सतत काहीतरी शिकण्याचा प्रवास निरंतर सुरू राहो!

चित्र प्रातिनिधिक सोर्स - गुगल 


सकाळी क्लाससाठी घरातून बाहेर पडले पण, क्लासला अजून थोडा वेळ होता. नाही तर... मी तिथे जाणार, तिथलं कुलूप बघणार, मग सरांना कॉल करणार मग ते म्हणणार पाच मिनिटात आलो. एक्झॅक्ट पाच मिनिटं तिथं विनाकारण रेंगाळावं लागणार. हे सगळं टाळण्यासाठी म्हणून म्हटलं थोडा चहा घेऊ. रस्त्यात एस.एम.लोहियास्कूलच्या समोर एक मोठा गाडा दिसला. ज्यावर नाष्टा मिळेल, चहा, उप्पीट, पोहे शिरा आणि मिसळ असा बोर्ड लावला होता. गाडा बघून मी गाडी थांबवली. गाडी वळवता न आल्याने रस्त्याच्या एका बाजूला गाडी थांबवून रस्ता क्रॉस करून मी पलीकडे गेले. चहा घेतला. चहा घेता घेता गाड्याचं थोडं निरीक्षण केलं. गाड्यावर अनेक छान क्रिस्पी क्रंची tagline लिहिले होते. चहाच्या गाड्यावर सुद्धा मराठी कंटेंटचा चपखल वापर केला होता. हल्ली हे प्रत्येक ठिकाणी दिसतंच. आजच्या काळात ‘कंटेंट इज किंग’ असं का म्हटलं जातं ते लक्षात येतं. अनेक छोटे मोठे रेस्टॉरंट्स सोबतच आता छोट्या गाड्या असणारे लोकंही कंटेंट मार्केटिंगचा मार्ग निवडत आहेत. त्या सगळ्या लाईन्स वाचता वाचता चहा कधी संपला ते कळलं नाही. त्यातील काही लाईन्स लक्षात राहिल्या आहेत... 

1. मित्रांसोबत मिसळ खाताना स्टीलचा चमचा देखील ‘सोन्याचा’ वाटू लागतो. 

2. तो: काय ऑर्डर करू? पिज्झा की बर्गर?
ती: मिसळ!

3.उपाशी राहण्यापेक्षा उ.पो.शि. खा ना! उ.पो.शि.च्या प्रत्येक अक्षराखाली त्याचं त्याचं चित्र दाखवलं होतं... उपीट, पोहे, शिरा...

कंटेंटचा प्रयोग मला अफलातून यासाठी वाटला की यातली भाषा अगदी सामान्य होती. भावना, भाषा आणि गरज यांचा रसिक मेळ घातलेला होता.
चहा पिऊन संपल्यावर मी त्या काकांना विचारलं हा कंटेंट कुणी लिहिला आहे? 
ते म्हणाले, “मी स्वतः!”
त्यांचा कंटेंट मला आवडल्याचं मी आवर्जून सांगितलं!

कंटेंट रायटर होण्यासाठी कुठल्या वर्कशॉप किंवा कोर्सपेक्षा आपल्यातील जिज्ञासा, रसिकता, वाचन, आपण ज्या विषयावर लिहिणार आहोत त्याप्रती लेखक म्हणून असणारी संवेदनशीलता, सूक्ष्म आणि उत्तम निरीक्षण शक्ती,  मिळालेल्या माहितीचं योग्य आकलन करून घेण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यातील विद्यार्थी सतत जागरूक असणं याच गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत.  वाचलेलं ते वेचून घेण्याची ग्रहणक्षमताही हवीच. 

कुठला क्षण तुम्हाला कधी काय देऊन जाईल हे सांगता येत नाही म्हणून वर्तमानात जगण्याची सवय (जी लावून घेणं तितकं सोपं नाही मात्र प्रयत्न केल्यास अशक्यही नाही) फारफार फायद्याची ठरते. 
आणि सगळ्यात महत्वाचं चांगला कंटेंट रायटर होण्यासाठी मुळात लेखन, अक्षर आणि साहित्याबद्दल अपार ओढ असावी लागते. ज्याला आजच्या भाषेत ‘पॅशन’ म्हणतात. 

व्यावसायिक लेखनात उतरण्याआधी मी सुद्धा कंटेंट रायटिंगच्या दोन कार्यशाळा केल्या. पण, या कार्यशाळा केल्या म्हणून लेखन सुधारलं असं नाही तर कार्यशाळेतून मिळालेले धडे अंमलात आणत गेले, शिकत गेले आणि महत्वाचं म्हणजे चुकत गेले म्हणून बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. 
कंटेंट रायटिंग कुठे शिकला? असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. 

लेखन ही एक कला आहे. इतर कलेप्रमाणेच तिलाही साधना आणि रियाजाची गरज असते. ज्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. सतत त्याच्याशी निगडीत गोष्टी, माणसं यांचा शोध घेत त्यांच्याकडून शिकत राहावं लागतं. शिकत राहण्याचा प्रवास सुरू ठेवावा लागतो. आजही या क्षणी तो प्रवास सुरू असल्याची जाणीव देणारा आजचा दिवस! 

शिकण्याचा हा प्रवास सुरू राहीला तरच लेखन जिवंत राहील!  

✍🏻 MeghashreeS

Post a Comment

0 Comments