कोरा कागज भाग-३

 


“तू ऐकलं असशील कदी तर तो ऐकल. नाही तर त्याचं काय नडलंय ऐकायला? कधी कधी म्हणून माया-लेकरांना माझी किंमत केली नाही. कायम मला आपलं वाळीत टाकल्यावाणी वागवत्यात.” बोलता बोलता त्यांचा आवाज कापरा झाला आणि डोळं पाण्यानं डबडबलं.

सुषमा पुरतीच गोंधळून गेली. आत्ता तरी आपणहून भाकरीला बसली होती. ही भाकरीला बसली म्हणून मी कपडे-भांडी आवरलं. मग आता अचानकच हिला काय झालं? सुदीप भांबावल्या नजरेनं एकदा आईकडं आणि एकदा आज्जीकडं बघू लागला. गांगरून उभारलेला सुदीप, अस्वस्थ झाला होता, हात पाठीमागे बांधून, भिंतीला पाठ टेकवून तो आपल्या एकच पाय हळूहळू वर आणि हळूहळू खाली आणत तसाच उभा होता.

सरला काकूचा आवाज काही शांत होण्याचं नाव घेत नव्हता. त्यात आवाज इतका  मोठा की गल्लीला ऐकू जाईल. सुदीप पण चक्रावला. अचानक आज्जीला काय झालं? तो आपल्या शांत आवाजात म्हणाला, “आगं, टीव्ही सुरु होता. मला तुझा आवाज आला नाही. मी कार्टून बघत  होतो, ते सोडून मला येऊ वाटलं नाही. लगेच रडायला काय झालं तुला?”

तो एवढंच बोलला, आणि सरला काकूंचं मस्तक आणखीच फिरलं. “व्हय, व्हय, लगेच वड लगली बघ तुला आईची. कसा बाजू घेतो आईची. एवढं मोठं झालं माझं पोरगं कवा माझ्या तोंडाला तोंड दिलं न्हाई. आणि ह्ये काल-परवाचं प्वॉर नुस्ता शब्दाला शब्द वाढवतं.”

झालं त्यांनी राईचा पर्वत करण्यास सुरुवात केली. सकाळ पासून सगळं काही व्यवस्थित पार पडलेलं असताना नेमकं आत्ताच सासूनं किरकोळ कारणावरून इतका त्रागा करून घेण्याची गरज काय हे सुषमाला ही कळत नव्हतं.

पण, सरला काकूंचा स्वभावच तसा बनला होता. आधी आधी त्या सुषमाला धाकात ठेवण्यासाठी म्हणून मुद्दाम आवाज वाढवत पण, हे मुद्दाम सुरु केलेलं नाटक आपसूकच त्यांच्या स्वभावाचा भाग बनत चाललं होतं. कधी कधी तर त्यांचं त्यांनाही कळत नसे की आपण का चीडलोय. पण हा चीडचिडेपणा त्यांच्या स्वभावात लोणच्या सारखा मुरात होता. त्यांची स्वतःची मनशांती आणि घराची शांतीही खराब करून टाकत होता.

सुषमाने सुदीपला एक फटका लगावला. झालं त्यानं भोकाड पसरलं आणि तीही त्याला बडबडू लागली. एकदा हाक मारली तर ऐकायला येतच नाय काय तुला? कळत नाही? असं म्हणत तीन आणखी चार-दोन थोबाडी लागावाल्याच.

दोघींच्याही शब्दानं शब्द वाढत गेला. शेवटी बराच वेळाने घरात अशी काही शांतता पसरली की वाटावं घराला मरणकळाच आलीये.

या सगळ्या गोंधळात तीन वाजले. काल नीट करून ठेवलेले गहू दळून आणायचे आहेत. हे सरला काकुंच्या लक्षात आलं आणि त्यांनी दळपाचा डबा घेतला नि दळायला निघाल्या. सुषमा आपल्या बेडवर आडवी पडली होती. त्यांनी तिला आवाज दिला आणि सांगितलं, “मी दळून आणुस्तोवर भाजी खुडून ठेव.” सुषमानं नुस्तंच हम्म केलं. सकाळच्या सगळ्या वातावरणानं तिचा गेलेला मूड अजूनही ठिकाणावर आलेला नव्हता.

हम्म करायला काय मुकी झालीस का काय? सकाळी तर चांगली म्हशिवणी वरडत हुतीस आणि आता काय झालं? सरला काकू जाता जाता फणकार्यान बोलून गेल्या.

सुषमा उठली. तिने स्वतःसाठी चहा ठेवला. तो घेतला आणि ती भाजीची तयारी करू लागली. भाजी खुडता खुडता तिचा एकच विचार सुरु होता. आता नवरा घरात आल्यावर ही सासू सगळं रामायण त्याला सांगणार आणि परत तो पुढचं महाभारत घडवणार. तिला आता एका क्षणी भीतीही वाटत होती आणि दुसऱ्या क्षणी ती स्वतःलाच दिलासाही देत होती. काय नाही होत, आपण उगीच या लोकांना विनाकारण घाबरून घाबरून नसतं डोक्यावर घेऊन ठेवलंय. कधी हे कधी ते, तीचंच मन तिला घाबरवत होतं आणि तिचंच मन तिला दिलासाही देत होतं.

विचार करता करता ती भूतकाळात गेली आणि आठवला तिला सुधीरचा पहिला मार. तिची काहीच चूक नसताना निव्वळ आईच्या सांगण्यावरून त्यानं कशी तिला बेल्टनी मारली होती. घरी कधी साधी थापडीही न खालेल्या सुषमाला स्वतःचच आश्चर्य वाटत होतं. कसं सहन केलं आपण, आपण कधी इतक्या सहनशील झालो? कधी आपण सगळं असं पोटात घालून घ्यायला शिकलो. ती अशीच विचाराच्या तंद्रीत हरवलेली असताना अचानक तिला काही तरी जळल्याचा वास आला.

बाहेरून घरात भकाभक धूर येत होता. बाहेर येऊन बघते तर काय? वलनीवर सुकत घातलेले सगळे कपडे पेटले होते. ज्यात सुधीरचे दोन शर्ट आणि दोन पँट होते. तिचे कपडे, सासूचे कपडे सगळे एकामागून एक धुमसत चालले होते. त्या ज्वालांच्या अस्पष्ट धगीच्या आड सुदीप हातात दिवाळीला आणलेली सुरसुरी घेऊन उभा होता. नि भीतीनं घाबरून ओरडत होता. मम्मे मी काय नाय केलं. म्म्मे मी काय नाय केलं. सुदीप त्या दोरीच्या पलिकडं आणि सुषमा अलीकडं. दोघांच्या मध्ये ती दोरी आणि त्यावरच्या कपड्यांनी पेट घेतलेला. कधी एकदा पोराला जवळ घेतोय असं तिला झालेलं.

#क्रमश: 

Post a Comment

0 Comments