तुम्ही मनाची काळजी घेत राहा. मन तुमची काळजी घेत राहील!

आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं जिथे आपला धीर खचतो, स्वतःवर विश्वास राहत नाही. राहून राहून आता सगळं संपलं असं वाटू लागतं. अशा नकारात्मक भावना तयार होण्यापाठीमागे अनेक कारणे असू शकतात. जसे की प्रेमभंग, कुणा जिवलग व्यक्तीचा मृत्यू, व्यवसायात झालेले मोठे आर्थिक नुकसान, चुकीच्या निर्णयाचे विपरीत परिणाम, अशा अनेक कारणांनी आपण मानसिक दृष्ट्या खचून जातो. आपण हे का केलं? आपल्याला आधी कळलं नाही का? आपण तेव्हाच हा विचार करायला हवा होता. आपण मूर्ख आहोत, नालायक आहोत, अशा अनेक नकारात्मक दूषणांनी आपण आपलाच उद्धार करायला लागतो.

 

Image source : Google

चूक प्रत्येकाच्या हातून होते आणि या चुकीची जाणीव होणे ही आपण योग्य वाटेवर असल्याची पहिली खुण असते.  कळतपणे किंवा नकळतपणे आपणच आपल्याला पाण्यात पाहत असतो. कुणीतरी आपली आर्थिक, भावनिक फसवणूक केलेली असते. मुद्दामहून आपल्याला वाईट वाटेल, आपण अस्वस्थ होऊ असे शब्द वापरलेले असतात आणि त्यात आपणही स्वतःलाच दुषणे देत राहतो ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी चिघळते.

 

एखाद्या मोठ्या प्रसंगातून सावरताना किंवा आपल्या मनाला झालेल्या जखमा भरून काढताना असे वागणे निश्चितच हितावह नसते. मग अशावेळी काय करायचे? तर अशावेळी आपल्या मनावरील ओरखडे भरून निघतील आणि आपला स्वाभिमान पुन्हा एकदा उजळून निघेल यासाठी काही सकारात्मक वाक्ये आपण स्वतःला ऐकवावी लागतात.

आज आपण अशाच काही वाक्यांची उजळणी करूया. जेव्हा जेव्हा मनात स्वतःला कमी लेखणारे, स्वतःला खचवणारे, नकारात्मक विचार मनात घोळू लागतील तेव्हा तेव्हा तुम्ही ही वाक्ये वाचून स्वतःच्या मनातील विचारांना सकारात्मक दिशा देऊ शकता.

१) मी स्वतःला आणि मला धडा शिकवणाऱ्या सगळ्या व्यक्तींना माफ करते/करतो.

आपण सध्या ज्या काही मानसिक स्थितीतून जात आहोत त्यातून बाहेर पडायचं असेल तर क्षमा हे मूल्य स्वीकारलेच पाहिजे. मग ते स्वतःसाठी असो की दुसऱ्यासाठी. कोणाबद्दल मनात राग, द्वेष ठेवून आपण पुढे जाऊ शकणार नाही. एखाद्याबद्दल आपण राग, चीड मनात ठेवून राहिलो तर काय होईल आपण या अवस्थेतून पुढे जाणारच नाही तिथे तिथेच घुटमळत राहू. आपली मानसिक स्थिती सुधारण्यासाठी हे वाक्य जमेल तेव्हा बोला.

२) मी माझ्या मनाची आणि माझ्या शरीराची काळजी घेते/घेतो.

आपल्या मनाची आपल्या शरीराची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्यासाठी हे दुसरं कुणी करणार नाही. मानसिक दृष्ट्या खचलेल्या काळातही वेळेवर जेवणे, पुरेशी झोप घेणे आणि खळखळून हसणे हे आरोग्याला निरोगी ठेवणारे फंडे कधीही सोडू नका. मन आणि शरीर जितके निरोगी राखण्याचा प्रयत्न कराल तितकेच भविष्याबाबत सकारात्मक आणि आशावादी रहाल.

३) मी स्वतःला यातून बाहेर काढत आहे, यातून बाहेर पडून पुढे जाण्याची तयारी करत आहे.

स्वतःच्या मनाला हे सांगा की आजची जी भावनिक स्थिती आहे ती कायमची असणार नाही. काही दिवसांनी यात बदल झालेला असेल. त्यासाठी आजचे आपण घडून गेलेल्या घटनांच ओझं मनावर ठेवलं आहे ते उतरवलं पाहिजे. म्हणूनच यातून मी बाहेर पडणार आहे, हे आपल्या मनाला बजावून सांगायचं आहे.

४) माझ्या जवळ जे काही आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

आपले मन अस्वस्थ असते, दुखावलेले असते तेव्हा आपल्याला असे वाटते की आता सगळं संपलं काही उरलं नाही. पण तसं नाही. अजूनही आपल्या आयुष्यात बरंच काही शिल्लक असते. त्या सगळ्याकडे पाहिल्यावर  लक्षात येतं की कितीही संपलं संपलं म्हटलं तरी अजून काही संपलेलं नाही. माझे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत, माझे शरीर माझ्यासोबत आहेत, माझ्यावर प्रेम करणारी कितीतरी माणसं आजूबाजूला आहेत. ते कदाचित बोलून दाखवत नसतील पण त्याच्या कृतीतून त्याच्या वागण्यातून त्यांचे प्रेम जाणवत असते. फक्त आपण याची नोंद घेतली पाहिजे.

५) माझ्या आयुष्यावर माझे नियंत्रण आहे.

कोणत्याही एका घटनेमुळे, एखाद्या व्यक्तीमुळे आपलं आयुष्यावरील नियंत्रण सोडून देऊन चालत नाही. आपण परिस्थितीला शरण जातोय. आपली मानसिकता खचते आहे असे वाटत असेल तर हे वाक्य नक्की स्वतःशी बोला. आपल्या आयुष्यावर आपले नियंत्रण आहे, याची मनाला जाणीव करून द्या. मग ते तुम्हाला परिस्थितीवर नियंत्रण कसं मिळवायचं हे शिकवेल. काही गोष्टी मनाला शिकवाव्या लागतात तशा त्या मनाकडून शिकाव्याही लागतात.

६) माझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझ्या गरजा मला चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येतात.

कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचं प्रेम कमी होता कामा नये. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करू लागता तेव्हा तुमच्यातील मानसिक अशांतता आणि अस्वस्थता लवकर दूर व्हायला मदत होते. पण जर तुम्ही स्वतःचाच द्वेष करत राहाल तर हे अशक्य आहे.

७) परिस्थितीने शिकवलेला हा धडा मी लक्षात ठेवेन.

तुमच्यावर आलेली वेळ तुम्हाला काही तरी शिकवण देत असते. यातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही पुन्हा तीच चूक केलीत तर चालणार नाही. म्हणून ही परिस्थिती का ओढवली, त्यातून काय शिकायला मिळाले हे आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजे पण सकारात्मक पद्धतीने. अगदी तुमची ही वाईट वेळ बदलून चांगले दिवस आले तरी हा धडा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे.

८) मी नेहमी आनंदी आणि हलकं राहण्याचा प्रयत्न करेन.

सतत तुम्ही दुखी राहत असाल तर त्याने परिस्थितीत काही फरक पडणार नाही पण आनंदी राहिल्याने नक्की पडेल. आनंदाला तुमच्या आयुष्यात प्रवेश करू द्या. तुम्हाला काय वाटलं पाहिजे हे फक्त तुम्ही ठरवू शकता दुसरं कोणीही नाही. म्हणून आपल्या मनाला जे सांगा की मी सतत आनंदी आणि हलकं राहण्याचा प्रयत्न करेन.

९) माझ्या आयुष्यातील हा प्रसंग दूर होणार आहे त्यामुळे मी शांत आहे.

मानसिक स्थिरता तुम्हाला एखादा प्रसंग निभावून नेण्याचे बळ देतात. म्हणून शांततेला तुमच्या आयुष्यात प्रवेश करू द्या. मानसिक दृष्ट्या कणखर होण्यासाठी शांत होणेही गरजेचे आहे. आयुष्याबद्दल सतत तक्रार करत राहिलात तर हे कधीच होणार नाही, पण आयुष्यात जे पुढे आले आहे ते निमुटपणे स्वीकारले की नक्कीच मानसिक शांतता मिळेल.

१०) मी संयमी आहे. स्वतःला या प्रसंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

एखादी घटना, प्रसंग आणि त्यातून मिळालेले घाव एका दिवसात बरे होणार नाहीत. त्यांची ठसठस सोबत असणारच आहे. ते विसरता येत नाही म्हणून आणखी उतावीळपणा करून स्वतःला आणखी अस्वस्थ करू नका. वेळेसोबत सगळ्या जखमा भरून निघतात. म्हणून स्वतःलाही वेळ द्या. आयुष्याशी पुन्हा भिडायचे आहे, तर कणखर तर व्हावेच लागेल. जसे तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नाही तसेच एकदा निश्चय केल्याने मन कणखर बनत नाही त्याला रोजच्या रोज सकारात्मक विचारांचा खुराक द्यावा लागतो. तेव्हा कुठे या जखमा भरून निघणार आहेत. संयम राखणे, शांत राहणे हाच एक मोठा उपाय आहे.

११) माझ्या भावनिक हिंदोळ्यांपेक्षाही मी अधिक सशक्त आहे.

जसे जसे तुमच्या मनातील अस्थिरता कमी होईल मन शांत शांत होत जाईल तसतसे तुम्ही अधिक कणखर आणि पूर्वीपेक्षा अधिक सशक्त झाल्याचे तुम्हाला जाणवेल. त्यासाठी मनाला या सकारात्मक वाक्याचा डोस द्या.

१२) माझ्या मनाला सशक्त बनवणारी ऊर्जा माझ्या शरीरात सळसळत आहे.

तुम्हाला हवी ती ऊर्जा, तो संयम, ते औषध बाहेर कुठे नाही तर तुमच्याच आत दडले आहे. त्याची स्वतःला जाणीव करून द्या.

१३) दिवसेंदिवस माझ्या स्थितीत प्रगती होत आहे.

तुमची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही रोज प्रयत्न करणार आहात. या क्रियेला काही दिवसांचा कालावधी तरी लागेलच पण जाणारा प्रत्येक दिवस आपल्याला काही तरी खास देऊन गेला हे अनुभवायचे असेल तर हे वाक्य मनाला पटवून द्या.

१४) भूतकाळापेक्षा मी वर्तमानकाळावर जास्त लक्ष देत आहे.

तुम्हाला त्रास देणाऱ्या त्या घटनेचा किंवा व्यक्तीचा तुम्ही जितक्यावेळा आठवण काढाल तितका तुमचा त्रास वाढत जाईल. ज्या ज्या वेळी तुम्हाला त्या घटना, ती व्यक्ति आठवेल तेव्हातेव्हा तुम्हाला वर्तमानकाळावर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे हे विसरू नका. या एका वाक्याच्या सहाय्याने स्वतःला वर्तमान काळात राहण्याची आठवण करून द्या.

१५) मला प्रेम मिळत आहे आणि माझ्यासाठी खास असलेल्या व्यक्तींवर माझे प्रेम आहे.

आयुष्यातील कुठल्याही प्रसंगातून आपल्याला निभावून नेण्याची ताकद प्रेमातूनच मिळते. ती मैत्रीण किंवा तो मित्र मला सोडून गेला म्हणून हळहळत बसाल तर आजूबाजूला जे लोकं तुमच्यावर प्रेम करत आहेत त्याच्याकडे तुमचे दुर्लक्ष होईल. तुमचे मन नाराज होईल तेव्हा त्याला तुमच्या आजूबाजूच्या प्रेमळ व्यक्तींची आठवण करून द्या. या व्यक्तींकडून मला प्रेम मिळते आणि मी ही त्याच्यावर प्रेम करतो हे तुमच्या मनाला आवर्जून सांगा. नाही तर एकाच घटनेची उजळणी करून ते तुम्हाला सतत तुम्ही कसे एकटे आहेत याची जणीव करून देत राहील.

 

एखाद्या परिणामकारक घटनेतून, प्रसंगातून सावरण्याचा प्रयत्न करत असाल तर ही सकारात्मक विधाने तुम्हाला उपयुक्त ठरतील. तुमच्या मनाला तुम्ही जसे खाद्य देता त्यावरच त्याचे आरोग्य अवलंबून आहे. शरीरासाठी जसे शिळे अन्न घातक आणि ताजे अन्न पौष्टिक असते तसेच मनाचेही आहे. त्याला वेळेवर सकारात्मक विचारांचे खाद्य देत रहा.

 

तुम्ही मनाची काळजी घेत राहा. मन तुमची काळजी घेत राहील!

 

 

 

Post a Comment

3 Comments

खुप छान सुंदर माहिती दिली आपण.. पटली बुवा आपल्याला अनुसरण करायला हवी
खुप छान सुंदर माहिती दिली आपण.. पटली बुवा आपल्याला अनुसरण करायला हवी
खुप छान माहिती दिली, धन्यवाद!