विषादाची आत्मकथा

तिने गळफास घेतला. आता ती गेली. कायमची. तिला कणाकणानी मरताना पाहणं वेदनादायी होतं खरं. पण सुटले मी तिच्या मरणानंतर.
Image source: Google 


"तिनं आत्महत्या का केली?"

माझ्यामुळंच.
मीच कारणीभुत तिच्या जगण्याला आणि मरण्याला सुद्धा.

इथं तिला असं लटकताना बघतेय. शांत वाटतंय. 

सगळे प्रश्न संपले?

कि नविन निर्माण झाले?

का केलं मी असं? 

कारण वैताग आला होता रोजची किरकिर सहन करण्याचा. दररोज उठून जगण्याचा. सहन करण्याचा, रागावण्याचा, भांडण्याचा, ऐकण्याचा, ऐकून घेण्याचा, बोलण्याचा आणि बोलून दाखवण्याचा. सगळं चक्र एकदासं संपून जावं, म्हणून केलं मी हे.

जगण्याची ही भयानक बाजू मी नेहमी तिला दाखवत राहिले. 

तिला आकाशात उडणारी फुलपाखरं खुणावायची तेव्हा मी तिला गांधील माशीची घरटी दाखवली आणि सांगितलं की यांचा डंख खुप दाहक असतो. 

तिला पावसात भिजायला आवडायचं तेव्हा, मी दाखवला तिला पायाखलचा किचकिच चिखल.

तिला खिदिखिदी हसायला आवडायचं तेव्हा मी तिला भिती घातली, असं खिदिखिदी हसणाऱ्या बाईला चार लोकं चांगलं नाही म्हणत. 

तिला आरशात न्याहाळायला आवडायचं तेव्हा मी सांगितलं की ती चारचौघींपेक्षाही खुपच सुमार आहे. ना शरिराला आकार ना उकार… काही खरं नाही.

ती प्रेम शोधत होती तेव्हा मी तिला लबाडी दाखवली.

मैत्री शोधत होती तेव्हा मी पाठीत खुपसलेले खंजीर दाखवले.

तिला फुलायचं होतं पण, हळूहळू ती मिटत गेली.

तिने कधीच माझ्यावर संशय घेतला नाही, मला प्रश्न केले नाहीत. मी कोण? कुठून आले असले प्रश्नही तिला पडले नाहीत. माझ्या प्रत्येक जाळ्यात ती अलगद अडकत गेली.

तिने कधी काही हालचाल केलीच मला झुगारून देण्याची तर मी इतक्या आवेषाने तिच्यावर तुटुन पडायची की, भेदरून जायची बिचारी. 

माझ्या सावलीत तिची स्वप्नं खुरटत चालली होती. पण आपल्या सोबत नेमकं होतंय काय हे तिलाही समजत नव्हतं. 

हळूहळू तिचं हसणं मंद होत गेलं. तिच्यातील आनंद, प्रेम, विश्वास आटत गेला. तिला कुणावरही विश्वास ठेवणं अशक्य वाटू लागलं. 

तिला पक्ष्यांचा किलबिलाट असह्य झाला. माणसांचा वावर खपेना झाला. स्वतःचीच शत्रू झाली ती जणू. सकाळची आल्हाददायक हवा सोसवेना झाली. स्वतःला आरशात पाहण्याचा छंदही मावळून गेला.

छोट्या छोट्या गोष्टीत तिला मोठे अनर्थ दिसू लागले. स्वतःच्या सावलीचीही भिती वाटू लागली. 

लख्ख प्रकाशात डोळे उघडे ठेवणंही अशक्य झालं. काळोखातच तिला शांतता मिळू लागली.

तिच्या भोवताली विचित्र कुंदपणा जाणवू लागला. इतरांनाही तिच्यात काही रस वाटेना झाला. तिचं हे हळूहळू मिटत जाणं कुणालाच दिसत नव्हतं. तिच्या अस्तित्वाचा पत्ताच गायब झाला. 

अशात मी तिला इतकंच म्हणाले, "कदाचित मरशील तर सुटशील."

आणि तिने तेच केलं. 

तिला असं लटकताना पाहताना शांत वाटतंय.

मी कोण म्हणताय?

खुप नावं आहेत मला, खुप मुखवटे घेऊन वावरते मी. पण मी क्वचितच कोणाला ओळखू येते.

मी अवदसा, मी साडेसाती, मी अवकळा, मी हडळ, चेटकीण. भरपूर नावं आहेत मला.

पण माझं खरं नाव सांगू? 

नकारात्मकता.

माणसांना हळूहळू संपवत जाणं हाच माझा छंद. 

मी कुठेही वावरू शकते, कुणालाही पछाडू शकते.

चिवट, हट्टी आणि स्वतःवर प्रेम असणाऱ्या लोकांसमोर मात्र माझं काही चालत नाही.

मीही कधी कधी हरते… आणि संपवत जाते स्वतःला इतरांसारखंच.


Post a Comment

0 Comments