तुम्हाला जखडून ठेवणाऱ्या या बेड्या तुम्ही ओळखल्या आहेत का?

आपली मानसिकता, आपला दृष्टीकोन, आपले विचार, या गोष्टींमुळे आपल्याला आपल्या ताकदीचा कधी अंदाजच येत नाही. मानसिक तणाव, विचारातील गोंधळ, नकारात्मक विचार, निराशा, राग या सगळ्यांचा आपल्या प्रगतीवर विपरीत परिणाम होत असतो. या सगळ्यांपासून स्वतःची सुटका करून घेणं तसं सोपं आहे. गरज आहे ती ठामपणे निश्चय करण्याची.

Image source : Google


दिवाळीच्या मुहूर्तावर घराची साफसफाई झाली असेल तर याच मुहूर्तावर एकदा अंतर्मनाची साफसफाई करून तिथे उर्जेचा, उत्साहाचा, दिवा लावण्याचा संकल्प करूया.


पहिली स्वच्छता करायची आहे ती, भीतीची. भीती कशाचीही असू शकते. अगदी लोक काय म्हणतील इथपासून ते आपल्याला जमलंच नाही तर? आपण अपयशी झालो तर? अशा कल्पनांनी मनात असा काही ठिय्या मांडलेल असतो की, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वीच काही लोक हातपाय गाळून बसतात. अपयश आले तरी कोणी तुम्हाला खाऊन टाकणार नाही. उलट त्यातून तुम्हाला नवीन काही तरी शिकायला मिळेल. म्हणून अपयश आले तरी त्याकडे एक धडा म्हणून पाहिल्यास त्याची भीती राहणार नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले जाते. पण जर या पायऱ्या सारख्याच येत असतील तर आपल्या पद्धतीत काही तरी चूक आहे ह नक्की. अपयश म्हणजे कोणताही बागुलबुवा नाही, ज्याला तुम्ही घाबरून राहिलं पाहिजे. त्याला आपला मित्र किंवा गुरु मानल्यास अपयशाची भीती राहत नाही. अपयशातून एक नवा रस्ता मिळू शकतो.

 

जगातील मोठमोठ्या लोकांनी आपल्या अपयशातून धडे घेतले आणि पुढची वाटचाल केली म्हणूनच ते यशापर्यंत मजल गाठू शकले.   


भीती वर मात करण्याची एक युक्ती आहे, ती म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट वारंवार करण्याचा प्रयत्न करणे. समजा तुम्हाला चार लोकांसमोर बोलण्याची भीती वाटते तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये, कुटुंबियांसमोर बोलण्याचा सराव करा. यामुळे तुमची भीती हळूहळू नाहीशी होईल.

 

ज्याची भीती वाटते तेच करणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही अचाट धाडस करून दाखवावं. उलट असे प्रयत्न करतानाही आजूबाजूची परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल असे पहा.

 

तुमचा आतला आवाज जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगेल हे तुला जमणार नाही तेव्हा त्याला तुम्ही प्रतिप्रश्न करा. का जमणार नाही? मी करून पाहीन मगच ठरविन. तुमच्या आतला आवाज हा तुमाच्यासमोरील अडथळा नव्हे तर तुमची प्रेरणा बनला पाहिजे. त्याचा तुमच्या अनुकूलतेनुसार वापर करून घ्यायला शिका. ज्या-ज्या गोष्टींविषयी तुम्हाला शंका वाटते त्या त्या गोष्टी अजमावून पहा. म्हणजे तुमच्यातील शक्तींचा तुम्हालाच अंदाज येईल.

 

नव्या गोष्टी शिकताना किंवा नव्या संकल्पनेला सुरुवात करताना, 'हे असच होणार,' असा कुठलाही पूर्वग्रह मनात ठेवणे धोक्याचेच ठरेल.  म्हणून आपल्या मनातील शंका-कुशंका, दृष्टीकोन, आपले समज एकदा तपासून पाहिले पाहिजेत. तुम्ही हातात घेतलेले काम हे तुमच्यासाठी चांगलेच आहे, पण इतर लोक त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात यावरून जर तुम्ही स्वतःच्या कामाचा आदर-अनादर करणार असाल तर हा दृष्टीकोन नक्कीच चुकीचा आहे.

 

आपल्या मनात अनेक नकारात्मक विचारांनी, दिशाहीन विचारांनी घर केलेले असते. या सगळ्यातून सुटका करून घेतल्यानंतर आता  आपल्या मनाची पुनर्रचना करावी लागेल, जी सकारात्मक दृष्टिकोनावर आधारलेली असेल. मनाचे री-प्रोग्रॅमिंग करावे लागेल. एकदा का आपल्याच मनातील नकारात्मक विचारांवर आपण मात करायला शिकलो की मग कोणतीच गोष्ट आपल्याला कठीण वाटत नाही.

 

आतापर्यंत तुम्ही जे मिळवले आहे, कमावले आहे, एकवार त्यावर गोष्टी डोळ्यासमोर आणा. तुमच्या ज्या इच्छा आहेत किंवा जी स्वप्ने आहेत ती मिळवण्यास तुम्ही पात्र आहात यावर विश्वास ठेवा आणि कामाला लागा. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यापासून आता तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही.


Post a Comment

1 Comments

खुप छान टिप्स.धन्यवाद,ताई!
पण आपला स्वभाव नैसर्गिक असतो
बदलायला अवघड असते.शुभ संध्याकाळ!
🌹🙏🙏🌹