उद्याचा दिवस आयुष्यात कधीच उगवत नाही. आयुष्यात आपल्या हाती असतो तो फक्त ‘आज!’
चीडचीड, राग, नैराश्य, तणाव, निद्रानाश, अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी जेव्हा एकाचवेळी पछाडतात तेव्हा यातून बाहेर कसं पडायचं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. मानसिक स्थिती एकदा का घसरू लागली की ती कधी रसातळाला पोहेचेल हे सांगता येत नाही आणि मग आपण त्याच त्या घटना, त्याच त्या भावना आणि तेच ते परिणाम अनुभवत राहतो. आयुष्य जणू भोवऱ्यासारखं एकाच जागी गरागरा फिरायला लागतं. अशांत मनाला कशातच रस वाटत नाही, त्याला काही चांगलं दिसत नाही आणि काही चांगलं आठवत नाही. मनाचा प्रत्येक कोपरा काळ्याकुट्ट अंधाराने भरून जातो तेव्हा एक दिवा जरी लावला तरी अशा मानसिकतेतून बाहेर पडायला मदत होऊ शकते. अगदी घोर निराशा नसली तरी जेव्हा जेव्हा एकटं आणि उदास वाटेल त्यात्या वेळी हीच एक सवय तुम्हाला तरून नेऊ शकते. कुठली सवय? कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय! समजा तुम्ही फक्त फिरायला म्हणून बाहेर पडलाय! मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलंय हे करू का ते करू अशा अनेक विचारात तुम्ही गुरफटून गेलाय. विचार करता करता तुम्ही चालताय आणि चालत चालत तुम्ही एका झाडीत शिरता, थोडं पुढे थोडं पुढे करत जात राहता पण नंतर मात्र तुम्...