पुण्य एनकॅश करण्याच्या या काळात पाप मात्र फोफावत चाललंय…!
तो कळकट चेहरा. मळके कपडे. काडीसारखे हातपाय. भिरभिरणारे डोळे. हताश, आगतिक, हतबल तरीही आशा लावून बसलेले. आपल्या या दयनीय परिस्थितीची कुणी तरी दखल घेईल. आपल्याकडे कुणाचं तरी लक्ष जाईल. आपण पकडूच कुणाला तरी ज्याच्या मनात कणव असेल. आपल्याकडे पाहून ज्याचं काळीज हलेल. ज्याला दान करून पुण्य पदरात पाडून घ्यायची हौस असेल. पाप धुवून पुण्य एनकॅश करण्यासाठी जमलेल्या या गर्दीत त्याच्या गळाला लागतील असे चिक्कार मासे होतेच आजुबाजुला. तरीही आपली शिकार होऊ न देता, त्याला शिकार शोधायची होती सावधपणे. हां सापडली. "काकु खायला द्या ना." एवढंस लेकरू. खायलाच तर मागतंय. चला देऊन टाकू म्हणून तिनेही विचारलं, "काय खाणार?" "चिकन राईस." दोघे समोरच्या चायनीज टपरीवर गेले. सगळी खाऊ गल्ली ओसंडून वाहत होती गर्दीने. तो टपरीवाला त्यांना पाहून गालातल्या गालात हसला. तिने हाफ चिकन राईसची ऑर्डर दिली. टपरीवाल्याच्या चेहऱ्यावरील भाव बघून तिने हेरलं काही तरी घोळ आहे. एका भुकेल्या जीवाचा आत्मा शांत करावा इतकं साधंसुधं प्रकरण नाही वाटत हे. टपरीवाला गोंधळलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होता, ...