मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी या प्रकारचा आत्मसंवाद तुम्ही कधी केलाय का?

“रोजचा दिवस कुठे उगवतो आणि धावपळीत कसा मावळतो हेही कळत नाही. दिवसभरात कसला तो निवांतपणा नाही. नुसती दगदग दगदग दगदग! आणि इतकं करून मिळतं काय? काहीच नाही. प्रत्येकाकडून आम्हालाच बोलून घ्यावं लागतं.” श्रियाचा पारा चांगलाच चढला होता. आज ऑफिस मध्ये असूनही ती नसल्यासारखीच होती. सकाळी सकाळीच स्वारी भलतीच नाराज आणि भडकलेली दिसत होती. खरं तर श्रियाच काय पण कधी कधी आपणही असे विनाकारण भडकलेले असतो. आपल्या मनात नेमका कसला संताप खदखदतोय ते आपल्यालाही कळत नसते. होतं काय की रोजच्या धावपळीत आपण आपल्या मानसिक अवस्थेकडे लक्षच देत नाही आणि मग आतली उलथापालथ अशी अचानक बाहेर पडते.

 

Image source : Google

आपल्या मनाची उलथापालथ अशी अचानक बाहेर पडत असेल, सतत आपला संताप होत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवरूनही पारा चढत असेल तर आपण थोडं आपल्या मनाकडे लक्ष द्यायला हवंय. कारण, राग राग करणाऱ्या, सतत चीडणाऱ्या व्यक्तीसोबत राहायला इतरांनाही आवडत तर नाहीच पण तुम्हाला स्वतःलाही पुढे जाऊन या गोष्टीचा मोठा फटका बसू शकतो.

 

आपले व्यक्तिमत्व प्रसन्न, शांत, प्रफुल्लीत आणि उत्साही बनवायचे असेल तर आपल्या मनाशी होणारा संवाद जाणीवपूर्वक बदलायला हवाय. मग हा संवाद कसा बदलायचा?

 

आता वर श्रिया जे बोलली ते शब्द बघा, ती म्हणजे दिवस कुठे उगवतो कुठे मावळतो हेच कळत नाही. या वाक्याच्या पाठीमागे ती स्वतःशी हेच बोलली असणार की माझा दिवस अत्यंत व्यस्त जातो. मला थोडीही उसंत मिळत नाही. खूप दमछाक होते वगैरे वगैरे, या तिच्या आत्मसंवादातूनच तिचा हा संताप निर्माण झाला आहे.

 

आता हाच आत्मसंवाद थोडा बदलला तर? या सगळ्या नकारात्मक वाक्यांच्या ठिकाणी आपण स्वतःशी बोलताना जाणीवपूर्वक काही सकारात्मक वाक्ये वापरली तर? तर नक्कीच आपल्या मानसिक अवस्थेतही सकारात्मक बदल होतील आणि ते तुमच्या व्यक्तीमत्वातही दिसतील.

 

आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी त्याच्याशी पुढील काही वाक्ये बोला. ही वाक्ये तुम्ही अशीच्या अशीही बोलू शकता किंवा याच्यात तुम्ही तुम्हाला साजेशे बदलही करू शकता फक्त त्यातील भावना जशीच्या तशी राहणे महत्वाचे आहे.

 

१. मी जशी आहे तशी मला स्वीकारले आहे आणि माझ्या आयुष्यात मी खुश आहे.

स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल आपल्या खूप तक्रारी असतात. तुम्ही जेव्हा सतत या तक्रारींचा पाढा वाचता तेव्हा आपसूकच स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडून ठेवता. त्याऐवजी आहे ती परिस्थिती स्वीकारली तर स्वतःचाच त्रास कमी होईल मग आहे ती परिस्थिती स्वीकारण्यासाठी मनाची तयारी तर करावी लागेलच ना? त्यासाठी हे किंवा या अर्थाचे तुमचे स्वतःचे वाक्य रोज सकाळी उठल्या उठल्या स्वतःशी बोला. यामुळे तुमचा मूड सुधारेल. स्वतःचा आणि परिस्थितीचा स्वीकार करण्याचे बळ मिळेल.

२. मी शांत आहे, माझे मन स्थिर आहे यात कोणीही बदल करू शकत नाही.

अनेकदा बाहेरच्या घटना, प्रसंग किंवा एखाद्या व्यक्तीचे वर्तन यामुळे आपली मानसिक शांतता भंग पावते असे आपण म्हणतो तेव्हा आपल्या मानिसक अवस्थेचे रिमोट आपण दुसऱ्याच्या हाती दिलेले असते. पण माझी मन:शांती माझी जबाबदारी या न्यायाने जेव्हा तुम्ही काही झाले तरी मी माझे मानसिक शांतता ढळू देणार नाही, या तत्वाशी ठाम राहता तेव्हा तुम्ही शांत राहायला शिकता. हळूहळू याचीही तुम्हाला सवय लागते. कुठल्याही प्रसंगामुळे, व्यक्तीमुळे, मी माझी शांतता भंग होऊ देणार नाही असा एकदा निश्चय केला की बास!

३. मी माझ्या श्वासागणिक अधिकाधिक शांतता अनुभवत आहे.

दिवसाची सुरुवात करताना तुम्ही थोडा वेळ स्वतःसाठी द्यायचाच आहे. हे करत असताना स्थिर बसा आणि तुमच्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा कल्पना करा की तुमच्या नाकपुडीतून आत जाणाऱ्या श्वासासोबत तुमच्या आत शांतता प्रवेश करत आहे तुमचे मन, तुमचा मेंदू आणि तुमच्या शरीराला ही शांती जाणवत आहे, तुम्ही ती शांतता अनुभवत आहात. जेव्हा तुम्ही उच्छवास सोडाल तेव्हा कल्पना करा की तुमच्या उच्छवासासोबत तुमच्या मनातील राग, भीती, संताप या  भावनाही निघून जात आहेत. किमान पाच ते दहा वेळा तरी तुम्ही या कल्पनेसोबत श्वासोच्छवास करायाचा आहे आणि हे करताना सतत हे वाक्य उच्चारायचे आहे.

४. माझे आयुष्य एकदम भन्नाट आणि जबरदस्त आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही तक्रारी असतात तशाच काही भन्नाट गोष्टीही असतात. तुमच्याकडे असणाऱ्या या भन्नाट गोष्टी मोजा. उदा. तुमचे राहते घर, तुमच्या घरातील फर्निचर, तुमच्या घरातील इतर सुखसोयी, तुमचे कुटुंबीय, तुमची मुले, हे सगळं जे तुमच्याकडे आहे, अनेकांच्या नशिबात तर तेही नसतं. म्हणून या सगळ्या सुखसोयींची, व्यक्तींची, गिनती करा आणि त्यामुळे तुमचे आयुष्य किती सुंदर बनले आहे याचा विचार करा. त्याबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त करा. म्हणूनच रोज सकाळी हे एक सकारात्मक वाक्य तुमच्या आत्मसंवादात असलेच पाहिजे.

५.  माझी रोजची कामे करताना मला आनंद मिळतो/ माझी दैनंदिन कामे मी अतिशय आनंदाने करतो/करते.

कितीही संताप, राग, नैराश्य आले तरी आपल्या पोटापाण्याचा उद्योग तर आपल्याला करावाच लागणार आहे. मग यासाठी तुम्ही कोणतेही काम करत असाल ते आनंदाने करत असल्याचे किंवा त्याकामातून तुम्हाला आनंद मिळत असल्याची कल्पना करा. कधीतरी तुम्ही ते काम आवडीनं केलेलं आहे ते क्षण आठवा. तुम्ही स्वतःशी बोलताना तुमच्या कामाबद्दल तक्रारींचा पाढा न वाचता त्यातून तुम्हाला आनंद मिळत असल्याचे वारंवार बोला आणि तो आनंद अनुभवा.

६. मी सुरक्षित आहे.

तुम्हाला कितीही आणि कसलीही भीती वाटत असली तरी आता या क्षणी कुणीही तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवलेली नाहीये. कुणी तुमचा जीव घेणार नाहीये. तुमचं जे काम आहे त्यात तुम्ही सुरक्षितता अनुभवता आहात. तुमच्यावर संकटांचा डोंगर कोसलेला नाही. कोसळला असला तरी तुमचे श्वास चालू आहेत. या सगळ्याची एकवारसजगपणे नोंद घ्या आणि स्वतःला कायम हे बजावा की, मी सुरक्षित आहे. यामुळे तुमच्या मनातील अज्ञात भीती कमी होईल. त्यामुळे तुमचे मन स्थिर राहील.

७. माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी कष्ट करू शकतो. माझ्यात कष्ट आणि परिश्रम करण्याची क्षमता आहे.

तुमची स्वप्ने कितीही मोठी, कितीही अवघड असू द्या. त्यावर विश्वास ठेवा. जगात काहीही शक्य आहे, तुमची स्वप्नेही प्रत्यक्षात उतरणे शक्य आहे. त्यासाठी जे परिश्रम करावे लागणार आहेत त्यासाठी तुम्ही सक्षम आहात, तुम्ही ते करत आहात आणि त्यानुसार तुम्हाला यश मिळत आहे. म्हणून आत्मसंवादाच्या वेळी या वाक्याचा जरूर समावेश करा. तुमचा हा आत्मसंवाद तुम्हाला आणखी प्रबळ आणि सक्षम बनवेल यात शंका नाही.

८. चिंता, काळजी आणि तणाव या सगळ्या नकारात्मक भावनांना मी तिलांजली देत आहे.

तुमच्या मनात कोणत्याही गोष्टीबाबत काळजी असेल, चिंता वाटत असेल, एखादी गोष्ट होईल की नाही जमेल की नाही याबद्दल तुम्ही तणावात असाल तर हे वाक्य जरूर बोला. हे वाक्य स्वतःशीच बोलत असताना तुमच्यातील काळजी, चिंता, तणाव बाहेर पळून जात आहेत अशी कल्पना करा. त्याठिकाणी सकारात्मक भावना प्रस्थापित झाल्याचे अनुभवा.

९. माझ्या मार्गात कितीही अडथळे आले तरी त्यावर मी मात करेन.

स्वप्नपूर्तीच्या वाटेतील अडथळे पाहूनच आपले मन कच खाते. आपला आत्मविश्वास डळमळतो. हा आत्मविश्वास डळमळू नये म्हणून तुम्ही स्वतःशी हे वाक्य जरूर बोला. आपल्या अडचणींपेक्षा आपल्यातील क्षमता जास्त शक्तिशाली असल्याचे जेव्हा तुम्ही अनुभवाल तेव्हा नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल.

१०. भीतीला दूर करून मी शांततेचा अनुभव घेत आहे.

तुमच्या मनातील भीती मग ती कुठल्याही गोष्टीबाबतची असेल, जेव्हा दूर कराल तेव्हा अपोआपच तुमचे मन शांत होते. लक्षात घ्या कुठल्याही गोष्टी बाबतची तुमच्या मनातील भीती ही तुमच्या कल्पनेत आहे वास्तवात नाही. आत्ता, या क्षणी तुम्ही सुरक्षित आहात. काही गोष्टी ज्यावर तुमचे नियंत्रण नाही त्या घडणारच आहेत, त्या तुम्ही बदलू शकत नाही हे वास्तव स्वीकारले की मनातील काल्पनिक भीती कमी कमी होत जाते आणि एकदा का भीती कमी झाली की मन शांत आणि स्थिर होत जाते. यासाठी दररोज तुम्ही स्वतःशी हे वाक्य बोलले पाहिजे आणि ते अनुभवले पाहिजे.

११. माझा स्वतःवर आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास आहे.

आपण जे निर्णय घेतो ते बरोबर आहेत की चुकीचे, त्याचा काही फटका बसला तर, त्यामुळे काही विपरीत घडलं तर? असे अनेक प्रश्न आपल्याला सतावत असतात. या प्रश्नांमुळे तुमच्या मनाची अस्थिरता वाढते आणि मन अशांत होते. स्वतःवरचा विश्वास वाढवण्यासाठी हे वाक्य तुम्हाला खूप खूप उपयोगी ठरेल. न चुकता हे वाक्य स्वतःशी बोला. जितक्या वेळा बोलता येईल तितक्यावेळा बोला.

१२. कोणत्याही परिस्थिती मी सकारात्मक विचार करते/करतो.

तुमचे विचार सकारात्मक असतील तर कोणत्याही परिस्थितीत तुमची मनशांती स्थिर राहते. म्हणून हे एक वाक्य स्वतःशी वारंवार बोला. ज्यामुळे तुमच्या मनाला सकारात्मक विचारांची ओढ लागेल आणि कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी तुम्ही सकारात्मक वाट निर्माण करू शकाल.

१३. मी शांत आणि स्थिर आहे.

तुम्ही स्वतःला जेव्हा सांगता की मी शांत आणि स्थिर आहे त्याक्षणापासून तुम्ही शांतता अनुभवण्यास सुरुवात करता. हे वारंवार बोला. वारंवार बोलल्याने तुमच्या मनाचा, मेंदूचा त्यावर विश्वास बसतो. तुमचे मन शांत आणि स्थिर होते.

१४. आयुष्यात झालेल्या बदलांचे मी स्वागत करते/करतो.

बदल हा निसर्गाचा एक नियम आहे. दररोजच आपल्या आयुष्यात छोटेमोठे बदल होत असतात. पण आपल्याला मात्र या बदलांशी लवकर जुळवून घेता येत नाही आणि मग सुरु होते अस्थिरता. ज्यातून अनेक समस्या उद्भवू शकतात. बदल स्वीकारायचे असतील तर मनाची तयारी करायला हवी मग ती कशी करणार, आत्मसंवादातूनच हे शक्य आहे. म्हणून सतत हे वाक्य स्वतःशी बोलत राहा.

१५.  माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे.

माझ्याच बाबतीत असं का? हे आताच व्हायचं होतं का? असे अनेक प्रश्न भंडावून सोडतात. तेव्हा मन शांत करण्यासाठी हा एक मंत्र चांगलाच उपयुक्त ठरेल. परिस्थितीचा स्वीकार करण्यास तुम्ही तयार व्हाल.

१६. माझे निर्णय माझ्या कुटुंबियांच्या दृष्टीनेही योग्य असतात.

आपल्या निर्णयाचे परिणाम फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या कुटुंबियांना आणि जवळच्या लोकांनाही भोगावे लागतात. आपल्यामुळे त्यांना तर त्रास होणार नाही ना, अशीही एक भीती आपल्या मनात दडी मारून बसलेली असते. ती भीती पळवून लावण्यासाठी हे वाक्य तुम्हाला मदत करेल.

१७. प्रत्येक प्रसंगात मी शांत असते/असतो. माझा आत्मविश्वास कधीही ढळत नाही.

प्रत्येक परिस्थितीत सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे शांती आणि विश्वास. या दोन गोष्टी ज्याच्याकडे असतात ती व्यक्ति आयुष्यात नक्कीच यशस्वी ठरते. आपल्यासाठीही हीच एक गोष्ट महत्वाची आहे, प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे.

१८. आयुष्यातील एका नव्या दिवसाबद्दल मी कृतज्ञ आहे आणि नव्या संधीबद्दलही.

आपण ही सकारात्मक वाक्ये रोज सकाळी उठल्या उठल्याच स्वतःशी बोलणार आहोत. म्हणून रोज सकाळी पहिल्यांदा आपल्या आयुष्यात उगवलेल्या या नव्या दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने आपले मन आनंदी होते. नवा दिवस नवी संधी, अशा दृष्टीकोनानेच दिवसाची सुरुवात केल्यानंतर मागच्या अनेक वाईट गोष्टींचा विसर पडतो.

१९. मी स्वत:वर प्रेम करते/करतो. मी स्वतःला आहे तशी/तसा स्वीकारते/स्वीकारतो.

यामुळे तुमच्या मनातील अपराधीभाव, न्यूनगंड कमी होईल. आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी झळाळी येईल. व्यक्तीमत्वात आकर्षक बदल घडवून आणायचे असतील तर या एका सकारात्मक वाक्याला तुमच्या सकाळच्या आत्मसंवादात  जागा दिलीच पाहिजे. तुम्ही हे वाक्य रोज सकाळी स्वतःशी बोलाल तेव्हापासूनच तुम्हाला फरक जाणवायला लागेल.

२०. मी माझ्यातील सर्व नकारात्मक भावनांचा त्याग करत आहे.

दररोजच्या अनुभवातून, ऐकण्यातून, आपल्या मनात अनेक नकारात्मक भावनांनी घर केलेले असते. त्या सगळ्या भावनांचा त्याग करण्यासाठी म्हणून हे एक वाक्य स्वतःशी बोलणे अत्यंत आवश्यक आहे.

 

ही सगळी वाक्ये तुम्हाला मानसिक दृष्ट्या स्थिर आणि शांत बनवण्यासाठी उपयुक्त ठरतील. यातील सगळीच वाक्ये तुम्ही जशीच्या तशी स्वीकारली पाहिजेत असं नाही पण किमान यातील काही वाक्यांचा तरी तुमच्या आत्मसंवादात शिरकाव झाला पाहिजे. बदलाची सुरुवात स्वतःपासून होते या वाक्यावर विश्वास ठेवणारी लोकं नक्कीच या वाक्यांचा स्वीकार करतील.

Post a Comment

0 Comments