पुण्य एनकॅश करण्याच्या या काळात पाप मात्र फोफावत चाललंय…!

तो कळकट चेहरा. मळके कपडे. काडीसारखे हातपाय. भिरभिरणारे डोळे. हताश, आगतिक, हतबल तरीही आशा लावून बसलेले. 


आपल्या या दयनीय परिस्थितीची कुणी तरी दखल घेईल. आपल्याकडे कुणाचं तरी लक्ष जाईल. आपण पकडूच कुणाला तरी ज्याच्या मनात कणव असेल. आपल्याकडे पाहून ज्याचं काळीज हलेल. ज्याला दान करून पुण्य पदरात पाडून घ्यायची हौस असेल. 


पाप धुवून पुण्य एनकॅश करण्यासाठी जमलेल्या या गर्दीत त्याच्या गळाला लागतील असे चिक्कार मासे होतेच आजुबाजुला. तरीही आपली शिकार होऊ न देता, त्याला शिकार शोधायची होती सावधपणे. 


हां सापडली. 


"काकु खायला द्या ना."


एवढंस लेकरू. खायलाच तर मागतंय. चला देऊन टाकू म्हणून तिनेही विचारलं,

"काय खाणार?"


"चिकन राईस."


दोघे समोरच्या चायनीज टपरीवर गेले. सगळी खाऊ गल्ली ओसंडून वाहत होती गर्दीने. तो टपरीवाला त्यांना पाहून गालातल्या गालात हसला. तिने हाफ चिकन राईसची ऑर्डर दिली. 


टपरीवाल्याच्या चेहऱ्यावरील भाव बघून तिने हेरलं काही तरी घोळ आहे. 


एका भुकेल्या जीवाचा आत्मा शांत करावा इतकं साधंसुधं प्रकरण नाही वाटत हे. 


टपरीवाला गोंधळलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होता, जणू त्याला न बोलता बरंच काही सांगायचं होतं. 


तिने त्या मुलाकडे एकदा पाहिलं. 

"नक्की खाशील ना रे चिकन राईस? संपेल ना तुला?"


त्याने स्टुल ओढला आणि त्यावर बसत म्हणाला, "खातो."


तिने टपरीवाल्याकडे पाहिलं.

 तो म्हणाला, "आताच दोन प्लेट पार्सल नेलंय त्याने खाणार नाही तो."


तिने त्या मुलाकडे पाहिलं. खात्री करून घेण्यासाठी पुन्हा विचारलं, "नक्की खाशील ना?"


त्याने आगतिकतेने उत्तर दिलं, "खाईन की द्या तर आधी."

शेवटी त्याच्या समोर हाफ प्लेट चिकन राईस ठेवण्यात आली. त्याचे डोळे चमकले पण क्षणभरच. एका क्षणात ती चमक कुठच्या कुठे पळून गेली आणि त्या डोळ्यात असंख्य प्रश्नांचं एक विवर तयार झालं.


खाऊ की नको? खाऊ तर वाटतंय पण… पण जात नाही. भुक आहे, खायचं आहे, पण…पण… हे खाणं आपल्यासाठी नाही. आपलं पोट आपल्यासाठी नाही? आपलं शरीर आपल्यासाठी नाही. आपल्या डोळ्यातली आगतिकता आपल्यासाठी नाही. आपली भुक सुद्धा आपली नाही.


भुक आहे, पोट आहे पण त्यावर सुद्धा आपला हक्क नाही. आपण फक्त भिकारी.


एकीकडे मॉल मध्ये ब्रॅंडेड वस्तू असतात, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी. 


तसेच आपम रस्ता म्हणजे आपला मॉल. लोकांच्या भावनेला हात घालणारे आपण ब्रॅंडेड भाकारी.


हा सगळा विचार कदाचित त्यालाही कळत नव्हता. आपण का विचार करतोय हेही कळत नसावं त्याला. जसं पोट आहे म्हणून भुक लागते तसंच डोकं आहे म्हणून विचार येतात.


त्या खोल विवरांनी तिचं मन मात्र गदगदुन गेलं.


भुक लागलीये तर पटापटा खात का नाही? अन्ना बद्दल तीव्र वासना का नाही दिसत याच्यात. याचे डोळे इतके भेदरलेले का? अन्न पाहिल्याचा आनंद का नाही दिसत त्यात? नक्की याला खायचं आहे? खायचं नव्हतं तर याने मागितलंच का? आणि मागितलंच तर ते आपल्याकडेच का?


याची भुक याला अस्वस्थ करत नाही मग, याच्या आगतिकतेनं मी का अस्वस्थ होतेय?


दोन दिशेनी असंख्य प्रश्नं आणि असंख्य विचार.


यातच तो टपरीवाला आलटून पालटून दोघांना पाहतोय. कारण त्याला या खेळातला अर्धा भाग माहित होता. बाकी किती तरी प्रश्नांची उत्तरं त्यालाही माहीत नव्हती. जसं की, ही बाई कोण? हा मुलगा कोण? हा रोज कुणाला तरी आपल्या केविलवाण्या नजरेनं फसवतो. कधी पैसे काढतो, कधी खायला पाहिजे म्हणून राईस, चिकन, पार्सल नेतो पण खाताना तर कधीच दिसत नाही. कुणाला तरी नेऊन देतो सगळं. पण कुणाला? इतकं सगळं मागून आणि घेऊनही हा मात्र उपाशीच. वाळलेल्या आतड्याचा भकासपणा डोळ्यात साठवून.


ही कोण कुठली, त्याला खायचा आग्रह करते. हिला पुळका यायचं कारण? काही कारण असलं तरी पैसे मिळतील ना आपले आपले? दोघंही दंगा घालून पळून गेले तर?


"अरे किती कालवशील? खा की ते खायला घेतलंयस ना?" ती त्या मुलाला दटावते. 


तो शुन्य नजरेने तिच्याकडे पाहतो. तो हक्क, तो वैताग, तो अधिकार नको असतो त्याला. शेवटी तीही भीकच.

भीक कधी दारिद्र्य संपवू शकत नाही. 


ना प्रेमाचं. ना पैशाचं.


पोरगा त्या बाईसोबत खात बसलाय. ती त्याला प्रश्न विचारतेय आणि तो चक्क तिच्याशी बोलत खातोय. त्याला आणलं पाहिजे. निदान त्याच्या पुढ्यातलं खायचं तरी आणलं पाहिजे. तो नाही खाऊ शकत ते. माहित नाही का त्याला.


मुलगा राईस मधून उगीचंच चमचा फिरवतोय. भुक आहे पण त्याची नाही. अन्न आहे पण त्याच्यासाठी नाही. सगळं काही उपरं. नकली.


"चल, चल तिकडे बसून खा चल. ते बारकं पोरगं पण रडतंय तिकडं." एक कळकट चेहऱ्याची मळकट साडी नेसलेली बाई त्या पोराला हटकत बोलली. तसं त्या पोराला हायसं वाटलं. 


"अहो, भुक लागलीये त्याला तर खाऊ द्या की."


"अगं बाई, ते बारकं पोरगं रडतंय जरा त्याच्यासाठी पण घेऊ दे."


"तो पण बारकाच आहे की, त्याला खायचंय. खाऊदे."


"ए बाई, तुझं खाणं ठेव तिकडं. नको आम्हाला आमचं पोरगं सोड." कळकट चेहऱ्याची बाई आता संतापली.


तसं पहिल्या बाईनं त्या पोराचा हात धरला आणि म्हणाली, "मी पैसे दिलेत त्याच्या खाण्याचे, त्यानं खाल्ल्याशिवाय मी सोडणार नाही."


आता तो टपरीवाला पण मध्ये पडला, "पोरगं खातंय तर खाऊद्या की."


आजुबाजुला मळकट कपड्यातल्या आणखी दोन-तीन बायका जमल्या. तसे आजुबाजुचे दोन तीन स्टॉलवालेही जमले. 


पोराच्या आधीच शुष्क पडलेल्या डोळ्यात भीतीचा मिट्ट काळोख दाटून आला. 

भुकेल्या पोटात अजून मोठा खड्डा पडला.


फार ओढून उपयोग नाही हे लक्षात आल्यावर तिनं पोराला त्या मळकट जमावात सोडलं. शेवटी त्यांचंच होतं. चायनीज वाल्याचं बिल भागवलं. 


पोरगा त्याच्या जगात परतला… एक नवी भीती घेऊन. 


ती आपल्या वाटेला लागली नवे प्रश्न घेऊन.


भुक नव्हती तर त्याला खायला का हवं होतं? भुक होती तर त्यानं खाल्लं का नाही? त्याची भुक, त्याचं शरीर, त्याची आगतिकता, त्याची सुकलेली आतडी, त्याचे खोल, शुष्क डोळे, त्याचे काडीसारखे हातपाय, कळकट चेहरा, मळकट कपडे या सगळ्यात तो कुठेच नव्हता.


मग 'तो' कुठे होता…त्याचं अस्तित्व शुन्य होण्याआधी? कुणी संपवलं त्याला? निरागस बालपण काढून घेऊन भावनांचे खेळ करण्याचे धडे कुणी दिले त्याला? त्याचं शरीर, त्याची भुक, त्याच्या भावना सगळ्यांपासून कुणी विस्थापित केलं त्याला?

कुणाकडे मिळतील याची उत्तरं?


देवीच्या दर्शनासाठी चारी बाजूंनी किलोमीटरभर लांब रांगा लागलेत. पुण्य एनकॅश करण्याच्या या काळात पाप मात्र फोफावत चाललंय… 


दिसतंय का अंबे तुला तरी? 





Post a Comment

1 Comments

Anonymous said…
Bhari lihilie ahe. 👌👌🙌🙌