स्वतःला माफ करून अपराधीपणाची बोच कमी कशी करावी?
माणूस म्हटल्यावर कोणत्या ना कोणत्या बाबतीत
आपल्याकडूनही चुका होतातच. चूक कशी झाली यावर काथ्याकूट करण्यापेक्षा चूक
झाल्यानंतर आपण कसे वागणार आहोत? हे जास्त म्हत्वाचे आहे. काही लोकं इतरांच्या
चुका माफ करू शकतात पण, स्वतःच्या बाबतीत मात्र ते जास्तच चिकित्सक बनतात. आपल्या
हातून हे झालंच कसं? हा प्रश्न त्यांना पछाडून टाकतो. इतका पछाडून टाकतो की
याशिवाय त्यांना दुसरं काही सुचतंच नाही. अपराधीपणाचं ओझं एखाद्या समंधासारखं मानगुटीवर बसून राहतं आणि मग या समंधापासून
पिच्छा कसा सोडवावा हेच कळत नाही.
आपण जे विचार करतो तसेच आपण बनत जातो. आपले
विचार आपल्या आयुष्यातील घटनांना आकार देतात, असे बुद्ध म्हणतो. मग तुम्ही जर सतत
अपराधीभाव मनात ठेवून वावरत असाल तर काय होईल? तुम्ही आणखीन जास्त अपराधीपणाच
आकर्षित कराल. तुमच्या हातून सतत चुका होत राहतील आणि तुम्ही एक बुद्धू, मूर्ख व्यक्ती
आहात अशीच तुमची स्वप्रतिमा तयार होईल. एकदा का अशा स्वप्रतीमेत अडकलात की मग
त्यातून पुन्हा बाहेर पडणे अशक्यच!
तर मुद्दा हा आहे की, अपराधीपणाच्या ओझ्यातून
मुक्त कसं व्हायचं? चला तर मग पाहूया स्वतःला माफ करण्यासाठी कोणते उपाय अवलंबले
पाहिजेत.
१) स्वतःला माफ
करायचे ठरवा –
आपण चुकलोय, आपल्या
हातून काहीतरी चुकीचं घडलंय, ही टोचणी मनातून काढून टाकण्याचा ठाम निश्चय करा.
स्वतःला माफ करायचं आहे हे एकदा पक्क ठरवा. माणूस म्हटल्यावर चुका होतातच आणि
कोणत्याही व्यक्तीला माफी मिळण्याचा अधिकार आहे. आपणही माफीला पात्र आहोत. एक चूक
म्हणजे आपले संपूर्ण जीवन किंवा आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व नव्हे. एखादी चूक झाली
म्हणजे आपण माणूस म्हणून जगण्यासच अपात्र ठरतो असे नाही. त्या एका चुकी
व्यतिरिक्तही आपल्यात काही चांगले गुण आहेत. बऱ्याचदा आपण माणूस म्हणून चांगली
कर्मेही केलेली आहेत. आपण एक चांगले मित्र/मैत्रीण आहोत. कित्येकदा आपण इतरांसाठी
काही चांगले केले आहे किंवा चांगले काही करण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्ही ठरवलंत तर हे
फारच सोपं आहे. स्वतःच्या मनाला स्वतःतील चांगल्या गोष्टींची जाणीव करून द्या.
त्याला आवर्जून लक्षात आणून द्या की एक चूक म्हणजे संपूर्ण आयुष्य किंवा आपलं
संपूर्ण व्यक्तिमत्व नाहीये.
मानसिक शांतता हवी असेल
तर स्वतःला माफ करणं हाच एकमेव पर्याय आहे. मनावरचं ओझं उतरल्याशिवाय तुम्ही शांत
कसे होणार? म्हणून स्वतःला माफ करा. स्वतःचा स्वीकार करा.
“मी मला स्वतःला
माझ्या सगळ्या मागच्या चुकांसाठी माफ करून स्वतःचा आहे तसा स्वीकार करत आहे,” हे
स्वतःच्या मनाला वारंवार सांगत राहा. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमची चूक आठवेल आणि
तुमच्यातील अपराधभाव जागृत होईल तेव्हा तेव्हा हे स्वतःला ऐकवा आणि ती अपराधीपणाची
बोच कमी कमी करा.
२) स्वतःला शिक्षा
देणे किंवा छळत राहणे हा चूक सुधारण्याचा पर्याय नक्कीच नाही.
स्वतःला सतत कोसण्याने,
दुषणे देण्याने चूक सुधारणार नाही. मात्र सतत स्वतःला धारेवर धरल्याने तुम्ही
नकारात्मक मानसिकतेचे शिकार होऊ शकता. खरे तर चूक केल्यानंतर कोणीही हाच मार्ग
अवलंबतो. आपल्याला आधीच का कळलं नाही? आपण असे कसे वागू शकतो? असे प्रश्न विचारून
विचारून स्वतःला छळण्याला पापक्षालन म्हणता येणार नाही. अशाने फक्त तुम्ही स्वतःलाच
त्रास देता आहात ज्याचा फायदा शून्य आणि तोटेच अधिक आहे. चूक दुरुस्त करण्याचे
आणखीही काही मार्ग असू शकतात, त्याचा शोध घेणे जास्त महत्वाचे आहे. पुन्हा पुन्हा
अशी चूक होऊ नये हे लक्षात घेणं आणि त्यानुसार सजग राहणं महत्वाचं आहे.
त्यासाठी स्वतःच्याच
विरोधातील आत्मटीकेचा कर्कश स्वर बंद करणे ही यातील एक महत्वाची पायरी आहे.
३) आपल्या हातून हे
काही होईल ते करण्याचा प्रयत्न करा
तुमच्यामुळे कुणी
दुखावले गेले असेल तर त्याची माफी मागा. परीक्षेत नापास झाला असाल तर पुन्हा
नव्याने तयारी करण्याचा निश्चय करा. चूक सुधारण्यासाठी काय काय करणे शक्य आहे असे
तुम्हाला वाटते ते ते प्रयत्न करा. लक्षात घ्या काही चुका या सुधारण्यायोग्य असतात
आणि काही चुका या कधीच सुधारल्या जात नाहीत. ज्या चुका सुधारण्यायोग्य असतात त्या
सुधारण्यासाठी हरेक प्रयत्न करा आणि ज्या चुका सुधारण्याची वेळ निघून गेली आहे
त्याबद्दल स्वतःला माफ करून पुढची धोरणे आखा.
आता पुढे काय? या
प्रश्नावर विचार करून जितके काही पर्याय सुचतील त्यावर काम करण्याचा प्रयत्न करा.
ज्या चुका सुधारता येण्यासारख्या असतात त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न जरी केला
तरी अपराधीभाव कमी होण्यास मदत होईल.
ज्या चुका सुधारण्यासारख्या
नाहीत त्यातून आपण काय शिकू शकतो? हा विचार करा. तो धडा कायमचा आणि पक्का लक्षात
ठेवण्याचा निर्धार करून पुढची वाटचाल करा.
आपल्या चुकांची
जबाबदारी स्वीकारली की त्यासाठी इतरांवर खापर फोडण्याची मानसिकता राहत नाही. एक
जबाबदार व्यक्ती बनण्यासाठीची ही पहिली पायरी आहे. चुकांची जबाबदारी स्वीकारली की,
पुन्हा त्याच चुका होण्याची शक्यता टळते.
४) स्वतःतील चांगल्या
गोष्टी शोधा
एक चूक म्हणजे आपण
असे कधीच होऊ शकत नाही. त्या एका चुकी व्यतिरिक्तही आपण कितीतरी वेगळे आणि मोठे
असतो. कितीदा आपल्यामुळे कुणाच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो. कुणाची कामे वेळेत
झालेली असतात. कुणाला भावनिक आधार मिळालेला असतो. या सगळ्या चांगल्या गोष्टी
करणारेही आपणच असतो. कित्येकदा आपल्यामुळे इतरांच्या वाट्याला आनंदाचे/अभिमानाचे
क्षण आलेले असतात. तेही आपणच असतो.
अशा कितीतरी चांगल्या
गोष्टी आपल्या आत दडलेल्या असताना एक चूक
आपल्या सगळ्या चांगुलपणावर पाणी फिरवू शकत नाही. आपण स्वतःला माफ करून आपल्यातील
या चांगुलपणावर लक्ष दिले तर माणूस म्हणून उन्नत होण्याची कितीतरी चांगली संधी
आपल्याला मिळू शकते. अजूनही असेच काही चांगले आपण करत राहू.
तुमची चूक तुमच्या
लक्षात आली हीच खरं तर मोठी गोष्ट आहे. त्यासाठी सतत अपराधी होऊन राहणं गरजेचं
नाही. त्यासाठी योग्य ती शिक्षा तुम्हाला मिळालेलीच आहे. पश्चातापाहून दुसरे
कुठलेच प्रायश्चित नाही.
५) आपणही माणूस आहोत!
माणूस हा चुकीचा
पुतळा आहे असे म्हटले जाते. आयुष्यात एकदाही चूक झालीच नाही अशी व्यक्ती या
पृथ्वीतालावर शोधून सापडणार नाही. अपयश मिळालेच नाही अशीही व्यक्ती कुठेच सापडणार
नाही. चुकांतून आणि अपयशातून शिकतात तेच लोक इतिहास घडवतात. आजवर झालेल्या महान
व्यक्तींबद्दल जर तुम्ही वाचलेत तर त्यांनाही त्यांच्या चुकांनीच योग्य तो रस्ता
दाखवला आहे. प्रत्येक व्यक्ती चुकते आणि प्रत्येक व्यक्तीला सुधारण्याची संधीही
मिळते. तशी ती आपल्यालाही मिळाली पाहिजे. इतकेच लक्षात ठेवा.
आयुष्यात कधी काय
होईल याचा अंदाज कुणालाच बांधता येत नाही. सगळ्याच गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे
त्याच वेळेवर घडतील असेही नाही. त्या त्या गोष्टींची वेळ यावी लागते. आपण फक्त
इथून पुढेही प्रयत्न करत राहण्याचा निश्चय सोडायचा नाही.
चुका होतात पण
त्यातून आपण पुढे जातो की तिथेच घुटमळत राहतो यावर च आपल्या प्रगतीचा आलेख अवलंबून
आहे. म्हणून स्वतःचा स्वीकार हाच आनंदी आयुष्याचा मूलमंत्र आहे!
Comments