जमेल का तूला?

जमेल का तूला?

हा बघ….
शब्द शब्द वेचून,
बांधलेला,
माझ्या स्वप्नांचा इमला…!
ये ना असा आत,
बावरू नको, बिचकू नको,
बघ कसा सजवलाय,
माणुसपणाच्या भग्न अवशेषांनी…!
असा अधीर नको होऊ,
बस….
माझ्या देहाच्या वळणदार,
अनवट घाटांतून,
हु़ंदडण्याआधी,
माझ्या डोळ्यांतून, मनात उतर.
बघ दिसतो का तिथे,
धार्मिक वेदनांनी पेटलेला,
सनातनी आक्रोश….!!
माझं माणुसपण नाकारणाऱ्या,
सत्शील नरपुंगवांनी,
मांडलाय जोहार….
ज्यात जळतेय माझी,
शुचिर्भूत योनी
शतकानुशतके….!
सतीत्वाचा घुंगट ओढुन,
मी बळजबरीच वाहतेय,
पावित्र्याचा अघोरी जोखड...
शतकानुशतके…!
फेकायचाय मला हा,
शुद्धवंशीय जू….
माझ्या खांद्यावरून
आणि जळत असलेली,
माझी शुचिर्भूत योनी,
वाट पाहतेय,
निव्वळ ‘माणूस’ असलेल्या माणसाची
जो फुलवेल,
निव्वळ माणुसपाणाची हिरवळ,
कुठल्याच भेदाभेदाचं
निरोध न वापरता…!
जमेल का तुला?
फितुर होशील,
तर,
याद राख…..
माझे शब्द आसुसलेत
लपापत्या ज्वाळा बनून,
व्यवस्थेचा जोहार मांडायला,
तुझ्यासह….!!!

© मेघश्री श्रेष्ठी



Post a Comment

2 Comments

वाह..शब्दात खुप ताकद आहे. लिहीत राहा.
जबरदस्त!
भेदाभेदांचा निरोध...फार सुरेख प्रतिमांचा वापर केला आहेस, आणि अतिशय दाहक शब्द योजना👌👌👌👌