Just Read - Must Read डिप्रेशन - नैराश्यासारख्या गंभीर आजाराची खोली आणि व्याप्ती समजावून देणारं पुस्तक

सध्याच्या काळात सर्वच पातळ्यांवर जाणवणारी एक भीषण समस्या म्हणजे मनोविकार. त्यातही नैराश्य (Depression) चं प्रमाण खूप जास्त आहे. एकूण लोकसंख्येपैकी किमान 10% लोकांना तरी या समस्येनं ग्रासलेलं आहे, पण याची तीव्रता अजूनही म्हणावी तशी लक्षात आलेली नाही. अलीकडच्या काळात याचं प्रमाण वाढलं असलं तरी, हा आजार काही नवा नाही. मग याची कारणं काय असू शकतात, याची लक्षणं काय असू शकतात आणि हा आजार केव्हापासून मानवासोबत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी लिहिलेलं डिप्रेशन (नैराश्य) हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं.

Image source - vachan.com


नैराश्य म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, त्याची सुरुवात कशी होते आणि यावर आजवर कोणकोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्यांचा विकास कसा झाला, या सगळ्याची सखोल आणि उत्तम माहिती या पुस्तकात दिली आहे.

बरेचदा आपल्याला नैराश्य म्हणजे काय? ते कसं असतं आणि ज्या व्यक्तीला या विकारानं घेरलंय त्याची अवस्था कशी असते हेच कळत नाही. ‘काही नाही सगळे मनाचे खेळ आहेत,’ असं म्हणून आपण एखाद्या नैराश्यग्रस्त व्यक्तीला आणखी नैराश्यात तर टाकत नाही ना हे समजून घ्यायला हवं.

या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात नैराश्याची ओळख आणि लक्षणे सांगितली आहेत. हे प्रकरण खूपच विस्तृत आहे. यात नैराश्याच्या प्रत्येक लक्षण व्यक्तगणिक कसं वेगळं असू शकतं किंवा नैराश्याच्या लक्षणात व्यक्तीचा स्वभाव, परिस्थिती आणि कारणानुसार कसा फरक पडू शकतो हे कळतं.

यानंतर या आजाराचा इतिहास सांगणारं प्रकरण आहे. ज्यात नैराश्य या आजाराची ओळख माणसाला नेमकी कधी झाली? याचा उहापोह केला आहे. पूर्वी ज्याला मेलेंकोलीया म्हणत त्यालाच आता नैराश्य म्हटलं जातं. अगदी रामायण महाभारताच्या काळातही व्यक्तींना नैराश्य यायचं हे यात सांगितलं आहे. या इतिहासात मग याची मानसिक आजार म्हणून केव्हापासून दाखल घेतली गेली आणि तो दूर करण्यासाठी कोणीकोणी काय काय उपाय सुचवले, ते कितपत यशस्वी झाले? हे सगळं इथं वाचायला मिळेल.

त्यानंतर नैराश्याचे प्रकार आणि त्याची कारणं, तसेच नैराश्याचे निदान आणि त्याचे उपचार याबद्दल सविस्तर माहिती देणारी प्रकरणं आहेत. साहित्य, संगीत, सिनेमा अशा कलांमधून व्यक्त झालेलं नैराश्य, कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींना आलेलं नैराश्य आणि त्यातून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या उलथापालथी, नैराश्य सहज ण झाल्याने प्रसिद्ध, श्रीमंत व्यक्तींनी केलेल्या आत्महत्या, या सगळ्याचीही चर्चा इथे करण्यात आली आहे.

ज्या व्यक्तींना नैराश्याच्या काळात कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि समुपदेशकांची किंवा योग्य उपचारांची मदत घेता येते ते या नैराश्यातून सहज बाहेर येऊ शकतात. पण ज्यांना अशी कोणतीही मदत मिळत नाही त्यांची अवस्था किती विचित्र होते याची अनेक उदाहरणं या पुस्तकात दिली आहे. ज्यामुळे नैराश्य म्हणजे मनाचा खेळ नसून ती मनाची एक गंभीर समस्या आहे आणि ती किती तीव्र आहे याची आपल्याला जाणीव होईल.

आयुष्यात खूप काही नकारात्मक घटना घडल्या असतील, कटू अनुभव आले असतील तरच नैराश्य येतं असं नाही. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, तरुण-वृद्ध अशा कोणत्याही स्तरातील आणि जगातील कोणत्याची कोपऱ्यातील व्यक्तीला नैराश्य हे येऊ शकतं. जसं ताप सर्दी कोणालाही येते अगदी तसंच. योग्य ते उपचार घेतल्यावर जसं ताप-सर्दी कमी होते अगदी त्याचप्रमाणे नैराश्यावरही योग्य ते उपचार घेतल्यास व्यक्ती पुन्हा हसतं-खेळतं आयुष्य जगू शकते.

नैराश्याचा बाऊ करण्याची गरज नाही. तर ते समजून घेण्याची गरज आहे. नैराश्याची खोली आणि व्याप्ती समजावून देणारं एक खूप महत्वाचं पुस्तक म्हणून याकडे पाहता येईल. ज्यांना स्वतःला नैराश्य आलं आहे असं वाटतं किंवा संपर्कातील एखाद्या व्यक्तीला नैराश्य आलं आहे, पण त्याचं निदान करता येत नाही किंवा त्याचं गांभीर्य काय? हे कळत नाही, अशा व्यक्तींनी तर हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं. तुमच्या आजूबाजूला एखादी व्यक्ती डिप्रेशनग्रस्त असेल तर तिच्याशी कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे तिला कसं समजून घेतलं पाहिजे हेही तुम्हाला लक्षात येईल.

डिप्रेशन ही फक्त वैयक्तिक नाही तर ती एक सामाजिक समस्या आहे. त्यामागे वैयक्तिक तशी राजकीय/सामाजिक/आर्थिक कारणंही आहेत. हे सगळं समजून घ्यायचं असेल तर मुळातून हे पुस्तक वाचायला हवं.

 

Post a Comment

1 Comments

Anonymous said…
खूप छान. नक्की वाचू हे पुस्तक