गोष्ट एका सरीची!



"ये सरे, उठ. दाजी आल्यात पाणी दे त्यास्नी."

"व्हय, देतुय न्हवं का?"

"अगं फुकनीचे, काम कर आधी मग लाग तोंडाला. आली मोठी रागाची."

"आत्ता देतु म्हणलं, तर त्यात राग कसला. काय बोलायची सोयच न्हाय हिच्यासमोर." ते दाजी वागत्यात कनाय हिच्याबर तेच बरोबर हाय.

"दाजी धरा पाणी. चूळ भरताय न्हवं?"

"व्हय व्हय सरे आलू थांब जरा."

मी दाजीच्या हातात पाण्याचा तांब्या द्यायला हात म्होर केला. तांब्या घेता घेता दाजींनी हातबी हळूच दाबला. 

बाई! काय धाडस तरी दाजीच. आक्का आत असली तरी तेस्नी भीती न्हाय वाटत. मला मातर आक्काची लय भीती वाटती. एकदा का वटवटाय लागली का तिच्या तोंडाला जरा सुदी फ्योस येत न्हाय, कसलं त्वांड हाय कुणास ठावक. पार दाजी लय जीव लावत्यात बर मला. लय म्हंजी आक्कापेक्षा बी.

"सरे, दाजीस्नी ताट कर. जेवाय वाढ. मी जरा गोट्यात चक्कर टाकून येती."

"बरं." मी म्हंटल.

'मला म्हाईतच व्हतं आत्ता ही जाणार आणि....

'मी कपाटावरलं ताट घितलं आणि दाजीस्नी जेवाय वाढाय लागली. माझं ताट अजून वाढून झालं बी नव्हतं तवर ही लेकराला घेऊन गेली बी. इकती धांदल कशापायी करती मला अज्याबात कळत न्हाय पण.'

"सरे, आक्का कुठ गेली गं तुझी?" आत येत दाजींनी विचारलं.

"गेली गोट्यातनं चक्कर टाकून येतू म्हणून..."

'ती गेली म्हणल्यावर काय दाजी खुश आन मीबी. लय छान वाटतं दाजी माझ्या भवती भवती घुटमळाय लागलं की. आत्ता जोवर आक्का यित न्हाय तवर आमचच राज. दाजी म्हंजी माझा राजा अन मी तेंची राणी.'

 'दाजी म्हणजे दिसाय एकदम हिरोवाणीच. एवढी शेतीभाती, रग्गड जमीनजुमला हाय, पण पोटाला पॉर नव्हतं. कुठून माझं नशीब फुटलं आणि तेंच फळफळलं. काय सांगू आत्ता? .....'

'हाताला काम शोधीत माझ आय-बा. इकड लांबच्या भागावर आलतं. तवा मी लय लहान अशीन. जित काम मिळल तीतच माझा बा खोपट रोवायचा. काम सुटलं की परत नव गांव. असं फिरत फिरतच मी सात-आठ वर्साची झाली. बानं असच खोपट रोवल्याल शेताच्या बांधाला... त्याच शेतावर माय अन बा कामाला जायचीतं. दिस भर, मी खोपटात एकटीच लहानग्या भावाला सांभाळत बसायची. आज्जी कवा कवा, यायची अमच्यासंग ऱ्हायला. पर, लय दिस ऱ्हायची न्हाय कवातरच. मी बाळाला चारायची भरवायची खेलावयाची... रानात फिरवून आणायची... आय घरला यीसतवर चूल पेटवून भात बी ठीवाची. लय छान जायचा दिस... बाळासंगती. सांच्यापारी आय लौकर आली तरीबी बाला उशीर होयाचा. मग रातच्या पारी कवा कावा लै उशीरान बा झिंगत येयचा.
मग बाचं आन आयचं भांडान लागायचं.

पर बावर काय बी फरक पडायचा न्हाय. तेच पिणं हाय तसंच सुरु व्हतं. पिण्याच्या संगतीनं बाची गावातल्या... राजुकाका बर वळक झाली. आत्ता, बाला चालायला यित नसलं की राजुकाका बाला घरापातुर पोचवायला यायचा. राती उशीर झाला की जेवायचा बी आन आयच्या डोक्यात बाबद्दल कायबाय शिकवत रहायचा. आय बी तेच्या शिकवणीन बा संगती भांडायची तेंची भांडण अजून वाढायची. राजूकाका कवा कवा बा नसताना पण घरी येयचा. आय तेला च्या पानी देयाची. राजुकाका आल्याबद्दल कुनालाच काय तक्रार नव्हती. राजुकाका येताना लय खाऊ आणायचा. बाळाला राजुकाका फिरायला नेयाचा...... तो आला कि बाळ खुश होयचा.
मग, हळूहळू राजुकाका आय आणि बा दोघांच्या बी जवळचा बनला. कधी कधी बाळाला फिरवायला नेयच्या निमित्तान तो आय अन बा नसताना पन घरी येयला लागला. बाळाला फिरवून खाऊ देऊन घरी आणून सोडायचा. माज्यासाठी बी खाऊ आणायचा. मग रोज राजुकाकाच येण सवयीच झालं. एकटीला कट्टाळा येयाचा. बाळ पण आत्ता ऐकायचं न्हाय. तेला बी राजुकाकान फिरायची सवय लावल्याली. मदी, काय झालं काय म्हाईत राजुकाकान येणच टाकल. आय आणि बा न पण तेची आठवान काढली नाय.
मी नाय तर बाळानबी तेची आठवान काढली कि आय चिडायची. म्हणायची, "जाऊ दे कि गेला तर तिकड, मरू दे. का... तुमच्या खादीसाठन आयला इकतासा?" मी कायच बोलायची नाय.
त्यावर मी अन बाळांन बी तेची आटवान काडली नाय.

एक दिस घरात आय अन बाबी नसताना राजुकाका घरात आला. तेन बाळाच मटामटा मुकं घीतलं. बाळ बी खुश झाला. मग बाळाला फिरवून आणायला गेला. थोड्यावेळानं बाळाला घरला आणून सोडलं. जाताना त्यानं बाळाचा आणि मजा बी मुका घितला. मला जवळ वढून दाबली.  तो गेला.
असच कुणी घरात नसताना तो यायचा बाळाला फिरवून आणायचा आणि मला जवळ बस म्हणायचा... मी जवळ बसली की तो विचित्र हसायचा...

मांडीवर हात फिरवायचा...मला आधी नको वाटायचं....

मी काहीच बोलायची न्हाय.... तेला बी न्हाय आणि घरात बी न्हाय...

हळूहळू त्यची धिटाई वाढत गेली... त्यान माजा पूर्ण ताबा घेतला... मी का गप्प बसली कळाल न्हाय.. मी वात बघायची तो यायची... त्यान मला शब्द दिला व्हता... तो मला इथून कायमची घिऊन जाणार... तेच्यासोबत तो जिथं जाईल तिथं... मला तेच विश्वास वाटायचा...

एक दिवस पोटात दुखायला लागलं... म्हणून आयसोबत दवाखान्यात गेली... डॉक्टर बोलला दिवस गेल्यात... आय तर पाक हादरलीच..... तवा मी फक्त तेरा-चवदा वर्साची अशीन...

आय घरात आली.. मला लय मारलं... "कुठ त्वांड काळ केलंस? तुमच्यासाठी या राक्षसाबरुबर नंदतुय आणि तुमीच असं माझं नाक कापाय निघालासा...." आय हाणून-बडवून घीत लय रडाय लागली...

मी सागीतल राजुकाका माज्यासंग लगीन करतु म्हणालाय... तू नग त्रास करून घिवू..."

आयन फाडदिशी माझ्या कानाखाली एक वाजवली...

त्या हलकट माणसासोबत केलयस व्हय त्वांड काळ... लगीनच करायचं होत तर बोलायचं व्ह्तीस.. दिली असती कि कुटं तरी ढकलून... हे काय करून बसलीस आयुष्याच मातरं... आत्ता कुणाला त्वांड दाखवायचं..?"
त्या दिवशी राजुकाका आला न्हाई... आणि त्यानंतर तो कधीच आला न्हाई... तो कुटं गायब झाला तेबी कळालं न्हायी...

मी बाळंत झालु. वय लहान असल्यान पोर खाली करता येत न्हवतं...

आईची एक लांबची मावशी होती. तिच्या लेकीला मुल होत नव्हतं... मला मुलगा झाल्याला...

तीन आपल्या लेकीसाठी माझ पोरगं  घेतलं आणि त्याला मी सांभाळायच म्हणून मला बी हिथं आणली....
तीन-चार वारंस झाली मी हिथं ऱ्हायला यीवून.

पैलं पैलं हिथं बी लई भ्या वाटायचं... कुणाची ओळख न पाळख.... पॉर सांभाळायचं... रातनदिस जागायचं... पोरा साठनं. वर कामं वडायाची काय लागतील ती...

हळू हळू पॉर मोठ होईल तसं जरा माझी भीती चेपत गेली.

दीड वर्षाचं झाल्यावर त्याचं दुध बंद केलं... आधी पॉर प्यायासाठी लुसुलुसू करायचं... रातचं ते माझ्याजवळच असायचं पन तेच पिणं बंद करून आक्का त्याला आपल्या पोटाजवळ घिवून झोपाय लगली...
मला एकटीला झोपायबी लई भ्या वाटायचं...

एक दिवस ..... झोपेत अचानक अंगावरनं काय तर सरपटल्या गत झालं... दचकून उठले तर... दाजी हुततं....
"सरे, तुला बघून लय चेकळाय व्हतय... तुझी अक्का घेती त्या पोराला पोटासंग... आत्ता तू मला घी..."
मी घाबरलेली....पण त्यांच्यासमोर माझं काय बी चाललं न्हाय... आता रोजच दाजी माझ्याजवळ आणि पॉर अक्काजवळ. असाच शिरस्ता पडल्याला.

आक्काला सगळं कळंत हुतं पर ती मुद्दाम दुर्लक्ष करायला लागली.... तिला फकस्त ते पॉर जवळ असलं की, झालं.
मला पण दाजींची सवय झाली....न्हाय तरी आत्ता माझ्याच पोराला ते आपलं पॉर म्हणून सांभाळत्यात. मी पन सगळं आलबेल असल्यागत वागू लागली....

अक्काला माज्या बद्दल आन दाजींबद्दल कायबी तक्रार नव्हती. सगळं कळून पण ती न कळल्यागत करायची...
दाजी मात्र माज्यावर खुश असायचंत.

बगता बगता असाच वरीस दीड वरीस गेलं. पोराला आत्ता आक्काच तेची आय वाटायची. मला ते 'सरी'च म्हणायचं. आक्काला 'आय' आन दाजीस्नी 'बाबा' म्हणायचं... दोघबी तेला लय जीव लावीत होते. दाजींनी मातर मला संगीतल्यालं, "तू पोराच्या लय जवळ जायचं न्हाय... त्या सुशीला हौस हाय पोराची ती बगल तेला... बगीतलस न्हवं किती जीव लावती तेला... हे बघ अजून थोडं दिस गेलं की तुज्या लग्नाचं कायतरी बगायला यील. म्हणजे तुझा बी जीव मोकळा आन आमचा बी. पोरासाठी झुरत राहिलीस तर आमच्या जीवाला बी घोर आणि तुज्या जीवाला बी.... कसं?"

आक्काला काहीच कसं वाटायचं न्हाय याचं मलाच आक्रित वाटायचं.... तिचं काय जात होतं म्हणा... कितेक द्याव-धरम केलं, दवाखानं केलं... तरी पंधरा वर्ष झाली घरात पाळणा हलला नव्हता.
सासू सासरं तर तिला वांझोटी म्हून त्वांड बी बगत नव्हते तिचं... दाजींनी बी कवाच टाकून दिल्याली... फक्त छपार होत डोक्यावर आणि राहिली कशीबशी तग धरून म्हनून  टिकली.  बाकी दाजी सगळं येव्हार तिलाच विचारून करत्यात. फकस्त रातच मातर तिच्याजवळ जायचं न्हाईत. दोघांच नेमकं कशात बिनसल्यालं म्हाईत नाय....

पन मला बी लई जीव लावत्यात दाजी ... एकीकडं जीव लावत्यात आन दुसरी कडं माज कुठंतर जुळवून द्याय पायजे बी म्हणत्यात... पन मला कळत नाय आत्ता दुसरीकडं कुटं जुळवायची काय गरज!
 कशाला कुटं माझ लगीन कराय पायजे? हितच ऱ्हाईन की, आत्ता र्हातोय तशी... माझं बाळ बी र्हाइल माज्या डोळ्याम्होर... पर... दाजींच्या समोर बोलायची हिम्मत होत न्हाय...

दुसरं घर दुसरा माणूस! कसा आसल?... कसा र्हाईल? कसा वागल?.... कदीकदी आसं इचार मनात आलं की भ्या वाटायचं... परत नवा डाव... परत नवा गडी... परत नवं सपान...
किती येळा जीव गुंतवायचा आन किती येळा जीव मारायचा....

दाजीस्नी सोडून, पोराला सोडून, दुसरीकड जीव कसा लागल? पर... माज्या जीवाची पर्वा हाय कुणाला हिथं... कोण हाय माझं हिथं....  मजा इचार करणारं....

"ये सरे काय ध्यान लावून बसलीस... दाजी कदी गेलंतं तुझं?" अक्का परत आली....

"झालं की आर्दा तास.... "

"मग अजून बसलीस व्हय तशी! जेवान घालायचं न्हाय का चुलीवर? तासाभरात दाजी परत येतील.... त्यास्नी काय वाडायचं?" अक्का खेकसली... तिला काय झालंय काय म्हाईत आजकाल अशीच खेकसत असती....

का? ते कळत न्हाय.... मी काय सोत्ताहून आले नाय या घरात... या घराला या घराच्या वंशाला दिवा हवा होता म्हून आली. मी सोत्ताहून दाजींना फशी पाडलं नाय... तेंना वाटलं म्हून मी गुंतली... एकबी दिवस मी माज्या मनाचं जगलेली नाय. एकबी दिवस मी पोराला आयच्या मायेनं जवळ घितल्याल नाय..... तेला पोटासंग घिऊन तेच मटामटा मुकं घीताल्याल नाय... माज्या डोळ्यासमोर माज्या पोराला माज्या पासून तोडलं पन गप्प गुमान गिळलं सगळं...!

"ये उठ, बस्सं झालं व्हाय ते तसं ध्यान लाऊन बसायचं... चित्त हाय का जाग्यावं? का गेलं आणखीन कुणाच्या मागनं?" अक्का परत खेकसली.

"तुला हाय की ठावं कुणाच्या मागनं गेल्याल?"

"सरे, आसरा दिला म्हून तू लयीच हातपाय पसराय लागलीस... हे बग सुदिन ऱ्हा सांगून ठीवतु.... नाय तर लई वंगाळ हुईल.."

मी दाताव दात घट्ट आवळलं, आवंढा गिळला आन कामाला लागलु.....

सयपाक झाला... बाळाला अक्का भरवत होती...  मला कदीकदी भरवू दिलेलं नाय... मला कदी तेच्याशी बोलू दिलेलं नाय... मी कायम तेच्या पासनं दूर र्हायाचं...

आक्का पण जेवून झोपून गेली... दाजी अजून घरात आलं नव्हतंत....

ते कदीच लवकर येत न्हाईत...

मी वाट बगत बसली.... रोज मीच वाट बगती... आज पण मी वाट बगत बसली... रोजच्यावानी... रोजच्यावानी ते आलत, जेवलत. मी सगळ उरकून अंथरुणावर पाट टेकली...आन रोजच्यावानीच ते जवळ आलत.... रोजच्यावानीच तेंचा हात सगळीकडन फिराय लागला... रोज मला दाजींचा हात पायजे पायजे वाटायचा... पर आज मला तो हात नको होता... मी दाजींसनी ढकलून लावलं...

दाजींनी माझा हात धरला आणि सर्रकन जवळ वडली...

दात वठ खात दाजी चवताळल्यागत म्हनलंत ..."माज चढला काय लई... मला ढकलून देतीयास....रांड.... पदर आला न्हाय तवर पोटुशी झालीस... आमी आसरा दिला म्हनून चार घास सुखाचं खातीयास... आन आत्ता खाऊन खाऊन माज चढला व्हय तुला?"  

"काय केलं म्या?"

"आवाज चढवतीस माझ्यावर?" अस म्हणत दाजींनी एक मुस्काट मारली...

आणि अजून पिसाळल्यागत तेनी माज तोंड दाबून धरलं.... माज्यावर जबरदस्ती केली.... अंग सगळं सोलून काडल्यावानी भगभगाय लागलं.... काल पर्यंत फुलासारखा जपणारा माणूस आज एक एक पाकळी चुरडून टाकत होता. आज तेच्यातला राकुस जिवंत झाल्ता.

मद्यान रातीला कादितर दाजी उटून गेलं असतील... पहाटचा गार वारा जरा जरा झोम्बायाला लागला. अंगावरची साडी पण सरळ करायला जीव ऱ्हायला नव्हता अंगात. डोळ्याला जडपणा होता...पण थंडी तर झोंबायला लागल्याली. उठून कशीबशी वाकळ अंगावर घेतली....

डोळं परत मिटलं....

सगळी कडं आग लागल्याली गावातली सगळी मानस पळत हुती वाट दिसल तिकडं..... मी एकटीच व्हते.... आणि माज्या कखत माझं बाळ.... मला पण पळायचं हुत लई जोरात पळायच हुतं....पर पर....पाय उचलत नव्हतं काखतलं बाळ माज्या चेहऱ्याकडं टकाटका बघत हुतं रडत हुतं.... आणि मला जरा सुद्धा हलता येत नव्हतं जागचं.... मी सगळा जीव एकवटून अगदी जोर लावून पळायला तयार झाली..... मी उठली धडपडत.... बघते तर मी तिथंच व्हते.... पायात जीव नव्हता... अंगावर कूटकुट वर्बाडल्याल.... रवंक वाडल्याल ठसठसत हुतं.... मला धड रडायला पण यीना आणि धड गप्प पण बसवणा.... अंग थरथरत हुतं, पोटात आग पडल्याली, काळीज इतकं वर उडत हुतं ... समोर बगनार्याला पण दिसलं असतं ते. सपान हुत ते.... पर, आता खरंच समद्या आयुष्याला वणवा लागल्याला.... मला वर उठायचं व्हइल का यातनं?

थोड थोड उजाडलं तवरच मी उठून अंगुळ केली आणि माज्या कामाला लागली.... माज्या डोक्यात मातर इचार घुमत व्हता.... का वागलं दाजी आसं माज्यासंग? म्या तर वागतच हुतो तेंच्या मनासारखं मग कशात बिगाडल गणित?

जेवण उरकत आलतं. आक्का उठून आली. तिनं माज्याकड डोळ मोट करून टक लावून बघितलं.
मी खाली मान घातली.

"अवसान पाक घाळलंय आज? का गं काय दुखतंय बिखतंय काय? अशी का पार मरायला टेकलीयास?"
आक्कानं विचारलं.

"काय नाय."

"आत्ता गं बया आवाज बी पार खोल गेलाय.... झालं तर काय म्हणायचं फुरफुर उडत्याल्या चिमणीला आज?"
मी मुकाट्यानं बसले. ती उगाच इकडून तिकडून घेर्या घालत व्हती... "काय ग अंगावर अस मारल्यावणी आणि वर्बाडल्यावाणी वळ कसलं गं?"

माझ्या काळजात चर्र झालं.

मी म्हंटल, "मी जरा बाहीर जाऊन यीती..." ताडकन उठली खरी पर... बाहीर म्हंजी मी जाणार तरी व्हती कुटं? कव्वा कव्वा घराचा उंबरा वलांडला नव्हता आल्यापासून. का कुणा शेजार्या पाजार्याची सकट वळक नव्हती.
पन मी उटून सोप्यात आली. दाजी जागं झाल्याचा आवाज आला मला. पायात साखळ्या बांधल्या गत झालं. मी माज्या पडवीत आली. डोळं भरलं हुतं पर थेंबास्नी वाट घावत नव्हती.....

दिवस कसा बसा गेला.... आत्ता रात्र अजून काळीकुट्ट वाटाय लागली..... कालच्यासारखंच! मन उगीचच दचकाय लागलं... वाटत हुतं.... रातीनं थोडं सावकास वर यावं .... मला कुटंतरं गडप व्हायला आधार घावावा....

जिमनीला तरी उमाळा फुटावा... पाय आपसूक लाटपटाय लागलं. हातात, उरात थरथर भरली.... वाटंत हुतं डोळं गपकन मिटलं तरं बरं हुईल...

थंडी अजून बोचत व्हती... अंथरुणावर पाट टेकायचं धाडंस हुत नव्हतं.... तरी पण टेकली....
सावकासानं झोप लागली.

सकाळी उजाडलं.... तवाच जाग आली....

उठून कामं उरकायला लाग्लु.

आक्का आली थोड्या वेळानं.  तिनं आपलं आवरलं, बाळाला आवरलं, तेला चारलं आणि निघाली.... आज तिनं आवडीची जरी काटाची हिरवी साडी नेस्ल्याली....कासोटा घालून. कायम कासोटाच घालती खरं. नवी साडी? बाळाला पण छान डीरेस घालून तयार केला... कुणिकड निघाली व्हती का कायकी...

"सरे! आमी तुज्यासाठन जागा बगाय चाललोय.... जरा उशीर झाला तर ठरवूनच यीन..." एवढच बोलली दाजी आवरून कवाच बसल्यालं मला कळाल सुदिक न्हाय...

मी तोंडाला पट्टी लावल्यागत गप्पच बस्लु.

'जागा....जागा....एवढच घुमत व्हत डोस्क्यात...हितनं गेली कि माजं बाळ मला पुना नजरेम्होरं दिसणार न्हाय... माजा जीव तुटत ऱ्हायल त्याच्यासाठन... डोळ्यातलं पाणी गालावर आल.

मला न्हाय करायचं आता लगीन. न्हाय बसवायचा पुना नवा संसार... नाय गुतवायचा पुना जीव कुणात... आपल्या जीवाची कुनाला कदर नसणार आन....

संध्याकाळ व्हायला आली तरी... या दोघांचा पत्ता नव्हता...

म्हंजे.... छातीचा भाता वरखाली वरखाली व्हायला लागला....

दिवं लावलं.... कसाबसा आर्दा-निम्मा स्वयपाक उरकला...

दारातनं घरात, घरातनं दारात येरझाऱ्या घालून पायाला गोळं आलं.

गाडी घराम्होर थांबल्याचा आवाज आला. दोन गडी मानस गाडीतन कायबाय सामान उतरून घरात ठीवत व्हतीत... मागनं आक्का आली... लई खुश दिसत व्हती म्हंजी...? मी आवंढा गिळला.

"सरे, आत ये.... " अक्का घरात जाताजाता म्हणाली.

हे बग तुज्यासाठी नवी साडी तयारच ब्लाउज आन... समद समान आणलंय लागल ते. पटदिशी तयार हो... नवर्या मुलाकडची मंडळी येत्याल आत्ता रातीचाच मुहूर्त ठरीवलाय.

कंबार पार घळल्यावाणी झाली.... काय तयार व्हणार...?

उर बडवून रडावं वाटायलं.... आरडून आरडून दंगा करावा  वाटायलं न्हाय करायचं मला हे लगीन...

पर, दाजी आलंत अन तेंच्या डोळ्यात बगूनच मला कळलं, आता या घरात मला थारा नाय... ते जिकडं वाट दाकवतील तिकडं पाउल टाकणं भाग हुतं...

मी तयार हून मांडवात गेली... नवरा मुलगा... धडधाकट दिसत व्हता... लगीन लागलं आणि रातोरात माझी वरात दुसरीकड पोचली... पाच दिवस कौतुक करण्यात गेलं.

नंतर नव्याच नवं दिवस सावकासानं कमी व्हायला लागलं. घर मोठं होतं. दोन भाऊ तीन बहिणी. समद्या बहिणीची लग्न झाल्याली. आमचं ध्यान ते धाकटं. पंधरा दिस झालं पर तो काय जवळ आला नव्हता का मला तेच्या जवळ जाऊ दिलं नव्हतं. नाही तरी मी कुट खुशीन लगीन करून अल्याली पर, तरीबी मला काय तरी खटकत हुतं.

सासू सारखी माग माग करायची. सारखी कामात गुतावाची रातच्याला सोत्ताहून माज्या बाजूला येऊन झोपायची... नवरा दिवसाच कदी दिसलाच तर फक्त हसायचा... असाच दिवस जात हुतत...

मला पोराची आठवण येत हुती पर सांगनार कुनाला? त्यो नवरा काय तोंड सुदिक दाखवत नव्हता... दिसदिस भर नुसतं शेतातल्या घरात असायचा आन रातच्याला कुट असायचा तेच तेलाच म्हाईत... कुनासंग बोलन नाय चालन नाय नुसतीच आपलं धंदा वडायला अनल्याला गड्या गात कामं तेवडी करायची बाकी कुणाला काय इचारायचं नाय. जाऊ सुदिक कदी तरच चेष्टा-मस्करी करायची. तेबी सासू सासरा दीर कुनी घरात नसलं तर. असलं कुनी की ती बी परक्यासरखं करायची. पर तिला बी काय इचारायचं धाडस व्हायचं नाय.

अक्काला कदी तरी वाटंल मला बगायला यावं आन ती पोराला घिवून यील असं सारखं वाटायचं पर मला लगीन करून दिल्यापास्न ते इकडे फिराकले बी न्हाईत.

बगता बगता वरीस गेलं... अजुनबी नवरा एकीकडं आन मी एकीकडं असंच चालल्यालं. एकदा शेणाची पाटी घिवून मी माळाला चालल्याले.  शेजारची शांताबाय दिसली रस्त्याला. जाता जाता थांबली ती, "काय नवं-जुनं काय केल्यास काय नाय गं पोरे." तिनं विचारलं. मी आपली मान हलवत नाय म्हून सांगितलं. एवढ्यात मागनं सासू आली.

"काय म्हणत व्हती गं ती शांती?," सासूनं विचारलं.

”नवं-जुनं काय झालंय का न्हाय विचारात व्हती."

"हं, असू दे नवं-जुनं कराय हरखल्यालीस म्हाइती हाय, आदी शानपनाच्या चार गोष्टी शिक. नवं-जुनं करायला मस्त जल्म पडलाय." सासू फणकारली.

मी फक्त डोळे वर करून बघितलं. काय सुदिक बोलली न्हाय. नाय तरी गुरावानी काम करायचं आन चोरावानी खायचं एवढंच तर आपलं काम.

सासू घरात आली. मी पन आली तिच्या मागून. घराच्या माग गेली. हात-पाय धुतलं. चूळ भरली. चार घास पोटात घालायचा वकूत झाल्याला. स्वयपाक घरात काय हाय का ते बघितलं. शिळ कालवण आन अर्दीच भाकरी व्हती. दोनी कुस्करलं आन पोटात ढकलल. तेवढ्यात सासू आलीच मागून, "जेवली असलीस तर जरा माडीवर ये काम हाय." एवढ बोलली आन ती निघून गेली.

पुढ्यातलं ताट उचलून बाजूला सारलं. आन निघाली तिच्या मागून. जिन्यावरून वर गेली. वर सासू-सासरा आन थोरला दीर तिघाबी व्हते. मला कळाल नाय काय झालंय नेमकं. तिघंच एकदम काय काम आसल?

सासरा म्हणाला "हे बग सरे आमच्या पोराला पॉर हुणार न्हाईत अमला म्हाईत होतं. आन तुज्या अक्काला आन दाजीला बी अमी हे लग्नात संगीतल्याल. त्यांनी आम्हाला शब्द दिलता की आमची पुरगी काय बी बोलणार नाय. तिला असारा मिळाला की झालं. बिन आय बाच लेकरू हाय ती. तवा तुमीच आय-बा व्हा तिचं."

हे ऐकून तरी माजं टकूरंच फिरलं. बिन आय-बाची मी? कसं सांगितलं ह्यांनी असं. एक येळ आली म्हून मी गप्प बसली पण ह्यांनी तर अगदीच मला मुकी समजूनच सगळा सौदा केला.

"हे बग पण त्याचा वारस पुढं चालला पायजे तवा तू का-कु न करता या दीरा बरुबर संबद ठीउन एक नातू दे आमाला. ह्याला आन ह्याच्या बायकोला पन काय तर्रास नाय व्हायचा एक पॉर झालं की, आनी काय पायजे? डोकं शांत ठिवून विचार कर... पोराबाळाची बी व्हशील आन संसार इज्जत सगळच शाबूत राहील. आमची बी आन तुजी बी.

खाली मान घालून ऐकून घेताना उरात नुसती इंगूळ पेटल्याला. म्हंजी मी माज्या मर्जीन कुणाबर झोपालू तर मी रांड आन हे ठरवतील तेच्या बरुबर झोपलं तर मी पतिव्रता.

डोकं भणभनायला लागलं. एवड बोलून सासू-सासरा तिथन उटून गेलत. आता माडीवर मी आन त्यो दीर दोघंच हुतो... इचकट हासत.... त्यो माज्या जवळ जवळ याय लागला..... जवळ जवळ अजून जवळ आला..... माज्या सगळ्या अंगाचा इंगुळ झाल्याला. या हलकट मानसाला जाळून राख करून टाकावं वाटायला लागलं..... माडीवर सासऱ्याची खोली होती.... शेतीचं-भातीच बरंच समान तिथच ठेवल्याल व्हत.

तो जवळ यील तसं मी माग माग सरकत चालली. सरकत सरकत सरकणार तरी कुट. वर्डून बोंबलून आवाज देणार तरी कुणाला.... कुंपणच शेत खायला उटल्यावर कुणाला बोलून फायदा काय? एक तर मुकाट्यान सगळं सहन कराय पायजे नाय तर... नाय तर....

मजा पाय कशावर तरी पडला आन मी आडकली....

त्यो दीर म्हणणारा हासत, दात इचकत काय बाय बरळत येतच होता.... माज्याकडं....

माज्या पायात.... जे काय होतं ते उचललं... तो जवळ आला माज्या अंगाला हात लावणार तोवर .....

त्याच्या डोस्क्याच तुकडं पडलं..... व्हाय मीच पाडलं... कुणाची दासी व्हायची नाय आत्ता मला....माजा पाय कोपर्यातन सरकलेल्या कोयत्यावर पडल्याला तोच उचलून घातला तेच्या डोस्क्यात....

या म्हणावं आत्ता मला रंडी म्हणायला....

© मेघश्री श्रेष्ठी-नाईक.

Post a Comment

4 Comments

सरीची दुखरी कहाणी खूप काही सांगून जाते...भारतीय समाजात बाईला काय स्थान आहे, याचा उलगडा या कथेतून होतो. मेघश्री श्रेष्ठी यांच्या कथा खुपच वाचनीय असतात..ही तर कादंबरीच वाटली. खूप छान...वास्तविक.
Meghashree said…
धन्यवाद, डॉ. मारोती कसब सर....
खूप सुंदर ....!