द अल्केमिस्ट – एका स्वप्न साधकाचा प्रवास

ब्राझिलियन लेखक पाउलो कोएलो यांची 'द अल्केमिस्ट' कादंबरी १९८८ साली प्रसिद्ध झाली. प्रत्येक पुस्तक त्याच्या त्याच्या कुवतीनुसार आपल्याला काही तरी देऊन जातं. तसच हेही एक पुस्तक. आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देऊन जातं. स्वप्न पाहत नाही असा माणूस सापडणार नाही. पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणारी त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणारी माणसं मात्र खूप विरळ असतात. मुळात आपण स्वप्नं निवडतो की स्वप्नांनी आपल्याला निवडलेलं असतं हाही एक प्रश्न आहे. स्वप्न पाहिलेल्या क्षणापासून ते तो पूर्ण होईपर्यंतच्या क्षणापर्यंतचा प्रवास किती अद्भूत असू शकतो हे जाणून घ्यायचं असेल तर ही कादंबरी जरूर वाचा. मूळ पोर्तुगीज भाषेत लिहिलेली ही कादंबरी जगातील अनेक भाषांत भाषांतरीत झालेली आहे. मराठीतही नितीन कोतापल्ले यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे.

Image source Google


या कादंबरीचा नायक एक मेंढपाळ आहे. त्याच्या घरच्यांना वाटत होतं की त्याने धर्मगुरु व्हावं पण सँतीयागो मात्र मेंढपाळ होणाचा मार्ग निवडतो. मेंढ्यामागून फिरता फिरता त्याला भटकंती करायला मिळेल आणि या भटकंतीतून त्याला जगाबद्दलचं भरपूर ज्ञान मिळेल असं त्याला वाटत होतं. त्याच्या वडिलांना मात्र कुणाही सामान्य बापाप्रमाणेच आपल्या मुलानं घर, गाव, आपला प्रदेश सोडून फार दूर जाऊ नये असं वाटत असतं. पण सँतीयागो त्यांची समजूत घालतो. मुलाच्या हट्टापुढे ते हतबल होतात आणि त्याच्या हातावर काही रक्कम ठेवून त्याला घरातून जाण्याची परवानगी देतात. मेंढ्या राखताना, सँतीयागो बरंच काही शिकतो. त्याला मेंढ्यांची भाषा पण समजू लागते. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाताना त्याला मानवी समाजाबद्दलच्याही अनेक गोष्टींचे ज्ञान होते. मेंढ्या आणि पुस्तकं हेच सँतीयागोचं खरं प्रेम. पण एका गावात मेंढ्यांची लोकर विकताना एका व्यापाऱ्याच्या मुलीबद्दल त्याला आकर्षण वाटू लागतं. अखेर एक वर्ष वाट पाहून पुन्हा आपण त्या शहरात जाऊ आणि मग तिला मागणी घालू असं तो ठरवतो. त्याप्रमाणे आता चार दिवसांच्या प्रवासानंतर तो त्या मुलीच्या गावी पोहोचणार असतो.

या चार दिवसात मात्र त्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की तो मुलगी ऐवजी पिरॅमिडच्या मागे दडलेला खजिना शोधण्यासाठी इजिप्तला जाण्याचा निर्णय घेतो. यापूर्वी त्याने कधीही इजिप्त पाहिलेलं नाही. इजिप्त कुठे आहे, तिथपर्यंत कसं जायचं हेही त्याला माहित नाही. पण, तरीही फक्त आपल्याला पडलेल्या स्वप्नावर आणि एका म्हातारी ज्योतिष बाईच्या भाकि‍तावर विश्वास ठेवून तो हा जुगार खेळण्याचा निर्णय घेतो.

 

या प्रवासात सँतीयागोला अनेक माणसं भेटतात. पहिलाच माणूस त्याला भेटतो जो त्याला इजिप्तला नेण्याचे आश्वासन देतो आणि त्याच्याकडचे सगळे पैसे काढून घेऊन पोबारा करतो. एका अनोळखी प्रदेशात, जिथली भाषा, संस्कृती माणसं याबद्दल काहीही माहिती नसताना सँतीयागो तिथे दीड वर्ष राहतो. यादरम्यान एका काच सामानाच्या दुकानदाराकडे काम करतो आणि पुन्हा आपल्या स्वप्नाच्या शोधात निघतो.

त्याचा हा प्रवास, प्रवासात त्याला भेटणारी माणसं काही मदत करणारी तर काही गोंधळात टाकणारी, अपरिचित प्रदेशात प्रवास करत असताना पावलोपावली जाणवणारी धास्ती, या सगळ्यांशी सँतीयागो कसा जुळवून घेतो. त्याच्या स्वप्नापर्यंत तो शेवट पोहोचतो का? त्याला खजिना मिळतो का? त्याला त्याचं प्रेम मिळतं का? आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यात तो स्वतःवर आणि आपल्या अशक्यप्राय वाटणाऱ्या स्वप्नावरचा विश्वास कसा टिकवून ठेवतो हे जाणून घेणं खूप मजेशीर आहे.

 

सगळ्यात महत्वाचा असतो तो स्वतःवरील आणि स्वतःच्या स्वप्नावरील विश्वास.

“किसी चीज को तुम अगर दिल से चाहो तो सारी कायनात उस चीज से मिलाने मे तुम्हारी मदत करेगी” या विधानाचा अर्थ उलगडणारी ही कादंबरी.

स्वप्न साधकाचा, प्रवास कसा असावा याचा वस्तुपाठ घालून देणारी ही कादंबरी प्रत्येकाने एकदा तरी वाचायला हवी. आपण स्वप्नं निवडतो की स्वप्नांनी आपल्याला निवडलेलं असतं हे जाणून घ्यायची उत्सुकता ज्यांना आहे, ज्यांना आपल्या स्वप्नांबद्दल आस्था आहे, ती पूर्ण करण्याची तळमळ, जिद्द आहे अशा तरुणांनी तरी नक्कीच वाचायला हवी.

सँतीयागोचा हा प्रवास आणि त्याचा खजिना तुम्हालाही समृद्ध नक्कीच समृद्ध करेल.

MeghashreeS✍🏻

 

Post a Comment

0 Comments