साचलेल्या संवादाचं काय?


पंधरा दिवस झाले शहरात राहायला येऊन. अजून शेजार्यापाजार्यांची काहीही ओळख झालेली नाही. खरं तर कुठेही नव्या ठिकाणी रहायला गेल्या नंतर पहिल्यांदा ओळखीचे होतात ते दुकानदार! कारण गरज असते, दोघांनाही. आपल्याला आणि त्यांनाही! नव्या ठिकाणी आपुलकीने चौकशी करणारी हीच ती जमात! अजून काही लागणारे का? आपुलकीने विचारणारे...
दुसरे असतात चहा टपरीवाले किंवा नाष्टा सेंटर वाले आणि तिसरे रिक्षावाले... रस्त्यावरून जाताना तेही आपुलकीने विचारतात, "कुणीकडं जायचं...?
मग शेजारी पाजारी हळूहळू ओळखीचे होतात. तेही मोजकेच! पूर्वीच्या शहरात हा अनुभव आलाच आत्ताही येतोय... आणि तरीही शहराची भुरळ पडतेच!
गावाकडं कसं असतं, हातात बदली घेऊन निघालं तरी लोकं विचारतात..."काय झाडायला वाटतं?"
सगळी विचारपूस लागते तिथे, 'सून सकाळी किती वाजता उठते पासून म्हस लवकर पानावते कि न्हाई...' इथं पर्यंत कुठलाही विषय वर्ज्य नसतो...
पण इथे आमच्या कॉलनीत एक ताई आहे, जी पहिल्या दिवसापासून मला विचारते, "निघालीस एवढ्या लवकर?" मी हो म्हंटल की, वरून टाटा, बायबाय पण करते.
ती येता जाता सगळ्यांना बोलवत असते, पण काही लोक तिला प्रतिसाद देत नाहीत. वेडी समजतात बिचारीला!
हो कारण, शाहाणी लोकं असं कुणाचीही रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या, अनोळखी माणसाची चौकशी करत नाहीत. ते एकमेकांची प्रायव्हसी जपतात!
माझी एक मैत्रीण होती. शहरात राहणारी. ती घरातून बाहेर पडताना तिला कुणी विचारलं, 'काय फिरायला काय?', 'बाजाराला काय?', तरी तिला राग यायचा. म्हणायची, 'कित्ती चौकश्या करतात लोकं!'
म्हणजे असंही असतं!
विचारायची पण पंचाईत न विचारायची पण पंचाईत!
बस मध्ये वगैरे पण शेजारी बसलेल्या एखाद्या सहप्रवाशीला स्मित दिलं तर काहीजणी रिप्लाय देतात आणि काही खडकीकडे तोंड करून बसतात. ओळख होण्याची सुरुवात इथूनच तर होते. तुम्ही दिलेल्या पहिल्या स्माईलनं! पण त्यासाठी इच्छुक नसतात काही लोकं... इतकंच काय घरात आल्यावरही आभासी संवाद हवासा असतो पण... लाइव्ह संवाद हरवलेला असतो...
परवा बस मधून जाताना एक आजीबाई शेजारी येईन बसल्या... मी आधीच तोंड खडकीकडे केलेलं. सवयीप्रमाणे. आपल्याला तरी काय करायच्यात कुणाच्या चौकश्या...?
मग, त्या आजी स्वतःहूनच बोलायला लागल्या... माझ्याकडे पाहून हसल्या..मग मी पण हसले... बोलताना खूप हातवारे करत होत्या.... आपल्या जवळच्या माणसाशी कसं अगदी साळढाळ बोलतो तसं. जणू खूप खोल गुपित खी तरी त्यांना सांगायचं होतं... मी ऐकते किंवा नाही याच्याशी त्यांना काहीच देणंघेणं नव्हतं... त्या फक्त बोलत होत्या... कधी स्वतःशी कधी माझ्याशी... त्यातील काहीकाही शब्द मला कळत... काही कळत नव्हते..... मुळात त्या सगळ्या बोलण्याचा काहीहि सरळ सुरळीत अर्थ निघत नव्हता.
"काय पुरुष माणूस असलं घरात कि काय खरं नाही.... काय करल एकटी बाई... पोरांची शाळा सोडवली... नववीतच .... नववीतच... आत्तापास्न... पोरांनी काम करायचं... बाईला हलायला येत नाही... वाटी (घुडघ्याकडे बोट दाखवत) तुटलिया... यित न्हाई चालाय...सगळ जाग्याव... पोरास्नी वळण... चांगलं शिकवत नाही... ती बघ पोरगी.... जा तिच्या माग...मज्ज्या असती... आसं आसं... वळण लावत्यात...नववितन शाळा सोडली पोरांनी ...."  तोंडावर प्रचंड चिंता, भीती, खेद आश्चर्य सगळं होतं.... कांडेक्टरनी मला सांगितलं त्या म्हातारीला सांगा स्टॉप आला उतर म्हणावं... मी म्हंटल आजी उतरा  स्टॉप आला.
व्हय व्हय करत आज्जी उतरून गेली... उतरतानाही तिचा संवाद सुरूच होता...
कुणी ऐको न ऐको... कोणी प्रत्युत्तर देवो न देवो.... आपण बोलत राहायचं... एवढच तिला कळत असावं...
कारण संवादाची प्रचंड भूक होती तिला ... तिच्या अस्वस्थतेनं मलाही वेदना झाल्या पण तिला सांगू शकले नाही मी... तिलाच काय कुणालाच सांगू शकले नाही मी.

काही तरी सांगायचं होतं तिला... आणि ते कुणीतरी समजून घ्यावं असंही वाटलं असेल तिला सुरुवातीला... पण नंतर तिने समजून घेणारं कुणी भेटेल याची अशा सोडून दिली असावी.....
कुणीतरी आपल्याही आसपास असतातच असे जीव... संवादाचे भुकेले... पण आपल्याला वेळ नसतो... कान द्यायला.

शिवाय औपचारिकतेच्या चौकटीत बंदिस्त होतात काही गोष्टी.
मग ....
साचलेल्या संवादाचं करायचं काय?

मेघश्री.


Post a Comment

3 Comments