बिकट प्रसंगात कृतज्ञ राहणं सोपं आहे का?

आयुष्यात सगळं काही अगदी सुरळीत, मनासारखं चाललेलं असतं, अपेक्षेपेक्षा पदरात जास्तच पडतं, हात लावेल तिथे सोनं अशी परिस्थिती असते तेव्हा तुम्ही मनापासून कृतकृत्य होत असाल. देवाचे किती आभार मानू आणि किती नको असे होत असेल. इतकं भरभरून दिल्याबद्दल तुम्ही त्याचे वारंवार आभारही मानत असाल पण, समजा हेच उलटं असेल तर? खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, रोजचा दिवस अगदी जीवावर उदार होऊन ढकलला जात असेल, मनावर निराशेचे मळभ दाटून आले असेल, कष्ट करूनही हाती फक्त शून्य लागत असेल तर? तर अशा परिस्थितीत कोणी कसे काय कृतज्ञ राहू शकेल. या परिस्थितीत कोणाला कृतकृत्य वाटेल? अशावेळी देवाकडे फक्त तक्रार केली जाते हे माझ्याच वाट्याला का? बरोबर ना?

 

Image source : Google


खरे तर कितीही वाईट, दुर्धर, प्रसंग असला तरी त्यातही काही तरी चांगले दडलेले असते. अशा संकटाच्या काळातही तुमच्यातील आशावाद थोडासा तरी लुकलुकत असतो. मग अशा दिवसात जे काही हाताशी आहे त्याबद्दल नको का आभार मानायला?

तुमच्या बिकट आणि खडतर परिस्थितीतही जर तुम्ही सकारात्मक राहायला शिकलात तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पण अशावेळी सकारात्मक कसं राहायचं आणि त्यातही कृतज्ञता कशाबद्दल आणि कशी व्यक्त करायची? त्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा!

 

खरे तर अशा अवघड काळात आपल्याला कृतज्ञ न वाटणं साहजिक आहे. पण या परिस्थितीशी दोन हात करायाचे असतील, घसरलेली गाडी रुळावर आणायची असेल तर आपल्याला कृतज्ञतेचा हात धरावा लागेल. त्यासाठी काही छोटी छोटी पावलं उचलावी लागतील.

१.  छोट्याछोट्या गोष्टींचा विचार करा -

  कृतज्ञता किंवा आभार व्यक्त करण्यासारखं काय आहे आपल्या आयुष्यात असं वाटतं तेव्हा आयुष्यातील अगदी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. जसं की तुमचं शरीर, परिस्थिती कितीही बिकट असली तरी माझं शरीर निरोगी आहे, म्हणून मी कृतज्ञ आहे असे आभार व्यक्त करू शकता. फक्त शरीरच नाही तर शरीरातील प्रत्येक अवयव! कारण, सध्या तुम्हाला काही शारीरिक त्रास नाही.

समजा जरी शारीरिक त्रास असला तरी मला औषध-पाणी आणि वैद्यकीय सुविधा मिळत आहेत, उपचार मिळत आहेत म्हणूनही तुम्ही कृतज्ञ राहू शकता.

तुमच्या घरातील एखादी वस्तू, तुमच्या सोबत राहणाऱ्या व्यक्ति, तुम्हाला धीर देणारे मित्र, या सगळ्याबद्दल तुम्ही कृतज्ञत व्यक्त करू शकता. तुमचे शिक्षण, तुम्हाला मिळणाऱ्या इतर सोयी सुविधा, लाईट, पाणी, किंवा अशाच अगदी छोट्या छोट्या गोष्टी. ज्यामुळे तुमची दैनंदिन कामं सुरळीत पार पडतात. दररोज ज्या गोष्टींशी आपला संपर्क येतो, ज्यामुळे आपला दिवस चांगला जातो असा सगळ्या गोष्टी कृतज्ञतेच्या यादीत येऊ शकतात.

 

तुमच्या अशा परिस्थितीतही तुमच्या पाठीशी राहणाऱ्या मित्र-मैत्रीणीना, नातेवाईकांना तरी धन्यवाद दिलेच पाहिजेत.

अगदी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहाबद्दल आणि दोन वेळच्या जेवणाबद्दल तर आपण कृतज्ञ राहूच शकतो.

 

२. जुन्या आठवणी

आज आयुष्यात काही चांगले घडत नसले तरी भूतकाळात आपण चांगले क्षण अनुभवलेले असतात. आयुष्यात चांगलं काही तरी घडून गेलेलं असतं. शाळा किंवा कॉलेजमधील दिवस तर किती भन्नाट असतात. त्या दिवसातील चांगल्या चांगल्या गोष्टी आजही आठवत असतील, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता. शालेय स्तरावरील एखाद्या स्पर्धेत मिळालेले बक्षीस, तुमच्या नृत्याला/ गाण्याला/ अभ्यासाला शिक्षकांकडून किंवा मित्रांकडून मिळालेली दाद, त्यांनी केलेले कौतुक. एखाद्या परीक्षेत तुम्ही मिळवलेले लक्षणीय गुण अशा किती तरी गोष्टी भूतकाळात घडून गेलेल्या असतात. ज्याबद्दल आपण आज आठवून आनंदी होतो, अशा सगळ्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो.

 

वडिलांकडून किंवा आईकडून, भावाकडून, मिळालेले एखादे गिफ्ट. ते क्षण, आठवल्यावर तुमच्या चेहऱ्यावर पसरणारं स्मित अशा गोष्टीही कृतज्ञतेच्या यादीत येतात.

अवघड काळात अशा सुखद आठवणीत रममाण होणं कुणाला आवडत नाही. तुम्हालाही आवडत असेल. अशा सुंदर क्षणात फक्त रममाण होण्याऐवजी इतके सुंदर क्षण आपल्याला अनुभवायला जगायला मिळाले म्हणून कृतज्ञ होऊया.

३. मन मोठं करूया

आणखी एक पर्याय म्हणजे मन मोठं ठेवणं. आपल्याला त्रास होतोय, आपल्याला हे सहन करावं लागतंय, अशा सगळ्या नकारात्मक भावनांपासून लक्ष थोडं दूर नेऊया आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. आपल्यावर प्रेम करणारे लोक म्हणजे आई-वडील, भाऊ-बहिण, आपली मुलं, पती/पत्नी किंवा आणखी कोणी असतील. या सगळ्यांमुळे आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त झालाय.

त्यांच्याकडून मिळालेले प्रेमळ क्षण, आधार, प्रेमाची ऊब या सगळ्या गोष्टींसाठी आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनाही काही तरी मदत लागत असेल तर ती देऊया, त्यांच्यातील चांगल्या गुणांचा शोध घेऊया आणि त्याबद्दल त्यांचं थोडं कौतुक करूया. नात्यात दुरावा निर्माण झाला असेल कटुता आली असेल, प्रत्यक्षबोलणं होत नसेल तरी, किमान आपण हे मनातल्या मनात, स्वतःशी तरी नक्कीच करू शकतो.

 

यामुळे तुमच्या मनातील कटुता कमी होईल. नकारात्मक विचार करण्यात जो आपला नाहक वेळ वाया जातो त्यापेक्षा हे विचार मनाला नक्कीच उभारी देतील. नव्याने प्रयत्न करण्यासाठी आणखी बळ देतील.

कठीण काळातही या सगळ्या गोष्टी करण्यासाठीही धैर्य लागतं, ऊर्जा लागते. आपलं आणि आपल्यासह इतरांचंही भलं व्हावं ही प्रमाणिक इच्छा लागते.

 

Image source : Google


तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा, एक न एक दिवस तुमच्या मुक्कामापर्यंत नक्कीच पोहोचाल.

 

Post a Comment

0 Comments