ध्यान करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घ्या!

Image source : Google 


ध्यान म्हणजे काय याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही लोकांसाठी तर ध्यान म्हणजे आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट वाटते. काही लोकांना ध्यान म्हणजे एखादी गूढ क्रिया वाटते. परंतु वास्तवात ध्यान ही एक सहज सुंदर गोष्ट आहे. 
या लेखातून आपण ध्यान म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. ध्यान कोणकोणत्या प्रकारे करता येते आणि त्याचे फायदे काय आहेत हेही पाहू. 

सरळ सोप्या भाषेत सांगायचे तर ध्यान म्हणजे विचार, चिंतन किंवा आपल्या भावनांचे परीक्षण करणे. खरे तर आपण बरेचदा नकळत या गोष्टी करत असतोच. पण, जाणीवपूर्वक आणि शक्य तितक्या तटस्थपणे आपल्या विचारांचे, भावनांचे परीक्षण करणे म्हणजे ध्यान असे म्हणता येईल.

ध्यान करण्याची विशिष्ट पद्धती आहे का?

खरे तर ध्यानाचा अमुक एक मार्गच बरोबर आणि दुसरा चुकीचा असं काही म्हणता येणार नाही. तुम्हाला ज्या मार्गाने ध्यान करणे आवडेल आणि ज्या पद्धतीने ध्यान केल्याने तुमच्या मानसिकतेत फरक पडेल तो मार्ग, ती पद्धत तुम्ही बिनधास्तपणे स्वीकारू शकता. 

एका ठिकाणी मांडी ठोकून, डोळे झाकून बसणे म्हणजेच ध्यान असं अजिबात नाही. 

जगातील प्रत्येक संस्कृतीत ध्यानाची वेगवेगळी पद्धत आणि त्यातही कित्येक उपप्रकार सांगितले आहेत. त्यामुळे ध्यानाचा एकच एक ठोस मार्ग कोणता याचं निश्चित उत्तर देता येणार नाही. पण, तुम्हाला सुरूवातच करायची असेल तर इंटरनेटवर अनेक प्रकार मिळतील त्यातील एक निवडू शकता. 

आपल्या विचारांचे भावनांचे परीक्षण करण्याचा कोणताही मार्ग हा ध्यान असू शकतो. त्यासाठी तुम्ही तासनतास बसून राहिलं पाहिजे असं नाही. या परीक्षणातून तुमच्यात स्वतःच्या भावनांबद्दल, विचारांबद्दल अधिक जागरूकता येईल. तुम्ही स्वतःला अधिक समजून घेऊ शकाल. थोडक्यात स्वतःच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. 

अनेक जण तुम्हाला मी अमुक एका पद्धतीने ध्यान करतो आणि हीच पद्धत सर्वात योग्य आहे, असं ठासून सांगतील. पण, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. कारण, इथे प्रत्येकाची विचारसरणी, जीवन आणि अनुभव वेगवेगळे आहेत. मानवी जीवन अमुक एका सूत्रात बांधणं अजिबात शक्य नाही. त्यामुळे दुसऱ्याला जो अनुभव आला तो तुम्हालाही येईलच असं अजिबात नाही. 

तुमच्या आणि त्यांच्या अनुभवात नक्कीच काहीतरी भिन्नता असणार आहे. म्हणून स्वतःची ध्यानाची योग्य पद्धत कोणती हे तुम्हाला स्वतः शोधून काढावं लागेल. त्यासाठी आवर्जून वेळ द्यावा लागेल. 

ध्यान करताना तुम्ही जितका सहज सोपा मार्ग अवलंबाल तितका तुम्हाला फायदा होईल. कारण, जीवन सहज सुलभ आणि सोपं करणं हाच ध्यानाचा अंतिम हेतू आहे. 
पण तुम्ही सुरूवात करणार असाल तर पुढील पद्धतीने करू शकता.

१. सुरुवातीला १-२ मिनिटांचा टायमर लावा. ध्यानाला सुरूवात करताना वेळ खूप महत्वाची आहे. सुरूवात करताना 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ अजिबात घेऊ नका. १-२ मिनिटापासून सुरूवात करून हळूहळू ही वेळ वाढवत न्या. 

२. आरामदायी ठिकाण निवडा आणि बसा. कोच, खुर्ची किंवा जमिनीवर कुठेही बसू शकता. फक्त पाठीला बाक न आणता पाठीचा कणा ताठ राहील याची दक्षता घ्या.

३. आता डोळे उघडे ठेवा किंवा झाका पण तुमचं लक्ष श्वासावर आणा. आत जाणारा श्वास आणि बाहेर पडणारा उच्छ्वास अनुभवा. 

४. आत जाणारा श्वास थंड आहे तर बाहेर पडणारा उच्छ्वास थोडासा गरम. दोन्हीतील फरक जाणवतोय का पहा. त्यावर लक्ष द्या. 

५. हे करताना मन अनेकदा भटकेल पण त्याला पुन्हा श्वासोच्छ्वासावर आणा.

६. टायमर बंद झाल्यावर तुम्ही ध्यानातून उठू शकता. 
यानंतर तुमच्या मनस्थितीकडे लक्ष द्या. मनावरील तणाव थोडा तरी हलका झाल्याचे जाणवेल. सुरुवातीला फक्त इतकं केलं तरी हळूहळू तुम्हाला याचे फायदे जाणवतील. 

ध्यानाचे फायदे – 

ध्यान ही मनाला शांत करण्याची पद्धत आहे. मन आणि मेंदूतील गोंधळ दूर करून स्थैर्य आणण्यासाठी ध्यान करणे हा एक उपयुक्त मार्ग आहे. तुम्ही किती वेळ ध्यान करता कशा पद्धतीने करता यापेक्षाही तुम्ही सातत्याने ध्यान करत राहिलात तर नक्कीच त्याचा फायदा दिसेल.

ध्यान केल्याने आपण इतरांप्रती आणि स्वतःबद्दलही अधिक संवेदनशील होतो. इतरांना समजून घेणे सोपे जाते. बाहेरच्या जगात वावरताना अनेक कटू अनुभव, कटू बोल मनात साचले जातात आणि त्यामुळे मन दुखावलं जातं. मनाला या कटुतेच्या ओझ्यातून मुक्ती मिळते. त्यामुळे मनातील राग, द्वेष कमी होतो. 

तुमच्या मनातील आकारण भीती, असुरक्षितता कमी होते. 
चीडचीड आणि संताप कमी होतो.

मनातील एखाद्या जुन्या घटनांचे व्रण आणि त्यातून निर्माण होणारे दुख कमी होण्यास मदत होते.

एखादी गंभीर परिस्थिती निर्माण झाली किंवा कोणी भावना दुखावणारी कमेंट केली तरी त्याला शांतपणे रीअॅक्ट होण्याची कला हळूहळू जमू लागते. 

आपल्याला आयुष्यात काय हवं आणि काय नको याबद्दल अधिक स्पष्टता येऊ लागते. हे करू की ते करू, अशी मनाची द्विधा अवस्था कमी होते.
 
ध्यानाचा सर्वांनाच फायदा होतो पण, ताणताणाव, नैराश्य आणि संताप होणाऱ्या व्यक्तींना याचा जास्त फायदा होतो.
 
ध्यानासाठी जागा कशी निवडाल?

ध्यान करण्यासाठी एखादी शांत जागा निवडा. जिथे बसल्यावर तुम्हाला जगापासून स्वतःला दूर करणे आणि स्वतःशी जुळवून घेणे सोपे जाईल. तुमच्या घरातीलच एखाद्या ठिकाणी तुम्हाला अशी जागा तयार करता येईल. जिथे फारशी कुणाची वर्दळ नसते, जिथे फार अडगळ किंवा साहित्य नसेल. अगदी तुमच्या कारमध्येही तुम्हाला शांतता मिळते असे वाटत असेल तर त्याठिकाणीही तुम्ही ध्यान करू शकता. फक्त तुमचे लक्ष भरकटवणारे आवाज किंवा कुणी व्यक्ती येऊन तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही एवढीच खात्री करून घ्या.

तुमच्या बेडरूममध्ये बेडवर बसून जरी ध्यान केलंत तरी चालेल. घरातील सगळ्या व्यक्ती झोपी गेलेल्या असताना बऱ्यापैकी शांतता मिळते. यावेळीही तुम्ही ध्यान करू शकता. ज्यांना झोप न येण्याची किंवा निद्रानाशाची समस्या आहे अशा लोकांनी तरी झोपण्यापूर्वी ध्यान करणं फायद्याचं ठरेल. 

सुरुवातीला तुम्ही गाईडेड मेडिटेशनची मदत घेऊ शकता. त्यात स्वतःच्या आवडीनुसार काही बदल करू शकता. 

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची इच्छा आणि तुमचा हेतू. स्वतःसाठी दिवसातील पाच मिनिटे वेळ देऊन तुम्ही स्वतःचे मानसिक आरोग्य निरोगी ठेवू शकता. जीवनात स्थैर्य, आनंद आणि सुख अनुभवू शकता. 

ध्यान करणं जमतच नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर सकाळी उठल्या उठल्या फक्त खोल श्वासोच्छ्वास करून तुम्ही दिवसाची सुरूवात करू शकता. फक्त यात सातत्य असणं महत्वाचं.

Post a Comment

1 Comments