आजचा विद्यार्थी दिवस कुणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो आणि का?

आज १५ ऑक्टोंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दूल कलाम यांचा जन्मदिन. आजचा दिवस संपूर्ण जगभर विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. २००२ ते २००७ या कालावधीत डॉ. कलाम यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. या कालावधीत ते ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ओळखले जाऊ लागले.  

Image source : Google


त्यांची मेहनत, त्यांची तळमळ, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि दृढनिश्चय या सगळ्या गोष्टी पाहता डॉ. कलाम हे आधुनिक काळातील विद्यार्थ्यांसाठी एक मृतीमंत आदर्श आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपला ज्ञान दानाचा वसा सोडला नाही. कर्मरत राहणे म्हणजे काय हे त्यांच्या जीवन प्रवासाकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. असे कलाम सर संपूर्ण जगाला आदर्श वाटतात म्हणूनच संयुक्त राष्ट्राने त्यांचा जन्मदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला आहे.

 

डॉ. कलामांना शिक्षकांप्रती खूपच आदर होता. त्यांच्या मते शिक्षकच समाजाची उत्तम बांधणी करू शकतात. विद्यार्थी आणि राष्ट्र उभारण्याची क्षमता ही फक्त शिक्षकांच्यातच असते.

 

डॉ. कलाम हे आजच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीही आदर्शच राहतील. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव पडत असे. विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्यात शिक्षणविषयी ओढ, आदर आणि आसक्ती निर्माण व्हावी म्हणून कलामांनी शेवट पर्यंत प्रयत्न केले. म्हणूनच त्यांचा जन्मदिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हावा हाच त्यांचा उचित सन्मान ठरेल.

 

शिलॉंग मधील आयआयएम च्या विद्यार्थ्यांना लेक्चर देत असतानाच त्यांना मृत्यूने गाठले. त्यांना शिकवण्याची खूप आवड होती. ते विद्यार्थ्यांच्यात रमून जात. आपल्याला एक चांगला शिक्षक म्हणूनच ओळखले जावे अशी त्यांची इच्छा होती.

डॉ. कलाम यांनी चाळीसवर्षे डीआरडीओ मध्ये कार्य केले. यावर्षात त्यांनी भारताला क्षेपणास्त्र सज्ज बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली आणि आपले स्वप्न पूर्ण केले. त्यांनी भारताला अवकाश संशोधनात पुढे नेले. लढाऊ क्षेपणास्त्रांनी सज्ज केले. या सगळ्या त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ते नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. भारताला अण्वस्त्र सज्ज बनवण्यातही त्यांचा मोठा वाटा राहीला आहे. १९९८ साली भरतात जी पोखरणची दुसरी अणुचाचणी झाली त्यात कलामांनी अनन्यसाधारण योगदान दिले. अणुचाचणी ही काही सोपी गोष्ट नव्हती या कामासाठी लागणारे संघटन, तांत्रिक मदत आणि राजकीय हस्तक्षेप या साऱ्यांचा त्यांनी चांगला मेळ घातला.

त्यांना पद्म भूषण, पद्म विभूषण, भारतरत्न, वीर सावकार पुरस्कार आणि रामानुजन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

‘विंग्ज ऑफ फायर’ हे त्यांचे आत्मचरित्र चांगलेच गाजले. बहुतेक भारतीय भाषांतून त्याचा अनुवाद  झाला आहे. इग्नायटेड माइंड हे त्यांचे पुस्तकही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांचे फक्त लिखाणच नाहीतर एकूण जगणेच फार प्रेरणादायी होते.

डॉ. एपीजे कलाम यांना त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन!

Post a Comment

0 Comments