डेलीशियस चिकन देणाऱ्या लीसियशचा जन्म कसा झाला?

शनिवार किंवा रविवारचा दिवस म्हटले की, चिकन किंवा मटणची आठवण येतेच. एका सर्वेक्षणानुसार भारतात जवळपास ७३% लोक मांसाहार करतात. आता मटण किंवा चिकन आपण कसे आणतो? कसे म्हणजे काय, रविवारी सकाळी थोडं उशिरा उठून चिकन किंवा मटणाच्या दुकानात जायचे, तिथला दुकानदार आपल्याला हवे तेवढे मटण किंवा चिकन आपल्यासमोरच कापून वजन करून देतो मग ते आपण काळ्या कॅरीबॅगमधून घरी आणायचे. हो ना?

 

तुम्ही इतर कुठलाही किराणा जेव्हा खरेदी करायला जाता तेव्हा दुकानदार जे काही पुडीत बांधून देईल ते घेऊन येता का? नाही. अगदी साधा अंघोळीचा किंवा कपडे धुण्याचा साबण जरी आणायचा म्हटले तरी आपण आपल्या चॉइसने आणतो. कुणी व्हीलचा साबण वापरत असेल तर कुणी टाईडचा. ज्याच्या त्याच्या इच्छेचा विषय. पण मटण किंवा चिकनच्या बाबतीत मात्र आपल्या हाती असा चॉइस अजिबात नसतो. तो दुकानदार जे काही देईल तेच घेऊन यावे लागते.

 

चिकन-मटण म्हणजे अनेकांसाठी जीव की प्राण! आपण खातो ती ते चिकन-मटण कुठून येते. या कोंबड्यांना किंवा बकऱ्यांना काय खायला घातले जाते? अशी कुठलीही चिकित्सा करता येत नाही कारण, तशी सोयच नसते. मग त्या चिकन-मटणचा दर्जा कसाही असला तरी, त्याच्याशी तडजोड करत ते खावंच लागतं. मग ग्राहकांना जर दर्जेदार चिकन मिळाले तर...?

 

कल्पना तर खूपच चांगली आहे पण ते मिळणार कसे? या एका प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी म्हणून दोन तरुण एकत्र आले ज्यातून त्यांनी कोट्यावधी डॉलर्सची उलाढाल असलेली युनिकॉर्न कंपनी उभी केली आहे. कोण आहेत हे तरुण आणि त्यांनी नेमका यावर कोणता तोडगा काढला, जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख नक्की वाचा.

 

मांसाहारी पदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या दोन मित्रांचे नाव आहे अभय हंजुरा आणि विवेक गुप्त. सुरुवातीला जेव्हा अभयने ही कल्पना मांडली तेव्हा बाजारात ही कल्पना कितपत चालेल याबद्दल विवेकच्या मनात शंका होती. मात्र अभयने आपल्या मित्राची मनधरणी करून या उद्योगात उतरण्यास प्रवृत्त केले. एकत्र विवेक आणि अभय दोघेही शाकाहारी कुटुंबातील. नोकरी निमित्ताने जेव्हा दोघेही परदेशात गेले तेव्हा तिथल्या खानपान व्यवस्थेशी जुळवून घ्यायचे म्हणून मग मांसाहार सुरु केला. तेव्हा त्या दोघांनाही पहिली शंका ही होती की, या क्षेत्रातील आपल्याला फारशी माहिती नाही. दुसरा प्रश्न असा होता की, आजपर्यंत या क्षेत्रातील ही उणीव कुणाच्या का लक्षात आली नसेल? आपण काहीतरी असंबंध विचार तर करत नाही ना? तरीही दोघांनी मनात आलेल्या या कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली.

Image source : Google


शेवटी २०१५ मध्ये दोघांनीही बेंगळूरू या आपल्या जन्मगावीच कंपनीची सुरुवात केली आणि कंपनीचे नाव ठेवले लीशियस! तुम्ही म्हणाल हे कसले नाव? त्यांनी काय केले तर Delicious मधील फक्त D काढला आणि उरलेले licious कंपनीचे नाव म्हणून स्वीकारले. आता नाव काहीही असले तरी हेतू हाच होता की डेलीशियस आणि क्वालिटीचे मांस ग्राहकापर्यंत पोहोचवणे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण काहीही करू हा दृढ निर्धार करून ते कामाला लागले.

 

लीशियसचे ब्रीद आहे – जे आम्ही खाऊ शकत नाही ते आम्ही कधीच विकणार नाही! गेली सहा वर्षे कंपनी सातत्याने यावर काम करत आहे म्हणूनच आज या कंपनीला युनिकॉर्न दर्जा मिळाला आहे. या कंपनीला अलीकडेच ५.२ कोटी डॉलर्सचे फंडिंग मिळाले आहे, आणि या फंडिंगमुळेच या कंपनीला युनिकॉर्न कंपनी होण्याचा मान मिळाला. ही भारतातील पहिली अशी कंपनी आहे जी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचते (direct-to-consumer), असा यांचा दावा आहे.

 

थेट फार्ममधून ग्राहकांच्या प्लेटमध्ये असे या कंपनीचे बिझनेस मॉडेल आहे. ग्राहकापर्यंत हे मांस पोहोचवण्याची जबाबदारीही स्वतः कंपनी घेते. जाग्यावरून माल खरेदी करणे, मग त्यावर प्रक्रिया करणे, त्याची साठवणूक, त्याची पॅकेजिंग आणि मग त्याचे वितरण या सगळ्या कड्या खुद्द कंपनीच हाताळते. यामध्ये इतर कोणीही मध्यस्थी नाही. कंपनीने स्वतःचे प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग युनिट्स उभारले आहेत. आपल्या कंपनीकडून बाजारात जाणारे मांस हे स्वच्छ, निर्जंतुक केलेले असते. त्याची शास्त्रीयदृष्ट्या तपासणी केली जाते. ऑर्डर मिळाल्यानंतर एक त दीड तासात त्याचे पॅकेजिंग केले जाते आणि मग ते ग्राहकापर्यंत पोहोचवले जाते.

Image source : Google


फक्त चिकन-मटणच नाही तर मासे, अंडी, हे इतर मांसाहारी पदार्थही ते याच पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी ऑनलाईन ऑर्डरी घेण्यासही सुरुवात केली. यावेळी त्यांनी जोखीम पत्करत कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यायही ग्राहकांना दिला. पण सुदैवाने ही जोखीम त्यांच्यासाठी वरदानच ठरली.

 

लॉकडाऊन काळात मासेमारी बंद असल्याने माशांच्या उत्पादनात थोडी घट झाली होती. याकाळात त्यांनी मोठ्या मासेमारी कंपन्याच्या ऐवजी छोट्या मच्छिमारांकडून माल विकत घेतला त्यामुळे अशा बिकट काळातही त्यांचे हे प्रोडक्ट बंद पडले नाही.

 

मांस हे इतर किराणा पदार्थाप्रमाणे आठवडाभर किंवा महिनाभर टिकत नाही. त्याचे आयुष्य फार तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन दिवसांचे. म्हणूनच यात तशी जोखीम असली तरी सेवा दर्जेदार असेल तर मोठ्या प्रमाणात ग्राहकवर्ग आकर्षित करता येतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

या कंपनीची आणखी एक खासियत म्हणजे या कंपनीसोबत काम करणारे, त्यांना या सगळ्या कामात मदत करणारे त्यांचे साथीदार हे त्यांचे कर्मचारी नसून स्टॉकहोल्डर आहेत. विवेक यांच्या मते, आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांनाही आपल्या कामात विश्वास निर्माण झाला पाहिजे. म्हणूनच कर्मचारी पद्धतीने कुणाचीही नेमणूक न करता सर्वांनाच कंपनीचे स्टॉकहोल्डर बनवले आहे. ग्राहकापर्यंत त्यांचे उत्पादन पोहोचवणारा कर्मचारी हा त्यांच्यासाठी डिलिव्हरी बॉय नाही तर डिलिव्हरी हिरो आहे, यावरून आपल्यासोबत काम करणाऱ्यांचा ते किती आदर करतात हे लक्षात येईल.

 

या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच फक्त सहा वर्षात कंपनीला एवढी मोठी झेप घेणे शक्य झाले आहे.

 

उद्योग करायचा आहे पण काय करू आणि कसा करू समजत नाही अशी जर तुमची अडचण असेल तर विवेक आणि अभय यांच्या या कल्पनेवरून आणि त्यांच्या बिझनेस मॉडेलवरून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता. आज अनेक महाराष्ट्रीयन तरुण पोल्ट्री व्यवसायात उतरत आहेत, त्यांनी या सगळ्या प्रक्रियांचा अभ्यास करून त्या अंमलात आणता येतात का याचा विचार करायला हरकत नाही.

 

शेवटी इच्छा तेथे मार्ग असे कुणीतरी म्हटले आहेच.

 

 

Post a Comment

0 Comments