वटपौर्णिमा आणि सावित्रीचा वारसा

फोटो गुगल वरून साभार 

हॅप्पी वटपौर्णिमा’पासून ते ‘ह्योच नवरा सात जन्मी हवा दिवसाच्या’ शुभेच्छा सोशल मिडीयावर फिरताहेत. अर्थात त्या दरवर्षीच फिरतात, तसा हा काही नवा प्रकार नाही. काही जणांसाठी हा सांस्कृतिक अस्मिता जपण्याचा दिवस असतो तर काही जणांसाठी हा दिवस निव्वळ थट्टेचा विषय असतो. आता इकडच्या काही जणांत आणि तिकडच्या काही जणांत कुणाचा समावेश होतो हे सांगण्याची गरज नाही.

 वटपौर्णिमे दिवशी सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, तिच्या पातीव्रत्यात इतकी ताकद होती की, तिने आपल्या मृतप्राय पतीलाही जिवंत केले म्हणजेच अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवली. सावित्रीची ही कथा तुम्ही अनेकदा वाचली किंवा ऐकली असेल आज जरा नव्या दृष्टीने तिच्याकडे पाहूया. 

युधिष्ठिराला द्रौपदी इतकी आपल्या पतींचा विचार करणारी (थोडक्यात काय तर पतिव्रता स्त्री) दुसरी कोणी स्त्री आहे का हा प्रश्न पडला होता. तेंव्हा युधिष्ठिराला मार्कंडेय ऋषींनी ही सावित्रीची कथा सांगितली, 

भद्र देशाचा एका राजा होता ज्याचे नाव होते अश्वपती. या अश्वपती राजाला मुल नव्हते. अश्वपती राजाने अपत्य प्राप्तीसाठी होमहवन सारखी कर्मकांडे सुरु केली. अठरा वर्षांनी त्याच्यावर सावित्री देवी प्रसन्न झाली आणि त्याला एक तेजस्वी कन्या रत्नाचा लाभ होईल असा वर दिला. देवीच्या आशीर्वादाने राजा अश्वपतीच्या घरी एका तेजस्वी, बुद्धिमान आणि सुंदर कन्येचा जन्म झाला. देवी सावित्रीच्या आशीर्वादाने झालेली कन्या म्हणून तिचे नाव सावित्रीच ठेवण्यात आले. 

आता सावित्री वयात आली. कोणत्याही वयात आलेल्या मुलीच्या बापाला भेडसावते तशी सावित्रीच्या वडिलांनाही सावित्रीच्या लग्नाची चिंता भेडसावू लागली. कारण, बुद्धिमान, गुणवान आणि रूपवान सावित्रीला अनुरूप असा वर त्यांना मिळत नव्हता. तिच्यासाठी योग्य वर शोधण्यात ये अपयशी ठरले तेव्हा त्यांनी तिच्यासाठी वर संशोधन करण्याची जबाबदारी तिच्यावरच सोपवली. 

वडिलांनी अनुमती दिल्यावर सावित्री स्वतः स्वतःसाठी वर संशोधन करण्यास बाहेर पडली. प्रवास करता करता ती एकदा वनात पोहोचली तिथे साल्व देशाचा राजा द्युमत्सेन आपल्या परिवारासोबत राहत होता. त्यांना त्यांच्याच राज्यातून हद्दपार केल्याने ते आपल्या कुटुंबासोबत या निर्मनुष्य वनात वास्तव्य करत होते. त्यांच्या मुलाला म्हणजे सत्यवानाला पाहताच सावित्रीने त्यालाच आपला नवरा म्हणून निवडण्याचा विचार केला आणि आपल्या वडिलांना तिने तसे कळवले. 

सावित्रीच्या या इच्छेबद्दल नारदांना कळताच ते राजा अश्वपतीला भेटण्यास आले आणि नारदांनी सांगितले की, आपल्या मुलीची निवड अत्यंत अयोग्य आहे. कारण, राजा सत्यवान हा अल्पायु आहे, लग्नानंतर काही वर्षांतच सावित्रीला वैधव्य येईल. 

नारद मुनींचे बोलणे ऐकून राजा अश्वपतीला चिंता वाटू लागली. त्याने आपल्या मुलीने तिचा निर्णय बदलावा म्हणून विनंती केली. त्यावर सावित्री म्हणाली की, मी मनातून त्याला वरले आहे. माझा निश्चय ठाम आहे, मी माझा निर्णय बदलणार नाही. तिच्या आवाजातील ठामपणा ऐकून राजा अश्वपती हतबल झाला आणि त्याने तिचे लग्न सत्यवानाशी लावून दिले. 
लग्नानंतर सावित्री सत्यवानासोबत वनात राहू लागली. सासू-सासऱ्यांची सेवा करू लागली. हळूहळू दिवस जात होते आणि सावित्रीला तिच्या पतीच्या मृत्यूची चाहूल लागली. 
सत्यवान वनात लाकडे तोडण्यास गेला होता. सावित्रीही त्याच्यासोबत होतीच. त्याला खूपच अस्वस्थ वाटू लागले. त्याचे डोके दुखत होते, त्याला असह्य वेदना होत होत्या. 
आपल्या पतीचे डोके आपल्या मांडीवर ठेवून सावित्री त्याला धीर देत होती पण मनातून तिलाही जाणवले होते की सत्यवानाचा अंत जवळ आला आहे. इतक्यात तिला सत्यवानाचे प्राण न्यायला आलेला यम दिसला. तो सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागला तशी सावित्री त्याचा मागोमाग जाऊ लागली. यमाने तिला आपला पाठलाग न करण्याची विनंती केली पण सावित्रीने ऐकले नाही. ती त्याच्या मागून चालतच राहिली. यमाने तिला आधी विंनती केली नंतर धमक्या दिल्या आणि नंतर पतीच्या प्राणांच्या बदल्यात तीन वरदान देण्याची तयारी दर्शवली. तेव्हा सावित्रीने तीन वर मागितले ते असे – सावित्रीचे सासू-सासरे अंध होते तिने यमाकडून त्यांच्यासाठी दृष्टी मागून घेतली. 

त्यानंतर तिने आपल्या सासऱ्यांचे हरवलेले राज्य परत मिळावे असा वर मागितला आणि तिसरा वर होता मला शंभर पुत्र व्हावेत. यमाने तिला हे तीनही वर दिले. 

यावर सावित्री म्हणाली, ऐकीकडे तुम्ही मला शंभर पुत्र होवोत असा वर देता आणि दुसरीकडे माझ्या पतीचे प्राण नेत आहात. तुमच्या शब्दात काही तरी घोळ होतोय असे तुम्हाला वाटत नाही का? माझे पती सोबत नसतील तर मला शंभर पुत्र कसे होतील तेव्हा मला माझ्या पतीचे प्राण परत द्या. सावित्रीच्या या चतुराईपुढे यमही थक्क झाला आणि त्याने सावित्रीला सत्यवानाचे प्राण सोपवले. 

या कथेत सावित्री आपले वडील अश्वपती, सासरे द्युमत्सेन आणि नवरा सत्यवान यांच्यापेक्षाही प्रभावी वाटते. तिने आपल्या सासू-सासऱ्यांची दृष्टी परत आणली, गेलेले राज्य परत मिळवले आणि पतीच्या प्राणांवर बेतलेले संकटही दूर केले. हे तिने कसे केले याबद्दल काहीही या कथेत नमूद न करता त्याऐवजी तिथे उपास-तापास, कर्मकांडासारख्या अतार्किक गोष्टीच दिल्या आहेत. अर्थात, काळाच्या ओघात कर्णोपकर्णी या कथेचा प्रवास होताना त्यात काही पडझड होणे अटळ आहे. म्हणून नीरक्षीर वेगळे करणाऱ्या हंसाप्रमाणे यातील आवश्यक तो भाग घेऊन अनावश्यक भाग नाकारणे विवेकशील मनुष्य म्हणून आपले कर्तव्य आहे. 

सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण आणून त्याला परत जिवंत केले. सत्यवान ज्या झाडाखाली गतप्राण होऊन पडला होता ते वडाचे झाड होते. वडाच्या झाडाचा आणि सावित्रीच्या कथेचा संबंध तो इतकाच! आजची सावित्री मात्र या वडाच्या भोवतीच घिरट्या घालण्यात व्यस्त झाली आहे. 

सावित्रीच्या पतीव्रत्याचे महात्म्य किंवा तिची आठवण जपण्यासाठी आजच्या दिवशी वडाची पूजा केली जाते. प्रत्यक्ष कथेत तरी सावित्रीने वडाची पूजा केली म्हणून तिला सत्यवानाचे प्राण परत मिळाले असा उल्लेख दिसत नाही. पण, हळूहळू या कथेला कर्मकांडात बदलताना ही वडाच्या पुजेची प्रथा निर्माण झाली असावी. 

कथेतील सावित्रीचे व्यक्तिमत्व पाहिल्यास ती एक बुद्धिमान, स्वत:च्या निर्णयावर विश्वास असणारी आणि त्याचे बरेवाईट परिणाम भोगण्याचीही तयारी दाखवणारी खमकी स्त्री वाटते. आपल्या आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य घेतले. तिच्या वडिलांनीही तिला ते स्वातंत्र्य दिले. दुर्दैवाने आजच्या आधुनिक काळात मात्र मुलीना हे स्वातंत्र्य फारसे मिळत नाही. सावित्री बुद्धिमान होती याचा अर्थ राजा अश्वपतीने तिला शिक्षणही दिले असणार म्हणूनच सावित्रीमध्ये आपल्या निर्णयाबाबत आत्मविश्वास निर्माण झालेला दिसतो. सावित्री ही एका राजाची एकुलती एक राजकन्या होती तरी ती आपल्या नवऱ्याची आर्थिक स्थिती न पाहता त्याचे गुण पाहून त्याच्यावर भाळली. त्याच्यासोबत तिने त्याच्या परिस्थितीचाही स्वीकार केला. खरे तर आपल्या पित्याकडून तिने मदत घेतली असती तर वनातील कष्टप्रद जीवन तिला टाळता आले असते पण तिने तसे न करता स्वतःच्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःचा संसार उभारण्याची तयारी दाखवली.

यातील काही तर्कहीन (होमहवन करून मुलगी होणे, सत्यवानाच्या मृत्यूचे भाकीत, यमाचा पाठलाग करणे, सावित्रीला शंभर पुत्र होणे, वगैरे) भाग वगळल्यास आपल्याला सावित्रीच्या खंबीर, दृढनिश्चयी, चतुर, प्रसंगावधानी व्यक्तिमत्वाची ओळख होते. स्त्रियांनी हे गुण अंगिकारले तर त्याही आपल्या कुटुंबांवर ओढवणाऱ्या एखाद्या बिकट प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडू शकतात. पण वास्तवात अनेकदा स्त्रिया स्वतःला कमजोर, दुबळ्या किंवा आपल्याला त्यातलं काय कळतं या मानसिकतेच्या शिकार झालेल्या असतात. प्रत्यक्षातली सावित्री मात्र, जेव्हा सत्यवानावर बाका प्रसंग गुदरतो तेव्हा ती धैर्याने त्याला सामोरे जाते. कठीण काळात आपल्या पतीला साथ देणे हेच खरे पातिव्रत्य! एवढेच या कथेतून खरे तर अधोरेखित होते. (आताच्या काळातील मालिकेतील नायिकेप्रमाणे मुळूमुळू रडत बसत नाही.)
आजही अशा कित्येक खमक्या सावित्री प्रत्यक्षात आपल्या कुटुंबाला सावरताना दिसतात. कुटुंबावर काही बिकट प्रसंग ओढवला असता त्यातून शिताफीने मार्ग काढणाऱ्या, कठीण प्रसंगातही आपली निर्णय क्षमता शाबूत राखणाऱ्या, निर्णय घेणाऱ्या, घेतलेल्या निर्णयाच्या बऱ्या-वाईट परिणामांना समोरे जाणाऱ्या, कुटुंबाला यशोशिखरावर पोहोचवणाऱ्या महिला आजही आहेतच. या सगळ्या सावित्रीचा वारसा चालवणाऱ्या खऱ्या लेकी आहेत.

एका सावित्रीच्या कर्तृत्वाच्या फुणगीवर राख चढली होती ती दुसऱ्या सावित्रीने आपल्या फुंकरीने पुन्हा चेतवली आहे. म्हणून आपल्यासाठी या दोन्ही ‘सावित्री’ तितक्याच महत्वाच्या आहेत. नंतरच्या सावित्रीने याला व्यापक रूप देत समाजालाच आपले कुटुंब मानले. या दोन्ही सावित्रींच्या काळात हजारो वर्षांचे अंतर असले तरी दोघीही आपल्या आतल्या वन्हीला चेतवण्याची आणि त्याचा वापर करून इतरांच्या आयुष्यात प्रकाश उजळण्याचीच प्रेरणा देतात. 

खरे तर आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी प्रत्येक सावित्री झटतच असते. कधी कधी तिचे मनोबल खचलेच तर एक एक प्रेरणादायी कथा म्हणून या सावित्रीच्या कथेकडे पहिले पाहिजे. 
अशा खमक्या सावित्रीचा खमकेपणा अंगीकारता यायला हवा. दुर्दैवाने तिच्यातील निसर्गदत्त गुण आणि तिने त्यांची चिकाटीने केलेली जोपासना या तार्किक गोष्टी सोडून फक्त या कथेतील अतार्किक घटनांचाच बाऊ करण्यात आला आहे. या सावित्रीने तर यमाकडून एकदाच सत्यवानाचे प्राण आणले. मग हे सात जन्म, वडाची पूजा, पावित्र्य आणि पातिव्रत्य वगैरे भाकडकथा सावित्रीच्या आडून आपल्या माथी मारत असतील का? एका तेजस्वी स्त्रीच्या नावाचा वापर करून पिढ्यानपिढ्या स्त्रियांना दुर्बल करण्याचा प्रयत्न तर केला गेला नाही ना? पातिव्रत्याच्या नावाखाली वडाला दोरा गुंडाळायला सांगून कुणी आपल्यालाच गुंडाळत तर नाही ना? हेही या निमित्ताने तपासायला हवे.

©मेघश्री श्रेष्ठी.

Post a Comment

2 Comments

pravin said…
खूप छान लेख ....
संपूर्ण लेखात "मात्र आजही सावित्री या वडाच्या भोवतीच घिरट्या घालण्यात व्यस्त झाली आहे." हे वाक्य म्हणजे आपल्या लेखाचा आत्मा आहे. असेच लिहित रहा......
अतिशय तर्कशुद्ध!
उत्तम मांडणी👌👌👌
👍🏼