आक्रंदन

हसतं खेळतं होतं एक छोटसं घर,
छोट्याशा घरात होतं,
एक इवलं इवलं पाखरू,
आई-बाबाच लाडक कोकरु,
रात्रीला बाबा खेळवायचा अंगणात
आणि
दाखवायचा आकाशातल्या,
स्वातंत्र्याच्या चांदण्या.
तो गायचा गाणं, मुक्तपणे…
मनमुराद स्वच्छंद जगणे…..
आणि अचानक….
अचानक
आकाश काळवंडुन गेल,
बाबाच्या काळजाला चिंतेन घेरलं.
आकाशातल्या चांदण्या आता आग ओकु लागल्या,
दिवसरात्र
रक्ताच्या नद्या वाहु लागल्या.
कोकरू भेदरल, आई हंबरली,
बाप सुरक्षेचा रस्ता शोधु लागला….
कधी धर्माधांनी चोपलं,
कधी सत्तांधानी.
बापाच्या काळजाला
सुरूंग लागला….
होतं नव्हतं सगळं विकुन,
बाप निघाला,
अख्ख बिर्हाड पाठीवर घेऊन,
शांतीचा आणि स्वातंत्र्याचा
देश शोधायला.
हातातली सारी कवडी
सोपवली त्यानं
स्वातंत्र्याच्या दलालाकडं
आणि बाप वाट पाहु लागला
प्रयाणाची स्वातंत्र्याच्या
आणि शांतीच्या देशात.
दलालान सोपवला एक तराफा
आणि इवल्या पाखराच्या हसर्या कुटुंबाला लोटलं,
अजस्त्र लाटांच्या
तुफान समुद्रात
बापाच्या काळजाला
पून्हा सुरूंग लागला.
पंखाखाली पाखरं घेऊन,
तारवटलेल्या डोळ्यांनी,
सुरू झाला प्रवास
शांतीच्या आणि स्वातंत्र्याच्या
देशाकडं.
उधाणलेल्या समुद्राने
गिळुन टाकला तराफा
आणि
इवल्या पाखरांच्या
निष्प्राण देहांनी
गाठला किनारा
स्वातंत्र्याच्या देशाचा.
कोवळ्या स्वप्नांचा तो
‘आयलान’
नावाचा ईवला देह,
आक्रंदुन विचारतोय,
सांगा
शांतीचा आणि स्वातंत्र्याचा देश
कुणी गायब केला,
जगाच्या नकाशातून?
धर्महीन सृष्टी टाहो फोडुन
सांगतेय
मी नाही, मी नाही…..!!!
………………………………..

©® मेघश्री.


Post a Comment

5 Comments