प्राध्यापक असूनही हा माणूस पत्र्याच्या डब्यापासून काचरापेटी बनवतोय!

शाळेत जाऊन मुलांना फक्त गमभन लिहायला वाचायला शिकवणं एवढंच शिक्षकाचं काम नाही तर, समाजात एक सुजाण नागरिक म्हणून कसं वावरायचं? याचे धडेही आपल्याला शिक्षकांकडूनच मिळतात. समाजातील न्याय आणि नैतिक मुल्यांची शिकवणही आपल्याला आपले शिक्षकच देतात. म्हणूनच आई-वडिलांच्या नंतर आपल्याला आपल्या शिक्षकांविषयी प्रचंड आदर वाटतो. आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबतच समाजात जागरूकता निर्माण करणारा एक शिक्षक काय काय करू शकतो हे जर पहायचे असेल तर आपल्याला उत्तराखंड राज्यातील अल्मोडा तालुक्यतील शिक्षक जमुना प्रसाद तिवारी  यांच्या विषयी जाणून घेतलं पाहिजे.

Image source : Google




प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होते असेही म्हणायचे आणि दुसरीकडे तेच प्लास्टिक विविध रुपात बाजारात आणायचे. हा दुटप्पीपणा सहन न होणारे जमुना प्रसाद यांनी पत्र्याच्या डब्यापासून कचराकुंड्या बनवल्या. स्वतःच्या हातानी बनवलेल्या या कचराकुंड्या ते आजूबाजूच्या लोकांना फुकटात वाटतात. पर्यावरण वाचवा आणि स्वच्छता राखा अशा नुसत्या घोषणा देऊन पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात तिवारी यांना फारसा रस नाही. त्याउलट त्यांनी स्वतः एक अशी वाट निवडली ज्यामुळे त्यांच्या हातून पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छता क्षेत्रात काही रचनात्मक कार्य होईल.

जमुना प्रसाद तिवारी  हे राजकीय इंटर कॉलेज, बटुलिया येथे जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात. आपल्या कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर ते फावल्यावेळात तेलासाठी जे पत्र्याचे डबे वापरले जातात त्या पत्र्याच्या डब्यापासून कचरापेटी बनवतात. त्याला सुंदर रंग देतात, त्यावर आपल्या सुंदर हस्ताक्षरात संदेश लिहितात आणि या कचरापेट्या ते फुकटात वाटतात.

स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासाठी जमुना प्रसाद गेले कित्येक वर्षे काम करत आहेत. त्यांच्या या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. गेली पाच वर्षे त्यांचे हे काम अखंडपणे सुरु आहे.

लोकांनी कचरा हा कचरापेटीतच टाकावा, रस्त्यावर इथे तिथे कचरा टाकून अस्वच्छता करू नये, म्हणून जमुना प्रसाद स्वतःही खबरदारी घेत आहेत. त्याच्या भागातील अनेक ग्रामपंचायतीही त्यांच्या या कामात सहभागी झाल्या आहेत. सर्वांनी एकत्र येत गावाच्या, शहराच्या आणि भागाच्या विकासासाठी स्वच्छता मोहीम राबवल्यास परिसरातील कचरा साफ होईलच पण कचऱ्यामुळे पसरणारी रोगराईदेखील आटोक्यात येईल.

जमुना प्रसाद तिवारी हे आजूबाजूच्या खेड्यापाड्यावर जाऊन स्वच्छतेसंबंधी जागृती करतात. गावातील लोकांनी ही या स्वच्छता मोहिमेशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे असे त्यांना वाटते.

पत्र्याच्या या डब्यांना फक्त कचरापेटीचेच नव्हे तर आकर्षक कुंड्यांचे रूप दिले त्यात सुंदर सुंदर फुलझाडे लावली. आपल्या विद्यार्थ्यांनाही ते या कुंड्यातून फुलझाडे लावण्यास प्रोत्साहन देतात. गावोगावी त्यांनी बनवलेल्या या कचरापेट्या नेऊन त्यात रस्त्यातील कचरा भरला जातो. त्यांनी स्वतःपासून सुरु केलेल्या या कामाला हळूहळू आजूबाजूच्या गावकऱ्यांनीही साथ द्यायला सुरुवात केली.

 

Image souce : Google

कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे देखील पर्यावरण रक्षणातील एक महत्वाचे काम आहे. ज्या तळमळीने ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात, त्याच तळमळीने आणि प्रामाणिकपणे ते कचरा उचलण्याचेही काम करतात. जीवशास्त्रीचा प्राध्यापक असूनही मी हे काम का करू? कसं करू? यासारखे प्रश्न त्यांना सतावत नाहीत. वेगवेगळ्या गावात ते आपल्या कचरा पेट्या घेऊन जातात आणि तिथे पडलेला कचरा उचलून या डब्यात टाकतात. एका त्रयस्थ व्यक्तीला गाव साफ करताना पहिल्यानंतर गावातील लोक आपणहूनच त्यांच्या कामात सामील होतात.

 

त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचे विद्यार्थीही आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ राहील याकडे विशेष ध्यान देतात. राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजचे नाव मोठे केले आहे.

 

जमुना प्रसाद तिवारी यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना २०१६ साली राज्य पुरस्कार आणि २०१७ सालचा शैलेश मटियानी पुरस्कार मिळाला आहे.

 

पाठ्यपुस्तकाबाहेर जाऊन आपल्या कृतीद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक उत्तरदायीत्वाची शिकवण देणारे जमुना प्रसाद तिवारी यांच्यासारख्या शिक्षकांची आज संपूर्ण देशाला गरज आहे.

Post a Comment

0 Comments