या ८ वर्षाच्या मुलाने असे काय केले की त्याला रातोरात प्रसिद्धी मिळाली?
आयुष्यात कुठल्या क्षणी काय जादू घडेल सांगता
येत नाही. एखादी गोष्ट अगदी सहज, मनापासून, आनंदाने केली जाते ना तेव्हा त्याचं फळ
हे मिळतंच मिळतं. आता हे पटत नसेल तर आठ वर्षाच्या डीलोन हेल्बिगची (Dillon
Helbig) ही गोष्ट तुम्ही वाचायलाच हवी. फक्त आठव्या वर्षी डीलोनला ते मिळालं आहे ज्याची
त्याने स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती.
आठ वर्षाचा डीलोन अमेरिकेतील बॉईजी शहराचा
रहिवासी आहे. त्याचे वडील अॅलेक्स हेल्बिग एक संगीतकार आहेत. आठ वर्षांच्या डीलोनला
पुस्तकांच खूप आकर्षण आहे. आपल्या आजीसोबत तो अगदी लहान असल्यापासून शहरातील
ग्रंथालयात जातो.
पुस्तकांच्या या आकर्षणातूनच त्याला स्वतःलाही एक
पुस्तक लिहावं असं वाटू लागलं. आता आठ वर्षाचं मुल कसलं पुस्तक लिहिणार? पण
डीलोनने मात्र लिहिण्याचं खूपच मनावर घेतलं. तो पाच वर्षांचा असल्यापासूनच काही ना
काही लिहित असतो. तर आता एखादं कॉमिक बुक ( comic book) का
लिहू नये, अशा विचारानं त्यानं लिहायला घेतलं.
या वर्षीच्या ख्रिसमसला त्याला जो अनुभव आला तोच
कॉमिक रुपात सांगायचा, असं त्यानं ठरवलं. तब्बल चार दिवस खपून त्याने ८१ पानांचं
पुस्तक लिहिलं आहे. विश्वास नाही ना बसत? डीलोनच्या या पुस्तकाचं नाव आहे, ‘द अॅडव्हेंचर
ऑफ डीलोन हेल्बिग्ज क्रिसमस’ (The Adventures of Dillon Helbig's Crismis.)
पुस्तक तर लिहून तयार झालं पण ते लोकांपर्यंत
कसं पोहोचवायचं? आता तुम्हाला वाटत असेल की यासाठी त्याने एखादा प्रकाशक शोधला
असेल आणि त्याने या लहान लेखकाचं पुस्तक छापण्याची तयारी दाखवली असेल. पण
डीलोनच्या बाबतीत असं काहीही झालेलं नाही. मुळात त्याने पुस्तक प्रकाशित न करताच
ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक भन्नाट आयडिया शोधून काढली.
आपल्या आजीसोबत तो नेहमीच ऐडा कम्युनिटी
लायब्ररीमध्ये जातो. या लायब्ररीत गेल्या नंतर त्याने हळूच एका कपाटात आपल्या या
पुस्तकाचे हस्तलिखित सरकवून दिले. (Ada Community Library)
ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी जेव्हा हे पुस्तक
पहिले तेव्हा त्यांना थोडे आश्चर्य आणि कुतूहल वाटले. पण, या ग्रंथालयाचे ग्रंथपाल
हार्टमन यांनी आपल्या सहा वर्षाच्या मुलाला हे पुस्तक वाचून दाखवले. त्यालाही हे
पुस्तक खूपच आवडले.
आपल्या या छोट्या लेखकाचे हे पुस्तक ग्रंथापालांनी
अगदी रीतसर बारकोड वगैरे लावून ग्रंथालयाचाच एक भाग बनवून टाकले. डीलोनचे हे
पुस्तक वाचनीय तर आहेच पण यातील कल्पना आश्चर्य चकित करणाऱ्या आहेत असे ते
म्हणतात. डीलोनच्या या पहिल्याच पुस्तकाला वाचनालयाच्या वतीने वूडीनी अवॉर्ड (Whoodini
Award)
पुरस्कारही देण्यात आला आहे.
लेखक ख्रिस्तोफर बर्गेस (Christopher
Burgess) यांनी देखील डीलोनच्या या पुस्तकाचं कौतुक केलं आहे.
डीलोनची आई सुसानसाठी तर हा आश्चर्याचा धक्काच
आहे. आपल्या मुलाला मिळणारे हे प्रेम आणि प्रोत्साहन पाहून ती भारावून गेली आहे.
तिच्या मते, “डीलोन नेहमीच आपल्या कल्पना विश्वात रमलेला असतो. त्याच्या डोक्यात
सततच नवनवीन कल्पना जन्म घेत असतात. पण त्याचा हा प्रयत्न आमच्यासाठी खूपच सुखद
धक्का देणारा आहे.”
ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांच्या नजरेला हे
पुस्तक पडताच अक्षरश: त्याच्यावर उड्या पडल्या आहेत. एकच प्रत असल्याने एका वेळी
हे पुस्तक एकाच वाचकाला वाचता येते. पण, वाचकांना या पुस्तकात या छोट्या लेखकाने
नेमके काय आणि कसे लिहिले आहे याची खूप म्हणजे खूप उत्सुकता आहे. आता पर्यंत अनेक
वाचकांनी हे पुस्तक वाचले आहे आणि तब्बल ५० वाचकांनी या पुस्तकासाठी आपली नाव
नोंदणी केली आहे.
छोटा डीलोन म्हणतो, “मी अगदी छोटा असल्यापासून
या ग्रंथालयात येतो. मला पुस्तकं खूप आवडतात. लोकांनी माझंही पुस्तक वाचावं असं
मला वाटत होतं म्हणून मी ते या ऐडा कम्युनिटी लायब्ररीच्या लेक हॅझेल ब्रांच मधील
एका कपाटात माझे पुस्तक मी सरकवून दिले.”
हे पुस्तक त्याच्या एका ख्रिसमस सणाच्या
अनुभवावर आधारित आहे. शब्दबद्ध करण्यासोबतच त्याने चित्राद्वारे देखील हे
सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एका थँक्सगिविंगच्या संध्याकाळी त्याला घरी परत
पाठवण्यात आले होते कारण, त्यादिवशी सजवलेल्या ख्रिसमस ट्रीवरील तारेचा स्फोट झाला
होता.
यातील चित्रे डीलोनने स्वतः काढली आहेत आणि संपूर्ण
पुस्तक स्वतःच लिहिले आहे. त्यामुळे यात तशा बऱ्याच चुका आणि स्पेलिंग मिस्टेक
आहेत तरीही या छोट्या मुलाचा अनुभव वाचण्यास सगळेच उत्सुक आहेत.
पण ग्रंथालयाच्या कपाटात पुस्तक ठेवण्याची
आयडिया डीलोनला कशी सुचली असेल? त्याचं उत्तर आहे, याची प्रेरणा त्याला त्याच्या
वडिलांकडून मिळाली. त्याचे वडील संगीतकार आहेत. त्यांनी लहानपणी जेव्हा स्वतःचा
पहिला अल्बम काढला तेव्हा त्याच्या १०० सीडीज बनवून त्या वेगवेगळ्या दुकानात
फुकटात वाटल्या होत्या का तर लोकांनी त्यांचं संगीत ऐकावं. त्यांनी केलेल्या या
प्रयोगातूनच मला प्रेरणा मिळाली असल्याचं डीलोन सांगतो.
“त्यांनी तर १०० सीडीज बनवल्या होत्या मी मात्र
एकच पुस्तक बनवू शकलो.” बघा, बाप से बेटा सवाई म्हणतात ते काही उगीच नाही.
सहज गंमत म्हणून डीलोनने जे काही केले त्यातून
त्याला चांगलीच प्रेरणा, प्रोत्साहन आणि प्रसिद्धी देखील मिळाली आहे.
तुमच्या लहानपणी तुम्ही अशी कोणती गोष्ट केली
होती जी तुमच्याही मुलाने करून पहावी असे तुम्हाला वाटते. कमेंट करून सांगा.
मेघश्री श्रेष्ठी
Comments