आज राष्ट्रीय विज्ञान दिवस!

 

दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. यावर्षी देखील आजच्या दिवसात देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा होत आहे. भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सी. व्ही. रमन यांनी भौतिकशास्त्रात लावलेल्या रमन इफेक्टच्या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिकाने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा भौतिक शास्त्रातील या अतुलनीय योगदानासाठी १९३० मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. विज्ञान क्षेत्रातील नोबेल मिळवणारे सी. व्ही. रमन हे पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत. जेव्हा प्रकाश किरण कोणत्याही पारदर्शक वस्तू मधून (स्थायू, द्रव, वायू) आरपार जातात तेव्हा काही परावर्तीत प्रकाश किरणांची तरंगलांबी आणि त्यांचे आकारमान (amplitude) बदलते. ज्या माध्यमातून हे प्रकाश किरण परावर्तीत होतात त्या माध्यमातील अणूमुळे या प्रकाश किरणातील उर्जा कण जास्त प्रमाणात पसरतात. हाच तो सिद्धांत ज्याला विज्ञानात रमन इफेक्ट (रमन प्रभाव) म्हटले गेले. सी. व्ही. रमन यांनी आजच्याचदव दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारी १९२८ रोजी हा शोध लावला होता. रासायनिक संयुगांची रचना समजून घेण्यासाठी या सिद्धांताने मोठी मदत केली. या सिद्धांत विज्ञानातील एक महत्वपूर्ण सिद्धांत आहे. म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिवस याच दिवशी साजरा केला जातो.

दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्व लोकांना पटावे आणि विज्ञानाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी याच उद्देशाने हा दिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी आणी भारतात विज्ञान संशोधनाला चालना मिळावी म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. भारतीय नागरीकांच्यातील विज्ञाननिष्ठा वाढवण्यासाठीही हा दिवस फारच सहाय्यभूत ठरत असल्याचे  दिसते.

दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट थीम ठरवली जाते. यावर्षीच्या विज्ञान दिनाची थीम आहे, ‘विज्ञान, तंत्रज्ञान, आणि नवनिर्मिती यांचे भविष्य आणि त्याचा शिक्षण, कौशल्ये आणि कामावरील परिणाम.’

यावर्षीची जी थीम आहे, त्याचा उद्देश हाच आहे की, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती किंवा कल्पकतेचा शिक्षणावर, मानवी कौशल्यावर आणि कामाच्यापद्धतीवर काय परिणाम होतो हे पाहणे. तो जाणून घेणे. भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काय बदल होणार आहेत किंवा होतील याचा अंदाज बांधण्यासाठी तरुणांनी प्रेरित व्हावं विज्ञानाकडील त्यांचा कल जास्तीत जास्त वाढवा हाच हेतू आहे.


१९८६ मध्ये राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेने पहिल्यांदा राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याचे ठरवले. यामागचा उद्देश हाच होता की लोकांपर्यंत विज्ञान पोहोचावे आणि विज्ञानातील लोकांची आवड वाढावी. या दिवशी विज्ञानाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या भारतीय संशोधकांचा सन्मान केला जातो. ठिकठिकाणी विज्ञानावर आधारित कार्यक्रम केले जातात, जसे विज्ञान प्रदर्शन, विज्ञानाचे महत्व पटवून देणारी व्याख्याने आयोजित केली जातात. विज्ञानावर आधारित चित्रपट, माहितीपट दाखवले जातात. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगांचे प्रदर्शन मांडले जाते. त्यांचा अभ्यास केला जातो.


आपणही विज्ञाननिष्ठ नागरिक होऊन भारतीय संविधानानुसार आपले कर्तव्य बजावूया.

 

 

Post a Comment

2 Comments

Sheetal said…
छान लिहिले आहेस