असुरक्षिततेच्या भावनेपासून सुटका करून घेण्याचे हे मार्ग अवलंबून पाहा!

असुरक्षितता म्हणजे मनातील काल्पनिक भीती. सतत काही तरी (वाईट) घडेल अशी धास्ती. आपलं नातं टिकेल का? इथपासून ते आपण हे करू शकू का? इथपर्यंत अनेक गोष्टींबाबत-व्यक्तींबाबत अविश्वास निर्माण होणं, स्वतःबद्दल न्यूनगंड, कामाबद्दल अनास्था, ताण, नैराश्या अशा अनेक समस्या या असुरक्षिततेच्या भावनेतूनच निर्माण होतात. ही असुरक्षिततेची भावना येते कुठून आणि ती कशी हाताळायची याबद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत.

Image source - Google


असुरक्षितता म्हणजे आपल्या क्षमता आणि आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे. बरेचदा मनातील नकारात्मक विचार यात आणखी जास्त भर घालतात. नातेसंबंध, काम, नोकरी, छंद, सामाजिक संबंध अशा अनेक गोष्टींवर याचा प्रभाव दिसून येतो.  

यातून स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलही अविश्वास निर्माण होतो. त्यामुळे कुणाशीही आपुलकीचे नाते तयार होत नाही आणि झाले तरी ते टिकत नाही.

आत्मविश्वास डळमळीत झाल्याने कामावरही लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळे करिअरही रखडते आणि आर्थिक तणावदेखील निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे असुरक्षिततेची भावना आणखी गडद होत जाते. असे हे दुष्ट चक्र आहे.

स्वतःला असुरक्षित समजणारे लोक नेहमी स्वतःला कमी लेखतात. कुठलंही काम करताना आपल्याला हे जमेल असा विश्वास नसतो. कोणत्याही गोष्टीची त्यांना खात्री वाटत नाही. कुठलीही गोष्ट कधीही विस्कटू शकते अशी सतत भीती असते. प्रत्येक गोष्टीबाबत शंका आणि संशय घेतात. नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत. कुणी नकारात्मक प्रतिक्रिया दिलीच तर ती सहन होत नाही. वैयक्तिक जीवनात किंवा कामाच्या बाबतीत जास्त जोखीम स्वीकारत नाहीत. सेफ झोनच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे यांची प्रगती खुंटलेली असते.

पण या लोकांना असुरक्षित का वाटतं? यामागे तशीच काही सबळ कारणं असतात.

१.        असुरक्षित बालपण – अशा लोकांना बालपणीच काही कटू अनुभवांना सामोरं जावं लागलं असेल तर त्या अनुभवाची भीती यांच्या मनात दडी मारून बसलेली असते. तो अनुभव विस्मृतीत गेला असला तरी तो मनाच्या तळाशी साचलेला असतो. ज्यामुळे यांना सतत भीती वाटते. लहानपणी आश्वासक आणि सुरक्षित वातावरण न मिळाल्याने यांचा आत्मविश्वास हरवलेला असतो. स्वतःला सक्षम समजत नाहीत.

२.       कटू नातेसंबंध – मित्र, कुटुंबीय, शिक्षक, सहकारी, बॉस अशा लोकांकडून हिणवले जाणे, मित्रत्वाची वागणूक न मिळणे, इतरांनी कधीही विश्वास न दाखवणे, जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होणे अशा अनुभवांमुळेही व्यक्तीमध्ये असुरक्षिततेची भावना जन्म घेते.

३.       कठीण प्रसंग – जवळच्या व्यक्तीचे निधन, आर्थिक नुकसान, नोकरी गमवावी लागणे, फसवणूक, बदनामी, अशा समस्यांना तोंड दिल्यानंतर व्यक्ती खचून जाते. आत्मसन्मान दुखावला जातो. यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

४.       सामाजिक दडपण – एखाद्या व्यक्तीने कसं असलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, प्रतिष्ठित व्यक्ती असण्याचे निकष, अशा अनेक गोष्टी या बाह्य घटकांवर अवलंबून आहेत. बरेचदा सामाजिक दृष्ट्‍या आपण अशा कोणत्याच निकषांवर पात्र ठरत नाही ही बोच व्यक्तीला मानसिकदृष्ट्‍या अधिक कमजोर बनवते. समाजात किंवा नातेवाईकांमध्ये दिली जाणारी दुय्यम आणि अपमानास्पद वागणूकीमुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासाचे आणि पर्यायाने मानसिक स्वास्थ्याचे खच्चीकरण होते.

५.       अवास्तव अपेक्षा – इतरांनी सतत आपली स्तुती केली पाहिजे, वाहवा केली पाहिजे, तरच आपल्याला किंमत आहे. अशी एक अवास्तव अपेक्षा ठेवल्याने आणि ती पूर्ण न झाल्यानेही स्वतःच्या क्षमतांबद्दल संशय निर्माण होतो. अमुक एका परीक्षेत मला इतके गुण मिळायलाच हवेत. अमुक युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळालाच पाहिजे. अशा अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा आत्मविश्वासाला तडे जातात. मानसिक स्वास्थ्य ढासळते. यातून आपले कधीच चांगले होणार नाही, आपल्या मनासारखं आयुष्यात काही घडतच नाही. इतरांच्या आयुष्यात सगळं काही ठीक आहे, मग माझंच नशीब असं का? वगैरे नकारात्मक विचारांची एक मालिका सुरु होते ज्यामुळे असुरक्षिततेची भावना वाढत जाते.

ही असुरक्षितता हळूहळू आयुष्याचे एकेक कोपरे व्यापू लागते. घर आणि नातेसंबंधापासून काम, करिअर आणि आर्थिक प्रगती या सर्वांवर विपरीत परिणाम घडवून आणते. म्हणून ही असुरक्षितता वेळीच ओळखून तिच्याशी फारकत घेणं आवश्यक आहे.

असुरक्षिततेपासून अंतर राखण्यासाठी किंवा असुरक्षिततेची भावना/तीव्रता कमी करण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टींची नक्की मदत होईल.

१.        आपल्याला उत्तेजित करणाऱ्या गोष्टी ओळखता येणे – नेमकं कोणत्या प्रकारच्या परिस्थितीमुळे आपल्याला असुरक्षित वाटते? हा प्रश्न स्वतःला विचारा. अशा परिस्थितीत आपले वर्तन, मानसिक आणि भावनिक प्रतिक्रिया काय असते याची नोंद करून ठेवा. शक्य असल्यास लिहून ठेवा. पुन्हा कधी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालीच तर तुमची प्रतिक्रिया काय असेल याची आधीच खूणगाठ बांधा. कधी कधी बाह्य परिस्थिती आणि कधीकधी स्वतःचे नकारात्मक विचार असुरक्षिततेला खतपाणी घालतात. नकारात्मक विचारांच्या बाबतीत आपण सजग राहिलो तर नक्कीच असुरक्षिततेची भावना थोडीफार कमी होईल.

२.       नकारात्मक भावनांचे आव्हान स्वीकारा – तुमच्या मनात स्वत:च्या क्षमतांबद्दल नकारात्मक विचार येत असतील तर हे विचार एखाद्या आव्हानाच्या रुपात स्वीकारा. उदा. आपल्याला हे जमणार नाही. असं तुम्हाला वाटत असेल तर गोष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ द्या आणि ती गोष्ट मी पूर्ण करणारच अशी जिद्द बाळगा. स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्याऐवजी विवेकी अपेक्षा बाळगा.

३.       तुमच्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा – तुमच्यातील चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत हे स्वतःला सांगता आल्या पाहिजेत. त्या गोष्टी वारंवार करण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावेल. तुमच्यात कोणते चांगले बदल घडून आले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं त्यांची यादी करा आणि त्यावर काम करा.

४.       आत्मविश्वास वाढवण्यावर लक्ष द्या – तुमच्या आत्मविश्वासाला चालना मिळेल अशा गोष्टी करा. यापूर्वी तुमच्या हातून झालेल्या चांगल्या गोष्टी आठवा. उदा. तुम्ही दिलेले एखादे चांगले प्रेझेंटेशन, तुमच्या एखाद्या निर्णयामुळे तुमच्या व्यवसायात झालेली वृद्धी, अशा गोष्टी तुम्हाला स्वतःबद्दल सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देतील.

५.       स्वतःला माफ करा – चुका या सगळ्यांकडून होतात. कोणत्याही एका चुकीसाठी तुम्ही आयुष्यभर स्वतःला शिक्षा करू शकत नाही. त्यामुळे भूतकाळातील एखाद्या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होत असेल तर ती गोष्ट प्रयत्न पूर्वक विसरा. स्वतःला माफ करा आणि नवा सकारात्मक दृष्टीकोन घेऊन कामाला लागा.

६.       त्रास स्वीकारा – कोणतीही गोष्ट करताना त्रास होणार आहे. त्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहते. आरामदायी वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून आव्हाने स्वीकारावी लागणार आहेत. त्यात अपयश आले तरी नशिबाला, स्वतःला, परिस्थितीला किंवा एखाद्या व्यक्तीला दोष न देता ते अपयश स्वीकारण्याची तयारी ठेवा. कोणी नकारात्मक टिप्पणी करेल, कोणी खच्चीकरण करेल, कोणी प्रोत्साहन देईल, सगळ्या गोष्टी सारख्याच भावनेने स्वीकारा. कधी एखाद्या निर्णयाचा पश्चाताप होईल. कधी उदास वाटेल. या सगळ्या स्थिती तात्पुरत्या काळासाठी निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे त्यांचा बाऊ करण्याची गरज नसते.

आयुष्यात अचानक येणारी संकटे, प्रसंग, शारीरिक व्याधी, जवळच्या व्यक्तींचे बदलणारे वागणे, त्यांच्या अवास्तव अपेक्षा या गोष्टी हाताळत असताना असुरक्षितता, भीती, चिंता वाटणारच आहे. पण, फक्त या नकारात्मक भावनांना स्वतःवर हावी ण होऊ देता. त्यांना सकारात्मक आणि विवेकी पद्धतीने सामोरे जायचे आहे.

मानसिक दुविधा, अस्वस्थता, या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत. पैसा, यश, प्रतिष्ठा, नातेसंबंध, यां सगळ्यापेक्षा आपण महत्वाचे आहोत.  म्हणतात ना, सर सलामत तो पगडी पचास! अगदी तसंच!

 

Post a Comment

3 Comments

Amit Medhavi said…
आनंदी जगण्यासाठी मनाचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे, हे छान मांडलेत.
Meghashree said…
धन्यवाद
स्वस्थ जीवन जगण्यासाठी उपयुक्त लेखन,समर्पक अभ्यासू ,चिंतन करायला लावणारे लेखन