तुमची भीती हाच तर तुमच्या मार्गातील मोठा अडथळा नाही ना!

एखाद्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी, एखादी नवे कौशल्य शिकण्यापूर्वी, एखादी नवी कल्पना सत्यात उतरवण्यापूर्वी, आपल्या मनात बरेच प्रश्न थैमान घालत असतात. आता हे मला जमेल का? मी ठरवतोय तसं नाही घडलं तर? आता याचा काही फायदा होईल का? इतका वेळ देणं शक्य होईल का? असे असंख्य प्रश्न कुठून उगम पावतात माहितीये?

 

Image source : Google

आपलं रुटीन लाईफ सोडून आपण काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपलं मन विनाकारण असहकार पुकारतं. का तर मनालानव्याने काही व्याप नको असतात. आहेत त्याचाच गुंता सोडवता सोडवता त्याला थकवा आलेला असतो. मग मन अनेक करणं द्यायला सुरुवात करतं. त्यातूनच आपल्या मनात यशाबद्दल संभ्रम आणि अपयशाची भीती बसते.

अपयशाची ही भीती सर्वांनाच वाटत असते पण, या अपयशाच्या भीतीवर मात करण्यासाठी काही तरी केलं पाहिजे. जेणेकरून आपणच आपले पाय मागे खेचतोय असे होणार नाही.

 

यापूर्वी आपण कधी केलय का असलं काही? नाही ना? मग आत्ता अचानक उठून काहीही करण्यात काय हाशील आहे? आपल्याला इतकी धावपळ दगदग झेपणार नाही. घर सोडून जायचं पण, मग घरच्या जबाबदाऱ्या कोण बघणार? अशी असंख्य कारणं देत आपण आज नाही उद्या बघू करत, वेळ मारून नेत असतो. पण, मारून नेलेला हा वेळ नंतर पश्चाताप करण्यास भाग पडतो हे नक्की.

 

ध्येयं आणि स्वप्नं पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ कधीच येत नसते, जी वेळ हातात असते तिचाच योग्य वापर करायचा असतो. त्यासाठी मनातील भीती आधी काढून टाकली पाहिजे. कम्फर्ट झोन सोडणं सगळ्यांनाच अवघड जातं, पण कधी तरी तो सोडावाच लागतो.

 आपली भीतीच आपल्या धेयायापेक्षा मोठी असेल तर, शत्रूची गरजच काय!

म्हणूनच या लेखात कम्फर्ट झोन सोडून, आपल्या भीतीवर मात कशी करता येईल याबद्दल आपण काही मुद्दे बघणार आहोत. माझ्याप्रमाणेच तुम्हालाही या मुद्द्यांचा फायदा होईल, याची मला खात्री आहे.

 बऱ्याचदा आपण आपल्या ध्येयापासून भरकटले जातो. आपले ध्येय काय आहे याबद्दल पुरेशी स्पष्टता नसते आणि मग गोंधळ होतो. म्हणून आधी कागद पेन घेऊन किंवा laptop समोर ठेवून तुमचे निश्चित ध्येय काय आहे ते लिहून काढा. अनेकदा लिखाणाचा कंटाळा येतो, किंवा असलं काही करून काय फरक पडणार अशा विचाराने आपण हे टाळतो. पण, जर आपले चित्रच सुस्पष्ट नसेल तर आपण रंग भरणार तरी कसे? ही स्पष्टता येण्यासाठी म्हणून हे लेखन करणं आवश्यक आहे. आपल्याला हे ध्येय का गाठायचं आहे? यातून काय साध्य होणार? या प्रश्नाचंही उत्तर आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आपल्याला काय केल्याने काय मिळणार आहे? हे जर माहिती असेल तरच आपले मन त्याकडे ओढ घेते. एकदा का हे चित्र सुस्पष्ट झाले की मग आपल्याला ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा बाऊ वाटत नाही.

 

२) भीती ओळखा – आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते आणि त्याचे मूळ कुठे दडले आहे हे ओळखा. तुमचा आत्मविश्वास कमी पडतो का? स्वतःचीच खात्री वाटत नाही का? लोकं काय म्हणतील? या विचारात तुमचे मन अडकले आहे का? भीती कुठून आली याचा शोध घेण्यासाठी ही सगळी प्रश्ने तपासून त्याची उत्तरे लिहून काढली पाहिजेत. भीतीचे नेमके स्वरूप स्पष्ट झाले तरच आपण त्याला मुळातून उपटून टाकू शकतो.

३) मनस्थिती बदलण्याचा प्रयत्न – नकारात्मक विचारांच्या जागी जाणीवपूर्वक सकारात्मक विचार पेरता आले पाहिजे. स्वतः च्या क्षमतांवर विश्वास ठेवून सुरुवात केली की, ध्येय गाठण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. आपण आपले ध्येय गाठले आहे, ध्येयापर्यंत पोहोचलो आहोत, आपले सगळे प्रयत्न सार्थकी लागले, आपण घेतलेले निर्णय अचूक आहेत, हे आपल्या मनावर कल्पनेतून ठसवत राहायचे.

४) महत्वाचे म्हणजे कृती – ज्याची भीती वाटते म्हणून आपण हातपाय गुडघ्यात घेऊन बसतो तीच गोष्ट करायला घ्या. स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडायला शिकलं पाहिजे. निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करतना काही वेळेस अपयश आलं तरी ती देखील अंतिम यशापुर्वीची एक पायरीच असते. निर्णय चुकले तरी स्वत:वरचा विश्वास कमी होऊ देऊन चालत नाही. चुकलेली गणितं पुन्हा जुळवता येतात. त्यातून काही शिकता येतं, स्वतःला पुढे नेता येतं. स्वतःत बदल करता येतात.

५) तुलना नको – इतरांना यश मिळतं मग मलाच का नाही? त्यांच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना करता येत नी. कुणाशीच तुलना करत बसण्यात काही अर्थ नाही. आपला रस्ता वेगळा त्यांचा रस्ता वेगळा. इतरांच्या आयुष्यातील यश जसं लख्खपणे दिसतं तसा त्यांचा संघर्ष दिसत नाही किंवा जाणवतही नाही. उलट ही तुलना आपल्याला नकारात्मक बनवू शकते. आपल्याला आपण निवडलेल्या रस्त्यानेच चालायचं आहे, कदाचित आयुष्याने आपल्यासाठी या रस्त्यावर काही विशेष भेट ठेवली असेल, असा विश्वास ठेवून फक्त चालत राहायचं.

इथे फक्त स्वतःवरचा विश्वास पक्का ठेवणं जास्त महत्वाचं आहे.

विश्वास पक्का होण्यासाठी आपल्या चुकांतून शिकता येणं गरजेचं आहे, एकदा का आपल्या चुकांतून आपल्याला शिकता आलं की मग कसलीच भीती राहत नाही. ना अपयशाची, ना लोक काय म्हणतील याची, ना चुकण्याची!

Post a Comment

0 Comments