आई - वात्सल्यमूर्ती की न दिसणारा एक अबोल संघर्ष ?

मला हे का लिहावं वाटतंय? तर फक्त ‘हे असंही असतं,’ हे इतरांना समजावं म्हणून. मानसिक आरोग्याच्या बाबतीत मी सातत्याने लिहित आहे. कारण एक तर हा विषय मा‍झ्या आवडीचा आहेच पण, काही अत्यंत वाईट कारणांमुळे खूपच जवळचा झालेला आहे. गेल्या वर्षी मी आईपणाची दुसरी बाजू नावाचा एक लेख लिहिला होता ज्यात पोस्टपार्टम डिप्रेशनचा आई आणि बाबा दोघांवरही कसा परिणाम होतो याबद्दल लिहिलं होतं. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या नातीने याच डिप्रेशनमधून आत्महत्या केल्यानंतर हा विषय चर्चेत आला. बाळंतपणानंतर स्त्रीचे मानसिक आरोग्य कितपत खालावू शकते याचे ते एक उदाहरण होते. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा अशा घटना घडतात तेव्हाच आपले डोळे उघडतात. एरवी आपल्या आजूबाजूला जेव्हा अशीच उदाहरणं दिसतात तेव्हा मात्र आपण सोयीस्करपणे डोळ्यांना झापड लावून घेतो.

दुसऱ्याच्या मानसिक आजारात त्याला साथ द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं हेच कदाचित अजून आम्हाला कळलेलं नाही आणि हे समजून घेण्याचे मार्ग सुद्धा खूप कमी आहेत. म्हणून हे होत असावं.

Image source : Google


आज आम्ही प्रेमचा चौदावा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने मला पुन्हा एकदा चौदावर्षापूर्वीचे दिवस आठवले. मुल होऊ देणं हा सर्वस्वी माझा निर्णय होता पण, जेव्हा तो निर्णय निभावण्याची वेळ आली तेव्हा, ‘अरे बापरे हे काय केलं आपण?’ हा माझा स्वतःलाच पहिला प्रश्न होता.

नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रचंड वेदनादायी अनुभवातून गेल्यानंतर शरीर आणि मनानेही प्रचंड थकवा आला होता. स्वत:सोबत काय होतंय हे अजून कळत नव्हतं आणि त्यात त्या पोराचं रडणं. त्याला नेमकं काय होतंय हेही समजायचं नाही. त्याच्या भुकेच्या वेळा, झोपेच्या वेळा, त्याला होणारा त्रास आणि त्याचं ते असह्य रडणं.   

दिवस-रात्र यातला फरक संपून गेला होता. त्यात बाळाची काळजी कशी घ्यायची, त्याला कसं पाजायाचं, हे सगळं सांगणारंही जवळ कुणी नव्हतं. बाळाला जन्म दिल्यावर आईपण अपोआप अंगी येतं, असा एक गोड (गैर) समज आहे.

त्यावेळी आमच्या घरात लाईटचे दिवे नव्हते. रात्री बाळ उठलं तरी रॉकेलचा दिवा लावून मग त्याला घ्यायचं, शांत करायचं. सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी होऊनही मला साध्या आयर्न आणि फॉलिक अॅसिडच्या गोळ्या सुद्धा डॉक्टरनी दिल्या नव्हता.

भर पावसाळ्यात डिलिव्हरी झाली. शिवाय जिथे डिलिव्हरी झाली त्या सरकारी हॉस्पिटलमध्येच घोट्यापर्यंत पाणी साचलं होतं. टॉयलेट-बाथरूमची तर अवस्था बघायला नको. अशातून कधी एकदा घरी जाते असं झालेलं. अपुरी झोप. पथ्यपाण्याच्या नावाखाली तीन वेळा फक्त वरणभात मिळायचा. बाळाला पुरेल इतकं दूध यायचं नाही आणि त्याचं पोट भरत नसल्यानं ते अजूनच रडायचं.

तेव्हा तर पोस्टपार्टम हा शब्दही माहित नव्हता. पण, जेव्हा माहित झाला तेव्हा लक्षात आलं की अरे आपण तर यातून गेलोय.

त्या दिवसात अक्षरश: असं वाटायचं की, हे बाळ कुठं तरी सोडून यावं किंवा मारून टाकावं. आपण इतका क्रूर विचार करू शकतो. याबद्दल स्वतःचाच राग, द्वेष, तिरस्कार सुद्धा वाटायचा. ही जबाबदारी आपल्याला झेपावणारी नाही. कारण, या जबाबदारीचा सगळा भार पूर्णतः आपल्यालाच पेलावा लागतोय. यामुळं प्रचंड राग, संताप आणि चिडचिड व्हायची.

पण, हळूहळू बाळाशी तुटलेली नाळ जुळत गेली. त्याला सांभाळण्यात, त्याची काळजी घेण्यात, आनंद वाटू लागला. त्याच्याशी बोलताना, हसताना, त्याला भरवताना, खेळवताना, अंघोळ घालताना, कळत गेलं की हे ओझं नाही हा एक आनंदाचा खजिना आहे. कधीतरी मनात चमकून गेलेले दुष्ट विचार मनावर हावी झाले नाहीत, याबद्दल नियतीचे मानावे तितके आभार कमीच.

पण, या काळात हे असं होऊ शकतं. अगदी सर्वांनाच होईल असं नाही. काही लोकांच्यातील ही लक्षणं आपसूक कमी होत जातात. पण, काही लोकांना तज्ज्ञांच्या सल्ल्याची, कुटुंबियांच्या आधाराची, सोबतीची गरज भासू शकते.

माझ्याबाबतीत सुदैवाने निसर्गत:च ती नाजूक अवस्था पार पडली. पण हे प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असं नाही.

अगदी मुलाचं तोंडही बघण्याची इच्छा नसणाऱ्या आया मी बघितल्या आहेत. बरेचदा मुली जन्माला आल्यानंतर आयांची (अगदी आजच्या काळातील शिक्षित आयांचीसुद्धा) अशी मानसिकता असते. याच मानसिकतेतून मुलाला टाकून देणं किंवा सोडून देणं, आत्महत्या करणं अशा घटना घडतात. ज्याचं नेमकं कारण इतर लोकांना कळत नाही.

घरातील इतर व्यक्तींवर चीडचीड करणं, छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रचंड राग येणं, रडायला येणं, इथपासून ते आत्महत्येपर्यंतचे टोकाच्या भावना आणि विचार मनात येतात. अशावेळी व्यक्तीला आपल्या माणसांची सोबत गरजेची असते.

दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेला मला असले काहीही अनुभव आले नाहीत. म्हणजे पहिल्या डिलिव्हरीच्या वेळी तुम्हाला पोस्टपार्टम झाला असेल तर पुढच्या डिलिव्हरीच्या वेळी होईलच असंही नाही. पण, याकाळात आई आणि बाळाच्या शारीरिक आरोग्यासोबतच त्यांच्या मानसिक आरोग्यातील चढ उतार, स्वभावातील बदल यांची आवर्जून दखल घ्यायला हवी.

 

पण, मला वाटतं हे आपण खूप पुढचं स्वप्न बघतोय. जिथे अजूनही गरोदरपणात औषधपाणी घेणं, डिलिव्हरीसाठी  सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध होणं याच गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत तिथे मानसिक आरोग्याची चिंता कोण करणार?

तसंही मानसिक आरोग्य म्हणजे नसलेल्या प्रश्नांना खतपाणी घालणं असा समज असेल तर हे पटवून देणं कठीणच आहे.

तरीही नवीन जोडप्यांनी तरी मुलाच्या बाबतीत विचार करताना याही शक्यता गृहीत धरायला हव्यात. बाळाच्या जन्मानंतर तुमच्या जोडीदाराच्या स्वभावात, वागण्यात अचानक बदल झाला असेल आणि तो बदल काही महिने सातत्याने तुम्हाला जाणवत असेल तर त्याबद्दल जोडीदाराशी, कुटुंबियांशी बोला. गरज असेल तिथे डॉक्टर, समुपदेशकांची मदत घ्या. आपल्या माणसाला समजून घ्या. इतकंच.

meghashreeS

motherhood, postpartum depressions , baby, delivery, birth, 

 

 

Post a Comment

2 Comments

Anonymous said…
चांगली माहिती
Anonymous said…
लिहित राहा.