नात्याच्या बाबतीत चोखंदळपणा हवाच!

काही लोक कुठलीही वस्तू घेताना, खरेदी करताना किती पारखत बसतात. त्यांना जशी हवी तशी वस्तू मिळाल्याशिवाय ते खरेदी तर करणार नाहीतच पण, ‘घे रे आता अॅडजस्ट करून,’ असे म्हटले तर ऐकणारही नाहीत. एकदम चोखंदळ. वस्तूच्या बाबतीत ठीक आहे पण काहीजण नात्याच्या बाबितीतही तितकेच चोखंदळ असतात. थोडसं जमवून घ्यावं नमतं घ्यावं आपल्या अपेक्षांना मुरड घालावी यातलं काही म्हणता काही त्यांना जमत नाही. त्यांच्या अटीवर ते ठाम असतात. इतका पण काय तो चोखंदळपणा किमान नात्याच्या बाबतीत तरी बरा नव्हे हं! असा सूर तुम्ही आजूबाजूला अनेकदा ऐकला असेल.

 

Image Source : Google



“काय बाई किती पोरी बघितल्या तरी या सुदेशला एक पोरगी पसंत पडत नाही. कुठली अप्सरा आणणार आहे कुणास ठाऊक?”

 

“मुलीचं वय काय आणि यांच्या अपेक्षा काय, जरा तरी कुठे तडजोड नको का करायला? कायमची घरात बसली की मग कळेल.”

 

असे टोमणे आणि चर्चा तुमच्याही  कानावर पडत असतील. केवळ या टोमण्यांपासून तुमची सुटका व्हावी म्हणून जर तुम्ही घाई केलीत तर पुढे जाऊन तुम्हालाच पश्चाताप होणार आहे. नात्यांच्या बाबतीत चोखंदळपणा दाखवलेला अनेकांना आवडत नाही पण नात्याच्या बाबतीत चोखंदळ असण्याचे काय फायदे असतात आणि चोखंदळ का असलं पाहिजे याबद्दलचे आपण आज थोडी चर्चा करूया.

 

आता तर सर्वच वर्गमित्रांची लग्न झाली मग आपणच का मागे? हाच हेतू ठेवून लग्न करत असाल तर तुम्ही चूक करताय. जेव्हा आपण आपल्या भावी जोडीदाराचा विचार करतो तेव्हा काही गोष्टींची पारख करणं अत्यावश्यक बनतं.

 

तुमच्या अपेक्षा, स्वप्नं, भविष्यातील योजना, एकमेकांना कशी साथ द्याल या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच काय तो अंतिम निर्णय घेतलेला सुखाचे ठरेल. कारण, हे नातं एकदा जोडलं की पटकन तोडता येत नाही आणि या नात्याचा दोन्ही व्यक्तींच्या आयुष्यावर खोल परिणाम होतो.

 

Image source : Google

लग्नाचा विचार करताना काही मुद्द्यांवर चर्चा होणं, त्याबद्दलची एकमेकांची मतं समजून घेणं आवश्यक आहे. जसे की,

तुम्हाला मुलं हवीत की नको, जर हवी असतील तर चांगले पालक होण्याची क्षमता तुमच्याकडे आहे का?

तुमच्या दोघांच्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि करिअरच्या दिशा यांच्याशी जुळवून घेण्याची क्षमता दोघांकडेही आहे का?

 

भविष्याकडे पाहण्याचा दोघांचा दृष्टीकोन एकसारखा आहे की भिन्न?

दोघेही उर्विरीत आयुष्य एकमेकांसोबत आनंदात घालवू शकाल असे तुम्हाला वाटते का?

एकमेकांशी संवाद साधण्याची, एकमेकांना सांभाळून घेण्याची आणि एकमेकांना स्वीकारण्याची क्षमता दोघांकडेही आहे का?

 

या सगळ्या गोष्टीं लक्षात घेऊन जर तुम्ही नातं जोडण्याचा विचार केलात तर तुमचं नातं दीर्घकाळ टिकून राहील नाही तर लवकरच कुरबुरी तक्रारी सुरु होतील.

 

एखादी व्यक्ति जेव्हा मनात घर करते, तेव्हा तिच्यातील चुका, उणिवा, दोष फारसे दिसत नाहीत. प्रेम आंधळं असते म्हणतात ते याचमुळे. काही लोकांना वाटते की छोट्या छोट्या गोष्टी त्रासदायक ठरत नाहीत पण सत्य तर हेच असते की पुढे जाऊन याच छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासाठी नाहक मनस्तापाच्या ठरू शकतात. एवढ्याने काय होते? छोटीशी तर गोष्ट आहे, असे म्हणून सुरुवातीला त्यावर पांघरूण घालताना काही वाटत नाही पण, रोजरोज त्याच त्याच गोष्टी घडू लागल्या तर एकदिवस संयमाचा बांध नक्कीच फुटेल.

 

जोडीदार निवडताना आपण चूक करतोय किंवा केली आस वाटून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच सर्व बाजूंनी तुम्हाला नात्यात पुढे जायचे आहे की नाही याचा विचार करणे कधीही योग्य ठरेल. यासाठी तुमची पूर्वीची नाती कशी होती याचाही विचार जरूर करा. तुमचे आधीचे नाते कशामुळे तुटले? आणि नेहमीच तुम्हाला असा अनुभव येतो का? असे असेल तर आपण जोडीदार निवडण्यासाठी खूप घाई करतोय किंवा आवश्यक त्या गोष्टींचा विचारच करत नाही, हे पहिल्यांदा ध्यानात घ्या. स्वतःची चूक सुधारा आणि मगच पुढची वाटचाल करा.

 

एक नाते तुटले म्हणून सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशातून दुसरे नाते जोडले आणि मग तेही टिकले नाही असाही अनुभव अनेकांना येतो. म्हणूनच आपल्या जोडीदाराच्या बाबीतत जर तुम्ही चोखंदळ नसाल तर सततच तुटलेल्या नात्यांचे ओझे वागवत राहावे लागेल.

 

आपला आतला आवाज नेहमीच आपल्याला काही तरी सांगत असतो, पण ते आपल्यालाच पटत नाही म्हणून आपण सोडून देतो. आपला आतला आवाजाकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन कुणावर तरी चूक ढकलण्याची वेळ येणार नाही. इतरांवर चुका ढकलल्याने तुमचे नाते सुधारले जाणार नाही, तेव्हा रोज उठून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा आधीच सतर्क राहून जोडीदार निवडणे कधीही फायद्याचे ठरेल.

 

इतका वेळ एकत्र राहिले मग आता कसं बाहेर पडायचं? असा विचार करून काही लोकं ज्या नात्यात फक्त घुसमटच अनुभवायला मिळते अशीही नाती रेटत नेतात. एखाद्या नात्यात राहिल्याने तुम्हाला  शारीरिक आणि मानसिक हानी होणार असेल, तर नक्कीच अशा नात्यातून बाहेर पडणे उचित ठरेल. त्या नात्यात ‘आपण एकमेकांना किती समजून घेतलं, किती वेळ दिला, भावनिक दृष्ट्या गुंतलो, पैसा खर्च केला, किंवा त्याने/तिने आपल्यासाठी किती केले,’ असा विचार करून स्वतःला दोष देणे बंद केले पाहिजे. तुम्हीही शंभर टक्के देऊनही जर त्या नात्यात तुम्ही खुश नसाल किंवा समोरचा आपल्या सोबत खुश नाहीये जे जाणवत असेल, तर त्यातून बाहेर पडताना अपराधीभाव बाळगण्याची गरज नाही. तडजोडीच्या नात्यात गुंतागुंत वाढत जाते.

 

आपल्या जोडीदारात कोणते गुण असले पाहिजेत आणि कोणते गुण नसले पाहिजेत याविषयी आपल्याला स्पष्टता हवी.

 

आपला जोडीदार आपल्याबद्दल हळवा आणि प्रेमळ असावा अशी जर तुमची अपेक्षा असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही. अशाचप्रकारे, जोडीदाराची आणि माझी धार्मिक, सांस्कृतिक मते एकसारखी असावीत, मुले होऊ द्यावीत की नाही यावरही दोघांचे एकमत हवे, नातं निभावताना आपसूकच काही जबाबदाऱ्या दोघांवरही पडतात. आपली जबाबदारी आणि जोडीदाराची जबाबदारी पार पडेपर्यंत एकमेकांना समजून घेण्याची आणि मदत करण्याची भावना असली पाहिजे.  तसेच आपल्या जोडीदाराला कसलेही व्यसन नसावे, स्वार्थीपणा, हट्टीपणा, इतरांपेक्षा मीच शहाणा अशी वृत्ती असू नये, या आणि अशा अपेक्षाही रास्तच आहेत.

 

आपला जोडीदार आपल्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतोय का? आपल्यापासून काही लपवतोय का? स्वार्थी आहे का? याचाही विचार करा. सिगारेट, दारू किंवा इतर कुठल्या गोष्टींचे अतिरिक्त व्यसन आहे का? त्याला आपल्या करिअरबद्दल तितकाच आदर आहे का जितका स्वतःच्या करिअर बद्दल आहे? एकमेकांपासून काही काळ दूर राहण्याची वेळ आली तरी तो आपल्याला समजून घेईल का? पैशाच्या बाबतीत खूप लोभी किंवा खूपच बेफिकीर आहे का? हळुवार भावना हाताळण्यास समर्थ आहे का? आपल्या भावना, इच्छा यांचा आदर करतो का? याही गोष्टी तपासून पहिल्या पाहिजेत.

 

यातील कुठल्या गोष्टी हव्यातच आणि कुठल्या गोष्टींवर तुम्हाला नकार द्यायचा आहे हे एकदा पक्क ठरलं की मग तुम्ही चुकीच्या नात्यात अडकणार नाही.

 

या सगळ्या प्रक्रियेत एक महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखता आणि जसे आहात तसे स्वतःला स्वीकारण्याचा प्रयत्न करता. आपल्या जोडीदारानेही आपल्याला आहे तसे स्वीकारावे आणि आपला सन्मान करावा अशी अपेक्षा ठेवणे अजिबात चुकीचे नाही. एकमेकांचा सन्मान, आदर राखणे ही तर कुठल्याही नात्यातील अत्यावश्यक बाब आहे.

 

मुलगा कमावता आहे मग दिसायला थोडा डावा असला म्हणून काय झालं? मुलगी नाकी डोळी छान आहे जास्त शिकलेली नसली म्हणून काय झालं? अशा वाक्यांना भुलून झुकते माप घेतल्याने पुढे जाऊन पश्चातापाची वेळ  येऊ शकते.

 

आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल थोडीही सहानुभूती वाटत नाही पण, घरचे म्हणतात मुलगा चांगला आहे/मुलगी चांगली आहे म्हणून फक्त निवड करायची आणि पुढे जाऊन “अरेरे हे काय झालं?” म्हणून डोक्याला हात लावून घेण्यात काय हाशील आहे? स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आयुष्यातही आनंद निर्माण करण्याऐवजी जर आपण त्रास आणि कटकटच करणार असू तर आयुष्याची मजाच निघून जाईल.

 

पुढे जाऊन काही तरी चांगल मिळणार असेल पण पुढे जायची इच्छाच नाही म्हणून आहे त्यावर समाधान मानूया अशा वृत्तीने जगाल तर आयुष्यातील आनंद निघून जाईल. म्हणून जोपर्यंत तुमच्या अपेक्षा, तुमची स्वप्ने पूर्ण होत नाहीत तोपर्यंत चालत राहा. कदाचित तुम्हाला असेही काही भेटेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती. घाई करण्यापेक्षा संयम कधीही चांगलाच!

 

जोडीदार निवडताना चोखंदळपणा हा हवाच. कारण, आपल्याला कुठलीही स्पर्धा जिंकायची नाही. आपल्याला कुठल्या प्रदर्शनाचा भाग व्हायचे नाही. तर एका अशा नात्यात प्रवेश करायचा आहे जिथे आपले आणि आपल्यामुळे दुसऱ्याच्याही आयुष्याचे नंदनवन होईल!

 

Post a Comment

0 Comments