तुमच्या नात्यात या गोष्टी असतील तर तुमच्या जोडीदाराशी असलेलं तुमचं नातं आणखी दृढ होऊ शकतं.

नात्यात वाद-विवाद, मतभेद, रुसवे फुगवे, राग हे होतंच राहतं. या सगळ्या दुविधांच्या पलीकडे जाऊन नातं अधिक दृढ आणि बळकट करायचं असेल तर नात्यासाठी आवर्जून वेळ द्यावा लागतो. जोडीदाराशी जुळवून घेणं, त्याला समजून घेणं, त्याला वेळ देणं, एकमेकांच्या अडचणी, समज गैरसमज शेअर करणं, त्याबद्दल बोलणं, एकमेकांना मदत करणं, मार्ग काढणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सुखी संसारासाठी याच गोष्टी फार महत्वाच्या असतात. आर्थिक स्थैर्य, समाजिक प्रतिष्ठा, मान्यता यांच्याही पलीकडे नात्यात दोघांच एक वेगळं जग असतं. हे जग सुंदर करण्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतात. आता बघूया नातं सुंदर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं उपयुक्त ठरतील.



लक्षात घ्या या सगळ्याच गोष्टींसाठी एकमेकांच्या व्यस्त दिनक्रमातून काही खास वेळ काढणं गरजेचं आहे. आणि हा खास वेळ फक्त याच कामासाठी वापरायचा, हे लक्षात राहणंही गरजेचं आहे. नातं टिकवणं ही कुणा एकट्याची जबाबदारी नसते. यासाठी दोन्ही बाजूंनी तितकीच ओढ असायला लागते.

डेटिंग – अतिशय मस्त आणि मस्ट अशी ही कल्पना आहे. मुव्ही किंवा डिनर डेट या कल्पना चांगल्याच आहेत. पण याव्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता का? यावरही थोडा विचार करा. म्हणजे जसं की, नदीकाठी फिरायला जाणं, व्हेकेशनवर जाणं, ट्रेकिंगवर जाणं (शक्य असेल आणि दोघांनाही आवड असेल तर) एखाद्या प्राणीसंग्रहालयाला, वस्तूसंग्रहालयाला भेट देणं, एखाद्या अम्युजमेंट पार्कमध्ये वेळ घालवणं, अशा अनेक गोष्टी तुम्ही प्लान करू शकता. यात जोडीदाराचा आणि तुमचा इंटरेस्ट महत्वाचा. फिरण्यासाठी एखादं शहरालगतचं छोटसं ठिकाण निवडू शकता. फिरता फिरता एकमेकांना वेळ देऊ शकता. समजून घेऊ शकता. फ्रेश होऊ शकता.

एकत्र करता येतील अशा काही गोष्टी शोधणे – तुमचे छंद काय आहेत ते जाणून घ्या. त्यात भिन्नता असली तर एकमेकांना येणाऱ्या गोष्टी एकमेकांना शिकवा. जोडीदाराकडून शिकण्याची आणि त्याला शिकवण्याची तयारी ठेवा. दोघांनी मिळून एखादी नवी रेसिपी करण्याचा प्रयत्न करू शकता. एखाद्या रविवारी दोघांनी मिळून छानपैकी घर आवरू शकता. घराचं सेटिंग, इंटेरीअर चेंज करू शकता.

बागकाम आवडत असेल तर बागेत नवीन रोपं लावू शकता. थोडक्यात कुठलंही काम पण ते दोघांनी एकत्र करायचं. काम करता करता एकमेकांना वेळ द्यायचा.




एकमेकांची काळजी आणि सोबत स्वतःची काळजी – जोडीदार म्हणून आपण एकमेकांची काळजी करतोच. पण त्याबरोबर स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे. तेव्हा दोघांनी मिळून व्यायाम, योगासने करू शकता. एकमेकांच्या साथीने निरोगी जीवनशैलीचा संकल्प तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठीही पोषक ठरू शकतो.

काहीही न करता बसून राहणे – छंद, व्यायाम, जेवण, याही पलीकडे जाऊन काही वेळ फक्त एकत्र बसून गप्पा मारू शकता. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता. अगदी पहिल्या भेटीपासून सप्तपदीपर्यंतचा प्रवास, एखादी मागच्या वर्षी केलेली ट्रीप, मुलांच्या पालकसभेतील गंमत, ऑफिसमधील गोष्टी, एकमेकांच्या आयुष्यात नक्की काय चाललंय हे जाणून घेता येईल. शांत बसून गप्पा मारणं, सोबत चहा घेणं इतकी साधी गोष्ट सुद्धा नात्यातील आपुलकी वाढवण्यासाठी पुरेशी असते. अगदी हेड मसाज करत करत ही अशा छान गप्पा होऊ शकतात. हो की नाही?

नातं दृढ करण्यासाठी प्रत्येक वेळी काही तरी रिलेशनशिप गोल्स ठेवले पाहिजेत आणि तो सोशल मिडीयावर पोस्ट केलेच पाहिजेत असं नाही. कुणाच्या तरी सोशल मिडियावरील पोस्ट पाहून जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा बाळगू नका. महत्वाचं म्हणजे जोडीदाराची इतर कुणाशी तुलना करू नका. अनेकदा नात्यात ही गोष्ट एक मोठी दरी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.

खरं नात्यासाठी विशेष दिवस दिला तरच नातं दृढ होत नाही. तर त्यासाठी प्रत्येक दिवस विशेष आहे आणि त्यात आपल्याला आपल्या लोकांसाठी काही वेळ राखून ठेवायचा आहे हे लक्षात घ्या. एकमेकांचे वाढदिवस, अॅनिव्हर्सरी डेट, विशेष प्रसंग हे सगळं लक्षात ठेवून त्यानुसार काही तरी विशेष करण्याचा प्रयत्न करा.

एकमेकांना प्रोत्साहन द्या. एकमेकांच यश साजरं करा. त्याचा आनंद घ्या. कठीण काळात जोडीदाराचं प्रोत्साहन, प्रेम आणि खंबीर साथ याच गोष्टी व्यक्तीसाठी प्रेरक आणि तारक ठरतात. आयुष्यात कुणीतरी आपल्या आनंदात नि:स्वार्थीपणे सहभागी होणारं आहे, हे कळल्यावर व्यक्तीला होणारा आनंद आणखी द्विगुणीत होतो. म्हणून एकमेकांचे आनंद आणि दु:खही वाटून घ्या.

कित्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि काही विशेष क्षण निर्माण करण्याची, आनंद द्विगुणीत करण्याची संधी हरवून बसतो. शक्य असेल तेव्हा तेव्हा हे क्षण पकडण्याचा, त्याच्यासोबत गोड आठवणी जोडण्याचा प्रयत्न केल्यास नातंही बहरून जाईल.

दोघांचे जग सुंदर करण्यासाठी थोडे कष्ट तर घ्यावेच लागतील.

Post a Comment

0 Comments