चला सुरू करू आनंदाची भिशी!(Gratitude Jar)

आशुचा वाढदिवस होता. त्या दिवशी ती फार छान तयार झाली होती. सगळेजण तिचं कौतुक करत होते. सगळ्यांच्या कौतुकाच्या शब्दामुळे आशु खूप आनंदात होती. तिची मैत्रिणी अन्वी आली. अन्वी म्हणाली डोळ्याखाली डार्क सर्कल किती वाढलेत तुझ्या...? झालं सगळ्यांना सोडून आशु दहा वेळा स्वतःला आरशात बघून आली खरंच डार्क सर्कल आलेत का? आई, मावशी, दीदी सगळ्यांना विचारून खात्री करून घेतली.

 


आलेल्या सगळ्या लोकांनी आशुचं कौतुक केलं होतं. एकटी अन्वी सोडल्यास तिच्याबद्दल कुणीही निगेटिव्ह कमेंट केली नव्हती. तरीही सगळ्या चांगल्या कमेंट्स सोडून आशु एकट्या अन्वीच्या कमेंटने इतकी अस्वस्थ का झाली? कारण, आपल्या मनाला तशा पद्धतीने विचार करण्याची सवय लागलेली असते. अर्थात मानवी मन नेहमीच नकारात्मक शक्यता जास्त गृहीत धरतं. आपल्या मेंदूला सकारात्मक गोष्टींची दखल घेण्याची तितकीशी सवय नसल्याने हे होतं. मानवी स्वभावाचा तो एक भाग आहे.

आपले पूर्वज जंगलात राहत होते. त्यावेळच्या असुरक्षित जीवनाचा भाग म्हणून सतत भीती, नकारात्मकता आणि असुरक्षिततेची भावना अधिक प्रबळ होती. आता आपण अधिक सुरक्षित जीवन जगत असलो तरी, मानवी मेंदू नकारात्मक गोष्टींकडेच जास्त आकर्षित होतो. उत्क्रांतीतून ती सवय आपण आत्मसात केली आहे. हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज ज्या परिस्थिती राहत होते ती परिस्थिती आता नसली तरी आपला मेंदू मात्र त्याच परिस्थितीतून घडलेला आहे. त्याला सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची सवय लागली आहे. कधीकाळच्या भटक्या जीवनशैलीमुळे मेंदूवर झालेले हे संस्कार सहजी पुसले जाणारे नाहीत.

आता आपल्या मेंदूला आपण सुरक्षित असल्याची जाणीव करून द्यायला हवी. आपण आनंदी, सुखी आणि स्थिर जीवन जगत आहोत याचे त्याला सतत स्मरण करून द्यावे लागते. दररोज कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या मनाला आणि मेंदूला सकारात्मक गोष्टींची सवय होण्यास मदत होईल.

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही रोज जर्नल किंवा डायरी लिहू शकता. पण लिखाण करत बसणे तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर तुम्ही ग्रॅटिट्युड जारचा वापर करू शकता. ही पद्धत तुम्हाला अधिक इंटरेस्टिंग वाटू शकते.

ग्रॅटिट्युड जार तयार करण्यासाठी तुम्हाला एक काचेची किंवा प्लास्टिकची बरणी, छोटे कागद आणि एक पेन, इतके साहित्य पुरेसे आहे. ज्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात आनंद आहे असे तुम्हाला वाटते, त्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, ती छोट्या कागदावर लिहायची आणि तो कागद घडी करून बरणीमध्ये ठेवून द्यायचा. अगदी रोज शक्य नसल्यास किमान एक दिवसआड किंवा आठवड्यातून २-३ वेळा तरी तुम्ही हे नक्की करू शकाल. यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टींवरचा फोकस वाढेल. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. हा जार म्हणजे तुमच्या आयुष्यातील आनंदी क्षणांची भिशी होईल. जशी पैशाची, सोन्याची, धान्याची भिशी बनवतो तशीच ही आनंदी क्षणांची भिशी... मस्त आहे ना कल्पना?

कृतज्ञता व्यक्त करण्याच्या सवयीमुळे आपण अधिक सकारात्मक विचार करू लागतो. आपले नातेसंबंध सुधारण्यास मदत होते. आपण आनंदी राहू लागतो. आत्मविश्वास वाढतो. आपल्यात पूर्वीपेक्षा जास्त आशावादी दृष्टीकोन निर्माण होतो. नैराश्य आणि तणाव कमी होतो. मानसिक समाधान मिळाल्याने पुरेशी आणि गाढ झोप मिळते.

आता तुमची ही भिशी सतत कशी वाढत राहील हे पाहूया!

ज्या क्षणी तुम्ही ही भिशी सुरु करत आहात तेव्हा त्यात पहिली नोंद टाकताना त्या भिशी बद्दल किंवा बरणी, जार, जी काही वस्तू तुम्ही त्यासाठी निवडली असेल त्याबद्दलच कृतज्ञता व्यक्त करा. आयुष्यातील छोट्यातल्या छोट्यात गोष्टीतही आनंद शोधण्याची सवय इथूनच लागते.

दिवसातील एक ठराविक वेळ निवडून त्यानुसार तुम्ही ग्रॅटिट्युड लिहिण्यासाठी एक अलार्म सेट करू शकता. ज्यामुळे कामाच्या घाईत राहून गेलं असं होणार नाही. शिवाय दररोज करत राहिल्याने हे कामही तुमच्या अंगवळणी पडून जाईल. अगदी दररोज शक्य नसले तरी, किमान आठवड्यातून २-३ वेळा तरी पण तेव्हाचा अलार्म आधीच सेट करून ठेवा म्हणजे विसरले जाणार नाही.

या जार किंवा भिशीच्या शेजारीच काही कागद आणि पेन ठेवा ज्यामूळे तुम्हाला या नोंदी करणे सोपे जाईल.

जेव्हाही काही चांगले घडेल तेव्हा तेव्हा लगेचच ते लिहून या भिशीत टाकून ठेवा.

तसेच आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा या सगळ्या नोंदी वाचण्यासाठी वेळ काढा. म्हणजे तुमच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण पुन्हा आठवून तुम्ही आणखी आनंदी व्हाल.

आता या भिशीत तुम्ही काय काय साठवू शकाल ते पाहूया

तुम्हाला सर्वात जास्त आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल लिहा. त्या व्यक्तीमधले कोणते गुण तुम्हाला आवडतात ते लिहा. ती व्यक्ति तुमच्या आयुष्यात असल्याबद्दल आभार व्यक्त करा. ते कागदावर लिहून तुम्ही या भिशीत टाकू शकता.

तुमच्या दैनंदिन कामात तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी पडणारी वस्तू... उदा. मोबाईल, गाडी, कंप्युटर, लॅपटॉप इ.

आजच्या दिवसात घडलेला एखादा प्रसंग, क्षण ज्यामुळे तुम्ही मनसोक्त हसलात. आजच्या दिवसात घडली नसेल तर किमान गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घटनांबद्दल तरी नक्की लिहू शकता.

तुमच्या आयुष्यातील एखादी अशी गोष्ट ज्याबदल्यात तुम्हाला जगातील महागात वस्तू देऊ केली तरी तुम्ही ती सोडणार नाही. जी तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, अशा गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.

तुम्ही ही आनंदाची भिशी का सुरु केलीत? तुम्ही ही भिशी सुरु केलीत याबद्दल स्वतःचेही आभार माना. कारण, यामुळे तुमच्या आयुष्यातील क्षण द्विगुणीत होणार आहेत.

तुमचा आवडता छंद... तुम्हाला जी गोष्ट करताना सर्वात जास्त आनंद मिळतो त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.

आयुष्यात तुम्ही शिकलेला धडा ज्यामुळे तुम्हाला स्वतःला सुधारण्याची, स्वतःमध्ये बदल करण्याची संधी मिळाली. अशा गोष्टीबद्दलही कृतज्ञता व्यक्त करा.

तुमच्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आले असेल तर त्याक्षणी तुम्हाला काय वाटले ते लिहा. इतरना आनंद देण्याशी संधी, क्षण मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.

तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीने तुमच्यासाठी केलेली एखादी खास गोष्ट आठवा. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.

स्वतःबद्दल, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल, संघर्षाबद्दल, स्वतःतील चांगल्या गुणांसाठी स्वतःचे आभार माना.

आजूबाजूला पाहा आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी वाटते त्याबद्दल करा. अगदी छोट्यातील छोटी गोष्ट असली तरी.

कृतज्ञतेच्या भावनेमुळे तुमच्या विचारात काय फरक पडला तेही लिहू शकता.

गेल्या काही वर्षात तुमच्यात कोणती आणि कशी प्रगती झाली त्याबद्दल लिहा.

आयुष्यात पुढे तुम्हाला काय हवं आहे, त्याबद्दलही आजच कृतज्ञता व्यक्त करू शकता.

स्वतःसाठी आनंदी राहण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणत आहात, स्वतःतील या जिद्दीबद्दल, स्वतःवरील प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.

एखाद्या कालावधीत तुम्ही स्वतःसाठी निश्चित केलेले ध्येय गाठल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.

तुम्ही कधी कुणाची मदत केली असेल. कुणाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असाल, एखाद्याला मानसिक धीर दिला असाल तर स्वतःतील या करुणेच्या, सहानुभूतीच्या भावनेबद्दल आभार व्यक्त करा.

तुम्हाला कंटाळा आला असेल आणि आरामाची गरज असताना स्वतःला रीलॅक्स करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीला पाहिलं प्राधान्य देता? त्या गोष्टीबद्दल लिहा.

लहानपणीची एखादी सुखद आठवण, त्याचीही नोंद करून ठेवा.

तुमचा एखादा मित्र-मैत्रीण हितचिंतक त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा संदेश लिहू शकता. त्याला दिलं नाही तरी चालेल पण तुमच्या भिशीत याची नोंद असू दे.

आठवड्याभरात तुमच्यासोबत काय चांगले घडले, त्या दिवसातील चांगले क्षण, चांगल्या आठवणी यांची नोंद करू शकता.

 

याव्यतिरिक्त तुम्हाला ज्या काही छोट्या-मोठ्या गोष्टी आठवतील त्या सगळ्यांची नोंद करून ठेवा. अशा रीतीने तुमचा आनंदाचा खजाना दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहो याच सदिच्छा!

 

 

 

Post a Comment

0 Comments