शाश्वत विकासासाठी मानवी एकता!

 



 आज आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस म्हणजेच International Human Solidarity Day. दर वर्षी २० डिसेंबर रोजी हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. जगभरातील विविध देश, त्यांची वेगवेगळी संस्कृती, खानपान, भाषा, वेशभूषा अशा कितीतरी गोष्टीत संपूर्ण मानव जात विभागली गेली आहे. पण, या संपूर्ण मानव जतीला एकत्रित बांधून ठेवणारा घटक म्हणजे आपले ‘माणूसपण.’ भारताचंच उदाहरण घेतले तर इथे अनेक गोष्टींत विविधता आढळते. तरीही अगदी प्राचीन काळापासून या विविधतेला एकत्रित बांधणारी एकताही इथे आहे.

जगाचा विचार केला तर ही विविधता आणखी भव्य वाटू लागते. पण, जगभर विखुरलेल्या या मानवी समूहालाही एक एकत्रित बांधणारी गोष्ट म्हणजे माणुसकी. अगदी आपण हजारो किमी दूर अंतरावर राहणारे, अपरिचित जीव असलो तरी आपल्या जगण्याचे ताणेबाणे कसे एकत्र गुंफलेले आहेत हे आपण याच वर्षी पहिले. एका देशात कोरोनाचा उदय झाला पण,  बघता बघता या छोट्याशा व्हायरसने संपूर्ण जग पादाक्रांत केले. एका देशाच्या अनुभवावरून दुसरे देश शहाणे होत गेले. संपूर्ण मानवजातीवर ओढवलेले हे संकट निवारण्यासाठी डब्ल्यूएचओ सारख्या जागतिक संघटनेनेही कंबर कसली आणि तिच्या सूचनांचे पालन सगळ्या जगभर होऊ लागले. हे झाले एक उदाहरण. आपल्याला शांतता आणि सौहार्दापूर्ण आयुष्य जगायचे असेल तर आपण सर्वांनी एक दिलाने राहणे आवश्यक आहे. कुटुंब असो, गाव असो, राज्य असो, देश असो कि संपूर्ण विश्व सगळीकडे हेच सूत्र लागू पडते. घरात शांतता नसेल तर घराची अवस्था काय होते हे तर आपण अनुभवतोच अगदी तीच गोष्ट जगाचीही नाही का...?

जगातही मानवी भेदाभेदाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. वंश, वर्ण, लिंग, आर्थिक स्तर असे अनेक घटक या भेदभावाला खतपाणी घालतात. याच वर्षी झालेला जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूने आपल्यातील भेदभावाचे किती पराकोटीचे हिंसक परिणाम होऊ शकतात हे दाखवून दिले. प्रत्येक देशात अशा घटना होतच असतात. जातीभेदावरून भारतात होणाऱ्या अत्याचाराच्या क्रूर घटनाही काही कमी नाहीत. अशा घटना आपल्या शाश्वत विकासाला खीळ तर घालतातच पण माणूस जमातीसाठी लाजीरवाण्या देखील आहेत. यातून मानवाचा एक हिंस्र चेहराही समोर येतो.

संपूर्ण मानव जमात एकमेकांच्या सोबतीने प्रगती करू लागली तर शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठणे अशक्य नाही. जगभरात आज अनेक लोक दारिद्र्य, उपासमार, रोगराई अशा जीवघेण्या दुष्टचक्रात अडकले आहेत. अशा लोकांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने युनो या जागतिक संघटनेने २२ डिसेंबर २००५ रोजी दर वर्षी २० डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस साजरा करण्याचे घोषित केले. या दिवसाच्या निमित्ताने तरी किमान जगभरातील ‘आहे रे’ गटातील लोकांनी ‘नाही रे’ गटातील लोकांसाठी काय करता येईल यावर विचार करायचा आहे. त्यासाठी काही ठोस पावले उचलायची आहेत. यासाठी शासकीय स्तरावर काही योजना राबवल्या जात असतील तर त्यात सहभागी व्हायचे आहे. या उद्देशाने जर काही बिगर शासकीय संस्था म्हणजेच एनजीओ काम करत असतील तर त्यांच्याही कामात सहभाग होऊन या समाजाप्रती आपले ऋण म्हणा किंवा कर्तव्य म्हणा पार पडायचे आहे.

विशेषत: या सगळ्या दुष्टचक्रात भरडले जाते ते कोवळे बालपण म्हणून अशा वर्गातील मुलांना ज्यांना बालपणीचा आनंद सोडून जबाबदारीचे ओझे वागवावे लागते त्या मुलांसाठीही काही करता येईल का यावर नक्कीच विचार केला जाऊ शकतो.  या संबधीही चर्चा व्हावी आणि त्यातून जागरूकता निर्माण व्हावी हाही एक उद्देश यामागे आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मुलन निधीचीही स्थापना करण्यात आली आहे.

त्याही पेक्षा सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय कायदे, आंतरराष्ट्रीय करार आणि आंतरराष्ट्रीय मानवी अधिकारांची पायमल्ली होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी आणि त्याप्रती प्रत्येक देशाचे काय कर्तव्य आहे याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. युनायटेड नेशन्सच्या सर्व सदस्यांनी यावर शिक्कामोर्तब केला आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी एकात्मतेच्या भावानेची जोपासना होणे नितांत गरजेचे आहे.

जगातील सगळी माणसे जर या उद्देशाने एकत्र आली तर जगातील खूप मोठ्या समस्यांवर उत्तरे मिळू शकतात. याची जाणीव सर्वांना व्हावी या उद्देशाने हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. मानवी एकता हे एक मुलभूत आणि वैश्विक मूल्य आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्दासाठी संपूर्ण मानवजातीत ऐक्याची भावना रुजवणे म्हत्वाचे आहे. तरच जागतिक पातळीवर मानवी हक्कांचे संरक्षण होऊ शकेल आणि सामाजिक व आर्थिक उन्नती साधणे शक्य होईल. आपणही या वसुधैव कुटुंबकमचा एक हिस्सा आहोत, याची जाणीव व्हावी आणि त्यादृष्टीने काही छोट्या छोट्या कृतीतून आपण सभोवतालच्या समाजातही याची जाणीव करून द्यावी म्हणून आजचा हा खास दिवस.

©® मेघश्री श्रेष्ठी

 

Post a Comment

2 Comments