Just read - must readआठवणीत चिंब करणारा पावसाआधीचा पाऊस,

पावसाआधीचा पाऊस - शांता शेळके 




नेमेचि येतो पावसाळा, हा सृष्टीचा नियमच. या पावसासोबत काही आठवणीही येतात. बालपणीचा पाऊस कसा सुखद असतो, हल्ली मात्र पाऊस म्हणजे अनंत कटकटींचे पाल्हाळ.

एक घटना घडावी आणि त्या मागून मनात आठवणींचे तरंग उठावेत, हे ही काही नवीन नाही. शांताबाईंनी अशाच एका घटनेतून जन्मलेल्या आणि त्याच्याशी समरूप असणाऱ्या असंख्य आठवणी यातील ललित लेखांत शब्दबद्ध केल्या आहेत. 

त्यांची चिंतनशील वृत्ती, कविमनाची संवेदनशीलता, सहानुभूती या लेखातून प्रकट होतेच पण, एखाद्या घटनेनंतर मनाचा प्रवास कसा होत जातो तेही इथं दिसतं. त्यात हा प्रवास तर कवी मनाचा. यात घटना आणि आठवणींचा बंध उलगडताना त्यातील अनेक छुप्या कंगोऱ्यांचे सखोल दर्शन घडते. 

सोपी, रसाळ आणि मनाचा ठाव घेणारी भाषा. त्यामुळे वाचनाची सहज तंद्री लागते. वाचताना अनेकदा वाटतं, आपणही हे अनुभवलंय, पाहिलंय किंवा अनुभवत आहोत. खरं तर प्रत्येक लिखाणात आपल्या भावभानांशी साधर्म्य असलेलं काही ना काही सापडतंच. तसं ते इथंही जाणवतं. 

आजुबाजुला घडणाऱ्या घटनांचे सखोल निरीक्षण, जीवनाबद्दलचे कुतूहल, गुढ, अज्ञात गोष्टींची ओढ, हुरहूर, घडलेल्या घटनांचा मनात उमटलेला संवेदनशील प्रतिसाद, यातून ही लेखमाला लिहिली गेली आहे. 

निसर्ग, निसर्गाची बदलती रूपे, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम तसेच, बदलत्या मानवी जीवनाचा निसर्गावर होणारा परिणाम, यांची एकमेकांविषयीची प्रतिक्रिया, त्यातील अपरिहार्यता यांचा घेतलेला वेध खूप सजग करून जातो.

मानवी स्वभावाचे विविध कंगोरे, त्यातून निर्माण होणारे दुःख, आनंद, यांची सरमिसळ जीवनाला समृद्ध बनवते. कलाकार, त्याचे कलेबद्दलचे प्रेम, उत्कटता अचंबित करून टाकते. 

काळाची विस्मयकारक गणितं आणि त्यातून येणाऱ्या अलौकिक अनुभवांचं विलक्षण वर्णनही यात आहे. 

जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊन वावरताना आपल्या हातून निसटून जातात अशा कित्येक क्षणांची पुनर्भेट हे पुस्तक वाचताना होते. 

ज्यांना जीवनाशी समरूप होण्याची संधी दवडतेय अशी हुरहूर आहे, त्यांना पुन्हा एकदा निसटलेले क्षण उत्कटतेनं अनुभवण्याची इच्छा असल्यास हे पुस्तक वाचायला हवं.


©मेघश्री✍️

Post a Comment

0 Comments