एकटे राहण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

तो स्वतः पार्ट्या, मित्रपरिवार, मौजमजा करण्यात व्यस्त असतो पण तिच्यावर संशय घेतो. तिने घरातून बाहेर पाऊल जरी ठेवलं तरी त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. तिने कुठं जायचं, कुणाला भेटायचं, कधी भेटायचं हे सगळं तोच ठरवतो. तिने घरातील कामे वेळेत केली नाहीत की लगेच तिला वेळेचा हिशोब विचारतो.

 

तो कधी कधी उशिरा घरी येतो. त्याला काही तरी नवं शिकायचं आहे. तिला मात्र त्याचं हे तासानतास बाहेर राहणं आवडत नाही. सतत त्याच्या घरच्यांच्या संपर्कात राहतो म्हणून तिला चीड येते. तिच्या मागण्या पूर्ण नाही केल्या की घर डोक्यावर घेते. सतत हे का? ते कशासाठी विचारत राहते? भुणभुण लावते.

 

Image source : Google

दोन्ही उदाहरणे वेगवेगळी आहेत पण दोन्ही ठिकाणी समस्या एकच आहे, जोडीदार!

 

प्रत्येक जोडप्यात तशा कुरुबुरी आणि तक्रारी असतातच. शंभर टक्के प्रेम किंवा शंभर टक्के तिरस्कार असा कुठल्याही नात्यात नसतं तरीही काही काही ठिकाणी काही लोक आपल्या हट्टापोटी, असुरक्षितते पोटी इतरांच्या पायात बेड्या अडकवतात. प्रेम करणं म्हणजे सतत दुसऱ्याची काळजी करणं नव्हे हे अशा लोकांना समजतच नाही किंवा सतत दुसऱ्याच्या इच्छा, आकांक्षा आपल्या ताब्यात ठेवणं म्हणजेही प्रेम नव्हे.

 

नात्यातील कुरबुरी आणि तक्रारी बोलून-चालून मिटवता येतात अशा विश्वास जेंव्हा वाटतो तेव्हा ते नातं पुन्हा बहरण्याची शक्यता असते. पण जिथे बोलल्याने-एकत्र राहिल्याने फक्त आणि फक्त एकमेकांना त्रास, अपमान, अवहेलना, तिरस्कार हेच देत असाल तर अशी नाती का टिकवायची हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा. नातं टिकवण्यासाठी आयुष्यातील काही गोष्टी आपण सोडून देतो पण, प्रत्येकवेळी तुम्हालाच आपल्या नोकरीवर, वेळेवर, प्रसंगी आरोग्यावरही पाणी सोडावं लागत असेल तर थोडा पॉज घ्या आणि यावर नक्की विचार करा.

 

तुम्हाला फुलू न देणाऱ्या, तुमच्या आत्मसन्मानाला वारंवार दुखावणाऱ्या नात्यात तुम्हाला का राहायचं आहे? एकटं पडण्याची भीती वाटते म्हणून. हेच जर तुमचं उत्तर असेल तर तुम्ही तुमच्या या उत्तरावर एकदा फेरविचार करायला हवा.

 

 खरे तर विखारी नात्यापेक्षा एकटेपणा कधीही बराच! एकटे राहण्याचे तोटे तर तुम्ही खूप जणांकडून ऐकले असतील पण एकटे राहण्याचे काही फायदेही असतात हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर हा पूर्ण लेख नक्की वाचा!

एकटं असणं किंवा एकटं राहणं तितकसं वाईट अजिबात नाही. एकटे राहण्याने एकटेपणा येतो ही देखील एक अंधश्रद्धाच! एकदा का तुम्हाला जखडून ठेवणारे साखळदंड तोडून बाहेर पाडण्यात तुम्ही यशस्वी झालात की तुम्हाला समजेल की अवघा आसमंत मोकळा आहे भरारी घेण्यासाठी.

 

सुरुवातीला थोडं दचकायला बिचकायला होईल पण हळूहळू तुम्ही रुळलात की मग आयुष्याच्या पटरीवरून सुसाट धावत सुटाल.

 

एखाद्या नात्यात जव्हा आपली घुसमट होत असते तेव्हा आपलं सगळं लक्ष फक्त त्या नात्यातील नकारात्मक गोष्टीवरच लागून राहते. स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. म्हणून जेव्हा एकटे व्हाल तेव्हा नक्कीच आधी स्वतःकडे लक्ष द्यायचे आहे हे लक्षात ठेवा. एकट्या माणसाला स्वतःकडे लक्ष द्यायला भरपूर वेळ मिळतो. या वेळेत तुम्ही तुमचा आवडता व्यायाम प्रकार करू शकता. सायकलिंग, सकाळी फिरायला जाणे, योगा, ध्यानधारणा अशा कितीतरी गोष्टी ज्या स्व-विकासासाठी आवश्यक आहेत त्या करण्यासाठी तुम्हाला एकांतच हवा असतो. मिळालेला हा एकांत जेव्हा तुम्ही अशा गोष्टींसाठी वापराल तेव्हा तुमच्या आरोग्यात सकारात्मक बदल होत जातील. तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा वाढवायचे असेल तर त्याकडे लक्ष देऊ शकता. रोगप्रतिकारशक्ती कशी सुधारेल त्यावर फोकस करू शकता. एकूणच काय तर तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी हा एकटेपणा नक्कीच तुम्हाला मदत करेल.

 

एकट्या माणसाला फारसा खर्च येत नाही. कारण एकटे असताना आपल्या गरजा कमीकमी होत जातात. त्यामुळे खर्च कमी होतो आणि बचत जास्त होते. याच वेळी आपण बचतीची सवय लावून घेतली तर पुढे जाऊन आपल्याला आर्थिक सुरक्षितता लाभते. शिवाय, आतापर्यंत मिलाल्लेल्या वेळ तुम्ही अधिकाधिक काम करण्यात घालवता आणि अधिक काम म्हणजेच अधिक पैसा. हा एकटेपणा आपसूकच तुम्हाला आर्थिक स्थिरता देण्यात फायदेशीर ठरतो.

 

तुम्हाला कामानिमित्त, बाहेरगावी, बाहेरच्या राज्यात किंवा देशात जायचं असेल तर त्यासाठीही कुणी कटकट करू शकत नाही. तुम्ही तुम्हाला हव्या त्या ठिकाणी जाऊन नोकरी, व्यवसाय करू शकता. तिथे जाऊन काय होणार? मला सोडून जाणं गरजेचंच आहे का? अशा प्रश्नांचा विचार करण्याची वेळच येणार नाही. परिणामी तुमच्या करिअरमध्ये तुम्ही अधिकाधिक यश मिळवू शकता.

 

आता आपल्याकडे अधिक वेळ असतो या वेळेत आपण निवांतपणा अनुभवू शकतो. कामावरून घरी जायला उशीर होतोय म्हणून धाकधूक वाटून घ्यायची गरज नाही. आपण नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ देऊ शकतो. नव्या गोष्टी शिकताना होणारा आनंद अनुभवू शकतो. आपल्याला आवडणारी पुस्तके वाचू शकतो. हवी ती सिरीयल किंवा टीव्ही वरील कार्यक्रम पाहू शकतो. आवडती गाणी ऐकू शकतो. तुमची कल्पनाशक्ती जिथं पर्यंत ताणली जाईल तिथं पर्यंत ताणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे बदल हवेसे वाटतात हे सगळे बदल अंमलात आणू शकता त यासाठी प्रयत्न करू शकता.

 

Image souce : Google



वेळ जात नसेल तर एखाद्या वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात वेळ घालवू शकता. ज्यांना माणसाची गरज आहे, अशा माणसासोबत राहण्याचा आनंद वेगळाच असतो. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करू शकता. कुणाला तुमच्याकडून काही शिकायची इच्छा असेल तर, तुमच्या जवळच्या चांगल्या गोष्टी इतरांना शिकवू शकता. यातून तुमचा स्वतःबद्दलचा दृष्टीकोन बदलेल. आपणही काही करू शकतो, हा आत्मविश्वास वाढेल. इतरासाठी उपयोगी पडल्याची भावना एक वेगळे समाधान देऊन जाते, जे आजपर्यंत तुम्ही अनुभवले नसेल ते अनुभवू शकाल.

 

विखारी नात्यात तुमच्या आत्मसन्मानाला खूप खूप इजा पोहोचलेली असते ती सल तुम्ही याप्रकारे भरून काढू शकता.

 

आपले आई-वडील, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी यांच्यासाठी वेळ देताना आधी खूप खूप विचार करावा लागत होता पण, आता तसे होणार नाही. त्यांना आपली गरज असेल तेव्हा त्यांच्यासोबत तुम्हाला राहता येईल. त्यांना तुमची काही मदत हवी असेल तर ती देता येईल. त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात, आनंदात सहभागी होता येईल.

 

एकटेपणा ही शिक्षा नसून ते आपल्याला मिळालेले बक्षीस आहे असे समजा. अनेक लोकांना स्वतःसाठी काही करायचं म्हटलं की वेळच मिळत नाही. पण एकटे राहणाऱ्या लोकांना ही समस्या सतावत नाही. एकटे असताना तुम्हाला शांतता आणि समाधान लाभते. जेव्हा घरात कोणी नसेल तेव्हा तुम्ही मोठमोठ्यानी गाणी लावू शकता, टीव्ही पाहू शकता, किंवा तुम्हाला गाणी गुणगुणण्याची आवड असेल तर तेही करू शकता. एखादे वाद्य वाजवायची आवड असेल तर ते करू शकता कारण, तुमच्या या सगळ्या अॅक्टिव्हिटीमुळे आपल्याला त्रास होतो असे म्हणणारे आजूबाजूला कुणीही नसेल. तेव्हा मिळालेला एकांत म्हणजे एक बोनस पॉइंट आहे असे समजून त्याकडे पहा.

 

एकटे राहण्याच्या भीतीने घुसमट सहन करणे म्हणजे जिवंतपणी स्वतःलाच मारून टाकणे.

 

 उंचावरून पाण्यात सूर मारणारे पट्टीचे जलतरणपटू तुम्ही पहिले असतील. त्यांना उंचीची, पाण्यात पडल्यावर लागले तर अशी भीती वाटत नसेल का? पण तरीही एका क्षणासाठी आपल्या भीतीला दूर सारून ते वरून खाली पाण्यात उडी मारतात आणि आपण उंचावरून उडी मारू शकलो, काही क्षण का असेना हवेत तरंगण्याचा अनुभव घेऊ शकलो याचा त्यांना जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो. म्हणून स्वतःला बांधून ठेवू नका, झोकून द्या. कदाचित तुम्हालाही अशक्य ते शक्य झाल्याचा अवर्णनीय आनंद मिळू शकतो. त्या आनंदाला पारखे होऊ नका!

 

 

Post a Comment

1 Comments

खूप मस्त फायदे आहेत. स्वतःसाठी वेळ देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सोबत आपल्याला आनंद मिळेल अशा समाज उपयोगी गोष्टी केल्या तर नक्कीच फायदा होईल.