हेल्दी सेक्स लाईफ हेच आनंदी वैवाहिक जीवनाचं गुपित आहे..!

नवरा-बायकोचा नात्यातील अत्यंत महत्वाचा पण तितकाच दुर्लक्षित मुद्दा म्हणजे हेल्दी सेक्स लाईफ. अनेक जोडप्यांमध्ये वरवर तरी सगळं काही छान सुरु असतं मात्र त्यांच्यातील इनर बॉंडिंग हरवलेलं असतं. नात्याला हेल्दी ठेवायचं असेल तर हेल्दी सेक्स लाईफ कशी असली पाहिजे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. नात्याची सुरुवात करतानाच जर या गोष्टी दोघांनाही माहिती असतील तर तुमचं नातं अजून स्ट्रॉंग, आनंदी होईल. नुकताच संसाराला लागलेल्या नव्या जोडप्यांनी तरी हा लेख आवर्जून वाचा. तुमच्या नातेवाइकांच्या किंवा मित्र-मैत्रिणीच्या लग्नात भलं मोठं गिफ्ट तर तुम्ही दिलंच असेल, आता सुखी संसाराचा राजमार्ग समजावून देण्यासाठी हा लेख त्यांच्याशी जरूर शेअर करा. 




जोडीदारासोबत सेक्स कसा करावा याबाबत प्रत्येकाची कल्पना ही वेगवेगळी असते. जशी प्रत्येकाच्या भुकेचे प्रमाण, आणि टेस्ट वेगळी अगदी तसच काहीसं याही बाबतीत असतं. प्रत्येकवेळी आपला जोडीदार आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकेलच असं नाही. सेक्सच्या बाबतीतील तुमच्या सगळ्याच कल्पना पूर्ण होतील अशा अपेक्षा ठेवू नका. परिपूर्ण सेक्स लाईफ अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसते. दांपत्य जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर दोघांच्या आवडीनिवडी, कम्फर्ट, मनाचा कल आणि मानसिक तयारी या सगळ्यांचा विचार व्हायला हवा. 

सेक्स मागचा हेतू एकच असला पाहिजे तो म्हणजे आपल्या जोडीदाराला आपल्यासोबत सुरक्षित आणि आनंदी वाटलं पाहिजे. याउलट जबरदस्ती आणि अवास्तव अपेक्षा तुमच्या सेक्स लाईफला आणि पर्यायाने तुमच्या संसारालाही गालबोट लावू शकतात. म्हणून जोडीदाराच्या शरीराशी जवळीक करण्याची घाई करण्याआधी त्याच्या मनाचा, भावनांचा आणि सेक्सबद्दलच्या त्याच्या/तिच्या फँटसीचा अंदाज घ्या. 

मनमोकळा संवाद, एकमेकांबद्दल आदर, प्रेम असेल तरच पुढचा प्रवास सुखकर होईल. सेक्सबद्दल तुमच्या कल्पना काय आहेत याबद्दल तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत मोकळेपणाने बोला, तुमच्यातील बॉंडिंग अधिक चांगलं करण्यासाठी स्पष्ट संवाद खूप महत्वाचा आहे. तुम्हाला सेक्समध्ये कोणत्या गोष्टी करायला आवडतील, कोणत्या नाहीत याची कल्पना पार्टनरला द्या. काही गोष्टींसाठी तुम्ही तयार नसाल, तर त्यामागचं कारण स्पष्ट सांगा. नवरा किंवा बायको आहे म्हणून माझं प्रत्येक म्हणणं ऐकलंच पाहिजे, या दुराग्रहामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील आनंदच नाहीसा होईल. निव्वळ एक सोपस्कार म्हणून सेक्स करण्याऐवजी एकमेकांच्या जवळ राहण्याचा, एकमेकांना आनंद देण्याचा आणि नातं अधिक सुदृढ बनवण्याचा मार्ग म्हणून त्याकडे पाहणं गरजेचं आहे.

तुमची  फँटसी प्रत्यक्षात उतरत असेल, आठवड्यातून अमुकवेळा होत असेल, जास्त वेळ होत असेल, तरच तुमची सेक्स लाईफ चांगली या सगळ्या सेक्सबद्दलच्या अवास्तव कल्पना आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत असं आपण म्हणू शकतो. 




दोघांनाही एकमेकांसोबत सुरक्षित वाटत असेल, दोघांनाही त्यातून शारीरिक आनंद आणि मानसिक सुख मिळत असेल तर नक्कीच तुम्हाला सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली आहे असं म्हणायला हरकत नाही. शेवटी काय अगदी खुलेपणानं आपण सगळ्या गोष्टी जर आपल्या जोडीदाराशी बोलत असू आणि त्याचं/तिचं म्हणणं ऐकून घेत असू तर अशी नाती अधिक सुखी समाधानी होत जातात. 

अरे हा असं कसा वागतो? किंवा छे, हिला ना काही पटतच नाही अशी अढी मनात ठेवून आपण सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करू शकत नाही. इथं दोन्ही बाजूंनी थोडा अधिक समजूतदारपणा दाखवणं गरजेचं असतं. सुखी सेक्स लाईफमध्ये हळुवारपणा, थोडी गंमत आणि एकमेकांची आवड, या सगळ्यांचा विचार व्हायला हवा.
अत्यंत बिझी लाईफ शेड्युलमधूनही तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर विचार आणि चर्चा करायला वेळ काढावा लागेल. एकमेकांना समजून घेण्यासाठी जितका जास्त वेळ द्याल तितक्या वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होतील. 
यासाठी आठवड्यातून किती वेळा आपण एकांतात बोलू शकतो, केव्हा बोलू शकतो याचा अगदी काटेकोर आराखडा तयार करता आला नाही तरी जेव्हा जेव्हा आपण एकमेकांशी बोलायला, समजून घ्यायला कमी पडतोय असं जाणवेल तेव्हा तेव्हा एकमेकांना प्रायोरिटी द्यायला हवी. 



पण असे अवघड विषय बोलायचे कसे आणि कधी?
सुरुवात तरी करून बघा एकमेकांच्या सहवासात जितका जास्त वेळ घालवाल तितकं तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल, जोडीदाराबद्दल विश्वास वाटायला लागेल. यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा लागेलच. त्यासाठी वेळ, जागा ठरवण्यापासून ते काय आणि कसं बोलायचं याचा आधीच विचार करून ठेवा. 

एकमेकांचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. समोरच्याला त्याच्या भावना नेमकेपणाने मांडण्यासाठी मदत करा. प्रश्न विचारा, तुमची मतं काय आहेत, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. 

संवादानेच एकमेकांच्या मनाची बंद कवाडं खुली करता येतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जोडीदार काही बोलत नाही, लाजतो, याचा अर्थ त्याची तुमच्या प्रत्येक गोष्टीशी सहमती आहे, असा अर्थ लावू नका. सहमती असल्याशिवाय सेक्सबद्दल फोर्स करू  नका. सेक्सच्या प्रत्येक टप्प्यावर ही गोष्ट लागू होते. तुम्ही वैवाहिक जोडीदार आहात याचा अर्थ तुम्ही संमतीशिवाय किंवा त्या व्यक्तीची इच्छा नसताना तुम्हाला हवं ते करू शकता असं होत नाही. ही जबरदस्ती पुढे जाऊन पश्चातापाचे कारण बनू शकते.

सेक्सच्या बाबतीत संयम सामंजस्य आणि संमती या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. समोरच्यावर जबरदस्ती करण्यात, त्याच्यावर दबाव येईल असं वागण्याने तुमच्या नात्यातील विश्वासार्हतेला, प्रेमालाच तडा जाऊ शकतो. या गोष्टींची चर्चा करताना, तुमचा आवाज, तुमचं बोलणं, बोलण्याचा टोन, भाषा या सगळ्या बाबींकडे लक्ष द्या. तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री कुठेही तुमच्या बोलण्यातून समोरच्याबद्दल नाराजी, अपमान, अनादर व्यक्त होणार नाही याची काळजी घ्या. यातून तुमच्या जोडीदाराची तुम्हाला किती काळजी आहे, हे दिसून येते. एक माणूस म्हणून तुम्हाला त्याच्या मताचा, त्याच्या भावनांचा किती आदर आहे, हेही कळते. 

शेवटी, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आणि जोडीदाराच्या आनंदासाठी करत आहोत. यातून एका  
 हळव्या, नाजूक, नात्याचा मजबूत पाया रचला जाणार आहे. एकमेकांसोबत जितका क्वालिटी टाईम स्पेंड कराल तितकं तुमचं नातं जास्त हेल्दी राहील. आपल्या जोडीदाराला आपल्याशी सेक्सविषयी बोलणं कम्फर्टेबल वाटेल यासाठी आपण त्याला तितका वेळ दिला पाहिजे. 

जोडप्यामध्ये आधी मानसिक, भावनिक बंध जुळले पाहिजेत. पोझिशन, फ्रिक्वेन्सी किंवा प्लेजर या गोष्टी त्यानंतर येतात. सगळ्यात महत्वाचं लैंगिक आरोग्याची काळजी. कंडोम सारख्या गर्भनिरोधकाचा वापर करणे, असुरक्षित साधनांचा वापर टाळणे आणि लैंगिक आरोग्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे. जोडीदाराच्या शरीराचा, मनाचा आणि मताचा सन्मान करा.  

जोडीदारामध्ये प्रेम, आदर आणि सुरक्षेची भावना निर्माण करण्याला प्राधान्य दिल्यास पुढचा प्रवास जास्त सुखकर आणि निर्धोक होतो. आपल्यासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी कुठली गोष्ट महत्वाची आहे त्याला प्राधान्य दिलंत तर नक्कीच तुमचा संसार सुखाचा होईल. 

नव्याने आनंदी दांपत्य जीवनाला सुरुवात करणाऱ्या सर्व सर्वांना शुभेच्छा! 


Post a Comment

3 Comments

Anonymous said…
Agadi barobar ahe...
Lakhan Chaudhari said…
"Your perspective on the importance of a healthy sex life is refreshing and insightful. Consider delving into a breakthrough blog to spark open conversations, break taboos, and contribute to a more informed and liberated society. Your words have the potential to make a meaningful impact!"
अगदी बरोबर आहे. या अत्यंत सध्या गोष्टी वाटत असतात पण आपलं याकडे दुर्लक्ष होतं. आजच्या काळात अवतीभवती पाहिलं तर वैवाहिक जीवनात अतिशय कटुता वाढत चालली आहे. घटस्फोट चे प्रमाण वाढले आहे. याची कारण शोधताना आणि वैवाहिक जीवन सुखी, आनंदी जगण्यासाठी तुमचा लेख नक्कीच सहाय्य ठरणार यात शंका माजी. खूप चकन....