तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती होणं आवडेल? नकारात्मक की, सकारात्मक?

Image source : Google 

काही लोकं नेहमी हसतमुख आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात. आजूबाजूच्या लोकांशी पटले नाही तरी त्याचा बाऊ करत राहत नाहीत, आपल्याच आयुष्यात कसं आणि किती दुख आहे याचा हिशोब मांडत बसत नाहीत. तर काही अगदी उलटे सतत तक्रार करणार, इतरांबद्दल नाही तर स्वतःबद्दल तरी यांची तक्रार असतेच असते. कुणावर विश्वास ठेवणार नाहीत. आयुष्यात खूप काही असूनही यांच्या तक्रारींची यादी काही संपत नाही.

 

असे दोन प्रकारचे लोक आपल्या आजूबाजूला दिसतात, तुम्हीही पहिले असतील. आयुष्याबद्दल तक्रार करण्याची सवय कुणी मुद्दामहून लावून घेत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही खाचखळगे हे असतातच. काही लोकांना हे खाचखळगे लीलया पार करता येतात तर काही लोक मानसिकरित्या त्यातच गुरफटून राहतात. त्यांना यातून बाहेर पडायचं असतं पण योग्य दिशा सापडत नसते.

 

थोडासा प्रयत्न केल्यानंतर नकारात्मक व्यक्तीही जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन स्वीकारू शकते. आपल्या विचारात सकारात्मक बदल करणे शक्य असते अगदी जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर किंवा वळणावर आपण हे बदल करू शकतो. गरज आहे ती फक्त आपली इच्छाशक्ती जागवण्याची!

 

सकारात्मक व्यक्तीच्या आयुष्यात दुख नसतेच असे नाही पण, त्याने आपल्या विचारसरणीने त्या दुखाची तीव्रता कमी केलेली असते. सकारात्मक विचारसरणीचा हा एक फायदा आहे की, दुखाची तीव्रता खूप जाणवत नाही किंवा अतीव दुखातही शांत, स्थिर राहण्याची कला जमलेली असते. सकारात्मक राहिल्याने अतीव दुखाची तीव्रता कमी होईल आणि आनंदी राहण्याची सवय लागेल. सकारात्मक विचारसारणी तुमच्यात बदल घडवून आणते आणि हा बदल म्हणजे चमत्कारच असतो.

 

सकारात्मक राहण्याचे फायदे खूप आहेत. त्यातही हे दहा फायदे वाचूनच तुम्ही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न कराल हे नक्की.

 

१) नैराश्य कमी होते.

नकारात्मकता आणि नैराश्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नैराश्याची सुरुवात कधीकधी नकारात्मक विचारापासूनच होते. नकारात्मकतेने नैराश्य येते की, नैराश्यामुळे नकारात्मकता येते? हे सांगणे कठीण असले तरी, या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात हे मात्र नक्की.

 

भूतकाळातच अडकून पडणे हे नकारात्मकतेचे आणि नैराश्याचे लक्षण आहे. तुमच्या मनातील वेदना, पश्चाताप अशाने वाढतच राहतो आणि तुम्ही मानसिक दृष्ट्या अधिकाधिक कमकुवत होत जात.

 

याउलट जर तुम्ही सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारून जगू लागलात तर, तुम्ही भूतकाळातील गुंत्यातून लवकर बाहेर पडाल आणि पुढे आपल्याला काय करायचे आहे? कुठे जायचे आहे? या विचारांवर लक्ष केंद्रित कराल. त्यामुळे नैराश्य कमी होते आणि आपली कार्यक्षमता सुधारते.

 

२) सामाजिक वर्तन सुधारते

 

सतत आयुष्याविषयी तक्रार करणारी माणसे कुणालाही नको असतात. अशा लोकांमुळे इतरांनाही कांटाळवाणे वाटते. नकारात्मक विचारांची लोक इतरांची अधिकाधिक ऊर्जा शोषून घेतात आणि त्यांना सतत कुणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावे असे वाटत असते. याउलट सकारात्मक विचारांचे लोक सतत नवनव्या कल्पना मांडत असतात. आपल्या बोलण्यातून वागण्यातून ते समोरच्याला आश्वस्त करतात. ज्यांच्यामुळे वातावरण प्रफुल्लीत होते. ही माणसे वातावरण हलके फुलके ठेवण्यात तरबेज असतात. अशी माणसे कुणालाही हविहावीशी वाटणे साहजिक आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर जाणवतो. विचार चांगले आणि सकारात्मक असतील तरच व्यक्तिमत्वही प्रसन्न आणि सकारात्मक राहील.

 

३) सकारात्मकतेमुळे तुमची स्वप्रतिमा सुधारते

 

तुम्ही स्वतःबद्दल स्वतःच्या क्षमतांबद्दल सतत संशय घेत असाल, नकरात्मक राहत असाल तर तुमच्या मनातील तुमची प्रतिमा ही कमकुवत माणसाची आहे हे सिद्ध होते. पण स्वतःबद्दल सकारात्मक राहून विचार कराल तर तुमचा आत्मविश्वास वाढेल. कोणतेही काम मला जमणार नाही ऐवजी करून तरी बघू असा विचार करून जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते. सकारात्मक विचार तुमच्यातील आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो.

 

४) नात्यावर जाणवणारा परिणाम

 

नकारात्मक विचारांचे लोक इतरांबद्दल मनात सतत संशय बाळगतात. त्यांना वाटते की समोरचा माणूस त्याची फसवणूक करेल. किंवा समोरचा आपल्या वर जळतो, कटकारस्थान करतो असे वाटते. तेच जर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर इतरांच्या हेतूबद्दल तुमच्या मनात संशय येणार नाही. डोळेझाकून विश्वास ठेवला नाही तरी प्रत्येक माणसाकडे संशयी नजरेने पाहणार नाही हेही खरे.

 

नकारात्मक दृष्टिकोनामुळे नाती दुभंगण्याची शक्यता असते तर सकारात्मक दृष्टिकोनामुळे नाती सांधली जातात.

४) अधिक आनंदी रहाल

 

नकारात्मक दृष्टीकोन कवटाळल्याने तुम्ही सतत दुखी रहाल आणि जितके दुखी रहाल तितकी नकारात्मकत वाढत राहील. छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदही हरवून बसाल.

 

सकारात्मक लोकांना छोट्या छोट्या गोष्टीतही मोठा आनंद दिसतो. आयुष्यात आधीच बऱ्याच उलथापालथी सुरु असतात आणि अशावेळी तुम्ही जर नकारात्मक विचारांना चिकटून राहिलात तर तुम्हाला थोडासा जो विसावा किंवा आनंद मिळतो आहे तोही गमवून बसाल.

 

६) तुमच्या तक्रारी संपतील

 

बऱ्याच गोष्टी आपल्याला जमतच नाहीत कळतच नाहीत, कुणी मला समजून घेतच नाही. माझं नशीबच असं, असं माझ्याच बाबतीत का होतं असे अनेक प्रश्न विचारून स्वतःला छळणारे लोक नकारात्मक असतात. यांच्या बोलण्यात नेहमीच कशा ना कशा विषयी तक्रार असते. उलट सकारात्मक दृष्टीकोन बाळगणारे मात्र आपल्याला काय शिकायला मिळेल, आपल्याला आज काय काम करायचे आहे, याचा विचार करतात आणि ती अंमलात आणतात. नवे निर्णय अंमलात आणताना काही त्रास झाला तरी त्यावर अधिका वेळ न दवडता पुढे काय करायचे याचे प्लॅनिंग करत राहतात. त्यांच्याकडे तक्रारी करायला वेळच नसतो.

 

नकारात्मक लोकं मात्र आपल्याला कुणी कसा त्रास दिला, याबद्दल सतत विचार करत राहतात. त्यामुळे त्यांच्यातील कडवटपणा अधिकच वाढत जातो.

 

७) अधिक कृतज्ञता अनुभवाल

 

कृतज्ञतेने सकारात्मकता येते आणि सकारात्मकतेने कृतज्ञता. आपल्या जवळ आहे त्या गोष्टींविषयी जर आपण कृतज्ञ नाही राहिललो तर आपल्या कृतज्ञतेत आणखी भर पडते. देवाने जे काही दिले आहे त्यात समाधानी असावे, हे वाक्य तुम्ही तुमच्या घरातील वडिलधाऱ्या आणि वयस्क व्यक्तींकडून नेहमीच ऐकले असेल. त्यामुळे तुम्ही तुमच्याजवळील गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करत राहाल आणि तुम्हाला आणखी आणखी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळत राहील. उलट नकारात्मक व्यक्तींना जे काही मिळते आहे त्यातून त्यांना कधीच समाधान मिळत नाही.

 

८) चांगल्या सवयी

 

जेव्हा तुम्ही सतत उदास किंवा निराश असता तेव्हा तुम्ही स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे तुमच्यात कोणताच बदल होत नाही किंवा सुधारणा होत नाही. उलट जेव्हा तुम्ही आशावादी राहता तेव्हा तुम्ही अधिक टापटीप, नीटनेटके राहण्याचा प्रयत्न करता. या प्रयत्नात तुमच्या अंगी काही चांगल्या सवयी रुजतात.

 

उलट जर सतत निराश राहाल तर, तुमच्यात वर्तन समस्या उद्भवतीलच पण एका नैराश्यातून बाहेर पाडण्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा आधार घेण्याची सवय लागेल. यातून व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

 

सकारात्मक विचार केल्याने तुम्ही स्वतःची, स्वतःच्या शरीराची काळजी घेऊ लागता तर, नकारात्मकता तुम्हाला स्वतःचे फाजील लाड करवून घेण्यास उद्युक्त करेल.

 

९) आरोग्यावर होणारा परिणाम

 

नकारात्मक लोकांना सतत निराश, दुःखी आणि तणावात राहिल्याने त्याचे शारीरिक परिणामही भोगावे लागतात. अशा लोकांना हायपरटेन्शन, हृदयरोग, आणि इतर यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. तर, सकारात्मक लोक आजारपणातूनही लवकर बरे होतात.

 

१०) प्रतिबिंब  

 

निराश राहणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांनाही त्यांच्यातील या नैराश्याचा त्रास जाणवू लागतो. अतिरिक्त तणावामुळे होणारी चिडचिड, आजारपण, यामुळे त्यांच्यासोबत राहणारे लोकही वैतागून जातात. तर सकारात्मक लोकांसोबत रहाणाऱ्या लोकांमध्येही तसेच बदल दिसू लागतात. जीवनाकडे पाहण्याचा त्यांच्या दृष्टीकोन आपणही अंगीकारावा असे त्यांना वाटते. सकारात्मक लोकांच्या सकारात्मक प्रयत्नातून त्याच्या जीवनात घडणारा बदल इतरांनाही सकारात्मक राहण्याची प्रेरणा देऊन जातो.

 

नकारात्मक लोक सतत आपल्याच विचारात गुरफटलेले असतात, त्याच्याकडे नव्या कल्पना असल्या तरी त्या अंमलात आणण्याची योजना नसते. अशा लोकांच्या आयुष्यात काहीच बदल होत नाहीत आणि प्रगती तर ठप्पच झालेली असते.  

 

जे आपल्या कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणतात असेच लोक इतरांसाठी प्रेरणा ठरतात.

 

सकारात्मक राहण्याचे हे फायदे जाणून घेतल्यानंतर आता तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ति व्हायला आवडेल हे ठरवा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.


 

 

 

 

 

 


Post a Comment

0 Comments