कोरा कागज -



पोरांना जेवायला घालून त्यांना जबरदस्ती झोपवलं. आज खूप दिवसांनी मला प्यायची होती. कपाटातून बाटली काढली सोबत सगळा तामझाम घेऊन मी बसले. बसण्याआधी एकदा पोरांच्याकडे नजर टाकली खरंच त्यांना झोप लागली आहे की नाही बघितलं. दोघेही गाढ झोपेत आहेत याची खात्री पटली आणि मी बसले.

चिकन सिक्स्टीफाय आणि सोबत रम. एकटीने पिण्यात काय मजा पण, असा विचार करत करत मी दोन पेग हाणले. आता डोळे जड झाले आणि आतून गुदगुल्या व्हायला लागल्या. खरं सांगू का... ह्या गुदगुल्या मला अजिबात सहन होत नाहीत. असलं काही हसू फुटतं की मला आवरता आवारत नाहीत. पण आता त्या आवरल्या शिवाय पर्याय नव्हता. मी हसत होते पण मोठमोठ्याने नाही गालातल्या गालात.

डोळे अजून अजून जड होत जातील तस तस माझं मंद स्मित आणखी आणखी पसरत होतं. मध्येच मला काही तरी आठवू लागलं आणि आठवत आठवता चक्क दिसू पण लागलं. डोळे जड झालेच होते तरी पण जड झालेल्या पापण्या मी मुश्किलीने वर-खाली केल्या. समोर अजून अर्धा पेला भरलेला होता. उघड-झाप करत करतच मी पेला हातात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. पण हात पेल्यापर्यंत जायला किमान अर्धा मिनिट तरी लागलाच. शरीर असं स्लो मोशनवर येतं ना तेव्हा खरच खूप भारी वाटतं.

कसाबसा तो ग्लास मी उचलून ओठांना लावत होते आणि ग्लास ओठांना लावता लावता माझं लक्ष समोरच्या बंद दरवाज्याकडे गेलं. दरवाजा बंद होता. वरची तिट्टी लावलेली. खालची कडी लावलेली. दरवाजा अगदी व्यवस्थित बंद केलेला असताना सुद्धा ती आत आली. अगदी एखाद्या हॉरर सिरीयलमध्ये नाही का दाखवत. भूतांना आरपार जाताना अगदी तशी. ती आत आली. कुठल्या तरी फिकट रंगाचा चुडीदार, दोन्ही खांद्यावर ओढणी. गुडघ्यापर्यंत लोंबणारे केस. हातात चार-चार बांगड्या. नजर थेट माझ्यावर रोखलेली. थेट आली आणि समोरच बसली.

मी पुन्हा एकदा जडावलेली पापणी हलवण्याचा प्रयत्न केला. तोंडातून काहीच शब्द फुटत नव्हता. आणि भितीनं मी तो सगळा अर्धा ग्लास घटाघता पिऊन टाकला. तीने आपले पाय दुमडले आणि मान तिरकी करून बघू लागली. तिचे पाय उलटे नव्हते. हो, जडावलेल्या डोळ्यांनीही आधी मी ती खात्री केली. तिचे पाय अजिबात उलटे नव्हते. म्हणजे ती भू...भूत अजिबात नव्हती.

मी डोळे वर करून तिला विचारण्याचा प्रयत्न केला, “तू कोण?” बस्स. एवढे दोनच शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले. तिने हात आपल्या गालाकडे नेला, खोपर गुडघ्यावर टेकवले आणि गाल मुठी बंद केलेल्या हातावर टेकवून लुडूलुडू डुलायला लागली. ती खरच डुलत होती की मला तसं वाटत होतं याबद्दल मी आता खरच काही सांगू शकत नव्हते.

एकतर ही बया अशी अचानक कुठून तरी येऊन टपकली आणि वर मलाच विचारते, “ओळखलं नाहीस का?,” म्हणून. तिच्यासोबत मी पण बहुतेक डुलत होते. “नाही,” एवढाच शब्द मी उच्चारला. मी शुद्धीत असतानाही मितभाषी असते आणि बेशुद्धीत असतना तर डबल मितभाषी होते. मला बोलायला अजिबात आवडत नाही. आता खूप दिवसांनी असं एकटीने बसले एन्जॉय करायला तर ही कोण बाय कुठून टपकली आणि मलाच विचारते ओळखलं नाहीस का म्हणून. खर तर शुद्धीत असताना तिच्या तशा येण्याची कल्पना जरी मी केली असती तरी मला दरदरून घाम सुटला असता पण, कदाचित... कदाचित... पिल्यामुळे असेल मला अजिबात भीती वाटत नव्हती तिची.

“अगं मी शुभा, असं कसं विसरू शकतेस तू मला?”

आता खरच हे नाव सुद्धा मी पहिल्यांदा ऐकत होते. मला खरच आठवत नव्हतं हे नाव मी पूर्वी कधी ऐकलंय असं. अजिबात आठवत नव्हतं. मला आठवण्याची कसरत पण करायची नव्हती. मी फक्त मान हलवली, नकारार्थी. मला खरच आठवत नव्हतं आणि मला काही आठवायचंही नव्हतं. आता अशा भलत्यावेळी मी अशा भलत्याच अवस्थेत असताना ही बया, अशी कुठून आणि का टपकली याची मात्र उत्सुकता होती. उतरण्याआधी या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती तर बरं झालं असतं.  

तीने आता इकडचा हात खाली घेतला आणि तिकडचा हात गालावर टेकवला अगदी तसाच. “तुझ्या कथेतलं पात्र गं, शुभा. आठवलं का?”

कुठली कथा असा प्रश्न कदाचित माझ्या चेहऱ्यावर उमटला असावा.

“कोरा कागज.” तिने पटकन उत्तर दिलं आणि ती पुन्हा डुलू लागली.

हे अस कधी कथेतली पात्रं येतात का  भेटायला. ऑं... कायच्या काय? असा मी विचार करत करत तोंडात घास घालत होते. तिचं हे असं टपकणं मला तरी आवडलच नव्हतं. पण ही अस्तित्वात नसलेली बया टपकली तरी कुठून? “कुठून म्हणजे दरवाजातूनच नाही का आले मी आत?” मी माझ्या मनातल्या मनात संवाद करत होते आणि ते चक्क हिला ऐकू गेलं.

आईशपथ्थ! डोळे गच्च भरून आले माझे अचानकच.

मग शुभाने आणखी एक ग्लास घेतला आणि आता तिने दोघींसाठी त्यात रम ओतली. माझ्या डोळ्यातून फक्त थेंब टपकत होते, आता मला विशेष बोलायची गरजच नव्हती. कारण आता मी वर जरी बोलले तरी तिला कळणार होतं आणि आतल्या आत जरी बोलले तरी तिला कळणार होतं.

मग बोलच कशाला. म्हटलं आता न बोलताच हिला काय कळतं का बघू.

“अहं, बोलूच नको तू, आज फक्त ऐक. खरं तर कसं झालं होतं माहितेय का आमचं. आम्ही ना लॉकडाऊनमध्ये अडकलो होतो.” कुठला म्हणजे काय? तुझ्या डोक्यातला लॉकडाऊन. ती मस्त पैकी एकेक शेंगदाणा तोंडात टाकत एकेक घोट घेत बोलत होती. तिची ती खाण्याची पिण्याची आणि बोलण्याची लकब जाम भारी होती हं पण. हे मी आता बोलतेय तेव्हा मी काहीच बोलले नव्हतं नाही तर ती बया त्यावरून परत सुरु झाली असती. हां तर ती सांगत होती, “तुझं डोकं ना मध्येच मध्ये असं लॉक होतं ना बया, मला तर जाम वैताग आला बया, तुझ्या डोक्यात राहून. मग म्हटलं जरा बाहेर पडावं आणि बोलावं घडाघडा. हे बघ तू काय घडाघडा बोलत नाहीस ते माहितच झालय आता. पण, तू आम्हला पण मुकी बनवून ठेवशील तर कसं व्हायचं? नाही हे बघ तू ठरवलंयसना तसं मी काय आता ते चकलीच पीठ नेऊन चकल्या-बिकल्या करत बसणार नाय हं. हे बघ. आता ती सासू पडलेय ना आजारी. तर तिला ना कोरोना होऊ दे आणि ती पटकन जाऊ दे. डोळं फाडून बघू नको. कुठवर ह्यांनी असं दुखणी सोसत दिवस काढायचं. आणि मध्ये मध्ये थोडं ते कारुण्य का काय लागतं ना? मग नुसतंच मला रडवत बसवणार आणि माझ्या मनाची घुसमट म्हणजे कारुण्य. हे गणित खोड. मी एकवेळ मेलेल्या सासूसाठी ढसाढसा रडंल पण मी अस उगीच्या उगी आता रडत बसणार नाय सांगून ठेवते. तिने आता एक पाय थेट पसरला. दुसरा हात जमिनीवर टेकवला आणि एका हातान शेंगदाणा तोंडात टाकत टाकत ती मला सूचना देत होती.

अर्धा पेला तिने पण रिचवला होता त्यामुळे आता तिची गाडी नॉनस्टॉप मोडवर जाण्याच्या तयारीतच होती. नव्हे ती बहुतेक असं ठरवूनच आली होती. खरं तर असं कुठल्या सुनेनं कल्पना करू नये की माझी सासू मारावी आणि मला चांगलं दिवस यावत. पण, आता काय हरकत हाय का असं करायला. ती सासू तरी कुठली खरी आणि मी तरी कुठली खरी. सगळीच दुनिया खोट्याची मग खोटं-खोटं का असना पण होऊ दे थोडं आमच्या मनासारखं.

मग ती मेली की सगळी जबाबदारी माझ्यावर येईल आणि माझ्या निर्णयात कुणी ढवळाढवळ  करणार नाही. अचानक कवा पण उठून मला चकलीचं पीठ दळायला जायला लागणार नाही. खरं तर मला पण पटत नाही हे पण तू असच लिही. मग मी आणि माझा नवरा दोघं पण चकना आणि ग्लास घेऊन बसू. तुझं काय तुला चालतं असं एकेकटं. मी नवऱ्यासोबतच पिणार. कसं त्याच डोकं खायचा चान्स सोडाय नको. कुठलाच. वैतागला पाहिजे बिचारा एवढी मी बडबड बडबड करणार बघ. हो करायलाच पाहिजे ना बडबड नाही केली तर आपल्याला काय पाहिजे काय नको, काय आवडत, काय नाही हे समोरच्याला कळणार कसं. मग मी सांगीन त्याला मोगऱ्याचा गजरा आणि गरमगरम वडापाव आणत जा कधीतरी ऑफिसमधून. लाड पुरवून घ्यावत हट्टानं. बोलल्याशिवाय कसं कळणार कुणाला आपल्या इच्छा, स्वप्न काय आहेत ते. आता तुझ्याच डोक्यात राहून राहून आम्हाला एक माहित झालय तुझ्या डोक्यात काय चाललंय. पण आमच्या डोक्यात काय चाललंय ते कुणाला कळणार? म्हणून बघ मी सगळं सांगणार. मनात येईल ते. कोंडमारा करून कशाला जगायचं. कुणीतरी ऐकणारं असताना. तिचे डोळे चमकत होते. जणू जन्माला येण्यापूर्वी एखाद्यानं चित्रगुप्ताकडून आपल्याला हवं तसं नशीब लिहून घेण्यासारखंच होतं हे.

तिची अशीच काहीबाही बडबड सुरू होती तोवर आणखी एक बाई अवतरली. ही बाई साडीत होती. गोल गरगरीत. गोरीपान. छोटीशी वेणी घातलेली मागे. ती तर धपकन फतकल घालूनच बसली. मी बहुतेक चौथा पेग पीत होते. आज तर माझी पिण्याची क्षमता अफाट वाढली होती. तिने बसता बसता पटकन शेंगदाणे उचलले आणि तिसरा ग्लास घेऊन तिने स्वतःसाठी पेग भरला. झटक्यात एक ग्लास रिचवून मग ती पण सुरू झाली.

“हे बघ ते लॉकडाऊन-फेकडाऊन काय ते असच येतंय आणि जातय. आता तेवढ्यासाठी आम्ही तुझ्या डोक्यात स्वतःला कोंडून घ्यावं काय? सारखं सारखं तो नवरा आणि ती सासू अशी डाफरती माझ्यावर. अरे मी सुषमा. सुदीपची मम्मी. हिच्या सासूला मारण्यापेक्षा. माझ्याच सासूला होऊदे कोरोना. तू तिलाच घालव. म्हणजे एकटा तो नवराच काय ते डाफरायचं ते डाफरू दे. मग मी पण बगून घेईन त्याला. कसं आता सासू समोर असली की बोलता येत नाही नव्हं नवऱ्याला. नाही दोघं मिळून सुरू झाली की मग काय खरं नाही बघ. आणि ते पोरगं जरा शहाणं कर. सारखा त्याच्या मागं अभ्यास कर आणि खा-खा म्हणून मागं लागायला नको. सुषमाची नॉनस्टॉप कॅसेट चालूच होती आणि तिचं ऐकताना मध्येच शुभा मला डोळा मारत होती.

दोघी पिऊन तर्र झाल्या होत्या आणि आता मला भीती वाटत होती, आता या दोघींच्या सासवा जर इथं आल्या आणि त्यांनी जर ह्यांचं बोलणं ऐकलं तर...? तेवढ्यात एक गोरी छलाटी बाई रडतच आली आणि तिच्या मागून तिची जाडजूड मैत्रीण.

बघा बघा ह्या सुना. सासूला कोरोना होऊदे म्हणं. काय आगाव का काय? कुठं फेडतील रे ही पापं बघतायसा नव्हं, नेल्सनची मम्मी. आता आम्ही काय ह्यांच्या वाईटासाठी ओरडताव का सांगा. ह्यास्नीच चांगलं वळण लागलं तर ह्येचं संसार चांगलं होतील. उद्या ह्यास्नीच सुख भोगायचं हाय. काय आमी असणार हाय काय तवा. जाणारच की कधितर. बघा बघा लाज बघा जरा ह्यांची. सासूसमोर पीत बसल्यात. काय वाटतंय जरा तर.

आता कुणाला काय वाटतंय मला काहीच कळत नव्हतं. आता जर ह्यांची इथच भांडणं लागली तर माझी पोरं उठतील म्हणून मी घाबरत होते आणि ह्याचं काय तर माझं असं करा आणि तिचं असं करा. सगळ्यांची च्यावम्याव सुरु झालं आणि मी बसल्या जागीच कोलमडून गेली. आता त्यांच्यापैकी कुणाचच काही ऐकण्याची माझी तरी क्षमता नव्हती. प्रत्येक जण स्वतःचंच काही तरी गाऱ्हाणं सांगत होती. ही म्हणे माझं असं कर ती म्हणजे माझं असं कर. तोवर अजून कोण अजून काहीतरी सांगत होतंच. अरे डोकं शांत होईल म्हणून प्यायची तर या बायांनी माझंच डोकं उठवलं.

काय नाही यांना परत बाटलीत बंद करायची गरज होती. पण मीच अशी अर्धवट शुद्धीत असल्यावर आता यांना परत बाटलीत बंद कोण करणार. बाटलीत बंद करण्याचा माझा विचार चालूच असताना, शुभा लगेच म्हणाली, “व्वा गं व्वा आली मोठी बाटलीत बंद करणारी. तुला कोणी आमचा चित्रगुप्त होऊन आमचं नशीब लिहायला सांगितलं होतं? आता बाटलीत बंद करते.  

हिलाच करा बाटलीत बंद. आली मोठी लिहिणारी. एक आवाज आला. नको नको हिला बाटलीत बंद करायला काय आपण जिन्न आहोत? ती करू शकते आपलं काय पण आपण काय करणार तिचं. करू की हिला झपाटू आता एकाच वेळी चौघींनी म्हणजे न कळेल, जन्माला घातलेल्या पात्रांना कोंडून ठेवलं की काय होतं.  मग काय तर, काय ते नुसता दुर्लक्ष दुर्लक्ष दुर्लक्ष. काही नाही हिलाच आधी अद्दल घडवू. असं म्हणत त्या सगळ्याजणी माझ्याच विरोधात काही तर कट रचू लागल्या.

कोणी म्हणे चला बदडून काढू, कोणी म्हणे, बांधून घालू, कोणी म्हणे टेरेसवर उचलून नेऊन टाकू, कोणी म्हणे, झाडूने झोडपू, कोणी म्हणे चटके देऊ, एकात एक आवाज मिसळत गेला.

सगळा नुसता कल्लोळ मजला होता. मी एक शुद्धीत नव्हते आणि स्वतःहून उठण्याइतकीही माझ्यात शक्ती नव्हती. त्यांचं मात्र असं करू तसं करू चालूच होतं. त्यांचे आवाज वाढत जात होते आणि माझी भीती मोठी होत होती.

इतक्यात मला एक ओळखीचा आवाज ऐकू आला. मम्मी, ए मम्मी, उठ की किती वाजले बघ.

त्या चौघी जशा अचानक आल्या तशाच अचानक माझ्यातच लुप्त झाल्या. माझे डोळे अजूनही जडच होते. इतक्यात माझ्या गालावर चटकन एक चपटी बसली.

समोर प्रेम होता, “काय जाबडतीस अगं मम्मे झोप की शांत. प्रेम मला दटावत होता. मी डोळे उघडून बघितलं आम्ही तिघे एका ओळीत शांत झोपलो होतो. घडाळ्यात पहाटेचे चार वाजले होते. मी परत झोपले आणि झोपेतच मला आठवलं की, पहाटेची स्वप्नं खरी होतात आणि माझी झोपच उडाली.

©मेघश्री श्रेष्ठी. 

Post a Comment

1 Comments

फार सुंदर व्यक्तिरेखा उमटलेल्या आहेत. स्त्रीच्या मनात चालणारी चालबीचलता लेखातून जाणवते. पुरुष आणि स्त्री समान वागणूक असताना स्त्री ला जर पेय घेऊ वाटलं तर ती का जून घाबरते. तिच्या डोक्यामध्ये किती विचार चालू असतात हे शुभा च्या व्यक्तिरेखेत दिसते. खूप चांगला लेख वाटला.