काळजी करून काय होणार?

संध्याकाळच्या भाजीची तयारी करता करता, लता घड्याळाकडे पाहत होती, तिच्याही नकळत या दहा मिनिटात तिने दहा वेळा घड्याळाकडे पहिले होते. समोर तिच्या सासूबाई पेपर वाचत बसल्या होत्या. त्यांच्या बारीक नजरेतून हे सुटलं नाही. त्यांनी लताला विचारलंच, “काय गं लता कसल्या विचारात आहेस? कुठे जायचं आहे का तुला?”

Photo by Andrea Piacquadio from Pexels



“काही तरीच, आता यावेळी मी कुठे जाणार?” थोड्याशा ताणलेल्या स्वरात लता उत्तरली.

“मग काय सारखी घड्याळाकडे पाहतेस मघापासून?”

“अहो, स्वरा आली नाही अजून म्हणून बघतेय किती वेळ झाला?” तोच ताणलेला स्वर.

 

येईल की सारखं असं घड्याळाकडे पाहून काय होणार? फोन करून बघ कुठे आहे? का उशीर झाला?”

त्यांचं हे बोलणं सुरुच होत तेवढ्यात स्वरा आलीच.

 

आल्या आल्या आजीच्या गळ्यात पडली आणि तिथेच बसली.

 

लताकडे तिचं लक्षच नव्हतं. लता मात्र मघापासून तिला उशीर का झाला या काळजीने अस्वस्थ झाली होती. इतकी अस्वस्थ झाली होती की तिची चलबिचल तिच्या शेजारी बसलेल्या सासूलाही जाणवली.

 

खरं तर मुलीला पाच-दहा मिनिटं उशीर झाला तर काही वाटत नाही. पण त्यापुढं थोडा जरी काटा सरकला तरी हिला एकदमच अस्वस्थ वाटतं. काय करू नी काय नको होऊन जातं. हातून काही होत तर नाही मात्र नुसती काळजी. मुलगी घरी आली नाही तरी काळजी. ती लवकर झोपली नाही तरी काळजी. लवकर उठली नाही तरी काळजी. चुकून लवकर उठलीच तरी काळजी. तिला काळजी करण्याची सवय इतकी भिनली होती की, तिच्याही नकळत ती अस्वस्थ होऊन जायची. फक्त मुलीच्या बाबतीतच नाही तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही, घरातलं काम वेळेवर आवरलं नाही – तरी काळजी. कामवालीने उद्या येणार नाही सांगितलं तरी काळजी. सासूबाईना दवाखान्यात रुटीन चेकअपसाठी न्यायचं आहे तरी काळजी. नवरा बाहेरगावी जाणारा असला तरी काळजी. म्हणजे अगदी कुठलंही कारण हिला काळजी करण्यासाठी पुरेसं व्हायचं.

 

काळजीने जणू हिच्या डोक्यात घरटंच बांधलं होतं. या सगळ्यामुळे व्हायचं काय की हिचं कुठल्या कामात नीट लक्षच लागायचं नाही. सतत धाकधूक धाकधूक! आता काय होईल नि मग काय होईल! खरं तर होत काहीच नाही पण भावना अशी बनून जाते की खूप काही घडून गेलं आहे.

 

याची सुरुवात कुठुन झाली हे कदाचित तिचं तिलाही समजणार नाही. काळजी करण्याची जणू सवयच लागून गेली. त्यामुळे तिला सतत कुठल्या तरी अकल्पित गोष्टींची भीती वाटत रहायची. कधी एकटे रहायची वेळ आली तर, झोप लागायची नाही. तब्येत तर अगदी सुकून गेली होती. तिच्याकडे पाहून कुणीच म्हटले नसते की तिने आता तिशीत प्रवेश केलाय.

 

 

सतत नवऱ्यावर, मुलीवर किंवा कामवाल्या बाईवर तरी चिडचिड करायची. त्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कामात हिची लुडबुड सुरूच. गरज नसताना त्यांना कसले ना कसले सल्ले देणार. सारखी फोन करून अपडेट घेणार. हिच्या अशा सवयीने नवऱ्याला आणि स्वरालाही कधी हिचा फोन उचलावा असं वाटायचं नाही. मग पुन्हा हिची काळजी वाढतच जायची.

 

खरे तर घरातल्या व्यक्तींची काळजी एकमेकांनी घेतलीच पाहिजे. पण लताची अशी समजूत झाली होती की, तिने काळजी नाही घेतली तर घरातील कुणालाच काही जमणार नाही, त्यांना स्वतःची काळजी घेताच येत नाही.

कशामुळं झालं असावं असं? कारण तिच्याही नकळत तिने आपल्या मनात हे पक्के केले होते की, माझ्या घरच्यांची काळजी मीच घेतली पाहिजे.( नाही तर त्यांना कळणारच नाही की स्वतःची काळजी कशी घ्यायची असते.) कंसातील वाक्य तर तिचं पक्क गृहीतकच बनलं होतं. पण इतरांची काळजी करता करता ती मात्र स्वतःकडे सपशेल दुर्लक्ष करत होती. त्यामुळे अध्येमध्ये अचानकच शुगर कमी होणे, बिपी लो होणे असा तक्रारी डोके वर काढू लागल्या. लता स्वतःच निर्माण केलेल्या दुष्टचक्रात पुरती गुरफटून गेली होती.

 

शेवटी तिच्या सासूबाई एकदा तिला म्हणाल्याच, “अगं लता, मान्य आहे आपण आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांना त्यांची काळजी घेता येतच नाही. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे ही तर ज्याची त्याची जबाबदारी मग त्याच्या छोट्यामोठ्या गोष्टींचीही आपणच का काळजी करत बसायचं. स्वरा आता मोठी होत आले तिला आपण वेळेत शाळेत गेलो पाहिजे वेळेत घरी पोहोचलो पाहिजे हे कळतं. कधी उशीर झाला तरी सुखरूपपणे घरी कसं पोहोचायचं त्यासाठी काय केलं पाहिजे हेही तिला कळतं. पण तू सतत तिला लहानमुलीसारखे मागे लागून लागून सुचना देते. डबा घेतला का? डबा खाल्ला का? कमीच का खाल्लं? अशा छोट्या छोट्या गोष्टीत तू जर तिला सुचना देत बसलीस तर अर्थातच तिला आवडणार नाही. स्वतःची जबाबदारी घेणं म्हणजे काय असतं हे कळू दे ना तिला? तू लग्न करून घरात आल्यापासून तुझ्या आईने किती काळजी केली तुझी? त्या तुझ्या कुठल्या तरी कामात लुडबुड करतात का? किंवा मी तरी तुला पहिल्या सारखी सतत सुचना देत बसते का? मला माहिती आहे आता तुला या घराची जबाबदारी चांगली सांभाळता येते. तू सांभाळतेस ही छानपणे. पण, काय झालय की तू प्रत्येक गोष्ट माझ्याशिवाय होणारच नाही असा ठाम समज करून घेऊन प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःच्याच शिरावर घेतेस आणि सगळा गोंधळ उडवून घेतेस.

मान्य आहे, मुलगी लवकर घरी आली नाही तर काळजी लागून राहते. पण दहा-वीस मिनिटे हिकडं-तिकडं होणारच. अगं हसण्या-बागडण्याच्या वयात इतकंही होऊ नये म्हणणे म्हणजे अतिरेक नाही का? सुभाष जरी दोन-तीन दिवसांसाठी घराबाहेर राहिला तरी त्यालाही कळतं आपली काळजी कशी घ्यायची. बाहेर राहिला तरी त्याचंही लक्ष तुमच्याकडे असतंच. त्यालाही तुमची काळजी, बाहेरच्या कामांची काळजी असतेच. पण तो बघ कसा सगळ्यात समतोल साधतो. तू मात्र काळजीचं घरटं डोक्यावर घेऊन फिरत असतेस. यामुळे तुझ्याच तब्येतीवर परिणाम होतोय हे तरी लक्षात येतंय का तुझ्या?”

हे सगळं ऐकता ऐकता उगीचच लताचे डोळे भरून आले. हे सगळं अति होती हे तिच्या लक्षात आलं होतं मात्र यातून बाहेर कसं पडायचं यावर तिला मार्ग मिळत नव्हता. तेव्हा सासूबाईच पुढे म्हणाल्या, “हे बघ तू फक्त काळजी करण्यापेक्षा त्यांना त्यांची जबाबदारी समजावून दे. त्यांची त्यांची काही कामं त्यांना वाटून दे. स्वतःसाठी थोडा वेळ काढ. स्वतःकडे थोडं लक्ष दे. थोडं वाचन कर. तुझ्या मैत्रिणींशी गप्पागोष्टी कर. काही नवं शिकता येतं का बघ. तुझ्यात काही नवेपणा आला की काळजीचं ते घरटं डोक्यावरून अपोआप उतरून जाईल. स्वतःला विश्वास दे, मी माझ्या घरच्यांसाठी करतेय ते खूप करतेय. माझी माणसं आणि माझं घर सुरक्षित आहे. परमेश्वरानं दिलेलं सगळं काही असताना फक्त नसती चिंता करून त्याची माती करून घेऊ नको. चिंता ही चीतेसारखीच जाळते असं म्हणतात ते काही उगीच नाही.”

 

प्रत्येकाला निसर्गाने स्वतःची काळजी घेण्याची उपजत बुद्धी दिलेली असते. किमान निसर्गाच्या या न्यायबुद्धीवर तरी विश्वास ठेव. तेव्हा अति काळजीचा हा भस्मासुर जाळून टाक. नवं काय काय करता येईल, कशात मन रमेल अशा गोष्टी शोध. काय माहिती कदाचित त्यातून तुला तुझं विश्व सापडेल आणि इतरांच्या छोट्याछोट्या गोष्टीत ढवळाढवळ करण्याची सवयही बंद होईल. तुझी काळजी कितीही रास्त असली तरी ती अनाठायी आणि अवास्तव आहे.

सासूबाईंनी जमेल त्या भाषेत तिला तिचं कुठं चुकतंय याची जाणीव करून दिली. लतानेही यावर शांतपणे विचार केला आणि त्यानुसार स्वतःत बदल करण्याचा प्रयत्न करू लागली.

 

खरं तर अनाठायी केलेली काळजी कुणाच्याच फायद्याची नसते, हे बहुतांश लोकांना कळत असतं पण वळत नसतं आणि त्यामुळे अशी लोकं स्वतःसाठी आणि इतरांसाठीही एक कटकट होऊन बसतात.

तुम्हालाही अशाच छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी वाटत राहते का? पुढे काय होईल? कसं होईल? हे विचार अस्वस्थ करतात का? याचं उत्तर जर होय असेल तर आपण करत असलेली काळजी किती वास्तव आणि किती अवास्तव आहे यावर एकदा चिंतन करा. तुम्हालाच तुमचे उत्तर मिळून जाईल.

लक्षात घ्या काळजी तुम्हाला आतून कमकुवत बनवते तर, माझ्याबाबतीत सगळं चांगलं घडेल हा विश्वास तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करतो. म्हणून काळजीचं घरटं डोक्यावर बांधून जगू नका.

Post a Comment

0 Comments