उद्याचा दिवस आयुष्यात कधीच उगवत नाही. आयुष्यात आपल्या हाती असतो तो फक्त ‘आज!’

चीडचीड, राग, नैराश्य, तणाव, निद्रानाश, अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी जेव्हा एकाचवेळी पछाडतात तेव्हा यातून बाहेर कसं पडायचं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. मानसिक स्थिती एकदा का घसरू लागली की ती कधी रसातळाला पोहेचेल हे सांगता येत नाही आणि मग आपण त्याच त्या घटना, त्याच त्या भावना आणि तेच ते परिणाम अनुभवत राहतो. आयुष्य जणू भोवऱ्यासारखं एकाच जागी गरागरा फिरायला लागतं. अशांत मनाला कशातच रस वाटत नाही, त्याला काही चांगलं दिसत नाही आणि काही चांगलं आठवत नाही. मनाचा प्रत्येक कोपरा काळ्याकुट्ट अंधाराने भरून जातो तेव्हा एक दिवा जरी लावला तरी अशा मानसिकतेतून बाहेर पडायला मदत होऊ शकते. अगदी घोर निराशा नसली तरी जेव्हा जेव्हा एकटं आणि उदास वाटेल त्यात्या वेळी हीच एक सवय तुम्हाला तरून नेऊ शकते. कुठली सवय?

 


कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय!

 

समजा तुम्ही फक्त फिरायला म्हणून बाहेर पडलाय! मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलंय हे करू का ते करू अशा अनेक विचारात तुम्ही गुरफटून गेलाय. विचार करता करता तुम्ही चालताय आणि चालत चालत तुम्ही एका झाडीत शिरता, थोडं पुढे थोडं पुढे करत जात राहता पण नंतर मात्र तुम्हाला परत येण्याचा रस्ताच सापडत नाही. घनदाट झाडीत आता तुमच्या मानतील भीती आणि बाहेरचा अंधार वाढू लागतो. आता तुम्हाला घरची आठवण येऊ लागते आणि तुम्हाला प्रचंड अस्वस्थ वाटू लागतं. जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधून शोधून तुम्ही थकून जाता पण, तुम्हाला रस्ता सापडत नाही. शेवटी थकव्यामुळे तुम्हाला त्या जंगलातच झोप लागते. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या बोचऱ्या वाऱ्याने तुम्हाला जाग येते. आजूबाजूला पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झालेला असतो. भूक आणि तहनेनी आता तुम्हाला टोचणी द्यायला सुरुवात केलेली असते पण, त्याहून मोठा प्रश्न असतो रस्ता सापडेल की नाही? आज तरी आपण घरी पोहोचू की नाही? अशातच तुम्हाला कुठे तरी झुळूझ्ळू वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येतो आणि तुम्ही त्या दिशेने जाता, पोटभर पाणी प्यायल्यावर तुम्हाला एक पेरूचं झाडं दिसतं आणि मग तुम्ही पेरू खाता.  त्या अनोळखी ठिकाणी उपाशी राहून रात्र काढल्यानंतर जेव्हा तुम्ही पेरू खाण्यासाठी तोंड उघडता आणि पेरूचा पहिला घास घेता तेव्हा तुमच्या मनात जी  भावना असते ना ती असते कृतज्ञता आणि तृप्तीची भावना. कुणाबद्दल असते ही कृतज्ञता? याचं उत्तर देणं कठीण असेल पण ती असते हे मात्र नक्की.

 

आता तुम्हाला थोडा आराम वाटतो आणि तुम्ही पुन्हा रस्ता शोधू लागता. तुमच्या काल तुमच्या मनात निराशा होती आणि आजूबाजूला अंधार होता, आज मात्र तुमच्या मनात एक आशेची पालवी फुटली आहे आणि तुम्ही रस्ता शोधत आहात, चालता चालता तुमचं तुम्हालाच कळत नाही पण, तुम्हाला रस्ता सापडलेला असतो.

 

घरी पोहोचल्यावर घरातील वातावरणच बदलून जातं. आई तुमच्या गळ्यात पडून रडायला लागते आणि बाबांचे डोळे नकळत भरून आलेले असतात आता कृतज्ञता अनुभवण्याची वेळ त्यांची असते. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव उमटतात, कुणाबद्दल असतात हे भाव हे मात्र सांगता येणार नाही.

 

म्हटलं तर घटना खूप आणि म्हटलं तर छोटी! पण या घटनेने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियाच्या मनात कृतज्ञतेचे भाव जागवलेले असतात. आता ही कृतज्ञता इथेच सोडून देऊन तुम्ही पुन्हा आहे तेच रुटीन कटकटीपूर्ण आयुष्य अनुभवणार की कृतज्ञतेच्या जादुसोबत आयुष्य पालटून टाकणार? निर्णय फक्त तुमचा असेल.

 

एका दिवसातील किंवा अलीकडच्या काही दिवसातील एखादी घटना आठवा ज्यातून तुमच्या आयुष्यात काही बदल झाले असतील, तुम्हाला कधी धडे मिळाले असतील, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींचे मोल तुम्हाला कळले असेल. या सगळ्या घटनांनी तुम्हाला जाणीव करून दिली आहे, की तुमच्या आयुष्यात फक्त तक्रारीच नाहीत तर, त्याहूनही बरच काही आहे ज्याची नोंद तुम्ही घेतलेली नाही आणि अशी नोंद तुम्ही घ्यावी म्हणूनच या घटना एक सूचक इशारा म्हणून घडलेल्या असतात.

 

कुतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावायची कशी? तर ही सवय काही एका दिवसात लागणार नाही पण एका दिवसापासून याला सुरुवात नक्की करता येते. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की नाही आता झालं ते बस्स झालं मला माझं आयुष्य बदलायचं आहे त्यादिवशी तुम्ही ही सवय नक्की उचलाल आणि अंमलात आणाल.

 

बदलायचं आहे ना? मग आताच ठरवा कधी पासून बदलायचं आहे? आजपासून? आत्तापासून? की, उद्या पासून?

 

‘उद्या’ असं जर याचं उत्तर असेल तर लक्षात घ्या उद्याचा दिवस आयुष्यात कधीच उगवत नाही. आयुष्यात आपल्या हाती असतो तो फक्त ‘आज!’

Post a Comment

0 Comments