नैराश्यातही रोजची कामं उरकण्यासाठी काय आयडिया वापरता येतील? तुम्हालाही हाच प्रश्न पडलाय का?

घर आवरायचं आहे, कपडे धुवायचे आहेत, परवा धुवून आणून ठेवलेले कपडे अजून घडी घालायचे आहे, स्वयंपाकाची तयारी करायची आहे, बाजारातून भाजी पण आणली नाही अजून... डोक्यात कामांची नुसती यादी सुरु असते पण एकाही कामाला हात लावू वाटत नाही. अगदी जे काम केल्याशिवाय पर्यायच नाही अशी कामं तेवढी कशीबशी उरकली जातात. ती करताना पूर्वीचा उत्साह जाणवत नाही. विनाकारण थकल्यासारखं वाटतं. स्वयंपाकात जिथे पूर्वी दोन भाज्या बनत होत्या तिथे आता एक भाजी करायचंही जीवावर येतं.



ही लक्षणे म्हणजे आळस किंवा थकवा नव्हे. ही नैराश्याची लक्षणे आहेत.

नैराश्य आलेल्या किंवा डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला आयुष्यातील अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतही रस वाटत नसल्याने त्या गोष्टी करू वाटत नाहीत. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये जर असा बदल दिसत असेल तर, आळशी झालीये, घरात बसून काही काम नसतं म्हणून असं होतं, जरा बाहेर पड, फिरून ये, जग बघ म्हणजे कळेल, इतकंही नाही जमत मग काय उपयोग? असले शब्द वापरून आणखीन निराश करण्यापूर्वी एकदा या गोष्टीचा नक्की विचार करा.

रोजची अगदी साधीसाधी वाटणारी कामं करणंही जेव्हा कठीण वाटू लागतं तेव्हा नैराश्याचा आयुष्यावर होणारा भयानक परिणाम जाणवू लागतो. मग अशावेळी स्वतःला या कामासाठी कसं प्रोत्साहित करायचं? रोज स्वतःला मोटिव्हेट कसं ठेवायचं? उदास मानसिक स्थिती आणि रोजची लढाई यातलं अंतर कमी कसं करायचं? जाणून घ्यायचं आहे? मग हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

दैनंदिन कामापैकी अगदी सोपी, कमी वेळेत उरकणारी कामं पहिल्यांदा करायला घ्या. मला वाटतं अशा कामांच्या यादीत अंघोळ करणे, हे काम देखील असू शकतं. कारण, नैराश्याचा जितका खोलवर परिणाम झालेला असतो त्यावरून हे इतकं रोजचं छोटं कामही आपल्याला अशक्य कोटीतील वाटू शकतं. अशी छोटी, पटकन होणारी कामं करून झाली की  थोडी विश्रांती घ्या.

घर आवरणं, हे काम तर काही केल्या संपत नाहीच. घर आवरायला घेतानाही छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. उदा.- एकच खोली आवरायला घेणे, कधीकधी फक्त ओटा आवरायला घेणे, फ्रीज साफ करणे, असं एकावेळी एकच काम करा. काम करताना गाणी ऐकायला आवडत असेल तर गाणी लावा, गोष्टी ऐकायला आवडत असतील तर ऑडीओ बुक ऐकत ऐकत काम करा.

ठरवलेली कामं एका दिवसात झाली नाहीत, म्हणून निराश होऊ नका. पुन्हा प्रयत्न करायचाच आहे, आपल्याला. त्यामुळे लगेच स्वतःला 'आळशी' असा शिक्का मारू नका. कामाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे स्वतःला निगेटिव्ह कमेंट देऊ नका.

उलट तुमच्या टू डू लिस्ट मधील जेवढी पण कामं तुम्ही पूर्ण केली असतील त्याबद्दल स्वतःची पाठ थोपटा! किमान काही कामं तरी आवरून झाली, याबद्दल आनंदी राहा.

सकाळी उठल्यावर मोकळ्या हवेत फिरून या. थोडा व्यायाम करा. यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हल टिकून राहते.

काही कामं हाताबरोबर आवरून घ्या. जसं की जेवण झाल्या झाल्या ताट धुणे, चहा झाल्यावर कप धुवून ठेवणे, अंघोळ झाल्या झाल्या स्वतःची कपडे पिळून टाकणे, अशी छोटी कामं हाताबरोबर उरकली की, ती साठत नाहीत.

घरातील लोकांना कामे वाटून द्या. त्यामुळेही तुमचा भार हलका होईल.

मोठी कामं जसं आठवड्याचे कपडे धुणे, टॉयलेट, बाथरूम स्वच्छ करणे, अशी कामे एकाच दिवशी काढू नका. समजा रविवारी तुम्ही सगळी आठवड्याची कपडे धुणार असाल, तर टॉयलेट बाथरूम साफ करण्याचे काम दुसऱ्या दिवशी करा.

एकाच दिवसात सगळी कामे पूर्ण करण्याचा अट्टाहास करू नका. यामुळे तुम्ही अजून निराश व्हाल. निराश असणे म्हणजे फक्त वाईट वाटणे, दुखी होणे नव्हे, नैराश्याची आणखीही बरीच लक्षणे आहेत जी कधी-कधी खूपच त्रासदायक ठरतात.

 लक्ष एकाग्र करता न येणे, सतत कंटाळा आणि थकवा जाणवणे, उत्साह न वाटणे, कधी काळी जी कामे करण्यात उत्साह वाटत होता तो उत्साह न राहणे, हालचालींचा वेग मंदावणे, अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, असे शारीरिक त्रास होणे, ही सगळी नैराश्य आल्याची लक्षणे आहेत.

अचानक जर तुम्हाला अशी काही लक्षणे जाणवत असतील किंवा यापैकी एक जरी लक्षण जाणवत असेल तर, समुपदेशक, थेरपिस्ट यांची मदत अवश्य घ्या.

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्व-प्रगतीला खीळ घालणे. स्वतःहून स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे बंद करू नका. मनातील घुसमट योग्य ठिकाणी व्यक्त करा. मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी योग्य नियोजन करायला घ्या. वेळेत घेतलेली दक्षता आणि काळजी पुढील अनर्थ टाळण्यास मदत करते.

 

 

Post a Comment

0 Comments