आगामी कथेतून ....
'गेले कित्येक दिवस अस्वस्थ वाटतंय! कुणाशी बोलू नये! कुणाकडे जाऊ नये! अगदी आजूबाजूला ही कुणी असू नये! आवाजही....! अशा निरव शांततेत स्वतःच बसवावं समोर स्वतःला आणि विचारावा जाब. काय बिघडलंय बाई नेमकं तुझं? पण मिळालाच एकांत तरी तसं काही स्वतःशीच बोलण्याचं धाडस होत नाही आणि समजा बोललेच तर आपण स्वतःशी तरी खरं बोलू की नाही याचीही खात्री वाटत नाही. समजा आपण अगदी खरं खरं बोललो स्वतःशी तर ते आपण पचवू शकू का? आणि नाहीच पचवता आलं तर काय होईल? हेही माहित नाही. अशी एक प्रचंड अज्ञानाची पोकळी वागवायचा कंटाळाही आलाय पण त्यापेक्षा ती पोकळी भरून काढण्याचा कंटाळा जास्त आहे. हे असं पोकळपण नकोसंही वाटतंय! मात्र ते झुगारून द्यावं, झटकून टाकावं असंही वाटत नाही. म्हणजे वाटतं आणि वाटत नाही या दोहोंच्या मधली संभ्रमावस्था कायम आहे. अशा अवस्थेत प्रत्येक जण असतोच. कितीही विद्वान, विचारवंत असला तरी. तर करायचं काय या पोकळपणाचं? कि काहीच न करता ठेऊन द्यावा तसाच! दुर्लक्ष केल्याने तो भरून निघणार का? कि आणखीन वाढतावाढता वाढे अशी अवस्था होईल? ह्म्म.....' (एक दीर्घ उसासा) ...