आगामी कथेतून ....


'गेले कित्येक दिवस अस्वस्थ वाटतंय! कुणाशी बोलू नये! कुणाकडे जाऊ नये! अगदी आजूबाजूला ही कुणी असू नये! आवाजही....! अशा निरव शांततेत स्वतःच बसवावं समोर स्वतःला आणि विचारावा जाब. काय बिघडलंय बाई नेमकं तुझं? पण मिळालाच एकांत तरी तसं काही स्वतःशीच बोलण्याचं धाडस होत नाही आणि समजा बोललेच तर आपण स्वतःशी तरी खरं बोलू की नाही याचीही खात्री वाटत नाही. समजा आपण अगदी खरं खरं बोललो स्वतःशी तर ते आपण पचवू शकू का? आणि नाहीच पचवता आलं तर काय होईल?  हेही माहित नाही. अशी एक प्रचंड अज्ञानाची पोकळी वागवायचा कंटाळाही आलाय पण त्यापेक्षा ती पोकळी भरून काढण्याचा कंटाळा जास्त आहे. हे असं पोकळपण नकोसंही वाटतंय! मात्र ते झुगारून द्यावं, झटकून टाकावं असंही वाटत नाही. म्हणजे वाटतं आणि वाटत नाही या दोहोंच्या मधली संभ्रमावस्था कायम आहे. अशा अवस्थेत प्रत्येक जण असतोच. कितीही विद्वान, विचारवंत असला तरी. तर करायचं काय या पोकळपणाचं? कि काहीच न करता ठेऊन द्यावा तसाच! दुर्लक्ष केल्याने तो भरून निघणार का? कि आणखीन वाढतावाढता वाढे अशी अवस्था होईल? ह्म्म.....' (एक दीर्घ उसासा)
                                                        *
"काय ही बाई... वैताग आहे नुसता! अगं दार उघड दार! किती वेळ झालं धडकून धडकून हात दुखायला लागले. ऐकू येतंय का तुला?"
"छे! झोप लागली की काय हिला? किती वेळ झालं काय झालं असेल? का उघडत नाहीये ही दरवाजा? पंधरा मिनिटं ठोकतोय आपण! हिचा काहीही प्रतिसाद नाही! बर दार तर आतूनच बंद आहे. मग कुठे गेली असेल? काही.... काही....."
छे...! नको, नको इतका अभद्र विचार नको करायला. "अगं दार उघड म्हणतोय मी दार! आहेस का आत? ऐकतेस ना?"
                                                     *
'तेच न कधी तरी पुन्हा वेळ मिळेल, पुन्हा वेळ मिळेल, असं करत करत तर आपणच वाढवली हि पोकळी!'
'संध्याकाळचे सात वाजले तरी या माणसाचा पत्ता नाही कुठे गेला असेल! साधा फोनही करता येऊ नये म्हणजे काय? अवघडय ना?'
"हॅलो, अहो किती वेळ झालं वाट पाहतेय मी. कुठे आहात कुठे तुम्ही?"
"अगं, माझ्या आई मी गेले अर्धा तास झालं... दार ठोठावतोय तुझा एक अक्षराने प्रतिसाद नाही. शेजार पाजारच्या लोकांना पण आत्ता संशय यायला लागलाय. कुठे आहेस तू?"
"अगं बाई! घरातच आहे की मी, आले आले उघडते दरवाजा."
ती गडबडीने दरवाजा उघडते तर खरोखरच तो दारात उभा असतो. आता मात्र तिला खजील झाल्यासारखं वाटतं.
"काय, करत काय होतीस, इतका वेळ?"
"काही नाही.........! काही नाही.....! (अडखळतच) डोळा लागला जरा." आतून पूर्ण भेदरलेली.
"तुझा इथे डोळा लागला आणि तिथे बाहेर उभा राहून माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. कमाल आहेस हां पण!माझी येण्याची वेळ झाली तरी तुझा कसा काय डोळा लागला?"
आत्ता झाली का पंचाईत!
एक दीर्घ श्वास घेऊन.
 "कसा म्हणजे लागला आत्ता त्यात काय एव्हढं! कसा काय म्हणजे लागायचा तसाच लागणार नं डोळा! काही तरी आपल तुमचं". उगाच खोट्या खोट्या नाराजीचा आव आणत. 
"बरं चहा ठेव." राहूदे आत्ता सगळ पुराण.
ती चहा ठेवायला आत जाते.
गॅस सुरु केला. पातेल्यात पाणी साखर, चायपत्ती टाकली.
'कसा काय बरं आपल्याला दार ठोठावल्याचा आवाज आला नाही? इतका वेळ! .................... खरच का हा इतका वेळ बाहेरून दार ठोठावात होता आणि आपण...? जागीच होते... की चक्क! विचारही करत होते...'
इतक्यात तिला कसली तरी जाणीव झाली आणि ती जोरात किंचाळली. तिला अक्षरशः कापरे भरले. इतकी भांबावली कि ओठातून शब्दही फुटेना आणि धड स्थिर उभंही राहता येईना....
***
"काय होतंय काय! नवरा आहे मी तुझा. लगेच लागली किंचाळयला! नवरा आहे मी तुझा!! इतका पण अधिकार नाही मला? साधी एक मिठी, एक मिठी देऊ शकत नाहीस?" दोन्ही हातांनी तिचे दंड जोरात हलवत तो विचारात होता.
तो बडबडतच होता आणि ही आत्ता भानावर आली. आत्ता कुठे तीची थरथर थांबली.
चहा उकळून उकळून करपून गेला.
'आत्ता काय करायचं? याचा तर आधीच पारा चढलाय, आत्ता अजून चहा नाही म्हंटल तर अजून चिडेल. दुसरा ठेऊया.'
'कसली बायको आहे ही, जवळ गेलं तरी किंचाळते, काय खाणार होतो कि मारणार होतो, मी हिला! फक्त जवळ तर घ्यायचं होतं मिठीत! एक तर बाहेर ताटकळत उभा रहून वैतागलेलो आणि त्यात नसत्या शंकांनी काहूर माजलेलं डोक्यात. पण हिच्यावर तर कसलाच परिणाम नाही. निवांत झोपले, चक्क अर्धा तास? आणि जवळ जावं तर नुसताच दंगा. कमाल आहे नाही! प्रेम करावं तरी कसं माणसानं?' तो वैतागला. थोडावेळ तो ही हरवला आठवणीत.
"आज मला घट्ट मिठीत घेऊन झोपायचं हं! चक्क एक रात्र मी तुझ्याशिवाय काढलीये. अस मला एकटीला टाकून नको न जात जाऊ!"
"अगं, कुणी हौस म्हणून जातं का बाहेर काम होतं. आत्ता नाही जाणार, आणि अशी तुझी मिठी असल्यावर कशाला बाहेर जाऊ वाटेल! वेडा आहे का मी इतक्या सुंदर बायकोची हि रेशीम मिठी सोडून त्या हॉटेलातल्या मळकट गाद्यागीर्द्यांवर एकटाच लोळत पडायला." आणि मिठीला मिठी घट्ट आवळत राहिली. धुंदीत रात्र जागली आणि पहात शांत झोपून गेली. किती छान होते ते दिवस आणि आत्ता एक स्पर्शाचीही चोरी? तेही स्वतःच्याच बायको पासून. गोंधळालाय तोही आतून पूर्णपणे कसा सोडवावा गुंता... काही कळत नाहीये...
"झाला का चहा?"
"हो हो आले न. आलेच." चहा आणून तिने टीपॉयवर ठेवला.
त्याच्यात राग अजूनही धुमसत होता.
                                                        *
'कुठे हरवला न नात्यातला तो निरागसपणा! आपलं होतं तसच होत असेल का इतरांच? ती काळजी ती हुरहूर काहीच नाही राहिलं आत्ता. नाही किंचाळायला नकोच होते मी पण... पण? पण थोडा तरी विचार करायला नको का इतका बदल का बर घडला असेल? काय झालं असेल? कि इतका विचार करायला वेळच नाही कि इच्छाच नाही विचार करण्याची? तसंच असेल बहुतेक. नाही तर इतकं दुर्लक्ष कुणी केलं असतं का?'
                                                              *
"तो काय सांभाळणारे का तुला व्यवस्थित? असंच प्रेम प्रेम म्हणतात नी नंतर मन भरलं की फेकून देतात. तो काय पुरुष आहे! तू कुठे जाशील नंतर?"
"सगळेच तसे असतात असं कुठे असत का आई? इतका काही वाईट नाहीये तो."
"घ्या आत्ता ही शिकवणार आम्हाला माणसं ओळखायला? आम्ही काय असेच उगवलो नाही काय, खूप पावसाळे बघितलेत. काल-परवाची पोरगी तू आम्हाला अक्कल शिकवणार काय? आणि तुझ्याकडून मी शिकू काय?"
"तसं नाही हो आप्पा, पण...!"
"ही पोरगी काही आपलं भलं करील असं वाटत नाही. ही कुठं न कुठं असंच तोंड काळ करणार आणि आपल्याला बट्टा लाऊन ठेवणार, असलीला जगवण्या पेक्षा मारून का नाही टाकत?"
"नाही तर काय तू शेण खाशील आणि आम्हाला निस्तरत बसायला लागलं. तुमचं काय दोन दिवसाचं तरुणपण फिटल. मजा मारली की तू मोकळी तो मोकळा. पण आम्हाला? आम्हाला आयुष्यभर मान खाली घालून दिवस काढायला लागतील. तुझ्यापेक्षा लहान दोन पोरं आहेत अजून मागं, त्यांच्या आयुष्याचा काय विचार? तो कोण करणार?"
'हे सगळ ऐकून ओठाला, घशाला प्रचंड कोरड आणि पोटात कळ आलेली, वास्तव प्रश्नांना भिडण्याची काही अक्कल नव्हती! पण खरंच इतका वाईट होता का माझा निर्णय? शेवटी त्यांनी आपलंच खरं केलं आणि पुढे ते म्हणाले तसंच आकाशही पालटलाच की! तब्बल पाच-सहा महिने मी आईशी-अप्पांशी भांडून त्यांना कसंबसं तयार केलं. तेही तो जातीतला होता; एवढा एकच मुद्दा पटला त्यांना, बाकी काही नाही.
आणि ऐनवेळी तो बोलला... तो जे बोलला तेही नसतं बोलला तरी चाललं असतं ना! तो बोलला, "आपण तर फक्त मित्रच आहोत आणि तू काय हे लग्न वगैरे खूळ डोक्यात घेतलयस? अख्खंआयुष्य पडलंय माझ्यासमोर! आणि मी तुझ्याशी लग्न करेन का? मी कधी तरी तुझा तश्या अर्थानी विचार केला का? काहीही काय? We are just frinds."
"अरे पण आपण तर !"
"Come on! chill yaarrr! एखादा किस्स घेतला, मिठी मारली, म्हणजे काही लग्न केलं पाहिजे असं नाही ना. And I want a vergin girl!
'घनघन घाव घालून कुणी डोकं का फोडत नाही आपलं. कित्ती कित्ती मूर्खपणा केला आपण? खरच किती चांगला सोज्वळ समजत होतो आपण याला! आकाश... तू तर... तू तर....तू तर कुत्रा निघालास कुत्रा नुसता वासावर लाळ टपकणारा कुत्रा...'
नुसतच संततधार बरसण्या व्यतिरिक्त काही उरलं नव्हतं... आकाश तर कधीचाच उठून गेला होता...
'आत्ता अप्पाला काय सांगणार? आणि आई ती... ती तर.... माझ्या पेक्षा जास्त कोलमडेल, कारण... तिला वाटणारच आत्ता.... जे नको वाटायला तेच.... तेच गलीच्छ आरोप! कस तोंड द्यावं तिला? कुठे जावं आपण? कुणी घेईल का मला आपल्या पोटात गाडून कायमचं?'
***
 'आपणच चुकलो माणूस ओळखायला त्यात कुणाचा काय दोष? आपल्या कर्मासाठी दुसर्याला जबाबदार धरण्यात खरं तर अर्थच नाही. आत्ता आहे त्यापेक्षा अधिक मी आकाश बरोबर सुखी राहिलेच असते असं तर अजिबातच नाही. आपल्या सुख दुःखासाठी कुणालाही जबाबदार धरणं चुकीचंच! तसाही इथे तरी आपल्याला काय त्रास होतो नेमका? समजतंय का आपल्याला, सांगता येतंय का? नाहीच ना.'
"ऐकतेस काय? मला आज लवकर बाहेर पडायचय. जरा आवर पटकन. " त्याने आवाज दिला...
"हो"
"हो, पेक्षा काही जास्त कमी बोलता येत नाही का तुला? हल्ली तू मला टाळण्याचा प्रयत्न करतेस. तुला काय वाटतं कळत नाही का मला? एवढा मूर्ख नाही गं मी! "
एकही शब्द न बोलता तिने फक्त डोळे वर करून पाहिलं, पुन्हा मुक्यानेच आपल्या कामात गुंतली. आवरून त्याचा डबा दिला.
"नकोय डबा मला."
तितक्याच थंडपणे तिने तो पुन्हा ठेऊन दिला.
"किती निष्ठूर वागतेस अगं! नाही म्हंटला म्हणून, लगेच ठेऊन द्यायचा?"
तिने पुन्हा थंड नजरेनच प्रतिक्रिया दिली. तिचं मन जितकं आत बोलत होतं नं तितकेच तिचे ओठ मात्र थंड होते.
 तिची ही थंड प्रतिक्रिया त्याला काही सहन झाली नाही. तडातडा पाय आपटत नं काही खाता पिता तो तसाच निघून गेला.
आज तो फारच अस्वस्थ होता.
'गेले कित्येक दिवस आमच्यात काहीच बोलणं नाही. नुसती कसलं तरी टेन्शन घेऊन बसलेली असते. आपल्याच विश्वात इतकी मग्न असते कि हाक दिली तरी ऐकत नाही. मी कुणी नाहीच का हिचा? पूर्वी सारखं मनमोकळ हसणं नाही, बोलणं तर नाहीच नाही. का वागत असेल अशी? काय झालं असेल? आत्ता निवांत जेवून झोपली असेल.'
विचाराच्या तंद्रीतच तो, उमाच्या घरी पोहोचला. उमा त्याची लहानपणा पासूनची मैत्रीण. दोघांनाही चांगलच ओळखायची. जेंव्हा जेंव्हा त्याला अस्वस्थ वाटेल तेंव्हा तेंव्हा तो तिच्याजवळ मनमोकळं करायचा. पण आज उमाही घरी नव्हती. दाराला भलं मोठं कुलूप लटकवून ती कुठे गेली होती कुणास ठावूक! माग तो एका रेस्टोरांट मध्ये जाऊन बसला. जेवणाची ऑर्डर दिली.
'ऑफिसला जाऊन तरी काय उपयोग तिथे काही लक्ष लागायचं नाहीच. काही झालं तरी आपण कुणाजवळ तरी मनमोकळ करतो पण स्मिताला तशी एकही जागा नाही, दहा-अकरा वर्ष होत आली, आपल्या लग्नाला. तिचे आई-वडीलच नाही, तर तिचे मित्र-मैत्रीणही आपल्यामुळे दुरावले. पूर्णतः एका वेगळ्या जगाशी जुळवून घेताना तिला आधी कितीतरी अॅडजस्टमेंट करावी लागली. पण तिने कधीच तक्रार केली नाही. मग आत्ताच...?'
त्याला आठवलं, लहानपणीच मोठं कुटुंब, आई सगळ्यांच किती आनंदान करायची. मोठ कुटुंब हळू हळू छोट होत गेलं. एकेका काकाचं लग्न होईल तसं प्रत्येकाने स्वतंत्र संसार थाटले. मग आईवरची जबाबदारी हळू हळू कमी होत गेली. पप्पांच्या व्यासायातही मंदी आली. त्यामुळे ते घरात कमीच राहू लागले. आईला एकटेपणाने इतक घेरलं की हळूहळू तिला भास होऊ लागले. एकटीच बोलत रहायची तासनतास, सावल्यांशी. आईच्या भोवतालचा एकटेपणा वेळीच कमी करता आला असता, तर आई आज आपल्यात असती.' त्याचे डोळे पाण्याने भरले. वेटरने जेवणाच ताट आणून समोर ठेवलं.
तेवढ्यात एक चीळीशीतली व्यक्ती त्याच्या समोर येऊन बसली.
"माफ करा, तुम्ही एकटेच दिसताय, मीही तुमच्यासोबत या टेबलवर बसू शकतो का? नाही, दुसरीकडे जागाच उपलब्ध नाही ना, म्हणून." त्याने मानेनेच होकार कळवला.
"thanks. एकटेच आहात का घरी कोणी आई वडील?" त्या माणसाने उगाचच काही बोलायचं म्हणून विषय काढला.
"आई-वडील नाहीत. बायको आहे."
"छान आहे नं. माझं बघा ना रोजचे हाल बायको पोरं गावाकडे आणि मी हिथे नोकरीनिमित्त एकटाच. मागे भलं मोठं कुटुंब आहे, पण इथे एकटेपणा खायला उठतो हो. आपलं माणूस असलं की चार गोष्टी मनातल्या बोलता येतात. इथे कोण आहे आपलं म्हणून विचारपूस करणारं." समोरचा माणूस बोलतच होता.
'इथे असूनही कोणी विचारपूस करत नाही.' तो मनातल्या मनात बोलला.
अशाच इकड-तिकडच्या गप्पा करत तो स्वतःबद्दल बरच काही बोलत होता. मध्येच तो म्हणाला,
"भावाने गावाकडच्या जमिनीत वाटणी मागितली, काय आहे न ज्याचा-त्याचा भार ज्याच्या त्याच्याकडे सोपवलेला बारा असतो इतरांच्या जगण्यात ढवळाढवळ करण्यात काही अर्थ नाही. नाही तरी माझं बरंच चाललंय, बायकोही तिथे राहून काहीबाही छोटीमोठी कामं करत असते, दोन मुलांना सांभाळते, घराकडे जमिनीकडे लक्ष देते म्हणून मीही निर्धास्त राहू शकतो. तिलाही काही करून दाखवल्याच समाधान मिळतं. फार शिकलेली नाही पण धमक आहे तिच्यात, काही करून दाखवण्याची. तिच्या कष्टामुळेच आमचं घर उभं राहू शकलं. भावाला शिकवू शकलो... तिने साथ दिली म्हणून आज समाधानी आहे." 
अशाच इकडतिकडच्या गप्पा करत  दोघांच जेवण आटोपलं. आपापल बिल देऊन दोघेही आपापल्या रस्त्याने निघून गेले. पण त्या माणसाच्या तोंडून बायकोबद्दल फक्त कौतुकाचे आणि आदराचेच शब्द निघत होते. आपल्यापेक्षा कमी शिकलेला असूनही. तो अंतर्मुख झाला.
'आपणच आत्ता काही गोष्टी स्वीकारायला हव्यात... तिला काही बोलायचं असेलं पण बोलताही येत नसेल असंही असू शकतं ना! तिला थोडं अलिप्त राहायचंच आहे; तर थोडा वेळ द्यायला हवा, नाही का! शेवटी ज्याची-त्याची जगण्याची तर्हा निराळी. फार अपेक्षा लादून किंवा सतत तिला आपल्यातच गुंतवून ठेऊन तिच्या फुलण्याच्या कितीतरी संधी नाकारल्या आपण हेही स्वतःशी काबुल करायला हवं. तिच्या घरात तिला सिद्ध व्हायची संधी मिळत नव्हती म्हणून आणि केवळ आपण भरोसा दिला म्हणून ती स्वतःचं घर लाथाडून बाहेर पडली. खरं तर आत्ता सतत चिडचिड करण्याऐवजी  जमेल तितकं शांत राहायचं.'
                                                            ***
'पूर्वी तो तसा उपाशी गेला की कित्ती अपराधी वाटायचं! पण हल्ली नाही वाटत काही... हल्ली स्वतःबद्दलच काही विचार करायला नको वाटतो, तर याच्याबद्दल कशाला काय विचार करू? नाही तसा काही फार तिरस्कार आहे स्वतःबद्दल किंवा त्याच्या बद्दल असं नाही. पण आत्ता ना स्वतःत गुंतावं वाटतं, ना इतर कुणात गुंतावं वाटतं. आत्ता सगळे गुंते असेच सोडून फक्त मोकळं राहावं वाटतं, कसलीच झगझग नको. नाही तरी फार फार विचार केल्यानं आयुष्य आपल्या कह्यात राहतंय असंही नाही. मग का छळायचं स्वतःला इतकं?'
'पण त्याला हा अलिप्तपणा समजून घ्यायचाच नाहीये किंवा स्वतःच्या अपेक्षांचं, स्वतःच्या स्वप्नांचं ओझं माझ्यावर लादून त्याला मोकळं व्हायचंय! जे काही असेल ते, पण आत्ता त्याच्या स्वप्नांचं ओझं त्यानं स्वतःच वाहिलेलं बर हरेक गोष्टीला मला जबाबदार धरण्याऐवजी, स्वतःला जबाबदार धरून स्वतःच्या डोळ्यांनी पहावीत स्वप्न... नाही ते साथ वगैरे ठीक आहेच पण म्हणून कुणाचा जू कुणाच्या खांद्यावर लादून फायदे पिकवण्यात अर्थ नाही. चला! बरीच कामं राहून जातात असाच विचार करण्यात.'

'त्यादिवशी आकाशचे शब्द काळीज चिरत गेल्यासारखे भासले खरं! पण त्यानंतर काही जगणं थांबलं नाही. थांबणारही नाही कुणासाठी तरी आपण प्रत्येकाच्या बाबतीत सतत असुरक्षितता अनुभवतो, उगाच घाबरत जगतो, याच्यासाठी  त्याच्यासाठी...'
'लहान असताना नाही का आप्पा कुठे दिसले नाही तर किती घाबरा व्हायचा जीव? पण आज? आज अप्पांना पाहून अकरा वर्ष झाली, कित्ती आठवण काढतो आपण अप्पांची? शेवटी रमलो न संसारातच! त्यांनाही येत असेल आठवण. पण, तेदेखील रमले आपल्या समाजमान्य चौकटीत! शेवटी जगण्याची ज्याची त्याची तऱ्हा निराळीच. त्यादिवशी अशाच विचाराच्या धुंदीत म्हणा किंवा परावलंबीत्वाला कंटाळून म्हणा किंवा सुटायचं होतं जाचक साखळदंडातून म्हणून! आपण पडलोच नं एकटे बाहेर. '
'काय झालं मग मेलो तर नाहीच ना! खरं तर जग जितकं घरात बसून  वाईट दिसतं ना तितकं ते खरंच वाईट नाहीये! खरं तर आई-अप्पांच्या त्या सततच्या कुबड्या फेकून दिल्या आपण ते बरंच झालं. सुरवातीला झाला तसा त्रास, पण आपल्या पायावर चालता येण्याचा आनंद काही वेगळाच! आणि तोच तर मिळवला आपण! नंतर नंतर कळलं की हाही एक पिंजराच आहे, फरक फक्त इतकाच की ह्याचा परीघ थोडा मोठा आहे एवढंच.'
'आता याचाही कंटाळा आलाय इतकच. फक्त पिंजर्याची दारं जरी खिळखिळी झाली ना तरी.... तरी निदान बाहेरचं जग पाहता येईल. म्हणून आज पासून हळूहळू एकएक दार हलवत धडकत राहायचं... निदान काही दिवसांनी........ काही महिन्यांनी...... किंवा....... काही वर्षांनी का असेना हे सगळे दरवाजे खिळखिळे होतीलच... हो होतीलच... खात्री आहे मला.'
संध्याकाळ झाली. घरातील बराच पसार्याची तिने दिवसभरात विल्हेवाट लावली. अगदी कशातही जीव न अडकवता. बराच गुंता कमी कमी करत राहिली स्वतःला रिझवत....
मेणाचं एखाद आवरण मिळालं असतं स्वतः भोवती लपेटायला तर कित्ती कित्ती बरं झालं असतं नाही? असाही मजेशीर विचार चमकला डोक्यात....!!
आत्ता तिच्या चेहऱ्यावर थोडं समाधानाचं हसू पसरलं. फोनवर तिने आपलं आवडतं गाण लावलं, अगदी लहानपणापासून आवडायचं हे गाणं तिला..."एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.............तो राजहंस एक..."
यातलं बदकाच पिल्लू म्हणजे आपणच नाही का आपल्यालाही थोड स्वतःत डोकावण्याची संधी नक्की मिळेल तेंव्हा आपणही असू "राजहंस एक."
तो आला. पण आज दरवाजा उघडाच होता... तो सरळ आत आला. त्यानं न सांगता तिने चहा ठेवला. तो फ्रेश झाल्यावर त्याच्या पुढ्यातही नेऊन ठेवला. त्यानंही चहा घेतला आणि विचारलं....
"आज भाजी काय बनवूया?"
"काय?'' तिच्या उद्गारात आनंद आणि आश्चर्य दोन्ही होतं.
"आजपासून तुझं ओझं मीही वाटून घेईन म्हणतोय गं बाकी काही नाही."
आणि तो आत वळला. बाहेर शीतल चंद्रप्रभेने अवघा आसमंत व्यापून टाकला होता. जणू त्याच्या शीतलतेनं अख्या विश्वाची तप्त पोकळी सुखावून जात होती.
त्यानेही आत तेच गाणं लावलं होतं. "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.... तो राजहंस एक......"
त्यालाही स्वतःतला राजहंस शोधायचा असेल आजपासून.

© मेघश्री श्रेष्ठी-नाईक.

Post a Comment

9 Comments

Unknown said…
Khupch chan mam pudhil bhag kadhi
Meghashree said…
लवकरच... धन्यवाद 🙏
सुंदर ,...पुढील भागाची प्रतिक्षा आहे!
Bharat Yadav said…
उत्कंठापूर्ण सुरुवात वाटते एका कथेची...मस्तच.
Meghashree said…
This comment has been removed by the author.