जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय?

माणसाचं सरासरी आयुष्य किती? तर साधारण, ७५ वर्षे. त्यातही अनेकांना ८०/९०/१०० वर्षे जगण्याचा बहुमान मिळतो. हो दीर्घायुष्य हे निसर्गाने दिलेलं एक वरदानच आहे. आज जगणं महाग आणि मरण स्वस्त झालेलं असताना काही लोक शंभरी पार करण्याचा विक्रम कसा काय करू शकतात?

Image Source: Twitter


आता अमेरिकेत जन्मलेल्या ब्रेन्यीस मोरेरा या स्पानिश आजीचंच उदाहरण घ्या. या वर्षी आजींनी ११५व्या वर्षात पदार्पण केले. २३ जानेवारी रोजी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ति म्हणून गिनीज बुकात नोंद असणाऱ्या ल्युसील रँडन याचं निधन झालं आणि ११५ वर्षाच्या ब्रेन्यीस मोरेरा जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ति म्हणून गिनीज बुकात नाव नोंद होण्याची अनपेक्षित भेट मिळाली.

११५ वर्षाच्या आयुष्यात आजींनी दोन महायुद्धे, १९१८चा स्पॅनिश फ्लू, १९३६चे स्पेनमधील नागरी युद्ध आणि कोव्हीड-१९ची जागतिक महामारी एवढ्या जागतिक उलथापालथी पहिल्या आहेत.

ब्रेन्यीस मोरेरा यांचा जन्म ४ मार्च १९०७ रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. त्यांचा कुटुंबीयांनी त्यांच्या जन्माच्या एकावर्षापूर्वीच मेक्सिकोमधून अमेरिकेत स्थलांतर केले होते.



१९१५ साली पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबाने पुन्हा एकदा मायदेशी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. ऐन महायुद्धाच्या काळात हा प्रवास सोपा नव्हता. यासाठी त्यांना जहाजामधून अॅटलांटिक महासागरातून प्रवास करावा लागणार होता. हा प्रवासही अगदी लपूनछपून थांबत आणि अनेक वळणे घेत करावा लागणार होता. जहाज क्युबा मार्गे असोरेसला निघाले होते. ब्रेन्यीस मेरोरा यांचे वडील क्षयरोगाने (pulmonary tuberculosis) ग्रस्त होते. या प्रवासातच त्यांचा मृत्यू झाला. दफन करण्यास जमीन नसल्याने त्याचं शव कॅफेनमध्ये घालून महासागरात फेकून देण्यात आलं. मग ब्रेन्यीस आणि त्यांची आई बार्सिलोनामध्ये स्थायिक झाल्या.

१९१८ साली स्पॅनिश फ्लू या जगातिक महामारीने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर १९३६ मध्ये स्पेनमध्ये नागरी युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. ब्रेन्यीसने या काळाची नोंद ‘वाईट आठवणींचा काळ’ अशी केली आहे.

तिचा नवरा जॉन मॉरेट एक डॉक्टर होता. त्यांच्या लग्नाचा किस्सा पण मजेशीर आहे. लग्न करण्यासाठी ते चर्च मध्ये गेले. एक तासभर वाट पाहूनही त्यांनी लग्नासाठी बोलावलेला प्रिस्ट चर्चमध्ये पोचलाच नाही. नंतर त्यांना कळालं की तो प्रिस्ट आदल्या रात्रीच देवाघरी पोहोचला. मग कार करून दुसऱ्या प्रिस्टची शोधाशोध केली आणि दोघे लग्नबंधनात अडकले.

त्यांच्या पतीचं वयाच्या ७२व्या वर्षी निधन झालं. त्यांना एकूण तीन मुलं. त्यातील दोन अपत्येच जगली. आज त्यांना ११ नातवंड आणि १३ परतुंड आहेत.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ११५ वर्षाच्या आयुष्यात या आजींना एकदाही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावं लागलं नाही. २०२० मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना त्यांच्या केअर होममधीलच एका रूममध्ये क्वरंटाइन करण्यात आलं आणि त्या बऱ्याही झाल्या.

त्यांच्या या दीर्घायुष्याचं रहस्य विचारल्यावर त्या म्हणतात, “मी काहीही विशेष केलेलं नाही, मी फक्त जगत राहिले. शिस्त, शांतता, मित्र आणि कुटुंबीयांसोबतचे दृढ बंध, निसर्गाचा सहवास, भावनिक स्थिरता, तणावाचा अभाव, भरपूर सकारात्मकता आणि नकारात्मक लोकांपासून चार हात लांब राहिल्याचा परिणाम म्हणूनच मला इतकं दीर्घायुष्य मिळालं असेल.”

शिवाय, दीर्घायुष्य मिळायला भाग्यही लागतंच, नशीब आणि अनुवांशिकता यांचाही यात हात असावा.”

११५ व्या वर्षी काळानुरूप आजी काही नव्या गोष्टी शिकल्या आहेत. त्यांना एका केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तरीही सोशल मिडिया आणि आधुनिक तंत्राच्या साहाय्यान त्या अजूनही आपल्या कुटुंबियांशी जोडल्या गेल्या आहेत.

आजींच्या मते इथे कुणीही अमरत्व घेऊन येत नाही. आयुष्याच्या या टप्प्यावर नवीन वर्षाचं स्वागत करण्याची संधी मिळणं म्हणजे एक सुंदर गिफ्टच आहे. हा क्षण कृतज्ञतापूर्वक साजरा करायला हवा कारण हा एक सुंदर प्रवास आहे, आनंदी आठवणींचा ठेवा आहे. आयुष्याचा आनंद लुटुया.”

इतक्या वर्षात एकदाही हॉस्पिटलाज्ड होण्याची वेळ आली नाही म्हणून आपल्या आरोग्याच्या देणगीबद्दल त्या कृतज्ञ आहेत. आजही आजींची तब्येत एकदम तांदरुस्त असल्याच,केअर सेंटर मधील लोकांचं मत आहे.

 

आयुष्य नुसतंच काय जगायचं? आला दिवस ढकलण्यात काय अर्थ आहे? असं म्हणत रडणाऱ्यासाठी आजींच हे उदाहरण निश्चितच प्रेरणादायी आहे. न जाणो, आहे तो दिवस समाधानानं जगण्याचं बक्षीस म्हणून उद्या निसर्गाकडून आपल्यालाही दीर्घायुष्याची भेट मिळू शकते. ज्यातून पुढच्या पिढीला समाधानी जगण्याचं महत्त्व पटवून देणारं एक जिवंत उदाहरण होता येईल.

💓मेघश्री

 

Post a Comment

0 Comments