अक्षर मानव - संवाद सहवास ७ (मा. कुमार केतकर)


अक्षर मानव - संवाद सहवास ७ (मा. कुमार केतकर)

अक्षर मानवच्या प्रत्येक संवाद सहवासातून काही न काही अक्षर ज्ञान मिळतच. म्हणूनच या कार्यक्रमासाठी 

आपणही जावं, अशी अक्षरशः आग लागतेच. त्यात अगदी घरच्यासारखच संयोजन, तशीच माणसं, जीव 

लावणारी, म्हणून सोबत मुलांनाही घेतलं तरी काही वावगं किंवा गैरसोयीचं वाटत नाही.

या सगळ्या अक्षर मानवांना भेटण्याची अतीव ओढही असतेच.

आ. ह. साळुंखे  ते कुमार केतकर असे एकूण सात संवाद सहवास अक्षर मानवने आयोजित केले.

कुमार केतकरांसोबतचा सातवा संवाद सहवास नुकताच सातार्याला पार पडला.

केतकर सरांनी, ते पाकिस्तानात गेले असतानाच्या काही आठवणी सांगितल्या. त्यातला एक किस्सा ऐकून माझे 

डोळे अक्षरशः पाणावले. ते पाकिस्तानच्या दौर्यावर गेले असताना, तिथल्या असेम्बलीतील काही खासदार 

आमदारांना त्यांनी विचारलं की,

"इथल्या सामान्य माणसांच भारताबद्दल काय मत आहे?" तर ते त्याच्या कडे पाहताच राहिले आणि त्यांनी अस 

उत्तर दिलं की,

"काही नाही! त्यांचं काय मत असणार भारताबद्दल? त्यांना एवढा विचार करायला कुठे वेळ आहे? रोजच्या रोजी 

रोटीचाच त्यांच्या पुढे मोठा प्रश्न असताना ते भारताबद्दल कशाला विचार करतील?"

म्हणजेच तिकडचा सामान्य माणूसही आपल्यासारखाच रोजच्याच रहाट गाडग्यात पिसलेला आहे.

हे काही त्यांना खर वाटलं नाही म्हणून ते जरा फेरफटका मारायला शहरात गेले. तिथे एका  हिंदू बोर्डिंग च्या 

हॉल मध्ये एक लग्न होतं. तिथे हे बिनबुलाये मेहमान म्हणून गेले. दोन्ही कडच्या माणसांनी त्याचं चांगल स्वागत 

केलं. मग त्यांनी सांगितलं त्या लग्न वाल्यांना की ते भारतातून आलेले एक पत्रकार आहे. तर त्यांनी बॉलीवूड 

मधल्या सिनेतारकांबद्दलच डायरेक्ट प्रश्न विचारले. तिथल्या लोकांना इकडच्या बॉलीवूडची इथभूंत माहिती 

होती, कारण तिकडे पिक्चरवर असलेली बंदी! मग ते चोरून सीडी मागवून इकडचे सगळे पिक्चर पाहायचे. 

एक तर ज्येष्ठ महिला त्यांना म्हणाली की, "तुमच्या बॉलीवूड मुळे आमच्या पोरी बिघडताहेत."

ह्यांनी विचारलं, "कसं काय बुवा तिकडच्या मुळे इकडे बिघडण्याचा काय संबध?"

"त्या पिक्चर मधल्या नट्यांच पाहून आमच्याही पोरी सिंदूर आणि टिकली मागायलेत."

तर इकडच्या बॉलीवूडचा तिकडेही असा परिणाम त्यांना जाणवला.

त्यानंतर ते एका कपड्याच्या दुकानात गेले, आणि त्यांनी जाणीव पूर्वक बॉम्बेचा उल्लेख करून सांगितल की, 

"मै बंबईसे आया हुं, वंहा पसंद आये ऐसे कपडे दिखाना."

बंबईसे हे ऐकल्यावर त्या दुकानदाराने त्यांना कपड्याचे चार जोड फुकट देऊ केले. का? तर, तो म्हणाला की, 

"आप मेरे मौसीके  गाव वाले हो, मै आपसे कैसे पैसे लुं?"

"आम्हाला काही तुझं फुकटातलं नको, पैसे घेणार असशील तर घे, नाही तर मी दुसर्या दुकानात जातो", असं 

म्हंटल्यावर त्याने चार जोड कपड्यांचे पैसे घेतले पण वर दोन जोड कपडे  तसेच दिलेच त्याने जबरदस्ती. हा 

किस्सा माझ्या मनाला इतका भावाला कि चटकन डोळ्यात पाणी आलं. म्हणजे त्या व्यक्तीला  भारताबद्दल 

किती आत्मीयता वाटली, अगदी आप्तस्वकीयाप्रमाणे फक्त बंबईवाला या शब्दासाठी तो उदार झाला. खरच 

भाबडेपणाला आणि प्रेमाला देशसीमेची बंधनं नसतातच.

यानंतर पाकिस्तान, सिरीया, इस्राईल, तालिबान, तिथली धोरणं, त्याचे जगाच्या अर्थकारणावर होणारे परिणाम 

या अनुषंगाने केतकर सर बरेच काही बोलले.

शस्त्रास्त्र निर्मितीत जगातील बरीच मोठी अर्थव्यवस्था अवलंबून असल्यानं युध्द होणं ही आजच्या काळातली 

अटळ गोष्ट आहे, त्यामुळे संपूर्ण मानव जातीचाच हा कदाचित अखेरच्या शतकाचा प्रवास आहे, असंही विधान 

मार्टिन रिज यांच्या अवर लास्ट अवर (hour)  या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी केलं आणि हे त्याचंच नव्ह तर 

ज्येष्ठ वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग याचंही भाकीत असल्याच त्यांनी सांगितल. त्याच्या या भाकीतानंतर वातावरण 

थोड जास्तच गंभीर झालं. त्यानंतर त्यांनी भारताच्या राजकारणाकडे मोर्चा वळवला. भारतातील सध्याच 

राजकारण हे अराजकच्या दिशेनं चालल असल्याचे ते म्हणाले. यासंबधीच्या अनेक प्रश्नांना त्यांनी संयमान उत्तरं 

दिली. सध्याचा काळही भारतीय लोकशाहीला कसा धोकायक आहे याबद्दलही त्यांनी बरच विवेचन केलं. 

आपल्या खासदार निवडीच्या प्रक्रियेबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

हलाखीच्या परिस्थितीतून घेतलेलं शिक्षण, नोकरी, विद्यार्थी चळवळीशी आलेला संबध, त्यानंतर मार्क्सवादी 

तत्वज्ञानाचा प्रभाव, ग्रंथाली चळवळ, महाराष्ट्र टाईम्स मधील नोकरी, याही संदर्भाने त्यांनी जुन्या आठवणीना 

उजाळा दिला. कौटुंबिक माहिती देताना त्यांनी सांगितलं, की पत्नी शारदा साठे देखील स्त्री चळवळीतील 

सक्रीय कार्यकर्ती असल्याने आणि ते स्वतःही चळवळ आणि नोकरी अशा दोन्ही आघाडीवर व्यस्त असल्याने 

त्यांनी मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. इतका मोठा निर्णय त्यांनी सार्थही करून दाखवला. आज मुलं 

असलेल्या लोकांची परिस्थिती पाहिल्या नंतर आपण फारच दूरदृष्टीचे निघालो याबद्दल स्वतःचाच अभिमान 

वाटत असल्याचही ते गमतीनं म्हणाले.

दुसर्या दिवशीच्या सत्राला प्रारंभ करताना त्यांनी पर्यावरण या विषयावर चर्चा केली. विकास विरुद्ध पर्यावरण 

असं द्वंद्व उभं करण हे पूर्णतः चुकीच असल्याच ते म्हणाले. पर्यावरण आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या 

हातात हात घालून चालू शकतात त्यासाठी आपलं राजकीय धोरणं सक्षम असलं पाहिजे असं ते म्हणाले. श्री श्री 

रविशंकर यान्ही यमुनेत दीड लाख अनुयायांसोबत जो कार्यक्रम घेतला आणि यमुनेच्या किनार्याची प्रचंड हानी 

केली, त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ५ कोटींचा दंड केला असतानाही त्यांनी तो भरलेला नाही आणि 

भरणार हि नाही अशी त्यांची भूमिका असतानाही सरकार त्यांच्यावर काहीही कारवाई करत नसल्याचं ते 

म्हणाले. वेळोवेळी त्यांनी मोदी सरकारच्या अनेक चुकीच्या निर्णयांचा आणि धोरणांचाही समाचार घेतला.

आणीबाणी विषयी बोलताना त्यांनी त्याबाबतचं आपलं तटस्थ आणि परखड मत व्यक्त केलं. आणीबाणी ही त्या 

वेळच्या परिस्थितीची गरज होती आणि मी आणीबाणीचा समर्थक असल्याचंही ते ठाम पणे म्हणाले.  त्यावेळी 

निर्माण झालेल्या परिस्थितीचही त्यांनी विवेचन केलं. गरज पडेल तिथे कॉंग्रेसच्याही धोरणांवर त्यांनी टीका 

केली आणि सध्याच्या निर्माण झालेल्या असहिष्णुतेच्या आणि अराजकाच्या वातावरणाबद्दल प्रचंड चिंताही 

व्यक्त केली. त्यांच्याशी झालेल्या या चर्चेतून किमान प्रत्येकाला आपली जबाबदारी काय असली पाहिजे आणि 

मानवतावादाचे पाईक म्हणून सध्याच्या काळात आपण कोणती बाजू घेतली पाहिजे याचं भान प्रत्येकालाच आलं 

असेल. ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर प्रत्येकाने आपण कुठल्या बाजूने उभे राहणार द्वेषाच्या की प्रेम आणि 

करुणेच्या, हे ज्याचं त्यानं ठरवण्याची ही निर्णायक वेळ आहे, हे मात्र सुस्पष्ट झालं.

© मेघश्री श्रेष्ठी-नाईक.





Post a Comment

2 Comments

Amit Medhavi said…
छान मांडणी..!