झोपेचं खोबरं होतंय?

कोरोनामुळे गेले वर्ष दीड-वर्षं आपण सगळेच आरोग्याबाबत कधी नव्हे तेवढे सतर्क झालो आहोत. चांगली रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्तीला शक्यतो कोरोनाचा फार काही त्रास होत नाही, हे माहीत झाल्याने लोक खरोखर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकडे काळजीने आणि जागरूकतेने लक्ष देत आहेत. आरोग्याबाबत आलेली ही सतर्कता तशी चांगलीच म्हटली पाहिजे. त्याचवेळी वर्क फ्रॉम होममुळे विस्कळलेले शेड्युल, अनेकांना घरात कोंडून राहण्याचा आलेला मानसिक ताण, विस्कटलेली आर्थिक घडी, कोरोनामुळे सततची आरोग्याची चिंता, आपल्या जवळच्या लोकांची आरोग्याची, सुरक्षेची, सुरक्षित भविष्याची चिंता, काहींच्या वाट्याला आलेले एकाकीपण या कोरोनामुळे आणखी गडद झाले आहे. त्यात सतत अपडेट राहण्याचा आणि माहितीचा भडिमार झेलण्याचा एक वेगळाच ताण. काहींनी कोरोनाच्या लाटेत आपले आप्तस्वकीय, कुटुंबीय गमावले आहेत. थोडक्यात काय तर कोरोनाच्या आधीही आपल्या आयुष्यात प्रश्न, समस्या होत्याच पण कोरोनाने त्या आणखी तीव्र केल्या आहेत.

 

Image Souce : Google image


या सगळ्या चिंता कुणासमोर बोलून दाखवणार? कारण घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात या आणि अशाच चिंतांनी घेरलेलं आहे. बोलायचं तरी कुणाजवळ आणि काय हेही माहीत नसल्यानं आला दिवस रेटण्याशिवाय आपल्या पुढे काही पर्याय नाही. कधी तरी हे सगळं संपेल आणि जीवन पूर्ववत होईल हा आशावाद जिवंत ठेवणं एवढंच आपल्या हाती आहे. तरीही मनातील प्रश्न, तणाव, चिंता काही केल्या मिटत नाहीत. त्यामुळे रात्र रात्र झोप लागत नाही. वाढत्या तणावाने रात्रीची झोपच हिरावून घेतली आहेत.

 

त्यात फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम सारखे सोशल मिडिया आणि नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, या सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरंजनाच्या खाजान्याने ओसंडत आहेत. सोशल मिडियावर सगळ्यांनाच हवा करण्याची घाई झाली आहे. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची ही एक वेगळीच स्पर्धा प्रत्येकाने इथे लादून घेतली आहे. या स्पर्धेने तर मानसिक स्वस्थ्याचा आणि पर्यायाने झोपेचा पुरता विचका केला आहे.

 

त्यामुळे रात्रीच्या वेळी झोप लागली नाही की यांचा आधार हवाहवासा वाटतो. त्यामुळे झोप न येण्याची चिंता उरत नाही आणि वेळ कसा जातो तेही कळत नाही. मग मध्यरात्री कधी तरी शरीराचे त्राण संपतात आणि डोळे अलगद मिटतात. तेवढ्यात इतरांची सकाळची लगबग सुरू झालेली असते. अर्धवट झोप डोळ्यात तशीच ठेवून दिवसभराच्या शोसाठी पुन्हा उभं राहावंच लागतं. कारण, शो मस्ट गो ऑन.

 

पुरेशी झोप न मिळाल्याने दिवसभर थकवा आणि आळस जाणवतो. हा आळस घालवण्यासाठी पुन्हा चहा, कॉफी, सिगारेट अशा उत्तेजित पदार्थांच्या सेवनाकडे कल वाढतो. थोडक्यात काय तर विस्कळीत झालेले झोपेचे शेड्युल अशा प्रकारे शरीराला सतत सतावत राहतं. कारण, झोप विश्रांती ही शरीराची गरज आहे तशी ती मेंदूचीही गरज आहे. शरीराला आणि मेंदूला विश्रांती घेण्याचीही उसंत राहिलेली नाही.

 

गृहिणी असो की नोकरदार महिला स्त्री पुरुष प्रत्येकजण एका अनामिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. भविष्यकाळाबद्दल कमालीची अशाश्वती निर्माण झाली आहे. या सगळ्या गोंधळात मानसिक अस्वास्थ्यही जोराने उफाळून वर येत आहे.

मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी पुरेशी आणि गाढ झोप अत्यावश्यक बाब आहे. अंथरुणात पडलो तरी डोक्यातील विचार चक्र थांबत नाहीत आणि मग गाढ झोप लागणार कशी? झोपेतही अतिविचार आपली पाठ सोडत नाहीत. या कुशीवरून त्या कुशीवर वळण्यातच रात्र संपून जाते. असं तुमचंही होत असेल, तर वेळीच ही झोपेची विस्कटलेली घडी नीट करायला घ्या.

 

काहीही झालं तरी मी माझ्या शांत आणि गाढ झोपेचा बळी देणार नाही हे मनाला पक्क ठणकावून सांगा. झोप येत नसेल तेव्हा मोबाईल जवळ करण्याऐवजी एखादं पुस्तक जवळ करा. दोन तीन पाने उलटली की अपोआप डोळे पेंगायला लागतील आणि झोप लागेल. एखादं मासिक असेल, कादंबरी असेल किंवा मुलाचंच अभ्यासाचं पुस्तक असेल, पण झोप येत नाही असे वाटू लागताच पटकन पुस्तक डोळ्यासमोर धरा. पुस्तकाच्या पानातून फिरताना मनही थोडं शांत होईल. अतिविचारांचे चक्र थोड्यावेळासाठी लुप्त होईल आणि झोप नक्की येईल.

 

दिवसाचा आळस आणि थकवा घालवण्यासाठी चहा, कॉफी, सिगारेट यासारख्या उत्तेजक पदार्थांचा आधार घेऊ नका. त्याऐवजी फक्त एक ग्लास कोमट पाणी घेतलं तरी चालेल. एक ग्लास कोमट पाणी पिल्याने आरोग्यालाही फायदाच होईल, या काळात शारीरिक आरोग्य जपणेही तेवढेच महत्वाचे आहे ना? मग आरोग्याला हानिकारक अशा गोष्टींपासून दूरच राहा. कोमट पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत करते, त्यामुळे शरीरालाही ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. रात्रीची झोपही शांत लागते.

 

खाण्यापिण्याच्या सवयीत थोडे बदल केले आणि झोपेपुर्वीचे शेड्युल जर आपण व्यवस्थित पाळले तर नक्कीच झोप न लागण्याच्या समस्येतून तुम्ही मुक्त होऊ शकता. झोपण्यापूर्वी थोडेसे मेडिटेशन, (जे झोपून राहूनही करता येते), केले तर आणखी फायदा होईल.

 

बिचारी तुमची झोपही आजकाल चिंताग्रस्त झाली आहे. झोपेला जवळ करा आणि तिलाही चिंतेतून मुक्त करा.

Post a Comment

0 Comments