अंधाराचा वारसा

नंद्या गेला. त्याला लागलेल्या या दारूच्या व्यसनान शेवटी त्याचाच घोट घेतला. अवघ्या तिशीतच तो गेला. त्याचे वडील ऑफिसर होते म्हणून स्मिताच्या वडिलांनी हे स्थळ पसंद केले. बाकी त्याच कर्तुत्व शून्य. तरुण बायकोसाठी आणि दोन लहान चीमुरड्यांसाठी अंधाराचा भयाण वारसा मात्र ठेवून गेला. अवघ्या पंचविसाव्या वर्षी आलेल वैधव्य आणि पदरात दोन लहान चिमुरडी. एक पाच वर्षांचा दुसरा तीन वर्षांचा. 
नंद्याला दारूचा हा वारसा त्याच्या बापाकडूनच मिळाला. शिकून काय उपयोग? आमची मुल काही अभ्यासात चांगली नाहीत कशाला शिकवायच्या नदाला लागायचं? म्हणून यांनी पोराला भाडयान चालवायला गाडी घेऊन दिली. पुढे कर्जाच्या डोंगरात ती गाडीही गडप झाली. पण शिकून काय करायचं?म्हणून शिकायचच नाही? यांना बाप तरी कस म्हणायचं?
प्रत्येक गावात, वार्डात एक तरी दादा असतो जो अशा पिणार्यांची काळजी करतो. कारण त्याचा गुत्ता, दादागिरी आणि राजकारणाअडून चालणारे सगळे बरे वाईट धंदे चालू ठेवायचे असतील तर अशा अगतिक माणसांची गरज असतेच. अशा विवेक आणि विचार गमावलेल्या माणसांना हाताशी धरूनच ते आपल साम्राज्य टिकवू शकतात. पैसे देण्यापेक्षा दारू देऊन काम करून घेता येत असतील तर मग, त्यांच्या घरच्यांचं काय होईल याची काळजी करण्याची या दादांना अजिबात गरज नसते. हे दादा आपल्या पोरांना तर शिकवत नाहीतच (करण ती शिकली तर मग हे धंदे कोण चालवणार?) आणि तोच आदर्श दुसर्यांसमोर ठेवतात. नंद्याच्या आजूबाजूला पाहिलं तर एकूणच शिक्षणाच्या नावाची नकार घंटा. दारूच्या नशेन कितीतरी संसार असेच उध्वस्त झालेलेÊ. ऐन तारुण्यात आलेल वैधव्य आणि त्यांची चिमुरडी आणि त्यांच्याकडे आहे तो फक्त अंधाराचा वारसा.
अग इथे तर प्रत्येक घरात अशीच परिस्थती आहे. इथल्या पोरांना दारू पिणे आणि त्या साहेबांच्या पोरांमाग हिंडणे एवढाच काम. एकेका घरात तर तरुण पोर राहिलेलीच नाहीत. एक तर म्हातारी नाही तर लहान लहान पोर आणि त्यांच्या आया. माझी बहिण सांगत होती.
एकूणच व्यसन, निरक्षरता, माणसाला अगतिक बनवणारी अशी कितीतरी आयुध या अंधाराच्या हाती आहेत. याच्याशी लढायचं कस? आणि या अंधाराच्या अडून राज्य करणारे किती तरी सम्राट!
आज लहान असणाऱ्या या जीवांना आपली अशी स्थिती का झाली? याच भान असणार नाही, पण यांच्या वाट्याला आलेल्या या अंधाराशी हि कशी लढतील हा खरा प्रश्न आहे. ती लढतील का? हा अंधार बाजूला सारून त्यातूनही उभी राहण्याची ताकद यांच्याकडे येईल का? कि हळूहळू तीही या अंधाराचाच एक भाग बनून हाच वारसा कवटाळून बसतील. पुन्हा कुणाच्या तरी नशिबी अंधार पेरण्यासाठी?
© मेघश्री श्रेष्ठी-नाईक.



Post a Comment

0 Comments