आनंद कशाकशात आणि किती असतो. जाणून घेऊया

आयुष्यात प्रत्येकाला आनंदी व्हायचं असतं. प्रत्येकाची आनंदाची व्याख्याही वेगवेगळी असते. आनंद म्हणजे अशी भावना ज्यात समाधान, पूर्णता आणि तृप्तता असेल. आनंदाचेही कित्येक प्रकार आहेत. प्रत्येक सकारात्मक भावना आनंदाशी निगडीत आहे. आयुष्यात समस्या, संघर्ष, तणाव असणारच आहे तरीही त्यांच्यासोबत जुळवून घेण्याची क्षमता आपल्याला या आनंदी क्षणातूनच मिळते. आनंद शोधण्याचे कित्येक मार्ग आहेत. हे मार्ग जाणून घेऊन ते अवलंबता आले तर, आयुष्यातील निराशा, दु:ख, त्रास थोडा तरी कमी होईल. यातील बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती असतील आणि काही नव्या असतील. वेगवेगळ्या परिस्थितीतही स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आनंदाचे हे प्रकार तुम्हाला माहीत असायला हवेत.

१.        कृतज्ञता – दैनंदिन जीवनातील चांगल्या गोष्टींची दखल घेण्यास कृतज्ञता खरोखर उपयुक्त ठरते. आजूबाजूला असणाऱ्या चांगल्या गोष्टी, वस्तू आणि व्यक्तींची जाणीव होते. यामुळेही आपल्या आनंदात भर पडते.



२.       नवा अनुभव – काही नवी गोष्टी केल्याने मिळणारा आनंद तुम्हीही अनुभवला असाल. नव्या ठिकाणांना भेट देणं, काही तरी  नवं शिकणं, अशा गोष्टींनी आपल्या मूडमध्ये बदल होतो.

३.       प्रेम – कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे दमछाक होत असली तरी, त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असते. मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेले हलकेफुलके क्षणही आनंद देतात. स्वतःची काळजी घेणं, स्वतःसाठी काही तरी नवीन करणं यातूनही आपला आनंद वाढतो. तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही वळणावर असला तरी आयुष्यात असलेलं प्रेम तुम्हाला अधिक ऊर्जा देत असतं.

४.       शांतता – नकारत्मक परिस्थितीतही शांत राहिल्याने मिळणारा आनंद अवर्णनीय! यामुळे बऱ्याचदा गुंतागुंत टाळता येते. मन शांत असेल तर नकारात्मक स्थितीतही आपण चांगल्या गोष्टींवर फोकस ठेवू शकतो. मन शांत करण्यासाठी ध्यान, प्राणायाम यासारखे मार्ग अवलंबू शकता. यातही वेगळा आनंद लपलेला आहे.

५.       अभिमान – खरं तर स्वतःचा अभिमान, एखादी गोष्ट पूर्ण केल्याने स्वतःचे वाटणारे कौतुक, किती आनंद मिळतो नाही या कौतुकातून! म्हणून स्वतःचं नेहमीच कौतुक असलं पाहिजे. अर्थात, हे कौतुक कधी कधी पश्चाताप आणि न्यूनगंड यामुळे झाकोळून जातं. तरीही स्वतःचं कौतुक करण्याची संधी सोडायची नाही.

६.       उदारता – इतरांची मदत केल्यानं, विशेषत: खरोखर ज्यांना मदत आहे अशा लोकांना मदत केल्यानंही आपण आनंदी होतो. आपल्यामुळे त्यांना काहीतरी फायदा झाला, हे पाहून बरं वाटतं. अर्थात ही मदत निरपेक्ष असली पाहिजे. नाहीतर अपेक्षा ठेवून मदत कराल आणि पुन्हा दु:खी व्हाल.

७.      पूर्तता – आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो, आपले ध्येय गाठू शकतो, या भावनेतून होणारा आनंद. कधी कधी आपला आतला आवाज ऐकून एखादी वेगळी गोष्ट करून पाहण्याचेही समाधान वेगळे असते. आपल्या आतील संघर्ष पूर्ण झाल्यावर होणारा आनंद. अशावेळी मन समाधानी असते.



८.  इच्छेनुसार वेळ घालवता येणे – दररोजच्या दिनक्रमात आपण इतके व्यस्त असतो की, हवा तसा वेळ घालवायला वेळ मिळत नाही. पण आठवड्यातून, पंधरादिवसातून जरी अशी संधी मिळाली तर..? तर काय हे स्वर्गसुखच असेल. या वेळेत तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करू शकता आणि त्या करताना कोणीही व्यत्यय आणणार नाही.

९.       उत्सुकता – एखादी सहल, कार्यक्रम, कधी होईल, कशी होईल, किती उत्सुकता लागून राहिलेली असते ना? भविष्यातील या सुंदर क्षणांची आतुरतेने वाट पाहताना होणारा आनंद खूपच उत्साहवर्धक असतो. एखादा मुव्ही किंवा सिरीयल पाहतानाही तुम्ही अशी उत्सुकता, उत्कंठा अनुभवली असेल. अशी उत्सुकता ताणणारी, उत्कंठा वाढवणारे क्षण वरचेवर कसे येतील याचेही नियोजन करून स्वतःचा उत्साह वाढवता येईल.

१०.    थरारक अनुभव घेणे – अनेकांना नवनवीन ठिकाणी प्रवास करणे, ट्रेकिंग, अॅडव्हेंचर गेम्स, स्पोर्ट्स यात आनंद मिळतो. बराच काळ अशा गोष्टींपासून दूर राहल्यास त्यांना आपले स्वातंत्र्यच हिरावल्यासारखे वाटते. तुम्हालाही या गोष्टी करायला आवडत असतील तर त्यासाठी आवर्जून वेळ काढा.

११.     आत्मकेंद्रित स्वभाव – आत्मकेंद्रित म्हणजे स्वार्थी नव्हे, कधीकधी इतरांची मतं, त्यांचे विचार, सल्ले याचा विचार न करता आपण आपल्या ध्येयासाठी काम करत राहतो. तेव्हा मिळणारे समाधान आणि तृप्तता काही औरच असते.

१२.    सुख – शरीराचे कौडकौतुक करणे आपलीच जबाबदारी आहे. व्यायाम करणे असेल किंवा आवडत्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारणे असेल, याही गोष्टी आपल्याच आनंदात मोडतात. आवडत्या व्यक्तीला मिठी मारणे, त्याच्या सान्निध्यात एकांतात वेळ घालवणे या गोष्टीही आनंदात भर घालतात.

१३.    वर्तमान क्षणातील आनंद – एखादी क्रिया करताना जर त्यात पूर्ण मन एकाग्र करून ती कृती केली तर त्यातूनही आनंद मिळतो. एखादे चित्र काढणे, पुस्तक वाचणे, इतकेच काय झाडांना पाणी घालणे, कचरा काढणे, भांडी घासणे, आकाशाचे/सभोवतालचे निरीक्षण करणे अशी छोटीछोटी कामेही एकाग्र होऊन सावध चित्ताने केलीत तर आनंद मिळतो.

१४.    निवांतपणा – सगळ्या चिंता, जबाबदाऱ्या, विचार, यांच्यापासून दूर जाऊन काहीही न करता रिकामं बसण्यातही आनंद आहे.

१५.    हास्यविनोद – गप्पा-गोष्टी, हास्यविनोद याने आपणही आनंदी होतो आणि इतरांनाही आनंद मिळतो. आपण इतर लोकांच्या आनंदाला कारणीभूत होत असू तर त्यातही आनंद आहे. विनोदाने तुमचे नातेसंबंधही सुधारतात. हसऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहायला सर्वांनाच आवडते.

१६.    स्वीकार – परिस्थतीवर नेहमीच आपले नियंत्रण असेल असे नाही. काही गोष्टी आपण ठरवून सुधारू शकत नाही. त्यासाठी काही वेळ जावा लागतो. अशा गोष्टींसाठी कुढत न बसता त्याचा स्वीकार केल्यास हरवलेला आनंद पुन्हा गवसतो.

१७.   स्वयंशिस्त – स्वतःमध्ये काही बदल करण्यासाठी म्हणून आपण काही नियम घालून घेतो. बरेच जण नवीन वर्षाच्या निमित्ताने काही तरी संकल्प करतात. पण, थोड्याच दिवासात उत्साह मावळतो आणि तो संकल्प धूळ खात पडतो. पण, ठरवलेली गोष्ट स्वयंशिस्त पळून पूर्ण केली तर त्यातून मिळणाऱ्या आनंदाची कशाशीही तुलना होऊ शकत नाही.

१८.    सृजनशील काम – व्यक्तीपरत्वे प्रत्येकाचे छंद वेगळे असतात. कोणाला मेहंदी काढायला आवडते, कोणाला चित्र काढायला आवडते,कोणाला गाणी म्हणायला आवडतात, अशा प्रत्येक  सृजनशील गोष्टी आनंद दडलेला आहे. आपल्या आवडीनुसार एखादी गोष्ट निवडून त्यातील नाविन्याचा आनंद घेता येतो.


१९.    उद्देश शोधणे – आपण एखादं ध्येय ठरवतो, पण ते ध्येय पूर्ण करण्यामागचा उद्देश माहीत नसेल तर? त्यासाठी काम करण्याची इछाच होणार नाही. म्हणून आपण हे करत आहोत ते कशासाठी? हे एकदा तपासून पाहायला हवं. या प्रश्नाच्या उत्तरातही मोठा आनंद लपलेला आहे.

२०.    आरोग्य – सगळ्यात महत्वाचं आरोग्य जर सदृढ असेल तर आणि तरच आपण कोणत्याही गोष्टीतील आनंद घेऊ शकतो. चांगले आरोग्य मिळवण्यासाठी किंवा राखण्यासाठी ज्या गोष्टी कराल त्यातूनही भरपूर आनंद मिळतो. यातही व्यक्तीपरत्वे भिन्नता आहे. कोणाला सकाळी फिरायला जायला आवडतं तर, कोणाला संध्याकाळी. कुणाला सायकलिंग आवडते, कुणाला जॉगिंग. कुणाला डान्सिंग तर कुणाला योगा. तुमची एक आवडती कृती दररोज करत राहण्यानं निरोगी आरोग्यासोबतच आनंदही मिळत राहील.

लक्षात घ्या आनंदासाठी केलेल्या कृतीपेक्षा आनंदाने केलेली कृती महत्वाची म्हणून जी गोष्ट करण्यात तुम्हाला आनंद मिळतो ती करत राहा. तुमच्या आनंदाच्या कल्पना काय आहेत, ते कमेंटमध्ये सांगा. यातील कोणत्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात तेही सांगा.  

 #Positive_mind, #Happiness, #Mental_health 

 

Post a Comment

0 Comments