मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी जाणून घ्या काही सोपे उपाय!

कामाचा तणाव, भविष्याची चिंता, भीती, यामुळे तुम्ही देखील मानसिक अशांतीचे शिकार झालाय का? कुठल्याही कामात म्हणावं तस लक्ष लागत नाही. मनात सतत काही ना काही उलथापालथ सुरू असते. कधी याबद्दल तर कधी त्याबद्दल विचार करून करून असुरक्षित वाटू लागतं. परिस्थितीचा दबाव असा असतो की आपल्याला सहज-सोपा-सरळ मार्गच दिसत नाही. गोंधळल्यासारखं होतंय? 
Image Source : Google



फक्त आपणच नाही तर आपल्या आजूबाजूची सगळीच लोक सध्या अशा मानसिक द्विधावस्थेत आहेत. सतत अस्वस्थ आणि अशांत वाटत आहे. मानसिक शांतता हवी आहे. पण ती कशी मिळवायची आणि कशी टिकवायची हे मात्र माहित नाही. 

आधी आपण मानसिक शांतता म्हणजे काय हे पाहू. 

आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येणे, स्वतःबद्दल सकारात्मक भावना असणे, परिस्थितीचा बाऊ न करता त्याकडे तटस्थपणे पाहता येणे म्हणजे मानसिक शांतता. दररोजची कामे करताना ताण किंवा थकवा न जाणवणे, दिवसभरात कुठलंही काम अचानक येऊन पडलं तरी ते आपण करू शकतो हा आत्मविश्वास वाटणे म्हणजे मानसिक शांतता. इतरांबद्दल सहानुभूती वाटणे, त्यांच्याशी जुळवून घेता येणे, स्वतःच्या आनंदासाठी इतरांवर अवलंबून न राहणे म्हणजे मानसिक शांतता.

मानसिक शांतता नसली की, आपण तणाव, चिंता नैराश्य, कलह, कुरापती यांचे शिकार बनतो. कितीही सुखसाधने आणि संपत्ती असली तरी मानसिक शांतता नसेल तर त्यांचा आनंद घेता येत नाही. 
एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असणारी व्यक्ती, बिकट प्रसंगात सापडलेली किंवा आर्थिक अरिष्टातून जाणाऱ्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य डळमळीत होते. परंतु, मानसिक शांतता नसेल तर या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गही सापडत नाही. म्हणून सगळ्यात आधी आपली मानसिक स्थिती सुधारण्याला प्राधान्य दिले पाहिजे. 
मानसिक शांतता मिळवण्यासाठी इथे दिलेल्या काही टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. 

१. नकारात्मक विचार तपासून पाहा- एखाद्या बिकट प्रसंगात सापडल्यानंतर आपल्याला भीती, चिंता वाटणे किंवा नैराश्य येणे साहजिक आहे. अशावेळी आपल्या मनात नकारात्मक संवाद सुरू होतात. हे नकारात्मक संवाद आपल्याला आणखीनच निराश आणि हताश बनवतात. या नकारात्मक विचारांनीपरिस्थितीशी दोन हात करण्याची क्षमताही आपण गमावून बसतो. सर्वात आधी आपल्याला हे नकारात्मक विचार ओळखून त्यांना सकारात्मक विचारात परावर्तित करता यायला हवेत. 
नकारात्मक वाक्यांना सकारात्मक दिशा कशी द्यायची याची काही उदाहरणे पहा. 
“परिस्थिती अवघड असली तरी प्रयत्न करणे आपल्या हातात आहे आणि ते मी करू शकते/शकतो.”
“हे काम सध्या अवघड वाटत असले तरी थोडासा प्रयत्न केल्यास मला ते नक्की जमेल.”
“सध्या मला जमत नसले तरी एक दिवस मी यात नक्कीच कुशल होईन.”
नकारात्मक विचारांना अशा प्रकारे सकारात्मक दिशा दिल्यास त्यांचा होणारा परिणाम देखील सकारात्मक होतो. कामाचा बाऊ करण्याऐवजी प्रत्यक्ष काम करण्याचा विश्वास निर्माण होतो. 

२. ज्या गोष्टी बदलणं शक्य नाही त्यांचा स्वीकार करणे – आयुष्य अनपेक्षित धक्के देत असते. कुठल्या क्षणी कोणती परिस्थिती निर्माण होईल सांगता येत नाही. कधी निर्माण झालेली परिस्थिती ही तात्पुरती असते. काही काळाने ती अपोआप निवळते. तर कधी निर्माण झालेली परिस्थिती ही अपरिहार्य असते आणि म्हणून तिचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नसते. चांगल्या क्षणांचा जसा आनंदाने स्वीकार करतो तसेच वाईट क्षणही आनंदाने स्वीकारता आले पाहिजेत. स्वीकारार्हता हा एक असा गुण आहे जो आपल्याला नेहमी कणखर बनवत असतो. 

३. बाह्य परिस्थितीशी आनंद जोडू नका – अमुक एक गोष्ट झाली की मी सुखी होईन, एवढं काम झालं की मग आयुष्यात सुखच सुख असेल, हा कल्पनाविलास तुम्हाला वर्तमानातील क्षणांमध्ये दडलेला आनंद घेऊ देत नाही. पुढे काय होईल काय नाही याचा अचूक अंदाज बांधता येणं कठीण आहे. म्हणून जे हातात आहे, त्यातच आनंद मानायला शिका. परिस्थिती बदलेल आणि मगच मी आनंदी होईन हा हट्ट मानसिक अशांततेला जन्म देतो. ज्यामुळे तुम्ही परिस्थिती बदलवण्यासाठी स्वतःवर आणि इतरांवरही जबरदस्ती करू लागता. यामुळे तुम्ही स्वतःचे मानसिक स्वास्थ्य तर गमवालच पण तुमच्या संपर्कातील लोकांनाही तुम्ही किरकिरे वाटण्याची जास्त शक्यता आहे. 

४. स्वतःची काळजी घ्या – स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर काय होत आहे याकडे लक्ष द्या. यागोष्टी तुमच्याशिवाय इतर कुणालाही चांगल्या पद्धतीने समजणार नाहीत आणि त्यावर तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काहीही पर्याय नाही. शारीरिक थकवा जाणवत असेल तर सकस, पौष्टिक आहार घ्या, व्यायाम करा, पुरेशी विश्रांती आणि झोप घ्या. भावनिकदृष्ट्या जी लोकं तुम्हाला नकारात्मक बनवतात, ज्यांना तुमच्याबद्दल कधीच चांगलं बोलता येत नाही, जे सतत तुमच्या क्षमतांबद्दल साशंक असतात अशा लोकांपासून चार हात लांब राहा. अगदी स्वतःबद्दल येणारे नकारात्मक विचारही धुडकावून लावा. त्यांना सकारात्मक दिशा द्या. आवडत्या आणि सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा. तुम्हाला प्रोत्साहन देतील, तुमच्यावर विश्वास दाखवतील अशा लोकांच्या संपर्कात राहणे भावनिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. 

ध्यानधारणा करणे, संगीत ऐकणे, तुम्हाला ज्या पद्धतीची उपासना आवडत असेल ती केल्याने मानसिक कणखरता वाढते. मन स्थिर होण्यास मदत होते. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुमचे छंद जोपासा. जे काही करण्यात तुम्हाला आनंद वाटत असेल त्यासाठी वेळ द्या. पुस्तक वाचणं असेल, ट्रेकला जाणं असेल, तुमच्या छंदांसाठी वेळ देणं म्हणजेच स्वतःसाठी वेळ देणं. तुमच्या दैनंदिन कामाच्या शेड्युलमध्ये या गोष्टींचा आवर्जून समावेश करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

या सगळ्या गोष्टी एकदा केल्याने तुम्हाला कायमची मानसिक शांतता मिळणार नाही तर, या गोष्टींसाठी तुम्ही दररोज वेळ दिला पाहिजे. तर आणि तरच तुमची मानसिक शांतता टिकून राहील.

नाही तर बहिणाबाईंनी म्हटलेलं आहेच, 

मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ||
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ||

मनावर जितकं काम कराल तितकं कमी आहे, आणि स्व-सुखासाठी भौतिक गोष्टींवर नाही तर मनावरच काम करावं लागतं.

Post a Comment

1 Comments

आजकाल मानसिक स्थिती सुदृढ राहणे खरच अवघड झाले आहे,काहीही केले तरी मनावरचा ताण काही कमी होत नाही,प्रत्येकाच्या आयुष्यात ताण अविभाज्य घटक बनला आहे ,प्रत्येक जण निर्भेळ आनंद शोधतो आहे,तुमचे लिखाण त्यांच्यासाठी मदत करेल