरीरात जे हार्मोनल बदल होत्यात त्याचा तर यात मोठा वाटा आहेच पण अचानक बदलेले वेळापत्रक, बाळाशी जुळवून घेण्यात, त्याची देखभाल करण्यात येणाऱ्या अडचणी, जोडीदाराला वेळ न देता येण्याचे दडपण, अशा अनेक कारणांमुळे हे नैराश्य येऊ शकते.

 

बाळंतपणानंतर शरीरातील संप्रेरकांचा स्तर बदलतो, शिवाय शारीरिक थकवाही असतोच, त्यामुळे किमान दोन आठवडे तरी स्त्रियांमध्ये थोडा मानसिक तणाव दिसून येतो पण, त्यानंतर हा तणाव आपसूक निवळतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त आणि अधिक तीव्र तणाव असेल तर मात्र हे काळजीचे कारण ठरू शकते.

 

बाळाच्या जन्मानंतर आईला आपल्या शरीरातील बदलांशी आणि बाळाशी दोघांशीही जुळवून घेण्याची कसरत करावी लागते. यात तिचा चिडचिडेपणा वाढू शकतो, विनाकारण रडावेसे वाटणे, आनंद होणे असे सतत मूड बदलत राहतात. ५० ते ७५% स्त्रियांना हे अनुभव येतातच. पहिल्या दोन आठवड्यात आईला बेबी ब्लूजचा त्रास होणे, सामान्य आहे. पण या नैराश्यामुळे जेव्हा रोजची दैनंदिन कामे करणेही अडचणीचे होऊन जाते, तेव्हा मात्र या अवस्थेला पोस्ट पार्टम डिप्रेशन म्हटले जाते.

 

बेबी ब्ल्यूज ही एक अशी मानसिक समस्या आहे, जी थोड्या कालावधीनंतर पुन्हा सुरळीत होऊ शकते. यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. पोस्ट पार्टम डिप्रेशनच्या बाबतीत मात्र असे होत नाही, इथे मानसिक समस्येने तीव्र रूप धारण केलेले असते आणि ही समस्या एका मानसिक आजारात परावर्तीत झालेली असते. नैराश्याच्या तीव्रतेवरूनच याची विभागणी करता येते.

 

गर्भावस्थेच्या काळात स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या प्रजनन संप्रेरकांची पातळी वाढलेली असते. बाळंतपणानंतर ३ दिवसातच ही संप्रेरके पुन्हा सामान्य पातळीवर येतात. यामुळे त्या स्त्रीला शारीरिक आणि मानसिक पातळीवरही खूप मोठ्या बदलला सामोरे जावे लागते. हा बदल सहजरित्या पचवता आला नाही तर मनासिक समस्या निर्माण होऊ शकते. शरीरातील या रासायनिक बदलासोबतच आईपणात काही मानसिक आणि सामाजिक बदलही घडून येतात. अपत्याच्या जन्मानंतर होणारे हे बदल नैराश्याला कारणीभूत ठरू शकतात. प्रत्येक दहापैकी एका स्त्रीला बेबी ब्ल्यूजची समस्या येऊ शकते तर एक हजार स्त्रियांपैकी किमान एका स्त्रीला तरी पोस्ट पार्टमची समस्या सतावू शकते.

 

अर्थात फक्त आईच नाही तर बाबादेखील या समस्येला बळी पडू शकतात. आईच्या वागण्यात झालेल्या बदलाचे परिणाम संपूर्ण कुटुंबावर होण्याची शक्यता असतेच. त्यामुळे पुरुषांच्यात ही समस्या जाणवतच नाही असेही नाही.

 

या नैराश्याची लक्षणे ओळखणे तसे खूपच अवघड आहे तरीही पुढील लक्षणे असतील तर समुपदेशकांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं होईल.

१)      झोप न येणे

२)     भूक न लागणे

३)      अतिशय थकवा जाणवणे,

४)     कामेच्छा नसणे

५)     सतत बदलणारे मूड

यासोबतच आणखीही काही लक्षणे आहेत ज्यामुळे पोस्ट पार्टमची समस्या अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.

बाळाबद्दल प्रेम न वाटणे, त्याच्याबद्दल कसलीच आस्था वाटत नाही.

काहीही कारण नसताना सतत रडू येणे

सतत खराब मूड

अधिकाधिक राग येणे

तापटपणा वाढणे

     कशातच आनंद न वाटणे

     निर्णय घेण्यात अडचणी येणे, एकाग्रता न होणे

स्वतःला किंवा बाळाला काही तरी इजा करण्याचे विचार मनात येणे, बाळाच्या आरोग्याबाबत मनात विनाकारण धास्ती निर्माण होणे, अशीही लक्षणे आढळून येतात.

अशावेळी त्या स्त्रियांना समुपदेशकांच्या मदतीची तर गरज असतेच शिवाय, कुटुंबियांच्या मदतीचीही गरज असते.

 

आधीच मानसिक तणावात असणाऱ्या व्यक्तीबाबत हा धोका जास्त वाढतो.

 

फक्त पहिल्या खेपेसच हा धोका निर्माण होऊ शकतो असे नाही तर दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेसही अशाप्रकारचे नैराश्य येऊ शकते. उलट जितक्या वेळा तुम्ही या अनुभवातून जाल तितकाच हा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा मुलासाठी म्हणून एक दोन तीन डिलिव्हरीचे चान्सेस घेतले जातात. पण यामुळे त्या स्त्रीच्या मानसिक, शारीरिक आरोग्याला निर्माण होणाऱ्या धोक्याचा विचार केला जात नाही. कमी वयात मातृत्व आले असेल तर, नैराश्य (postpartum dipression) येण्याची शक्यता अधिक असते.

 

अशावेळी स्त्रियांना समुपदेशनासोबतच औषधांचीही गरज असते. नैराश्याच्या तीव्रतेवरून डॉक्टर उपचारांची रूपरेषा ठरवतात. गरज असेल तर अशा रुग्णांना दवाखान्यात भरती करावे लागते. बऱ्याचदा अशा रुग्णाकडून स्वतःच्या किंवा इतरांच्या जीवाला धोका पोहोचेल असे कृत्य करण्याची होण्याचीही शक्यता असते.

 

या रुग्णांना वेळीच उपचार मिळाले नाही तर, ते कायमचेच निराश, उदास आणि हताश व्यक्तीत परावर्तीत होतात. त्यांना कुठल्याच गोष्टीतून आनंद मिळत नाही. आनंदी कस राहायचं हेच ते विसरून जातात. ज्यामुळे त्यांना एकटेपणाही येऊ शकतो.

 

त्यामुळे ही लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार करण्याची नितांत गरज असते.

 

घरात एक नवा पाहुणा येणं हा प्रत्येक कुटुंबियांसाठी अत्यंत खास आणि आनंदाचा क्षण असतो, पण होणाऱ्या आई-बाबांची मानसिक आणि शारीरिक सक्षमता खूप महत्वाची आहे.

मेघश्री श्रेष्ठी

Post a Comment

1 Comments

आई होणे जितके आनंददायी तितकेच जबाबदारीचे आहे ,त्यामुळे स्त्रिया अतिशय हळव्या होतात ,खूप छान मांडले गेले आहे लिखाणातून