कोरा कागज भाग-६

सरला काकू घराजवळ कधी पोहोचल्या हे त्यांचं त्यांना पण कळलं नाही. विचारांच्या तंद्रीत त्या चालतच राहिल्या. रस्ता कधी मागं गेला याचा त्यांना पत्ताही लागला नाही. घराजवळ येताच त्यांना दुरूनच काहीतरी बिघडल्याची जाणीव झाली. जाताना होतं तसं आत्ता का दिसत नाही? हा एक नवा विचार आता त्या घोळवू लागल्या. या विचाराचा धागा पकडून त्या जसजशा घराजवळ येत गेल्या तसतसं त्यांना कळालं की बहुतेक सुदीपनी काही तरी पराक्रम केला असेल किंवा सुषमाने काही तरी आगाऊपणा केला असेल त्याशिवाय इतकं पाणी रस्त्यावर येणार नाही आणि बारीक काळीराख पण उडाली होती सगळीकडे म्हणजे नक्कीच काही तरी मोठा तमाशा करून ठेवला असेल या बाईनं. एका मागून एक येणाऱ्या या असंबंध विचारांनी त्यांचे मन अस्वस्थ होत होते. दारात आल्यावर तर घरात पसरलेली शांतता त्यांना आणखीनच त्रस्त करून गेली. त्या घरात आल्या तर सुषमा आणि सुदीप खाली मान घालून बसले होते. त्यांनी दळपाचा डबा ठेवला आणि इकडे तिकडे बघू लागल्या. सुषमाने भाजीची तयारी तर सगळी करून ठेवली होती. संध्याकाळचे सात वाजायला आहे होते. त्यांना पुढच्या स्वयंपाकाला लागायचं होतं. बाहेर ठेवलेल्या बदलीकडे त...