शांत राहण्याच्या या फायद्यांकडे बरेचदा आपलं दुर्लक्ष होतं.


शांत राहण्याचे पण काही फायदे असतात. पण सध्याच्या काळात शांत राहणे म्हणजे दु:खी असणे असा एक विचित्र अर्थ लावला जात असल्याने कुणालाच शांत राहू वाटत नाही. सतत काही ना काही करत राहिल्याने आपल्यातील जिवंतपणा, उत्साह, टिकून राहील किंवा या गोष्टींमुळे आपण इतरांना आकर्षित करतो असं अनेकांना वाटत असलं तरी हे चुकीचं आहे.  मोबाईलची रिंगटोन, सतत ध्यान खेचणारे नोतीफिकेशन्स, स्क्रोलिंगचे वाढलेले प्रमाण, अपडेट राहण्याची तीव्र गरज, अशा अनेक कारणांमुळे आपलं लक्ष सतत विचलित होत राहतं. 

आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाचा शो ऑफ करण्याच्या या चढाओढीत सगळ्यापासून दूर जाऊन शांत रहाणं सोपं नाही. पण प्रयत्न केल्यास अशक्यही नाही. शांत राहिल्यानं आपलं मन अधिक एकाग्र होतं. आपल्यातील कल्पकता वाढते. नवनव्या गोष्टी सुचू लागतात. काम करण्याचा उरक आणि क्षमता वाढते. कामातील चुका कमी होतात. कंटाळा कमी होऊन काम करण्याचा उत्साह वाढतो. शांत राहण्याचे भरपूर फायदे आहेत.

शांत राहण्याचा आणखी एक फायदा म्हणजे स्वतःचे परीक्षण करता येते. स्वतःबद्दल अधिक विचार करता येतो. यामुळे इतर लोकांशी जुळवून घेण्याची, त्यांना समजून घेण्याची क्षमताही वाढते. शांत राहण्याचे नेमके फायदे जरा विस्ताराने पाहुयात.

तणाव कमी होऊन निवांतपणा मिळतो – 
आजूबाजूला गोंधळ किंवा गोंगाट असेल तर आपला तणाव वाढतो. गोंधळाला प्रतिसाद देण्याची आपल्या शरीराची ती स्वाभाविक क्रिया आहे. शिवाय, सतत माहितीचा होणारा मारा यामुळेही आपला तणाव वाढतो. संप्रेरकांचे कमी जास्त होणारे प्रमाण आपल्या मानसिक शांततेसाठी हानिकारक ठरते. आपल्याला मिळणाऱ्या माहितीवर आपला मेंदू आणि मन काहीना काही प्रक्रिया करत राहतात. आपण संवाद साधत असतो तेव्हाही आपल्या मेंदूला मिळणाऱ्या संदेशाचे विश्लेषण करावे लागते. ज्यामुळे तणाव वाढतो. शांतता असेल तर मन आणि मेंदू दोन्हीही आपोआप शांत होतात. शरीरातील स्नायू देखील शिथिल होतात. 

आपल्या आजूबाजूला जेव्हा गडबड गोंधळ चालू असते तेव्हा आपले शरीर तणावाला प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत जाते. आजूबाजूला फारच गोंधळ किंवा मोठा आवाज असेल तर आपल्या हृदयाच्या ठोक्याची गती वाढते. या उलट शांत वातावरणात शरीर शिथिल होते. तणाव निवळतो आणि मनालाही शांतता मिळते. शांत वातावरणामुळे गाढ झोप लागण्यास मदत मिळते. एकंदरीत शारीरक आणि मानसिक आरोग्यासाठी शांतता अधिक फायद्याची ठरते.

घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी ठराविक वेळेसाठी घरातील फोन, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बंद ठेवा. त्यामुळे घरात शांतता निर्माण होईल. घरात शक्य नसेल तर काही वेळ घरापासून दूर शांत वातावरणात जाऊन बसा. यामुळे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानेही मन अधिक शांत होते.

कल्पकता आणि समस्या निराकरण कौशल्य विकसित करण्यासाठी फायदेशीर – 
शांत वातावरणामुळे आपल्यातील कल्पकता आणि समस्या निराकरण करण्याची क्षमता वाढीस लागते. गोंधळ आणि गोंगाटाच्या वातावरणात फोकस करणे अवघड जाते. शांत वातावरणात मात्र आपण एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करू शकतो. शांत एखाद्या समस्येवर लक्ष देऊन विचार केल्यास त्यावर काही मार्ग सापडू शकतो. 

शांत वातावरणात आपण चांगल्या प्रकार आत्मपरीक्षण करू शकतो. स्वतःच्या विचारांवर फेर विचार करणे, त्याकडे तटस्थपणे पाहणे, शक्य होते. समस्येकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. आपल्या विचार आणि भावनांकडे अधिक एकाग्रतेने लक्ष देता येते. आलेल्या अनुभवातून आपण काय चुकलो हे अशा वातावरणात अधिक स्पष्टपणे जाणवते. ज्यामुळे आपल्या हातून होणाऱ्या चुका टाळून अधिक योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. 

एखाद्या विशिष्ट प्रोजेक्टवर काम करताना याचा फायदा होऊ शकतो. कामातील उरक आणि परिणामकारकताही वाढते. शांत वातावरणात विचारमंथन करण्याच्या प्रक्रीयेलाही गती आणि योग्य दिशा मिळते. स्वतःतील कल्पकता, निर्मितीक्षमता आणि निर्णयक्षमता सुधारण्यासाठी किंवा यांचा अधिक चपखल वापर करण्यासाठी शांत वातावरण अधिक उपयुक्त ठरते.

एकांतामुळे संवादक्षमता सुधारते
एकांतात आपण स्वतःबद्दल आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल अधिक स्पष्ट विचार करू शकतो. काही काळ शांततेत गेल्यानंतर आपली संवाद साधण्याचे कौशल्यही सुधारते. नेमके आणि माफक बोलण्याची सवय लागते. बोलताना आपला आणि समोरच्याचाही गोंधळ उडत नाही. संवाद साधत असताना बरेचदा आपण समोरच्याला नेमकं काय सांगायचं आहे, ते लक्षपूर्वक ऐकून घेत नाही. त्यामुळे गैरसमज, तणाव वाढतात. हे गैरसमज नात्यासाठी हानिकारक ठरू शकतात. 
उलट शांत राहण्याच्या आणि अधिक लक्षपूर्वक ऐकून घेण्याच्या सवयीमुळे समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यास मदत होते. यामुळे आपले वैयक्तिक, व्यावसायिक, कार्यालयीन नातेसंबंधही अधिक दृढ होण्यास मदत होते. शांत राहण्याच्या सवयीमुळे समोरचाचे बोलणे अधिक लक्ष देऊन लक्ष विचलित न होता ऐकून घेण्याची सवय लागते. यामुळे समोरच्याबद्दलची सहानुभूती वाढते. एक उत्तम श्रोता होण्यासाठी या गोष्टी फारच उपयुक्त ठरतात. तुम्ही जर समोरच्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले तर तुमच्यातील बॉंड अधिक स्ट्रॉंग होऊ शकतो. 

कामाचा उरक आणि परिणामकारकता वाढते 
सध्याच्या काळात लक्ष विचलित करणारी अनेक साधने आपल्या आजूबाजूला आहेत. एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याचे स्कील उपयोगाचे वाटत असले तरी त्याचा कार्यक्षमतेवर, कामाच्या क्वालिटीवर परिणाम होतो. उलट एकावेळी एकच काम केल्याने त्या कामातील प्रभावीपणा वाढतो. शांत वातावारणात आपली एकाग्रता आणि एकावेळी एकाच कामाला प्राधान्य देण्याची सवय लागते. मन शांत असेल तर आपले कामातील लक्ष विचलित होत नाही. त्यामुळे काम लवकर उरकते, कामाचा कंटाळा येत नाही आणि कामही चांगले होते.
उलट गोंधळ आणि गोंगाट असलेल्या ठिकाणी आपण एकाग्रता करू शकत नाही. मन सतत भरकटत राहते. ज्याचा कामावर परिणाम होतो. आपले ध्येय लवकर पूर्ण करण्यास या गोष्टी अधिक फायदेशीर ठरतात. 

गाढ झोप लागण्यास मदत होते 
आजूबाजूला गोंधळ असेल तर बरेचदा आपल्याला गाढ झोप लागत नाही. शांत वातावरणात मात्र लवकर आणि गाढ झोप लागते. ज्यांना रात्री झोप न येण्याचा किंवा निद्रानाशाचा त्रास आहे अशा लोकांनी झोपताना आजूबाजूला शांतता असेल याची खात्री करावी. झोप जर व्यवस्थितरित्या पूर्ण झाली तर आपला उत्साह दुणावतो. काम करण्याची क्षमता सुधारते. मेंदूला पुरेशी विश्रांती मिळाल्याने लवकर थकवा किंवा कंटाळा जाणवत नाही. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी जास्त वेळ आणि गाढ झोप आवश्यक आहे. 

जागरूकता किंवा वास्तवभान वाढवण्यास मदत
शांत वातावरणात आपण अधिक सजग होतो. ध्यान धारणा सारख्या मानसिक स्थिरता देणाऱ्या क्रिया करण्यासही शांतता उपयुक्त असते. मन शांत आणि स्थिर झाल्याने तणाव निवळतो. मूड सुधारतो. चिडचिड कमी होते. हार्मोनल बॅलन्स साधण्यात या गोष्टी सहाय्यभूत ठरतात. शांत वातावरणात आपल्या भावना, विचार आणि सभोवतालचे वातावरण याबद्दल आपण अधिक जागरूक राहतो. एखाद्या प्रसंगाला प्रतिसाद देताना अनावधानाने क्रिया करण्याऐवजी आपण सावधपणे प्रतिसाद देतो. ज्यामुळे परिस्थिती न चिघळण्याऐवजी आटोक्यात राहण्यास मदत होते. शांत वातावरणात आपण समोरची परिस्थिती अधिक चांगल्याप्रकारे हाताळू शकतो. 

अध्यात्मिक प्रगतीसाठी पोषक
शांत वातावरणात आपण स्वतःशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होतो. स्वतःबद्दल अधिक चिकीत्सक आणि जागरूक होतो. ध्यान करताना अधिक एकाग्र होतो. मन अधिक स्थिर आणि शांत होते. आपली विचारप्रक्रिया, आपला पिंड कसा आहे हे समजून घेण्यासाठी शांत वातावरण गरजेचे असते. अशा वातावरणात आपले उद्दिष्ट, आपले ध्येय अधिक स्पष्ट होते. आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने प्रवास करण्याची योग्य दिशा सापडण्यास मदत होते. आपल्या आयुष्याचा उद्देश काय, हे जाणून घेण्यासाठी शांत वातावरण अधिक उपयुक्त ठरते. यामुळे आयुष्यात अधिक समाधान, आनंद आणि परिपूर्णतेची जाणीव होते. 

शांतता आपल्यासाठी किती आवश्यक आहे हे आता तुम्हाला समजले असेल. बरेचदा आपण स्वतःपेक्षा इतर गोष्टींना इतके प्राधान्य देतो की स्वतःसाठी आवश्यक असणारी गोष्ट कोणती हेही कळत नाही. शांत वातावरण स्व-प्रेमासही अधिक सहाय्यभूत ठरते. स्वप्रेमासाठी शांत वातावरणात वेळ घालवणे ही एक अनिवार्य बाब आहे. 

शांत राहण्याकडे आपण बरेचदा दुर्लक्ष करतो. पण त्यामुळे आपण स्वतःचे किती नुकसान करतो हे आपल्यालाच समजत नाही.

Post a Comment

2 Comments

धावपळीच्या जीवनात शांततेचा आनंद हरवला आहे. शांत राहिल्याने इतके फायदे होतात हे कळल्यावर तरी किमान आपण शांत राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
Anonymous said…
खूप छान व उपयुक्त लेख, धन्यवाद